मत्सर, हेवा यांचे जर आकर्षण नसते.......

Submitted by profspd on 16 May, 2014 - 01:59

मत्सर, हेवा यांचे जर आकर्षण नसते.......
रामराज्य असते येथे रामायण नसते!

स्थळकाळाच्या अतीत माझ्या गझला सा-या.......
उगाच त्यांचे झाले रे, पारायण नसते!

स्वत:च जातो ऐकायाला त्यांच्या गझला.........
मला मैफिलींचे कुठल्या आमंत्रण नसते!

मीच दिली दुनियेला जर का संधी नसती........
विटंबनांचे हे माझ्या प्रक्षेपण नसते!

पायपीट जर केली नसती अशी भटांनी........
आज गझल लिहिणारे हे इतकेजण नसते!

खरेच तू आहेस खुळा अन् अती वेंधळा.......
शहाणाच तू असता तर हे लक्षण नसते!

अंगमेहनत शिकला असता गाढवातली.........
माणसा तुझ्यामध्ये हे गाढवपण नसते!

तुझ्यामुळे हे नभ पाझरते, शेते पिकती........
तुझ्याविना ही हिरवळ नसती, श्रावण नसते!

पहाताक्षणी प्रेमामध्ये तुझ्याच पडलो.......
तुझ्याविना गझले माझे वेडेपण नसते!

बाप राबला, आई झटली माझ्यासाठी...........
मायबाप जर नसते तर हे शिक्षण नसते!

तू नाही पण तुझी आठवण ठायी ठायी.........
तुझ्याविना या घरास माझ्या घरपण नसते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगमेहनत शिकला असता गाढवातली.........
माणसा तुझ्यामध्ये हे गाढवपण नसते!

निरीक्षण आवडले.