रती

Submitted by भारती.. on 18 May, 2014 - 04:21

रती

तो धुंद रती मदमस्त मिठी तो रसवर्षा
ही पाझरते भू पालवते हिरव्या हर्षा

तो कृष्णमेघ तो तडित-रेघ आभाळझुला
ही ढासळते भू कोसळते झेलत त्याला

ओसरे प्रलय तो अंबर झुंबर शुद्ध निळे
ही स्वस्थ सुस्त वाफांनी तनुमनी निथळे

तो सूक्ष्म सूक्ष्मतर उंच दूर निर्वात पुन्हा
ही पृथुला शिथिला सृजनकळा पांघरताना

भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारती....भारती.....काय लिहू मी या कवितेच्या सौंदर्यावर वा शब्दझुल्यावर ? कुठून आणतेस हा खजिना, कशी बांधतेस ही शब्दओंजळ ?....थक्क करून सोडतेस वाचकाला...कविता वाचू वारंवार की शब्दांच्या करामतीत गुरफटून जाऊ अशी मनःस्थिती होऊन गेली आहे माझी. इतकी रेखीव बांधेसूद कविता सापडायची असेलच तर मग मला पु.शि.रेग्यांचा कपाटात जावे लागेल. शब्दसमूहांची विशिष्ट रचना आणि आशय इतका प्रभावी उतरला आहे... अन तोही आठ ओळीत !

"....पाझरते भू पालवते...ढासळते भू कोसळते....अंबर झुंबर....पृथुला शिथिला...." ~ तू जादुगार आहेस, भारती.

वेड लागेल....लागले आहेच.

धन्यवाद शशांक, अशोक Happy
Jouissance या Lacan प्रणीत संकल्पनेवर काही थोडे वाचन/विचार करताना तिची अभिव्यक्ती मराठीत ही अशी झाली !'नभ आणि भू ' ही नेहमीची प्रतीके घेऊन !

तो सूक्ष्म सूक्ष्मतर उंच दूर निर्वात पुन्हा
ही पृथुला शिथिला सृजनकळा पांघरताना<<<

इंटरनेटच्या युगात, जेथे 'का ही ही' लिहिले तरीही शेकडो लाईक्स आणि प्रतिसादांमधून दंडवते आणि लोटांगणे मिळतात, त्या युगात ही अशी कविता वाचायला, समजून घ्यायला, मुरवून घ्यायला कोणाला वेळही नसतो.

हीच कविता आंतरजालीय कवितांचा फेस यायच्या आधी प्रसिद्ध झाली असती तर बरीच अधिक सुदैवी ठरली असती.

अशोकरावांचा प्रतिसाद कोणाला अतिशयोक्तीयुक्त वाटला तर त्याने कविता पुन्हा वाचावी.

अनेकदा कवितेच्या आशयावर अभिव्यक्तीमधील प्रासादिकता हावी होते. ही रचना वाचूनही मनात असे आले की जे सांगायचे आहे त्यापेक्षा ते कसे सांगितले गेले आहे ते अधिक प्रभावी वाटत आहे. पण म्हणून काय? काहीजणांची शैली अशी असते की 'एखादी गोष्ट कशी सांगितली जावी आहे हेसुद्धा त्या गोष्टीमधील सांगणे असू शकते'.

भारती....

नादशब्द भ्रम यावरूनच मी देखील गेला तासभर रेग्यांची एक कविता धुंडाळत होती....ती "गंधरेखा" त आहे...."पाहिले न पाहिले..."

"जे मत्त फुलांच्या कोषांतुन पाझरलें,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
जे मोरपिसांवर सावरले....
ते - त्याहुनही - आज कुठेसे
पुन्हा एकदा
तशाच एका लाजवंतीच्या
डोळ्यांमध्ये - डोळ्यांपाशी
झनन-झांजरे मी पाहिले..."

~ ही पूर्ण कविता आहे माझ्याकडे....तुला "गंधरेखा" मिळाले तर ठीकच, नाहीतर तुझ्या विपूत देतो ही पूर्ण रुपातील कविता.....

इथेही...."झनन-झांजरे....ठिबक-ठाकडे....बहर-बावरे" अशा नादशब्दांचा जो वापर रेग्यांनी केलेला दिसत आहे तिथे त्या भावना डोळ्यासमोर येतात...अगदी तुझी कविता याच रंगाने खुलली आहे.

बेफिकीर,अशोक,
तुमच्या प्रतिसादांनी फार आनंद झाला आहे इतकेच म्हणू शकते . कविता समजून घेण्याची एक वेगळी उत्कटता असते. ती सर्वांमध्येच आणि सारख्याच तरलतेने असण्याची मी अपेक्षा करत नाही. ती असेल तर फार मोठा लाभ आहे तो !
अशोक, रेग्यांची कविता ही सोपे आणि अवघड या शब्दांनाच आव्हान देणारी. त्यांची गंधरेखा माझ्याकडे होती, हरवलीय. विपूमध्ये अवश्य द्या.

आशय, अल्प पसारा आणि मोहक, विभ्रमी शब्दकळा यामुळे मलाही " त्रिधा राधा" ची प्रकर्षाने आठवण आली.
बहुतेक वाचक शब्द समूह वाचतात आणि शेवट दिसत असलेल्या कवितेसारख्या गोष्टीच्या अंतिमाकडे पोचायची उपजत घाई असते. या प्रक्रियेत वाचलेल्यावर समजेचा संस्कार करायला थांबण्याचे स्थैर्य नसेल तर दुर्बोधता वा अगम्यतेचा शिक्का मारून पुढे जाणे कमी त्रासाचे वाटू शकते. ही कविता पहिल्या वाचनात अशीच वाटण्याची शक्यता आहे. मात्र थांबून , रस घेऊन वाचणार्‍यास मिळणारा वाचनानंद फार दुर्मिळ जातीचा असेल, जो मलाही मिळाला. दुपारपासून अनेकदा वाचली आणि वेगवेगळी संलग्न रुपके, प्रतिमा तरळत राहिल्या.
पूर्वी त्रिमित रंगीत प्रतिमांचे एक सुंदर पुस्तक माझ्याकडे होते, त्याची आठवण झाली. एक नजर टाकली तर केवळ कोरा कागद, पण मन एकाग्र करून, डोळ्यांना आव्हान देत पाहिले तर कागद सोलत एक लखलखते चित्र अवतरायचे.
मला ही रचना एक अशीच त्रिमित कविता म्हणून लक्षात राहील.

अहाहा! माझ्या आवडत्या पावसाचे आणि तृषार्त धरेच्या मीलनाचे इतके उत्कट, यथार्थ आणि शब्दसंपन्न वर्णन!!!!!

क्या बात है भारतीताई! अगदी सभोवती दरवळला पाऊस!

अशोकजी, बेफि आणि अमेय यांचे प्रतिसादही अगदी बोलके. कवितेकडे वेगवेगळ्या दृष्टीने पहायची नजर देणारे!(द्विरुक्ति झालीये वाक्यात ..पण जाणवले ते असेच! Happy

पुनःपुन्हा वाचावी अशी कविता..

कसं सुचतं गं तुला Happy

toooooooooooooooooooooooooooo gooooooooood!!

_____/\_____

_____/\_____

_____/\______

मिरिंडा , जाई,उल्हासजी,अंजली,दिनेश, आभार मनापासून.
अमेय, त्रिधा राधा , त्रिमित चित्र .. अगदी ज्ञात्याचं पाहणं कवितेकडे .
आनंदयात्री,काहीतरीच काय ! आपण सगळेच कधी खूप सुंदर आणि कधी त्या पातळीला न पोचणारं असं लेखन करतच असतो !

वा सुंदर, आवडली. प्रतिसादपण अतिशय सुरेख आहेत. ह्या सर्वात माझा प्रतिसाद खरंच खूप सामान्य आहे. किती छान लिहितात कवितेबद्दल, किती सुंदर रसग्रहण करतात. अशा मैफिलीत फक्त डोळे मिटून ऐकत राहावे, आपण काहीच बोलू नये असे वाटते.

अजून येईन इथे परत कविता वाचायला आणि प्रतिसाद वाचायलाही.

.

भारतीताई ....__/\__

शब्दाशब्दानं मनावर गारूड केलंय .

Happy

भारतीताई ... ___/\__ ! अफाट सुंदर कविता! आभाळ आणि पृथ्वीच्या धसमुसळ्या प्रेमाचं तरल वर्णन!!

किती सुंदर लय.... किती अप्रतिम शब्दवैभव... किती व्यक्त होण्यातली उत्कटता...!!!
अजून काय प्रतिसाद द्यावा समजत नाही... क्षमा असावी. शब्द तोकडे आहेत.

व्वा, खूप सुंदर. मनाला भावली. प्रतिसाद ही अप्रतिम.
अजून येईन इथे परत कविता वाचायला आणि प्रतिसाद वाचायलाही.>> अंजू, मी पण कारण कविता आणि प्रतिसाद दोन्ही परत परत वाचण्यासारखे.

अत्यंत उच्च रचना....

मी तर नादखुळा झालो (सध्या अ(न्)र्थांनी अतिरेकी वापराने अत्यंत गुळगुळित झालेला शब्द वापरतोय त्याकरता क्षमस्व !)

भारतीताई, पुन्हा पुन्हा वाचतेय, प्रत्येक शब्द एकेक निराळं दृश्य डोळ्यांसमोर उभं करतो आहे. ओळीओळीत आवेग शिगोशीग भरलेला आहे. मी नतमस्तक होते दर वेळेस तुमच्या कविता वाचताना.

मामा, बेफिकिर आणि अमेय, तुमचे प्रतिसाद आम्हालाही समृद्ध करणारे आहेत. तुम्हा तिघांनाही त्यासाठी मुद्दाम वेगळे धन्यवाद! पु. शिं. ची कविता मलाही वाचायला आवडेल. अमेय, त्रिधा राधा सुद्धा.

भारतीताई,
तुमच्या प्रतिभेला लक्ष लक्ष लोटांगणे !!!

अशोकजी, बेफिकीर आणि अमेय यांचे प्रतिसादही खूप छान आहेत.

भारतीताई,

या कवितेला सुंदर म्हंटलं तर आज दिव्य लोकांतून एक अप्सरा येउन मनमोहक नृत्य करून परत आकाशी गेलेली वाटते. मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय ते अनुभवता आलं. हे भाग्य प्राप्त करून दिल्याबद्दल तुमचे शतश: आभार. Happy

भानावर येऊन थोडं तटस्थपणे बघितल्यावर एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे प्रत्येक द्विपदीतील पहिली ओळ अमूर्त आहे तर दुसरी समूर्त आहे (दुसऱ्या द्विपदीत क्रम उलट). हे मुद्दाम की सहज?

आ.न.,
-गा.पै.

Pages