तिनसोचालीस नंबर सिट कहां है?

Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 10 April, 2014 - 12:49

तिनसोचालीस नंबर सिट कहां है.. ३४० ?
हातातली बॅग सामान ठेवायच्या कप्प्यात सरकवत मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं. एक उंचपुरा तिशीतला माणुस त्याची सिट शोधत होता.
ऐसा कोई सिट नंबर नही होता फ्लाईट्मे. आप कुछ गलत नंबर बोल रहे हो. एअर हॉस्टेस कुत्सीतपणे त्याच्याकडे बघत म्हणाली.
अरे भाई ये थर्टीफोर डी है. ये सामने वाली सिट पे बैठो. कुणी सहप्रवाश्याने मदत केली बापड्याची.
भाईसाहब थपकन बसला ३४-डी नंबरच्या सिटवर. खिश्यातुन मोबाईल फोन काढला. सुरेशभाई हुं फ्लाईट्मा बेठा छुं.. मगनभाई हुं फ्लाईट्मा बेठा छुं. अजी फ्लाईट उड्यु नथी.. धिमे धिमे हाले छे.. (माईंड माय गुजराती Happy ) एका पाठोपाठ एक पाच सहा फोन लावले.. ईलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बंद करायची सुचना झाली तरी याचे फोन सुरुच.
माझ्या शेजारी बसलेल्या बाईनी त्याला फोन बंद करायला सांगीतला. हो म्हणुन काही सेकंद थांबला आणि पुन्हा त्याने फोन लावला. बाईंनी त्याला पुन्हा फोन बंद कर म्हणुन सांगीतल. एक दोन मिनीटं थांबला. मग सिटवरची छोटी उशी कानावर ठेवुन उशी खाली फोन दडवुन बोलनं सुरु झालं.. त्या बाईंनी माझ्याकडे बघीतल.. आम्हाला हसु आवरेना. अचानक बाईंचा पारा चढला. आपको चेन्नई पहुंचना है के नही ? बंद करो.. स्विच ऑफ.. एकदम दरडावलच त्याला. मग कुठे त्याने फोन बंद करुन ठेवला.

आम्ही दोघ अधुन मधुन त्याच्याकडेच बघत होतो. सिट बेल्ट मात्र पटकन लावला पट्ठ्याने.

कृपया अपनी कुर्सी पेटी बान्धें... सुचना सुरु असताना अचानक त्याच लक्ष हवाईसुंदरी(?)च्या हातातल्या ईमर्जन्सी जॅकेट कडे गेलं. थोडा घाबरलेल्या स्वरात त्याने माझ्या शेजारणीला विचारलं. ये जॅकेट किसलिये है?
पे अटेंशन.. ध्यान दो वो क्या बता रही है..
तो पर्यंत सुचना इंग्रजीत सुरु झाल्या.. सुचना दिल्या प्रमाणे सिटबेल्ट खोलुन बंद करुन पाहिला. आता चेहर्‍यावर भिती दिसत होती थोडी थोडी.
विमानाने उडण्यासाठी वेग घेतला आणि त्याची तारांबळ उडाली. डाव्या हाताने सिटहँडल घट्ट पकडून ठेवलं. उजवा हात डोळ्यांवर दाबुन धरला.
डरो मत. कुछ नही होगा. हम कितनी बार बैठे है विमानमे.. म्हणत त्याला बाईंनी धिर दिला.
माझ्याकडे बघत म्हणाल्या, लुक्स लाईक फर्स्ट टाईम ट्रावलर..

सर, वेज या नॉनवेज ? त्याने वेज जेवन ऑर्डर केलं.
बांसी है. दाल बांसी है. क्या बकवास खाना है म्हणत प्लेट बाजूला सरकवली.

चेन्नईला विमान थांबल. माझ्या शेजारची बाई जाता जाता मला सुचना देउन गेली. प्लीज मदत कर त्याला. नवखा आहे बिचारा.
विमान एका तासाने पुन्हा उडणार होतं सिंगापुरसाठी.
टॉवर आ रहा है. टॉवर आ रहा है.. म्हणत तो मला त्याचा मोबाईल दाखवत होता.
यहा चिन मे गुजरातके मोबाईलका टॉवर कैसे आ रहा है?
भाई, ये चेन्नई है. मद्रास. चिन नहीं. चेन्नई हिंदुस्तान मे आता है. चिन मे नही.
त्याच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं.
मै गुजरात फोन लगा सकता हुं क्या?
हां हां. अब जितनी चाहे बात कर लो. एक घंटा रुकेगा यहां.

मगनभाई, चेन्न्य मे विमान रुका है.
ड्रायवर बदल रहा होगा. पायलटचा ड्रायवर करुन टाकला एका सेकंदात. नुकत्याच हरवलेल्या एमएच-३७० ची आठवण आली मला.
कोई बडा साब है. बडी कंपनीका कोई अफसर लग रहा है.
साब बोल रहा है के चेन्न्य हिंदुस्तानमे है. (अर्थात तो गुजराती वा कच्छी बोलत होता.)
मी ताबडतोब खिडकीच्या काचेत स्वतःला बघायचा प्रयत्न केला. कोणत्या कोणातुन मी याला मोठा ऑफिसर दिसतोय?
बोलताबोलता फोन कट झाला.
साब आपको बात करनी है क्या आपके घर? ये लो कर लो. म्हणत त्याने फोन पुढे केला. मी नाही म्हणताच तो दुसरा नंबर लावायचा प्रयत्न करु लागला. बॅलंस संपला होता बहुतेक.

त्याने मागीतलेली शाल हवाईसुंदरीने काही त्याला दिली नव्हती. त्यच्या शेजारची बाई सिटवर नाही बघुन त्याने तिची शाल घेतली आणि तिच्याच खुर्चीत जावुन बसला. इतक्यात ती आलीच. ती बाई सिंगापुरची चिनी भाषीक होती.

आपको इधर बैठना है क्या?
दॅट्स माय सिट.
उठला बिचारा. तिची शाल पण दिली तिला. पुढच्या रिकाम्या सिटवरची शाल उचलुन घेतली.
वरच्या बॅगेतून काहीतरी खायला काढलं. मला विचारल तु खाणार का? मग तिला विचारल तु खाणार का? (हिंदीत बरं).
ती बाई म्हणाली, सिंगापुर.. नो हिंदी.. ओन्ली इंग्लीश.
इंग्लीश नही आता.
त्याने सिटखाली फेकलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीकडे बोट दाखवत ती म्हणाली, नो लिटर इन सिंगापुर. पुलीस कॅच.. नो लिटर..
पानी कितनेका आता है सिंगापुरमें? त्याने लिटरचा संबंध पाण्याशी लावला बहुतेक.
तिने पाण्याची बाटली दाखवत म्हंटल वन डॉलर.. एक डॉलर. त्याला आश्चर्य वाटल. इतक महाग?
तिला तोडक मोडक हिंदी समजतय वाटल्यावर दोघांच्या हिंदीत गप्पा सुरु झाल्या.
मै कुक हुं. मेरे अहमदाबादमे दो रेस्टॉरंट है चायनिज. त्याच्या शेजारच्या बाईला सांगत होता.
त्याने एक पेंटींगज् चा अल्बम काढून तिला दाखवायला सुरुवात केली.
मग अल्बम मला दाखवला. खुप सुंदर पेंटींगज् होती. त्याचा काका चित्र काढतो. त्याने एक चार फुट बाय पाच फुट पेंटींग कुणा मित्राला द्यायला आणल्याच सांगीतल. बाकी सगळ्या पेन्टींगज्सचे फोटो काढुन अल्बम बनवला होता.

नो लिटर इन सिंगापुर. पुलीस कॅच.. नो लिटर.. ती पिशवी उचलुन सिटच्या कप्प्यात ठेव असं तिने त्याला खुणावलं.

हां. समझ गया म्हणत त्याने कचरा चक्क तिच्या सिटच्या समोर खोचला.

सिंगापुरमधे कुठे रहाणार म्हणून विचारल्यावर त्याने एका हॉटेलचा पत्ता मोबाईल मधे दाखवला. तिथे कुणी ओळखीच आहे का? तर कुणी मित्राचा मित्र आहे म्हणाला. त्याच काहितरी नाव पण सांगीतलं. लिटल इंडियात मुस्ताफा सेंटरच्यामागे त्याच दुकान आहे.

मी चांगला कुक आहे. तिथे नोकरी शोधायचीय म्हणाला.

इमीग्रेशन मधे संभाळून रे बाबा. नोकरी शोधायला आलास सांगितलस की परतीच्या विमानाने भारतात पाठवतील तुला.
नाही. ते मला माहित आहे म्हणे. त्याच्या कुणा मित्राला दुबईत अटक झाली होती म्हणाला.

आप थोडी मदत करना बाहेर जाने तक.
मी फॉर्म भरे पर्यंत करेन मदत. पुढचं तुझं तुलाच बघाव लागेल. हिंदी बोलणारा असेल एखादा ऑफिसर तिथे.

मला प्रश्न पडला की हा माणुस सिंगापुरमधे कसा काय निभावणार?
त्याला त्याच नाव सोडल तर इंग्रजी लिहिता येत नव्हत. नाव सुद्धा पासपोर्टवर बघुन कॉपी केलं. जन्मतारीख गुजरातीत लिहिलेली बघीतली आणि मग बाकीचा फॉर्म मीच भरुन दिला.

मी इमीग्रेशन ऑटोक्लिअरन्स मधुन बाहेर पडलो. समोरच सामानाच्या बेल्टवर माझी बॅग आली ती घेतली आणि याची वाट बघत उभा राहिलो. तो एका ऑफिसर समोर उभा दिसला मला. एक क्षण नजर चुकली आणि तो कुठेच दिसेना. काही कळायला मार्ग नाही की हा बाहेर आला की फॉर्म परत भरायला गेला? नाव आणि आडनावात स्पेस नव्हता सोडला. बर्थडेट गुजरातीत लिहिली होती. मलाच गिल्टी वाटत होतं.
अजून १०-१५ मिनिटं वाट बघावी आणि निघावं म्हंटल. मी निघणार इतक्यात स्वारी बाहेर येताना दिसली.
भाई, एटीएम किधर है?
काय झाल? किधर थे तुम?
त्याच्या खिश्यात फक्त १०० डॉलर होते. सिंगापुर मधे पैशांची दुसरी काय व्यवस्था आहे हे विचारायला त्याला आत नेल होतं. १००० डॉलर लोड केललं कार्ड दाखवल्यावर सुटका झाली होती.
एव्हड्यात त्याची बॅग बेल्ट वरुन उतरवून ठेवली गेली होती. पण त्या पेंटींगचा पत्ता नव्हता.
ऑड साईज वस्तू कोणत्या बेल्टवर येतात ते तो हिंदीत विचारायचा प्रयत्न करत होता.
ते भल मोठं पेंटींग बाजुच्याच बेल्टवर पडल होतं.

कुठे जाणार तु आता? टॅक्सी करुन देतो तुला.
त्यने पुन्हा होटेलचा पत्ता दाखवला.
मित्राचा नंबर दे. मी फोन करतो त्याला. दुकानाच नाव काय आहे त्याच्या?
कौन्सा फ्रेंड? मेरा कोई मित्र नही है सिंगापुर मे. ये पेंटींग कोई होटेलवालेको बेच दुंगा. हॉटेलमे ही जॉब मिला तो ठिक. नहीतो घुमके गुजरात वापस चला जाउंगा..

येव्हाना माझा मेंदु बधीर होत चालला होता. एटीएम मधुन ५०० डॉलर काढायला मदत केली.
टॅक्सी स्टॅन्डपर्यन्त त्याला सोडलं.. मी चक्क एमआरटी च्या दिशेने चालू लागलो.
*समाप्त*

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महान!! पण करेल कसं तरी सर्वाईव्ह तिथे.. दोन वर्षांनी अख्खं खानदान मायग्रेट करेल.

खुप दिवसांनी धुलेमामा? की वर्षांनी? राम राम! Happy
भारी आहे लेख. काय एक एक नग असतात? ह्यांच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते मात्र. एक गुजराथी सोडून फारसं काही येत नसताना फक्त "देख लेंगे" ह्या अ‍ॅटिट्युडच्या जोरावर ही लोकं बिन्धास्त परदेशात येतात आणि पुढे सायो म्हणतेय तसा जम पण बसवतात.
इथे माझी आई शिकलेली, इंग्लिश समजणारी असून सुद्धा एकटं विमानात बसून अमेरिकेत यायचं म्हंटलं की कानाला हात लावते. Happy

धन्यवाद सगळ्यांचे.
सायो, अगदी खरय.
वैद्यबुवा, त्याच्या हिमतीची खुपच कमाल वाटली.
गा.पै.>> अगदी ताजा ताजा अनुभव आहे १० दिवसां पुर्वीचा. खरा-खुर्रा.. Happy

कान्त...
आज पयल्यांदाच तुमचां लेखन वाचलंय... मस्त-मस्त-मस्त... आवाडलां... Happy

मी ताबडतोब खिडकीच्या काचेत स्वतःला बघायचा प्रयत्न केला. कोणत्या कोणातुन मी याला मोठा ऑफिसर दिसतोय?...>>>... तुमका पयल्यांदा (आणि एकदाच... Wink ) भेटलेलंय - ठाण्याक 'जा-जु'च्या घरात, तेव्हां तुमकां आणी आशुतोषांक बघुन माका देखिल तसांच वाटलेलां... :)... Keep-it-up...

जबरदस्तच.
<<कोई बडा साब है. बडी कंपनीका कोई अफसर लग रहा है.
साब बोल रहा है के चेन्न्य हिंदुस्तानमे है. (अर्थात तो गुजराती वा कच्छी बोलत होता.)
मी ताबडतोब खिडकीच्या काचेत स्वतःला बघायचा प्रयत्न केला. कोणत्या कोणातुन मी याला मोठा ऑफिसर दिसतोय?>> Happy

मस्त खुसखुशीत भाषेत लिहीलंय. खरंच हे लोक देख लेंगे अ‍ॅटिट्यूड वर आणि हिमतीअर जग फिरतील आणि एखाद्य ठिकाणी बस्तानही बसवतील... शिकलेली, इंग्लिश समजणारी असून सुद्धा एकटं विमानात बसून अमेरिकेत यायचं म्हंटलं की कानाला हात लावते.>> माझ्याही येतो... भल्यामोठ्या जागा, चकचकीत वातावरण माझ्या अंगावर येतं भीती वाटते की आपण काही बावळटपणा करून आपलं हसं तर होणार नाही ना... क्वीन मधल्या एकट्याने हनीमूनला लंडनला गेलेल्या रानीचं अपार कौतूक वाटलेलं
बाकी काही नाही संकोचाचं कारण बहुदा लोग क्या कहेंगे हेच असतं. एकदा त्या संकोचाचा पडदा काढला की बस्स!

कांतानु, बरेच दिवसानी कीबोर्ड हातात घेतल्यास कांय ? मस्तच. धा येक वर्षानी तुमका होच माणुस सिंगापुरात चांगलाच बस्तान बसवलेलो दिसतलो. (आणि आम्ही आराडतो "भैया हातपाय पसरी" म्हणांन)

अशेच लिहिते रवां Happy

लक्ष्मीकांत,

>> अगदी ताजा ताजा अनुभव आहे १० दिवसां पुर्वीचा. खरा-खुर्रा.. Happy

असं? मग कथालेखक सुद्धा मस्त! Proud

आ.न.,
-गा.पै.

भारीच किस्सा.. पिक्चर बनेल एखादा ह्या स्टोरीवर...>>

हां परेश रावळ किंवा दीपक जोशी( तारक मेहता मधला जेठालाल) छान काम करतील

प्रतिसादां बद्दल धन्यवाद...
गुरुकाका, मास्तर प्रोत्साहन दिल्याबद्द्ल आभारी आहे.

पिक्चर बनेल एखादा ह्या स्टोरीवर...>> बर्‍याच वर्षांनी एअर्-इंडियाने प्रवास करत होतो. दुसर्‍या एन्टरटेंट्मेन्ट सोयीची गरजच नसते एआय च्या विमानात. Lol

Pages