आकाश मोकळे होते

Submitted by बागेश्री on 27 May, 2014 - 08:17

मी अडकत अडकत जाते
तो सुट्टा सुट्टा होतो,
का सोप्याश्या नात्याचा
गुंताच शेवटी होतो!

अनिवार ओढीचा अर्थ
'शरिराचा मोह'च होतो!
का विणलेल्या नात्याचा,
तो उसवत टाका जातो..

मी अडकत अडकत जाते
तो सुट्टा सुट्टा होतो..

जे सहजा सहजी जुळते
अन पार जिवाच्या होते,
त्या जपलेल्या नात्याचा
टवकाच शेवटी उडतो...

संपते जुनेसे काही
आकाश मोकळे होते,
मग डाव नवा रचण्याचा
तो ध्यास मनाशी घेतो,

ती अडकत अडकत जाते
तो सुट्टा सुट्टा होतो....

-बागेश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कविता आवडली खूप. सहज आणि सोप्पी.
वहात गेले मी अर्थाबरोबर.

का सोप्याश्या नात्याचा
गुंताच शेवटी होतो! >> हेच एक अंतिम सत्य आणि शोकांतिका आहे.

छान

मने गुंतवू ठरावीकश्या मुदतीसाठी
वर्षानंतर व्याजाचा दर बदलत नसतो Sad

भावनेचा ओघ आवडला.