झळा

Submitted by संतोष वाटपाडे on 28 April, 2014 - 00:26

खाटेवरती का म्हातारी पडल्या पडल्या कण्हते आहे
कुणीतरी या नरड्यामध्ये ओता पाणी म्हणते आहे...

ऊन असे कि काळ्या मातीनेही अगदी प्राण सोडले
बांधावरली बाभूळ वेडी तरी सावली विणते आहे

ढेकळातल्या आडव्या रेषा भाळावर दिसणारंच नक्की
झोळीमधल्या क्षीण मुलाचे नशीब यातून बनते आहे...

पिवळ्या खुरट्या गवतामध्ये गाय मारते असंख्य टोचा
भकास डोळ्यावरती माशी पिसाटशी भणभणते आहे...

कधीतरी या तप्त उन्हाने घाम फ़ुटावा आभाळाला
अंथरुणावर धरती व्याकूळ तापाने फ़णफ़णते आहे....

--- संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहिलीचे, तृष्णेचे वर्णन छान झालेले आहे. पण कविता वर्णनाच्यापुढे जावी अशी अपेक्षा काही दिग्गजांनी केल्याचे स्मरते व म्हणून थोडे आगाऊपणे येथे नोंदवलेही. (र्‍हस्वदीर्घांकडे - मात्रांच्या हिशोबाच्या हेतूने - बघणे आवश्यक).

(अवांतर - मायबोलीकर शांताराम खामकर ह्यांच्या कविता आपण वाचता का? वाचत नसलात तर अवश्य वाचाव्यात अशी मैत्रीवजा विनंती)

कृ गै न

बेफि +१

मी आजवर त्यांच्या कविता वाचल्या नाहीयेत...वेळ काढून अवश्य वाचेन ...धन्यवाद बेफिकीर आणि विजयजी..