दिले सोडुनी आरसा मी पहाणे..........

Submitted by profspd on 22 May, 2014 - 00:14

दिले सोडुनी आरसा मी पहाणे, कुठे आरसा आरशासारखा?
इथे सूर्य सुद्धा न सूर्याप्रमाणे, दिसे तो अता काजव्यासारखा!

कधी तू, कधी मी, इथे येत जातो, लहर लागते त्याप्रमाणे असे....
सरीसारखी वाटते तू, दिसे मी जणू श्रावणाच्या उन्हासारखा!

हरेकास तू आपले मानतो अन् सरळ त्यास देतोस काळीज तू....
न कोणीच येथे असा सांब भोळा, सरळ एवढा रे, तुझ्यासारखा!

शिखर हे शिखर राहतो काय कोणी असा नेहमी सांग शिखरावरी
कसे शक्य आहे अरे, ती प्रसिद्धी, जिचा झोत तुजला हवा सारखा!

सुना आज आल्या, मुले, नातवंडे, असे घर दिसायास गोकुळ जणू..
अता वय असे साठ माझे, अता मी घरी राहतो पाहुण्यासारखा!

जगा वाच गझलाच माझ्या जरा तू, कळावे तुलाही असे मी कसा?
तसा मावतो मी न गझलेत कुठल्या, असे मी अरे, त्या नभासारखा!

असे वेष त्यांचा जरी माणसांचा, तरी वर्तणूकीत ही श्वापदे....
दिसायास ही माणसे माणसासम, असे चेहरा चेह-यासारखा!

कधीचाच झालो तुझ्या मी हवाली, हृदय, मन, मनातील इच्छा तुझ्या
तुला पाहिजे ते लिही त्यावरी तू, असे मी जणू कागदासारखा!

किती भाग्यशाली असे मी खरोखर, तुझ्या हातचा घाव मज लाभला....
अलंकार जपतात, जपला तसा मी तुझा वार हृदयी फुलासारखा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अता वय असे साठ माझे, अता मी घरी राहतो पाहुण्यासारखा!<<<

तुला पाहिजे ते लिही त्यावरी तू, असे मी जणू कागदासारखा!<<<

छान ओळी