मुक्ती

Submitted by अमेय२८०८०७ on 15 April, 2014 - 02:01

क्रूर स्तब्धता सोलत आली वीण जिवाच्या वहिवाटीची
आत्म्यालाही ओढ निराळी देहवेगळ्या घरपरतीची
अवतीभवती जमली नाती म्हातारीच्या खाटेपाशी
प्रहर चालले कणाकणाने चैतन्याच्या घेउन राशी

सीमेवरती लढणा-या त्या पुत्रमुखाचा ध्यास लागला
मुक्ती क्षणभर दूर सारुनी वेदनेसवे प्राण थांबला 
मिटल्या डोळ्यांपुढे अचानक उजळत आली छबी कोवळी
म्हणली, 'आई, वाट दावतो ये मागे तू ठाम पावली'

वृद्धेच्या सुरकुतल्या ओठी अस्फुटसे मग हास्य पसरले
बोट मुलाचे धरून गेली हलके हलके जगणे सरले
नातलगांना काय कळेना समाधान हे कोठुन आले
पुत्रभेट ना अजून झाली तरी तिने का श्वास त्यागले

धडधडताना चिता स्मशानी, गाडी थांबुन कुणी उतरले
'कामी आला पुत्र रणावर', तार वाचता घर गहिवरले

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users