.....मदांध सत्ता ...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 April, 2014 - 13:43

तोंडामध्ये पान चघळत
अजस्त्र देह धडधाकट
पुढे येती सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कुणाकुणाच्या नावाचा
टिळा कपाळी लावलेला
डोळ्या मध्ये बेदरकार
सत्तेचा मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र वासात मिसळली
परीटघडीच्या पेहारावी
गुंडगिरी सजलेली
आम्ही झोडू आम्ही मोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्या वाचून
समोरच्याला पार गाडू
होते दानव काय वेगळे
यवनांनीही हेच केले
बाहुच्या मदात मातले
परि शेवटी मातीत गेले
नियती फिरवे गरागरा
तीच वर्तुळे पुनःपुन्हा
सत्ता मद अविचार अंत
कळूनी सारा घडे गुन्हा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विप्र,

एकदा विदुराने दुर्योधनाला कळवळून विचारले की, "बाबारे, तुला धर्म आणि अधर्म यांतला फरक समजावून सांगण्यासाठी आचार्यांची नेमणूक करू का?" त्यांच्या सहवासात दुर्योधनाच्या स्वभावात फरक पडेल अशी विदुराची अटकळ होती. तर दुर्योधनाने दिलेले उत्तर मोठे मननीय आहे. तो म्हणाला, "आचार्यांकडून वेगळं काहीही शिकण्याची मला गरज वाटत नाही. तुम्ही ज्याला धर्म म्हणता तो मला चांगला परिचित आहे. मात्र माझं मन ज्याकडे आकर्षित होतं त्याला तुम्ही अधर्म म्हणता."

दुर्योधनाच्या उत्तराचं सार कवितेत उतरलंय! Happy

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : माननीय हा चुकीचा शब्द बदलला आहे.

अतिशय मार्मिक टिप्पणी.मननीय,सुंदर ....धन्यवाद