तुझ्यावाचून आले मी

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 April, 2014 - 12:56

पुन्हा माझ्या मनाची वेस ओलांडून आले मी
तुझ्यापासून आले मी, तुझ्यावाचून आले मी

पुन्हा सत्यामधे माझी तुझ्याशी फारकत झाली
पुन्हा स्वप्नामधे माझ्या तुला गाठून आले मी

अबाधित राहिले बाकी तुझ्या-माझ्यातले अंतर
जरासे सैल केले तू जरा ताणून आले मी

नको काढूस हा निष्कर्ष 'झाले संपले सारे !'
मनाचा कोपरा अन् कोपरा व्यापून आले मी

पुन्हा डोळ्यात वस्तीला जमा झाले जुने अश्रू
पुन्हा दुःखास आमंत्रण नवे देवून आले मी

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सगळे शेर आवडले
पहिले ३ सर्वाधिक आवडले
तरी सर्वच शेर तुम्ही अजून बढिया करू शकला असतात असे वाटले (उगाचचही असेल ..मला काहीही वाटायलय आजकाल Sad ) बेफीजींची एक ओळ आठवली >>>तुझ्यापर्यंत आलो की तुझ्यापासून आलो मी <<<त्या प्रभावात मग पुढील ओळी भराभर वाचत गेलो असेन त्यामुळे असे वाटले असावे बहुधा
असो
धन्यवाद
आगावूपणाबद्दल क्षमस्व Happy

अबाधित राहिले बाकी तुझ्या-माझ्यातले अंतर
जरासे सैल केले तू जरा ताणून आले मी

हा फार आवडला.

'निष्कर्ष' हवे, माझ्या मते.