फेसबुक फटका

Submitted by रसप on 21 April, 2014 - 02:41

फेसबूकचे नवे कुरण तू बघून येडा बनू नको
रान मोकळे समजुन येथे सैरावैरा पळू नको

मिळेल त्याला टॅग लावण्याचा चाळा तू करू नको
समोरच्याने हाकलले तर नंतर तू चरफडू नको

डोळ्यांमध्ये लाळ आणुनी चिकना मुखडा बघू नको
अपुला चिकना फोटो पाहुन स्वत:च हुरळुन फुगू नको

मित्र विनंत्या धुडकावुन तू माज फुकाचा करू नको
होयबांस मागे अन् पुढती घेउनिया बागडू नको

अपुल्या भिंतीवर सरपट तू कुंपण तोडुन फिरू नको
फेसबूक ही भाडेपट्टी, मालक इथला बनू नको

ताई, माई, दादा, बाबा अगतिकतेने म्हणू नको
गळेपडू म्हणतात लोक तू विषय विनोदी बनू नको

दु:खाचा बाजार मांडुनी ज्याला त्याला पिडू नको
प्रत्येकाची एक कहाणी असते हे विस्मरू नको

वाद कुणाशी झाला तर तू डूख कुणावर धरू नको
खोडकराला झोडण्यातही कधीच मागे हटू नको

उचलाउचली करू नको तू 'कॉपी'मास्तर बनू नको
मनातले तू लिही भावड्या भीडभाड बाळगू नको

अभिप्राय-लाईक मोजुनी लायकीस ओळखू नको
अज्ञातातिल विश्व विलक्षण, आभासाला भुलू नको

....रसप....
२१ एप्रिल २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/04/blog-post_21.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतलाबंद गझल <<< मलाही हेच वाटले वाचून

फटका एकच नंबर !! मागे एकदा प्राजूने देखील अशी रचना केल्याचे स्मरते आहे ..तो काळ होता जेव्हा देवपूरकर माबोवर धुमाकूळ घालत असत

मी हिला गझल म्हणणार नाही.
कारण 'गझल' म्हणून हे लिखाण सदोष आहे. प्रत्येक 'नको'ऐवजी 'नकोस' हवे, तर व्याकरणदृष्ट्या ते बरोबर असेल आणि मगच गझल वगैरे....

'फटका' हा काव्यप्रकार असा आहे (मला फारसं माहित नाही) जो जास्तकरून ग्रामीण भागातला आहे. अनंत फंदींचा 'बिकट वाट वहिवाट नसावी..' हा फटका शाळेत असताना होता. त्या व्यतिरिक्तही एक-दोन फटके वाचले. त्यात अश्या किरकोळ व्याकरण चुका आढळतात.

काही चुकत असल्यास सांगावे.

धन्यवाद !