मदत केलीत?.... मग भोगा आपल्या कर्मांची फळं......

Submitted by आशिका on 25 April, 2014 - 08:29

एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ....

हे लहानपणापासून ऐकत आलो आणि तसेच संस्कारही झालेत आपल्या सर्वांवर.

तर अशी ही मदत करण्याची वृत्ती, कधी नातलगांना, कधी मैत्रीच्या नात्याने तर कधी माणुसकीच्या नात्याने अनोळखी व्यक्तीला आपण सर्वांनीच येन केन प्रकारेण मदत ही केलीच असेल.

परंतु कधी असं अनुभवलंय का आपल्यातील कुणी की करायला गेलो एक आणि झाले भलतेच, किंवा केलेली मदत आपल्याच अंगाशी आली, चार-चौघात हसं झालं, फजिती झालीय?

हो ना? माझे आहेत असे काही अनुभव जे मी सांगणार आहे, अशा अनुभवांचं संकलन करण्यासाठी हा धागा, काही नकारात्मक संदेश देण्यासाठी नाही तर एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्यासाठी की काळाबरहुकुम कशा सगळ्या व्याख्याच बदलत जातायंत, मदतीच्या देवाण-घेवाणीतही....आणि आपण समाजात वावरत असतांना कसं सजग, सतर्क राहण्याची गरज आहे ते नीट पडताळून पाहण्यासाठी.... आणि हो...असेच कुणाचे विनोदी प्रसंग वाचून दिलखुलास हसण्यासाठीही...

चला तर मग करुया सुरुवात, माझ्यापासूनच?

१. स्थळ - सी.एस्.टी. स्टेशनकडे जाणारा भुयारी मार्ग, वेळ- संध्याकाळची अर्थात गर्दीची.
जिन्यावरुन एक वृद्धा जड सामानाच्या दोन पिशव्या घेऊन, अत्यंत कष्टाने पायर्या चढत होती, हे एव्हढंच दृश्य बस होतं आमचं मन द्रवायला. घाईघाईत २-२ पायर्या चढुन आजीबाईंपर्यंत पोहोचले व म्हटले, "आजी, मी धरु का एक पिशवी?", असे म्हणून हात पुढे केला तर ही चाणाक्ष आजीबाई कोण हातचलाखी, नजरचलाखी करणारी भामटी आलीय आपल्याजवळ अशा आविर्भावात आपल्या पिशव्या छातीशी कवटाळून व संशयी नजरेने माझ्याकडे बघत भराभर चढू लागली व अवतीभवतीचेही मी काय त्या म्हातारीला केले असावे अशा नजरेने माझ्यकडे पाहू लागले. सुदैवाने आपल्या ओळखीचे कोणी नाही याची खात्री करून मी तिथून सटकले होते.

२.काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट, व्हॉट्स-अप, फेसबुक वर एक संदेश फिरत होता की आपल्या घरी मेजवनीनंतर उरलेले अन्न फेकून देऊ नका, आमची संस्था जी एक अनाथालय चालवते, तिथे फोन करा, आपल्या विभागातील आमचे सदस्य अर्ध्या तासांत येऊन अन्न घेऊन जातील व अनाथ बालकांचे पोट भरल्याचे पुण्य आपणांस मिळेल इ. तो फोन नंबर सेव्ह करुन ठेवला होता. असेच एकदा काही कर्यक्रमानंतर बरेच जेवण उरले आणि सा.बांना म्हटले मी एकच फोन करते त्यांची माणसे लगेच येतील आणि जेवण घेऊन जातील. फोन लावला, तो बरोबर अनाथालयाचाच होता. पण फोनवरील व्यक्तीला या उपक्रमाचा काहीही गंध नव्हता. उलट आमच्या मुलांना उरले-सुरले नाही तर ताजे अन्न आम्ही रोज देतो असे मला खडसावण्यांत आले आणि फोन अर्थातच आपटला गेला.

३. लोकल ट्रेनचा प्रवास, दोन्ही हात नसलेला( शोले पिक्चरमधील संजीव कुमार स्टाइलमधे शर्ट नुसताच अडकवलेला) एक भिकारी गळ्यात डबा अडकवून भीक मागत होता. या प्रसंगाला बळी पडलेली सुदैवाने मी नसून माझी मैत्रीण आहे. माझ्या मैत्रीणीने त्याची परिस्थिती पाहून त्याला दहा रुपये दिले. ते घेऊन महाशय दरवाजात जाऊन उभे राहिले. स्टेशन येतच होते, तेवढ्यात अचानक वार्याची एक झुळूक आली आणि या भिकार्याचा शर्ट वर उचलला गेला, आतमधे याचे दोन्ही हात, व्यवस्थित घडी घालून ठेवलेले, वर कहर म्हणजे त्याने निर्लज्जपणे तिला हात उंचावून टाटा केला आणि क्षणात खाली उतरून गर्दीत पसारही झाला. झाली की नाही फजिती बिचारीची?

हे वाचून असेच वाटते ना की भलाईका जमानाही नही रहा......

आता आपलेही असे किस्से येउद्यात.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिका,

तुमचे किस्से मजेशीर आहेत, पण 'भोगा आपल्या कर्माची फळं' ह्या उक्तीला शोभेलसे नाहीत. तुमचे किस्से असे आहेत ज्यात तुमची किंवा मदत करणार्‍याची थोडीशी फजिती किंवा गंमत झाली आहे.

तुमच्या शीर्षकाला शोभतील असे किस्से माझ्याबाबतीत मात्र अनेकदा घडलेले आहेत. ते मी हळूहळू येथे पोष्टत राहीनच. तोवर तुम्हीही 'भोआकफ' वाले किस्से पोष्टा! Happy

धागा छान आहे.

आशिका हे असे अनूभव भरपूर आहेत माझ्याकडे. त्यामुळे माणुस ( बाई/बुवा इत्यादी इत्यादी) पारखल्याशिवाय मी शक्यतो आता मदतीच्या फन्दात पडत नाही, पण काही वेळा मदत केलीच तर नेकी कर, दर्यामे/ गन्गामे डाल असे आचरण ठेवते.

शेवटी आपल्या नशीबात चान्गले/ वाईट हे नेहेमी लिहीलेच असते. आणी आपले बर वाईट हिशेब ठेवणारा वर बसलाय, तो काही आन्धळा नाहीये. मग वाईट कशाला वाटुन घ्यायचे? एक अदृष्य नजर आपल्या चान्गल्या कृत्याकरता नेहेमीच
आपल्या पाठिशी असते, हे लक्षात ठेवायचे.

वाणीत सरस्वती असावी आणी मनात लक्ष्मी असावी.:स्मित:

हे किस्से विनोद म्हणुन वाचायला छानच आहेत. पण हा आपला आणि आपल्या मैत्रीणीचा अनुभव आहे आणि आपण निराशेपोटी हे लिहले असेल तर मात्र विचार बदलायला हवा.

जगात खुप गरजु लोक आहेत. ज्यांना पिशव्या उचलुन आपण छोटीशी मदत करु शकतो किंवा त्यांच आयुष्य सावरण्याइतकी मोठी मदत करु शकतो.

प्रश्न हा आहे की खरी गरज कुणाला आहे. खरा गरजु छोट्याश्या मदतीने भारावुन जातो या उलट ज्यांना गरज नसताना मदत केली जाते असा माणुस आपल्याला आलेले चुकीचे अनुभव देऊन जातो.

आपल्याला मदत केल्याच समाधान लाभत असेल तर नक्कीच खरा गरजु कोण हे शोधायचे तंत्र अवगत करायला हवे.

हे तंत्र आपल्याच अनुभवाने आनि साधे माणुस ओळखण्याच्या कलेने साध्य होते.

एकदा का तंत्र विकसीत झाले म्हणजे असा अनुभव येणारच नाही असे नाही पण त्याचे प्रमाण मात्र १० चांगले गरजु सापडतील आणि एक चुकीचा सापडेल असे होईल. याला कारण प्रबळ भावना जी विवेकावर मात करते.

पण मदत करण्याचा विचार सोडु नका.

छान आहेत किस्से. निव्वळ भिकार्‍यांचे किस्से लिहायला गेले तर त्याचा वेगळा धागा बनेल. मुंबईत तर बरेच अनुभव येतात. गंमत म्हणजे इतर पर्यटनस्थळी स्थानिक लोक पर्यटकांना गंडवायला बघतात आणि इथे मुंबईत बाहेरचे लोंढे येऊन स्थानिक मुंबईकरांना गंडा कसा घालता येईल या धंद्याला लागतात. त्यामुळे इथे मदत नेहमी जपूनच. काही सुचले आठवले किस्से तर भर टाकतो धाग्यात नक्की.

वॉव ! हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं का? मला डफ्फर म्हणुन घोषित केलं होतं दोन वेळा आणि दोनही वेळेस भरपुर घरुन भरपुर रागवुन घेतलं होतं.

किस्सा १ - कॅम्पमधलं फेमस गार्डन वडा पाव माहित आहे का? त्या कॉर्नरजवळ वळताना एक स्कुटीवाली घसरली. तिला रिक्षावाल्यांनी मदत केली, पण तिचा ड्रेस फाटला होता आणि खरचटलं खुप होतं. सकाळी ८/८.१५ वेळ असल्याने फार लोक नव्हते, म्हणुन मी तिच्याबरोबर थांबले. तिच्या घरच्यांना माझ्या सेलफोनवरुन फोन केला. नंतर त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणुन तीची बाइक पार्क करुन माझ्या कारमधे तिला हॉस्पीटल मधे नेलं. तिचे वडिल तिथे आल्या आल्या माझ्यावर ओरडायलाच लागले. मी एकदम शॉकमधे. त्यांची बावळट्ट मुलगी फक्त रडत होती. मग त्यांनी मला सांगितलं की हॉस्पीटलचं बिल कळाल्याशिवाय मी जायचं नाही. अर्ध बिल मी भरायलाच हवं कारण त्यांच्या मुलीला माझ्या कारचा धक्का लागला. ( हा त्यांचा अंदाज कारण मी कामं सोडुन त्यांना मदत करायला फिरत होते.) मग मुलगी होशमधे आली आणि वडिलांना माझी चुक नाही हे सांगितलं. त्यांनी मला डर्टी लुक्स देत जायला सांगितलं. तेव्हापासुन रस्त्यावर अपघात दिसला तर पहातही नाही.

किस्सा २ - सिटी प्राइडच्या एस्केलेटरजवळ एक ६०च्या आजी उभ्या होत्या. त्यांनी मला स्टेप टाकेपर्यंत हात धरायची विनंती केली. मी त्यांना नक्की जमेल का विचारलं, कसं स्टेप अप करायचं ते सांगितलं तरी घोळ झालाच. त्यांचा पाय स्टेपच्या बॉर्डरला आणि त्या पडल्या. मेटल स्टेपमुळे हातला किंचीत खरचटलं पण ज्या काही किंकाळ्या आणि लोकांचे रागीट लुक्स झेलावे लागले. नवरा आणि त्याच्या मित्रांनी भरपुर झापलं. मी बदाबदा रडले आणि सिनेमा बुडवुन घरी आलो आम्ही. आता प्रत्येम मुवीला गेल्यावर त्या प्रसंगावरुन टोमणे ऐकते. सगळे मला सुचवतात कि बघ त्या आजी, बघ ते काका, दे त्यांना हात. Sad

असे अनुभव थोड्याफार प्रमाणात सगळ्यांच येत असतील पण म्हणून मदतच न करणे हा उपाय असू शकतो असे नाही ना . त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः ला ठेवून पहिले तर कळेल कदाचित ती व्यक्ती बरोबर असू शकते , तिने काहीतरी अनुभव घेतला असू शकतो चुकीचा कधीतरी . अर्थातच अपवाद सगळीकडेच असतात . आपल्याला जर कोणी मदत केली नाही तर आपण असेच म्हणू माणुसकी शिल्लक राहिली नाही .
मीही माझ्या प्यांटवाल्यांचे(नवऱ्याचे) बोलणे खाते अनोळखी व्यक्तीला मदत करण्याबद्दल म्हणून मी मदत करणे सोडत नाही . शक्यतो आपल्याला फार त्रास होणार नाही असे पाहावे म्हंजे आपल्यालाही समाधान मिळते आणि आपल्याला कमीत कमी त्रास होतो , चिडचिड होते . Happy

९५-९६ च्या दरम्यान कॉलेजच्या शेवटच्या वर्षी घडलेला प्रसंग. पण जिवावर बेतू शकला असता.
डोंबिवलीला आमच्या इमारतीमध्ये संजय सावंत नावाचा एक नवीन मुलगा राहायला आला होता. दोघांच्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्या कारणाने त्याच्याशी चांगलीच गट्टी जमली होती. त्याचे वडील मिलमधून रात्री उशिरा घरी येत. असेच एकदा रात्री १ वाजता घरी येताना इमारतीच्या शेजारी त्यांना काही मुल टवाळक्या करताना दिसली आणि त्या मुलांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या आणि कोणालातरी बडवायच्या इराद्याने उभी होती.
हे काका थोडे पुढे गेले आणि परत पाठीमागे येऊन त्या मुलांना त्यांनी हटकले. ती मुले आधीच प्यायलेली असल्याने त्या मुलांचा काकांबरोबर वाद झाला आणि त्या मुलांनी काकांना बांबूचा एक फटका मारला. काका कळवळून घरी परतले.

सकाळीच संजय माझ्या घरी हजर. दिन्याला ओळखतोस का असा सरळ सवाल टाकला. मी बुचकळ्यात, सकाळी सकाळी हा दिन्याला का विचारतोय? मग त्याने रात्री घडलेली हकीकत सांगितली आणि त्याला आता दिन्याला धडा शिकवायचा होता. मला सुद्धा दिन्या म्हणजे मारामाऱ्या करणारा एक मुलगा आहे एव्हढीच माहिती होती. माझ पण तरुण रक्त एकदम उसळी मारायला लागल. आमच्या बरोबर सतीश नावाचा आणखी एक मित्र आला. आता दिन्याला शोधायला सारा विभाग पालथा घातला. पण कुठेच सापडला नाही. दुपारी इमारतीखाली उभे असताना अचानक दिन्या आणि त्याचा मित्र आमच्या समोर आले. मी लगेच संजयला खूण केली आणि तिघेही दोघांवर तुटून पडलो.

तसेच बडवत दोघांना घेऊन तत्कालीन 'कायद्या' प्रमाणे शाखेत गेलो. शाखेतसुद्धा त्याची यथेच्छ धुलाई झाली. इथली शाखा स्थानिक भूमिपुत्रांच्या ताब्यात आणि त्यात एखादा ''भाडोत्री'' मुलगा जर त्यांच्या कचाट्यात सापडला तर जास्तच मार खायचा. पण पट्ट्या एव्हढा मार खाऊन सुद्धा अजिबात मन तुकवत नव्हता.

त्याला कारण सुद्धा तसच होत. त्याच्या तोंडातून एका महनीय व्यक्तीच नाव बाहेर पडलं आणि सगळ्यांचेच धाबे दणाणले. मी बाहेर उभा असल्याने शाखेच्या आतमध्ये घडत असलेल्या या प्रसंगाची मला काहीच कल्पना नव्हती. त्या काळात डोंबिवलीमध्ये मंचेकर हे नाव जरा जास्तच प्रसिद्धीच्या झोतात होत आणि हा दिन्या म्हणजेच दिनेश राजापूरकर मंचेकर गेंगचा सदस्य होता. आता शाखेवाल्यांचीच मांडवलीची भाषा सुरु झाली. या मांडवली मध्ये संजयचे आई वडील सुद्धा सामील झाले. त्याच्या हाता पाया पडून त्याचीच माफी मागितली आणि पुढे घडू शकणाऱ्या विपरीत प्रसंगातून आपल्या मुलाची सुटका करून घेतली. पण जाताना दिन्याने ‘’त्या ढापण्याला म्हणजे मला सोडणार नाही अशी धमकी दिली’’. पण या धमकीकडे संजयच्या आई वडिलांनी आणि खुद्द संजयने दुर्लक्ष केल आणि घरची वाट धरली. मी बाहेर उभा असल्याने मला याची काहीच कल्पना नव्हती.

मी सुद्धा सगळ निस्तरल अस समजून घरच्या वाटेला लागलो. पण दिन्याची थोडीफार पार्श्वभूमी माहित असल्याने मनात धाकधूक होतीच. दुसऱ्याच दिवशी मी घरी नसताना दिन्या आणि त्याची मंडळी मला शोधत असल्याचा निरोप माझ्या मित्राने आणला. आता मात्र माझी तंतरली, मी लगेच संजयच्या घरी गेलो आणि काल शाखेत काय झाल या विषयी विचारणा केली. तर संजय आणि त्याचे आई वडील उडवा-उडवीची उत्तर द्यायला लागली.
मी हताशपणे बाहेर पडलो आणि इतर मित्रांकडे चौकशी केल्यावर खरी हकीकत मला कळली. माझ्या घरी या विषयी काहीच कल्पना नव्हती. पोलिसांकडे जाण्याएव्हढी अक्कल पण नव्हती. काय कराव या विवंचनेत असतानाच भागशाळा मैदानात बसलो होतो आणि गवळी नावाचा एक मित्र अचानक तिथे आला. मी उदास बसलेला पाहून त्याने माझ्याकडे विचारणा केली आणि मी त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याने सगळ ऐकून घेतल्यावर एक हलकस स्मित करून मला दुसऱ्या दिवशी त्याच्या घराखाली यायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी त्याच्या इमारतीखाली गवळी चक्क दिन्याबरोबर उभा होता आणि मला येताना पाहून दोघेही हसायला लागले. मग गवळीने वातावरण हलक केल आणि मला दिन्याला sorry म्हणायला लावलं. मी सुद्धा झाल गेल विसरून जा म्हणून त्याची माफी मागितली. पुढे या दिन्याच मालाडला पोलिसांकडून encounter झाल. पण आज त्या दिवसाची आठवण झाली कि संजय आणि त्याच्या आई वडिलांची मला कीव येते.

एकदा अशीच मदत करताना माझी तन्तरली होती. मी तेव्हा अकरावीला होते आणि दुपारी एकटीच घरी होते .... एका माणसाने बेल वाजवली आणि त्याच रडगाण सुरु केल .. माझ हानियाचे ओपरेशन आहे माझ्याकडे पैसे नाहीत जरा मला मद्त करा. मी इतकी मुर्ख ना की त्याला सागयला लागले की एथून ५ मिनटात चालत जा सरकारी दवाखाना आहे तिथे फुकट ओपरेशन होइल .मग त्या माणसाने नविन अस्त्र बाहेर काढ्ले मला चालवत नाही जरा पाणी द्या .आता पाणी कस नाकारणार म्ह्णून पाणी आणायला आत गेले तर हे महाशय हॉल मधे येउन खुर्चीत बसलेले... मग मात्र म्हणल आता काय खर नाही.. ताबड्तोब त्या माणसासमोरच समोरच्या घरात फोन केला की लगेच काम सोडून या इथे..मग त्या माणसाला वाट्ल बहुदा आता निघालेलच बर... मग लगेच बाहेर निघून गेला........
लगेच वीकेन्डला बाबानी फ्ल्॓ट च्या बाहेरच्या दाराला लोखन्डी ग्रिलच दार लावून घेतल... आणि अगदी निक्षून सान्गितल कुणाही अनोळखी माणसासाठी दार उघडायच नाही.. आणि खाली पार्किग्मधे पिण्याच्या पाण्याचा नळ आहे तिथे पाणी पिल कुणीही तहान लागली तर.... नन्तर ते बेल बन्द्च करून जातात... आता जर कोणी ओळखीच असेल तर दारच वाजवत ...
आपल्याला शाळेत जे शिकवतात मद्त करा...... त्यापेक्षा आधी स्वतःला कस अशा प्रसन्गात सापडायच नाही ते शिकवायला हव...

पुण्यातला किस्सा:

पौड रस्त्यावर ऑफिसची गाडी येण्याची वाट पाहत उभा होतो. एका वळणावर समोरून वळणारी मोटारसायकल व आपल्याच तीर्थरुपांचा रस्ता असल्याच्या आविर्भावात येणारा एक सायकलस्वार यांची टक्कर झाली व दोघेही पडले. थोडे खरचटले दोघांनाही. जखमांना माती-रेती लागली होती. मी व इतरांनी त्यांना उठायला मदत केली.
मी मागचा पुढचा विचार न करता पिण्याच्या पाण्याची बाटली दोघांच्याही जखमांवर ओतली जेणेकरुन लगेच जंतुसंसर्ग तरी होऊ नये.

मी व इतर लोकांना धन्यवाद द्यायचे बाजूलाच, ते दोघे स्वत:ला सावरत आणि एकमेकांना शिव्या घालत सरळ आपल्या वाटेने निघून गेले. आम्ही सगळे जणू अदृष्य होतो.

मदत केली. ठीक आहे. पुढे आपण धन्यवाद किंवा इतर काही स्वीकारण्याअगोदरच लवकरात लवकर तिथून निघून जाणे उत्तम.

फिलोसॉफी झाडण्याआधी पोस्ट नीट वाचा हो. मी माझ्या ऑफिसच्या गाडीची वाट पाहत थांबलो होतो. तिथून निघून जाऊन कसं चालेल? कैच्याकै.

खरंय काही काही खरंच अप्पलपोटे लोक असतात.
फ्लाईट, वॉल्वो असे सगळे ओवरबुक्ड असल्या कारणाने २००३ च्या भर ऊन्हाळ्यात नॉन एसी बसने चेन्नई बँगलोर असा प्रवास करावा लागला. ऊन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून सगळीकडेच तौबा गर्दी होती त्यात चेन्नईची असह्य ह्युमिडीटी आणि प्रचंड ऊकाडा जीव नकोसा झाला होता. ट्रॅवल्स एकदम फुल्ल होती. मध्येच एक कपल एका दोनेक वर्षाच्या मुलाला घेऊन गयावाया करत बसमध्ये चढू लागले. ड्रायवरला त्यांचे बँगलोरला जाणे किती महत्त्वाचे आहे सांगत अर्धा तास वाद घातला आणि काही पैसे चारून ड्रायवरच्या बाजूला ईंजिनावर बसायचा करार केला. राहणीमानावरून दोघेही नवरा बायको सुशिक्षित आणि पैशांची काही चणचण नसलेले वाटले. फक्त आता वेळ आली आहे आणि पर्याय नाही म्हणून असा प्रवास.
तर अर्ध्या तासात जसे गाडीचे ईंजिन गरम व्हायला लागले तसा त्या छोट्या मुलाने प्रचंड भोंगा पसरला. त्याचीही खरं काही चूक नव्हती. प्रचंड ऊकाडा आणि गरम ईंजिन. अर्धा तास झाला तरी त्याचे रडणे ओरडणे आजिबात कमी होईना. त्याला बघून मुलाची आईही प्रचंड कासावीस होत होती. मुलाचा बाप मात्र ढिम्म. आजूबाजूला काही होतच नाहीये असे दाखवत शांतपणे मासिक वाचत होता. बस मधेले प्रवासीही त्या आवाजाला वैतागले. शेवटी ड्रायवरने मुलाला शांत करा नाही तर ऊतरा असा दम भरला. मुलाची आई तरी त्या बाळाला काय समजावणार, ते काही गप्प बसेना. शेवटी मी ऊठून त्या बाळाच्या आईला म्हणालो ईथे ईंजिन खूप गरम आहे, तुम्ही माझ्या सीटवर जाऊन बसा. ती कसबसं बळच थँक्यू म्हणत निघून गेली. नवरा अजूनही रेड्यासारखा ढिम्मच. प्रचंड ट्राफिक होतं बस अगदीच ३०-३५ च्या स्पीड ने धावत होती. अश्या थकवणार्‍या प्रवासात मला ईंजिनाच्या बॉक्सवरच बसल्या बसल्या कधी तरी तीनेक तासांनंतर अर्धा पाऊन तास झोप लागली. जाग आली आणि बघितलं तर बाजूचा रेडा गायब! मला वाटलं ऊतरले असतील आणि आपली सीट खाली झाली असेल तर बसावं मागे जाऊन. जाऊन बघतो तर रेडा मस्त आरामात माझ्या बाजूच्या रिकाम्या झालेल्या सीटवर घोरत पडला होता. त्याची बायकोही झोपली होती आणि ते बाळ पण. मला काही त्यांना ऊठवावसं वाटलं नाही. मी परत आपला ईंजिनावर जाऊन बसलो. बंगळूर दोन तासांवर आलं असतांना जेवायला गाडी थांबली तेव्हा मला बघून दोघांपैकी एकही जण , तुम्ही पुन्हा तुमच्या सीटवर जाऊन बसा म्हणाला नाही.
गाडी बंगळूरात पोहोचल्यावर सगळे (मी आठ नऊ तास गरम ईंजिनावर बसून आपल्या कर्माची फळं भोगल्यानंतर) ऊतरले तेव्हा मी त्या रेड्याकडे जाऊन 'यू सेल्फिश अनकाईंड पीस ऑफ शिट आणि बरेच काहीबाही' म्हणत सगळ्यांसमोर त्याचा पाणऊतारा केला. त्याची बायको दहा वेळा सॉरी बोलली. म्हंटलं मी तुमच्यासाठी तुमच्या मुलासाठी इंजिनावर बसलो.

चमन,

तुम्हाला आलेला हा अनुभव बऱ्यापैकी प्रातिनिधिक आहे! Sad रेड्याने आभार मानायला हवे होते. ते न मानणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तुमचं वाक्ताडन योग्यच आहे. मी असतो तर तुम्हाला जेवायला घेऊन गेलो असतो.

मी रेड्याचं समर्थन करीत नाही. पण दुसरी बाजू असू शकते. आपल्या महाराष्ट्रात बाई परपुरुषाच्या बाजूच्या जागी बसलेली कोणालाही खटकत नाही. मात्र दक्षिणेत बायको दुसऱ्या पुरुषाच्या बाजूस बसायला नाखूष असते (सुशिक्षितपणाची ऐशीतैशी). बालक ओकरं असू शकतं. अर्थात केवळ तुम्हीच या परिस्थितीचं यथोचित मूल्यमापन करू शकता, मी नाही.

आ.न.,
-गा.पै.

माझ्याकडे चांगले अनुभवच जास्त आहेत म्हणजे मी मदत केली आणि त्याबदल्यात एक गोड स्मित मिळाले किंवा आशीर्वादाचा हात डोक्यावरून फिरला असा…. तसे काही वाईट अनुभव आहेत पण ते बरचसे विस्मरणात गेल्यासारखे झाले आहेत. चांगले किस्से मात्र खणखणीत लक्षात राहिलेत

अजूनही आठवतं… एकदा कॉलेजला जातांना एक म्हातारीशी आजी भर उन्हात स्लीपर हातात घेऊन चालत जात होत्या . त्यांची चप्पल तुटली होती. एवढ्या तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावरून त्यांना असं चालतांना पाहून मलाच कसतरी झालं. मी त्यांना हात दाखवून थांबायला सांगितलं, माझी गाडी साईड ला लावली आणि चक्क माझ्या कॉलेज च्या ओढनीची सेफ्टीपिन काढून खूप प्रयत्नांनी स्लीपरला तात्पुरती चालण्याजोगी केली. त्यावेळी आजीच्या डोळ्यातले भाव खरंच पाहण्याजोगे होते.

आम्ही पूर्ण फेमिली 'गजनी' सिनेमा पाहायला गेलेलो. कुठल्याश्या एका भयंकर सीन च्या वेळी एक मुलगी दान्नकिनी आदळली आणि बेशुद्ध. एवढ्या थेटर मध्ये तिच्या आजू बाजूची एकही बापाची लेक (मायका लाल च्या धरणीवर) उठून मदतीला धजावली नाही. आमची सीट सर्वात वर होती आणि ती तिच्या BF सोबत मधल्या रो मध्ये मधल्या सीटवर बसलेली. मी उठले जवळची पाण्याची बाटली घेऊन तिच्या जवळ गेले आणि मग त्या मुलाने आणि मी दोघांनी मिळून त्या वजनी देहाला कसंतरी बाहेर आणलं. नंतर बर्याच प्रयत्नांनी ती नीट शुद्धीवर आली. तो मुलगा प्रचंड घाबरला होता पण मी प्रयत्न करत होते म्हणून तोवर शांत झाला… नंतर दोघांनीही मनःपूर्वक धन्यवाद दिले आणि निघून गेलेत. मी माझ्या सीटवर परत आल्या नंतर घरच्यांचे शब्द ऐकावे लागले ते अलाहिदा …

.

बाहेरची लोक सोडा काहीवेळा नातेवाईक सुद्धा तुमच्या मद्त करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतात.... माझी एक नात्यातली बहिण आहे तिने असाच माझ्या सरळ आणि मद्त करण्याच्या स्वभावाचा बरेचदा असेल एक अन्दाजे २० वर्शे तरी फायदा करून घेतला....शेवटी मी तिच्या अतिस्वाथ्री स्वभावाला कटाळून तिच्याशी बोलणच बन्द केल (आणि गम्मत म्हणजे तिनेही नाही विचारल की बोलत का नाहीस ) आणि अर्थात तिच्या जवळ्पासच्या लोकान्शी माझे सम्बध आधीसारखेच आहेत. .. पण आता मला अस तरी वाट्ण बन्द झालय कि मी हिच्यासाठी एवढे केल तरी ही माझ्याशी अशी लबाडीने का वागते..u know that kind of frustration ....:)...
बहुदा तिला वाटायच की मी मुर्ख आहे त्यामुळे माझ्याशी कितीही लबाडीने वागल तरी चालेल......

वाईट अनुभव म्हणायचे तर जवळच्या माणसांचेच, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचेच …. हि लोक आपल्याला गृहीत धरतात. आपण चांगले वागतोय किंवा मदत करतोय म्हणजे फार मोठी कामगिरी नसते त्यांच्या नजरेत. आपण १०० कामे त्यांच्यासाठी चांगली केली तरी त्याचे मोजमाप होत नाही पण एखादे काम चुकुदेत किंवा तुम्ही 'नाही' म्हणा आयुष्यभर टोचणी लावतात. हे झाले आपल्या बाजूने …

असाही अनुभव आहे कि आपल्याला मदत हवी असेल तेव्हा हि मंडळी कधीच हजर नसतात. तुमचे हजारो असे गरजेचे प्रसंग, संकट यांच्या मदतीविना त्रासातून पार पडलेले असतात, पण हि लोक एखादवेळी कधीतरी काहीतरी मदत देऊ करतात आणि मग आयुष्यभर आम्ही तेव्हा मदत केलेली असे जन्मभर गात फिरतात.

जवळच्या माणसांचे वाईट, मन दुखावणारे पण दूरच्या, काहीही संबंध नसणाऱ्या माणसांचे सुंदर अनुभव असे अनेक अनुभव आहेत साठवणीला…
इतकं सांगायला खरतर त्यासाठी वेगळा धागा लागेल

मध्ये एकदा रस्त्याने जात असतांना एक अपघात पाहिला. बाईकवर जाणार्या दोघांनी एका वयस्कर माणसाला उडवले होते. हे मी पोचण्यआधी अर्धा तास झालेला सीन. मी पहिले ते असे कि …. ज्या माणसाला लागले तो रस्त्याच्या एका कडेला डोक्यावरून वाहत्या रक्ताला थांबवण्याच्या प्रयत्नात, त्याच्या आजूबाजूला एकही माणूस नाही आणि संपूर्ण मॉब त्या दोन बाइक वाल्यांना मारण्यात गुंग. जो तो हात धुऊन घेत होता. लागलंय त्या माणसाची मात्र कुणालाही काळजी नाही. ती दोघे अगदी काकुळतीला आली होती. इतकं मार खाण्यात या दोघांचाच जीव जाऊ नये म्हणून मला भीती वाटली. पुरुषांची गर्दी असल्याने मी मध्ये शिरू शकत नव्हते म्हणून मी १०० वर फोन केला आणि लवकर मदत पाठवा असे सांगितले. माझा फोन गेल्यानंतर पाचंच मिनिटांपासून संपूर्ण दिवस पोलिसांनी मला सारखा फोन करून ताप आणला. दर दहा मिनटात फोन आणि उगाचीच विचारपूस … मी कामात होते. म्हणून हळू आवाजात त्यांना हवी ती उत्तरं दिली … पण संध्याकाळी कामातून सुटल्यावर त्या पोलिसांना फोन करून प्रचंड झापले. ज्यांना मदत हवीये त्यांना मदत करायचे सोडून ज्यांनी फोन केला त्यांची प्रश्नमंजुषा काय घेत बसलेत म्हणून …. नंतर त्या पेशंट चे काय झाले? त्या दोन मुलांना दवाखान्यात नेले काय ? वगैरे प्रश्नांना त्या प्रश्न विचारणाऱ्या पोलिसांकडे काहीच उत्तर नव्हतं …. आहे न कमाल

पोलिसांकडे काहीच उत्तर नव्हतं >>>>> पोलिस त्याच्या लाईनीप्रमाणे काम करत असतील ( पु. ल. देशपाडेच्या म्हैस या कथाकथनात आहे " मला माझ्या लाईनीप्रमाणे जाउ द्या मधे मधे हाएट नका करु" )

वर 'आता अपघातग्रस्तांना मदत करत नाही' अशा अर्थाचं पोस्ट वाचलं आणि वाईट वाटलं. आजच ही बातमी वाचनात आली - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/articleshow/34.... अशा अनेक घटना सतत आपण वाचत असतो. आपल्या कुटुंबातल्या अपघातग्रस्त व्यक्तीला कोणीच मदत केली नाही, तर आपल्या भावना काय असतील, याचा विचार एकदा करून बघावा.

असे बाफ विनोद म्हणून ठीक आहेत. वाईट अनुभव प्रत्येकालाच येत असतात. पण अशा अनुभवांनंतर असंवेदनशील होणं, याला काय म्हणायचं हे ठाऊक नाही.

मयी,

तुम्ही मदत करता ती योग्यच आहे. उद्विग्न करणारी ताजी खबर : त्यांच्या हंबरड्याने एकाही मुंबईकराला पाझर फुटला नाही!

Sad
Angry

आ.न.,
-गा.पै.

Sad

नाही कुणी जाणीव ठेवली तरी अपघातग्रस्तांना नक्कीच मदत करा. एकदा का कुडीतून जीव बाहेर पडला तर परत आत घालता येणार नाही. तुमच्या छोट्याश्या मदतीने एखादा जीव वाचू शकतो.

थोडं अध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर ज्याच्यासाठी करताय त्याला जाणीव नसली तरी किंवा कुणाला कळलंही नाही तुम्ही मदत केल्याचं, तरी त्या भगवंतापाशी सगळं रुजू असतं. तुम्ही कुठल्याही हिशेबाने काही केलं नसलं, निव्वळ माणुसकी म्हणून केलं असलं तरी त्याची परतफेड तो भगवंत ह्या ना त्या रुपाने हजारपटीने करतोच कारण तुम्ही त्याच्याच दुसर्‍या लेकराला मदत केलेली असते. ज्यांना ह्या विचारात इंटरेस्ट नसेल त्यांनी ह्या परिच्छेदाचा अनुल्लेख करा आणि ओलांडून पुढे जा.

तुम्ही मदत करता ती योग्यच आहे.>> + १

मदत करणे तर मुळीच थांबवू नये. निदान अपघातग्रस्त पिडीतांना तरी. शेवटी केलेल्या चांगल्या गोष्टींची नोंद ही देवाकडे असतेच. तसेच आपल्याला स्वतःलाही मानसिक समाधान मिळतेच. मात्र इतर प्रसंगी आलेले वाईट अनुभव हे आपणास सतर्क नक्की करू शकतात. मी लेखात लिहिलेला भिकार्याचा अनुभव - त्यानंतर मी भीक देणे पूर्ण बंद केले.

@ सुम - बाहेरची लोक सोडा काहीवेळा नातेवाईक सुद्धा तुमच्या मद्त करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतात>> हे मलाही पटले. माझ्याही अशाच नात्यातल्या व्यक्तीची L.I.C. व पोस्टाची agency आहे. त्यांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी कित्येक पोलिस्या गळ्यात मरल्या गेल्या. पोस्टाच्या योजनांचीही तीच गत. आणि नंतर या संस्थांशी आपल्याला व्यवहार करावे लागतात, तेव्हा खरंच असं वाटतं की मदत करायला गेलो ना, मग भोगा आपल्या कर्मांची फळं.

सगळ्यात हाईट म्हणजे बस मध्ये उभ्या असलेल्या स्त्रीला आपण उठुन त्याजागेवर बसायला संगीतल तर असला कटाक्ष टाकतात की हिच्या मागेच लागलोय किवा काही वाईट हेतू आहे (म्हणजे बाई दिसली की ........... शिवायदुसर काही सुचतच नाही आम्हाला ) म्हणून मी तरुण स्त्रीला जागा देण सोडून दिलाय फक्त वयस्कर बाईलाच जागा देतो.

Pages