माझेच जगणे खरे - विडंबन

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 April, 2014 - 10:14

आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो?

या आधी फेसबुकावर टाकले होते, काही माबोकर मित्रांच्या मागणीवरुन पुन्हा इथे पोस्ट करतोय.

(गेल्या धा वर्षापासून नवाच असलेला) नव-ईडंबनकार ईरसाल म्हमईकर

अमेयदांची मुळ कविता इथे आहे ...
https://www.facebook.com/amey.pandit.12/posts/10200756409655806

विडंबन :

गुत्त्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत वीर ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, वाणीतुनी सांडते
वारूणीत तनू समस्त भिजली वैकुंठ झाले खुजे
जोशाने उठती अता, कचरले भार्येस ना शूर ते

दारूडा उठतो पहाट सरता.., साकी त्या हाकारते
अजुनही उरली, कशी न सरली? आश्चर्य त्या वाटते
ओकारी मग त्यां भरात करतो, शोधी नवे सोबती
शुद्धीच्या मिटल्या खुणा मग सुरा देहात साकारते

दारूड्यास असा तयार बघुनी इतरांसही ज्वर चढे
माझ्याहून इथे असे कुणितरी ज्याचे पिणे ना सरे
"मदिरेवीण उदास जिवन जसे भकास होउन झिजे"
दारूडा हसतो जनांस म्हणतो "माझेच जगणे खरे"

आहे मद्य जरी कटू, वचन हे साक्षात घ्या जाणुनी
क्लेशांचा अपुल्या पडे विसरही प्याला 'मधू' पाहुनी

ईरसाल म्हमईकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users