तीन मुक्तछंद

Submitted by कमलाकर देसले on 17 April, 2014 - 02:59

तीन मुक्तछंद

१).. बस कोसळत आहे ..

किती अधांतरी वाटतं नाही कधी कधी ?
कुणीतरी फेकून द्यावे
असीम आकाशाच्या पोकळीत आपल्याला ..
कुठेच पडू नये आपण
नुसतं कोसळत राहावं
सनातन गतीने ...
असेच काहीसे .. होते आहे ...

कपाळमोक्ष होवून
थांबावा हा सगळा जीवघेणा खेळ.. , पण ..
जमीन नावाच्या खडकालाही वंचित व्हावे आपण ,
एवढा सूड कसा घेवू शकतो ;
संचिताचा शत्रू ?
किती अधांतरी वाटतं नाही कधी कधी ?

बस , कोसळत आहे मी ..
पडत नाही कोठेच ...

२) तहान

तहान तर अशी लगलीये , की ..
एकाच घोटात
समुद्र पिवून टाकेल सगळा ..

कसे काय कोण जाणे
कळले त्यांना ..
माझा आख्खा समुद्रच
खारा करून टाकला
नतद्रष्टांनी...

३) अश्वत्थामा

हो मी चुकलोच ,
काय करू ?
वंचितांना चुका कराव्याच लागतात ..
नाईलाज असतो त्यांचा , पण ...
चुकीला गुन्हा समजण्याचा गुन्हा
तुम्ही कसा करू शकतात ?

न्यायासनही तुमचेच असते ..
मग तुम्ही काढतात
माझा अक्षय सुखाचा मणी ...
आणि करून टाकतात मला
चिरंजीव दु:खाचा
अश्वत्थामा ....

-कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली जास्त आवडली. आधी नावामुळे कोड्यात पडलो, वाटलं 'बस' (एस टी, लक्झरी ) कोसळत आहे.

<< जमीन नावाच्या खडकालाही वंचित व्हावे आपण ,
एवढा सूड कसा घेवू शकतो ;
संचिताचा शत्रू ?
किती अधांतरी वाटतं नाही कधी कधी ? >>

सुंदर ओळी.