चिकन पटाखा(तेलाशिवाय)

Submitted by देवीका on 25 April, 2014 - 05:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

हि तेलाशिवाय करायची कृती आहे. चवीला झणझणीत पण मस्त वाटते एखादी तंदूरी रोटी किंवा नान असेल तर. ब्रेड्/पाव वगैरे सुद्धा मस्त जातील. तयारी जरा करावी लागते.

१ किलो चिकनचे तुकडे.
२ मोठे चमचे हिरवी चटणी: पेरभर आलं, लसूण(८-९ पाकळ्या), १ मूठी कोथींबीर धूवून निवडून, २-३ हिरवी मिरची, १ मूठी पुदीना धूवून साफ निवडून घेवून गंधासारखे वाटून.
१ मोठा कांदा उकडून वाटून
पटाखा मसाला: २ चमचे धणे, १ चमचा जीरं, पाव चमचा बडीशेप, पाव पेक्षा निम्मी काळंमिरी, पेरभर दालचिनी तुकडा, ३-४ लवंग, १ फूल जायपत्री, १ बडी वेलची, १ चहा वेलची असे वेगवेगळे भाजून पूड करून घ्यायची. वरील पूड १ मोठा चमचा घेवून त्यातच आपल्या सोसेल अशी व आवडीप्रमाणे तिखट लाल मिरची भिजवून वाटायची. १ चमचा रंगाला म्हणून काश्मिरी तिखट किंवा देगी मिरची पूड टाकावी. आता हा ओलसर मसाला तयार करून ठेवायचा.
२ मोठया वाटया घट्ट दही भरपूर फेटून एकजीव करून,
मीठ चवीला

क्रमवार पाककृती: 

आदल्या दिवशी रात्री चिकन साफ करून आधी हळद लावून मग पटाखा मसाला मस्त चोळून ठेवावा व चिकन बाहेरच ठेवावी.
१ तास वाट पाहून त्याला हिरवी चटणी लावावी. मग त्यातच कांदा पेस्ट घालावी मस्त कालवावे जिन्नस मग चिकन काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी.
दुसर्‍या दिवशी सकाळीच बाहेर काढून फेटलेले दही घालावे व आता चिकन बाहेरच ठेवावी. दोन तास मुरवावी.
दोन तासाने पुर्ण चिकन टोपात घालून , टोपाच्या कडेला कणीकेने बंद करून वरून झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावी. खाली लागायची भिती असेल तर झाकणावर पाणी ठेवायचे. पण आत अजिबात पाणी टाकू नये.

चिकन शिजल्याचा वास सुटेल आपोआप. तसेही चिकनला २०-२२ मिनिटेच लागतील. मुरलेली असल्याने पटकन शिजेल.चिकन अप्रतिम लागते.

अधिक टिपा: 

दही चांगल्या प्रतीचे व घट्ट असावे.
आता ताजे काजू मिळतात ते सुद्धा घालू शकता.
चिकन शिजले की त्यातच सोललेली उकडलेल्या अंडयाचे काप टाकावे. वाढताना एक अंड देवु शकता.
नेहमी सारख्याच कांदा चकती, टोमॅटो व लिंबू काप देवून वाढावी.
मसाला पापड सुद्धा बनवु शकता.

खास शाकाहारीसाठी: कच्चा बटाटा मुरवून घाला. Happy पनीर घालू शकता, उकडलेले छोले ह्या मसाल्यात ठेवून आणखी मुरवून चवीष्ट बनवु शकता. सर्व कुर्मा भाज्या घालून बनवु शकता.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages