ययाती ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 May, 2014 - 11:34

पेगमधील उंची मद्याचा
शेवटचा घोट घेवून
चढू लागलेली झिंग
डोक्यामध्ये साठवून
हळू हळू तो उठला.
जडावलेल्या देहाने
आपल्या प्रचंड मोठ्या
स्टुडीओत फिरू लागला
कित्येक सुवर्ण आणि
रौप्य महोत्सवी यश
साजरी झाली होती इथे
कित्येक महत्वकांक्षी स्वप्नं
उधळली गेली होती इथे
पद पैसा प्रतिष्ठा प्रेम
मान सन्मान वैर अभिमान
पडद्या शिवाय तेच जग
प्रत्यक्ष जगत होता तो
पंच मकारांच्या यज्ञात
देवच झाला होता तो
आता ही त्याचे नाव होते
दरारा होता भय होते
दरबारात वजन अन
वाढणारे धन होते
पण ..
पण ते दिवस गेले होते
तसे भोगणे घडत नव्हते
तो स्पर्श हर्ष विरघळणे
तो गंध सुगंध धुंदावणे
ती मस्ती सुस्ती उधळणे
हाती असून सारे काही
जणू काही काही नव्हते
विकल गात्रे अन मन अभिलाषी
सुखपोभोगाच्या लहरी लक्षी
“आयुष्य किती छोटे असते “
गर्द सिगारी धूर फेकत
जणू स्वत:ला धुरात दडवत
स्वत:शीच पुटपुटला तो .
थोडा लडखडत तोल सावरत
त्याच त्याच्या मयखान्यात
पुन्हा एकदा शिरला तो
ती ययाती दीर्घ आसक्ती
सर्वव्यापी घेवून अतृप्ती
स्कॉच शरण गेला तो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users