तिचे अभंग…।

Submitted by चेतन.. on 8 April, 2014 - 08:12

तिचे अभंग…।

आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी,
तिच्या आठवणी, खंडीभर..!

तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी,
स्पंदने उराशी, तिचीच रे..!

कसे तिचे असे, मधाळ बोलणे,
मिठाने चोळणे, जखमांना..!

उगाच एवढी, केली उठाठेव,
तिच्या डोळी देव, दिसायचा..!

काय काय सांगू, काय रे व्हायचे,
मोर नाचायचे, ग्रीष्मातही..!

ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ,
पदरात जाळ, श्रावणाच्या..!

इवल्याश्या देही, किती उलाढाल,
तिच्या लेखी झालं, काही नाही..!

ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली,
झोळी हि भरली, आठवांनी..!

अशात नेहमी, हवे ते ना घडे,
अश्रुंचेच सडे, जागोजागी..!

नको ते घडले, इथेही नेमके,
चांदण-चटके, काळजाला..!

शेवटची भेट, काळजाला पेट,
वणव्याचा थेट, झाला घाव..!

एकदाच तिने, यावे माझ्यासाठी,
भरेन मी ओटी, कवितेनं..!

मग जावे तिने, अगदी खुशाल,
कवितेची शाल, माझ्या अंगा..!

तिच्याशी जुळले, कवितेचे धागे,
आता तिच्या मागे, कविताच..!

तिला पडू नये, कशाची वानवा,
तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!

एवढे मागणे, ऐक रे श्रीरंग,
पडो हा अभंग, तिच्या पायी..!

- चेतन..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

wah!