प्रतिकावरील शायरी

Submitted by profspd on 14 May, 2014 - 03:17

आकाश/नभ/गगन/व्योम/आभाळ/अंबर या प्रतिकावरील शेर

आता कुठे जरासे आकाश शांत झाले....
मी बेचिराख झालो अन् ते निवांत झाले!

..............प्रा.सतीश देवपूरकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सर छान उपक्रम

तरहीच्या धाग्यासारख्या दर काही दिवसांनी नवनवीन प्रतीके /प्रतिमा टप्याटप्याने सुचवत रहावे ही विनंती

असो , माझे शेर देतो ..

प्रतीक : नभ

अश्या रितेपणातही कसे भरून यायचे
नभाकडून हे कसब शिकायला हवे मला

आकाश पांघरू धरा अंथरुण बनवू
स्वप्नांनी भरवू वातावरणाचे थर

आकाश/नभ/गगन/व्योम/आभाळ या प्रतिकावरील माझे तीन शेर

आभाळ उतरले खाली दाराशी, खिडकीपाशी;
पिंजरा घराचा आता पिंजरा राहिला नाही!

पाय मला मातीचे होते....साफ विसरलो!
उगाच केली आकाशाशी बरोबरी मी!!

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

................प्रा.सतीश देवपूरकर

जगा वाच गझलाच माझ्या जरा तू, कळावे तुलाही असे मी कसा?
तसा मावतो मी न गझलेत कुठल्या, असे मी अरे, त्या नभासारखा!

व्योम सर्व ओढणीत मावते तिच्या....
सांडते सभोवती कितीक तारका!

दूर आकाश मोकळे होते.....
पंख माझेच वेंधळे होते!

पंख मिळाले सोनेरी पण, हाय गगन मी गमावले....
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!

आभाळ फाटकेही शिवतात लोक काही.........
काळीज फाटलेले टाचायला शिकावे!

हे असे होईल काही, वाटले नव्हते!
एवढे आभाळ केव्हा फाटले नव्हते!!

............प्रा.सतीश देवपूरकर

लावू तरी ठिगळे किती मी?
आभाळ माझे फाटलेले!

आकाश पाझराया हृदयात लागलेले......
काढून हृदय माझे त्याची पखाल केली!

कैक तारे निखळती दररोज वेड्या
काय पडतो रे, फरक त्या अंबराला?

कोणताही पिंजरा आकाश नसतो....
कोण समजावेल हे त्या पाखराला?

भले गगनस्थ ता-यांनो, तरूंनो, पायवाटांनो.....
करा वर्षाव स्मरणांचा परंतू, श्वास घेऊ द्या!

का ठेंगणे न व्हावे आकाश सांग त्याला?
आकाश खुद्द उतरे या पाखरात माझ्या!

पहा बाजार वाळूचा, भुईचा पोचला गगनी......
पहा उद्योग लोकांचे नदीकाठी, तुकारामा!

त्यास बोलावते नभ अरे सारखे....
दूर हो पिंज-या, दे उडू पाखरा!

तारांगणाप्रमाणे आहे पदर प्रियेचा....
मज पाहिजे कशाला गगनामधील तारा?

प्रेमामध्ये गगन ठेंगणे, स्वर्ग धरेवर असतो.....
जगावेगळ्या धुंदीमध्ये समजत नाही काही!

प्रा.सतीश देवपूरकर

असेल व्योम फाटले, धरा असेल भंगली.....
पहाड लागला रडू असा कसा ढसाढसा!

तुझ्या नभातील मेघ दारावरून गेले!
उजाड डोळे तुडुंब अगदी भरून गेले!!

किती हे चालले तांडव चहूबाजूस मृत्यूचे!
कसा माणूस धरणीचा ठिगळ लावेल आभाळा?

भले घडो ढगफुटी, खचू दे पहाड, येवोत पूर देखिल....
दुभंगलेल्या धरेस मिटवायची धमक या नभात नाही!

जरी भरारी नभात घेतो, भुईवरी घट्ट पाय माझे....
हवा न डोक्यात माझिया, मी तुझ्याप्रमाणे भ्रमात नाही!


.................प्रा.सतीश देवपूरकर

खूप उद्विग्न छळाने धरणीच्या होता;
आपले दु:ख उरातील, नभाशी बोला!

नभास नाही फिकीर पण, ही धराच साक्षी!
गळून पडतो अलीकडे रोज एक तारा!!

अशाच साठी नभात वणवण अजून चालू दिसे ढगांची.....
अजून त्यांना तृषार्त दिसले धरेवरी माळरान नाही!


................प्रा.सतीश देवपूरकर

पांगळा जरी होतो......मन न पांगळे होते!
लीलया नभालाही लंघले प्रयत्नांनी!!

तारांगण आकाशाचे उतरले तिच्या पदरावर!
तो चंद्र नभीचा सुद्धा भाळला तिच्या मुखड्यावर!!

नभ म्हणते की, धरणीवर हर रात्र कशी पुनवेची?
तो चंद्र नभीचा जळतो धरणीच्या या चंद्रावर!

उरला न फरक आताशा धरणी अन् गगनामध्ये!
प्रतिबिंब धरेचे दिसते बघ, पडलेले गगनावर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर

मोकळे व्योम करते इशारा......
पंख नसुनी भरारून आलो!

............प्रा.सतीश देवपूरकर

दूर आकाश मोकळे होते!
पंख माझेच वेंधळे होते!!

लागलो नादी उगा मी त्या नभाच्या!
लाभल्या नाहीत वाटा परतण्याच्या!!

.............प्रा.सतीश देवपूरकर

निहाळे ही धरा भेगाळलेली.....
नभामध्ये किती दाटी ढगांची!

..........प्रा.सतीश देवपूरकर

पांगळा असुनी भरारी लागलो घेऊ.....
वाकले आकाश सुद्धा माझियासाठी!

का थरारतो पहाड, अन् निहाळतो नभास?
वेगळेच रंग आज लागले दिसू नभात!

............प्रा.सतीश देवपूरकर

खुद्द नभाची ही मर्जी जर, हरकत नाही!
नकोस देऊ पंख हवे तर, हरकत नाही!!

सोडला हात काय गगनाने?
पंख तुटल्यासमान का वाटे?

...........प्रा.सतीश देवपूरकर

लाव नंतर नभाला ठिगळ तू.....
मी तुला आज टाचून देतो!
ही नजर आजही सूक्ष्म आहे....
दे सुई, आण, ओवून देतो!
.............प्रा.सतीश देवपूरकर

भल्या पहाटे कोण मला देतो आरोळी?
कुणी काढली दवबिंदूंची ही रांगोळी?
तलम धुके पांघरून धरणी निजली आहे....
साखरझोपेमधेच अजुनी बुडली आहे!
मंद मंद झुळकींची ये जा सुरू जाहली....
किलबिल किलबिल हळू पाखरे करू लागली!
रविकिरणांचे सडासारवण सुरू जाहले....
प्राजक्ताने पखरण केली...अंगण सजले!
सकाळच्या शाळेची घंटी जणू वाजली!
पहा कावळ्यांची तारेवर शाळा भरली!!
क्षितिजावरती रंगपंचमी सुरू जाहली....
जाग नभाला सोनेरी किरणांनी आली!
जणू धरेला साद नभाने दिली असावी....
धरणी सुद्धा हळूच नकळत झाली जागी!
सूर्य लागला तेजाळाया जसा अंबरी....
धरणीचीही एकच लगबग सुरू जाहली!
घडी घालुनी धुके तिने ठेवले नेटके!
अन् किरणांनी स्नान जणू अभ्यंगच केले!!
किरणांची चाहूल लागता मीही उठलो....
प्रसन्न चित्ताने सूर्याच्या पायी पडलो!
मला वाटले स्वप्न पहाटेचे ते होते!
स्वप्न नव्हे ते तर सत्याचे दर्शन होते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर

त्याच्यामुळेच झाली ओळख ख-या नभाची
गगनास बिलगणारा तोही विहंग होता!

वाटले त्यांना जणू आकाश झाले मालकीचे
खुद्द चंद्राशी जणू त्यांचे म्हणे संधान होते!

.................प्रा.सतीश देवपूरकर

देवसर मला वाटते की आता नभ /आकाश इत्यादी इत्यादी हे प्रतीक बदलण्याची वेळ आली आहे नवीन प्रतीक सुचवायची वेळ आली आहे

धन्यवाद

Pages