स्मशान

Submitted by संतोष वाटपाडे on 30 April, 2014 - 23:25

आमच्या गावी मध्यरातीला
नदिकिनारी स्मशानातूनी
भुतावळीचा आवाज येतो
असे आमचे आज्जे पणजे
त्यांना त्यांचे खापरपणजे
खुप भयानक किस्से सांगून
जमिनीवरती रांगून रांगून
कशाकशाचे आवाज काढून
अगदी ठासून सांगायाचे....

वेस सोडली गावाची कि
घाम यायचा सर्वांगाला
नदीत कोणी बसले आहे
असेच वाटे बघणार्‍याला
झपझप पाऊल टाकत टाकत
तिरप्या नजरेनेही तिकडे
बघेल कोणी भले बहाद्दर
मुळीच नाही कधीच नाही
आवळून नाजूक अवयव त्यांचे
भनाट सगळे धावायाचे...

जिथे मढ्याची जागा होती
तिथे पांढरी मडकी फ़ुटकी
सुतळी काथ्या कपडे काही
काड्या कडबा तिरडी तुटकी
असे पसरले तिथे रोज कि
कुणीतरी या स्मशानातल्या
काळ्या भक्कम खडकावरती
जणू खरोखर निजले आहे
वेशीमधल्या दरवाजातून
असेच अगदी भासायाचे...

स्मशानामधे झाडे होती
जुन्या काळची दोन वडाची
दुरुन अजगर वाटायाची
वारा येता करकरणारी
पारंबी एक जाड बुडाची
ढोलीमध्ये घुबडांसोबत
नाग नांदतो काळा काळा
अन बोलवतो जाणार्‍याला
येणार्‍याला बघणार्‍याला
अख्खे माणूस गिळण्यासाठी
असे कुणीही बोलायाचे....

कधी कधी तर खेळत असता
लाल आमचा रबरी चेंडू
उंच उडाला त्याच दिशेने
आम्ही फ़ळकुट्या दांड्या फ़ेकून
घरी जायचो अगदी धावत
आमच्यामधले धट्टेकट्टे
जाड्गोबरे पहिलवानही
रस्त्यामधल्या हनुमंताला
पळता पळता डोळे झाकून
हात बिचारे जोडायाचे...

लहान होतो मोठे झालो
फ़िरलो शिकलो शाळा सारी
तरीही सुद्धा त्या वाटेने
सहा वाजल्यानंतर आम्ही
कधी आजवर गेलो नाही
कारण तेथे दात विचकूनी
केस पिंजली हडळ हासते
तिच्यासोबती नाचायाला
हाका मारते कुणाकुणाला
असे मनोमन वाटायाचे....

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users