अस्पष्ट होत आहे जयदीप नाव आता

Submitted by जयदीप. on 2 April, 2014 - 15:02

अस्पष्ट होत आहे जयदीप नाव आता
सोडून चाललो मी माझेच गाव आता

नव्हते मला कधीही दुखवायचे कुणाला
माझ्याविरुध्द माझा आहे उठाव आता

माझ्याकडून माझा अपमान होत गेला
अपमान सोसण्याचा झाला सराव आता

यांच्या गटात नाही.. त्यांच्या गटात नाही
नाते तुझे नि माझे आहे निनाव आता

तू एकदाच केला आहेस वार ........मित्रा
स्त्रवणार जन्मभर हा माझ्यात घाव आता

ही सांगता म्हणू की सुरुवात एकदाची....
माझ्या मनात माझा अंतिम पडाव आता!

जयदीप.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा, पण हे खयाल तितकेसे नावीन्यपूर्ण नाहीत. गझल सहजसुलभ झाली आहे, पण खयालही वेगळे मिळावेत अशी अपेक्षा असते.

धन्यवाद बेफिजी.

या गझलेत अजूनही त्रुटी जाणवत आहेत-
१.'माझे', 'माझा' इ. शब्दांचा जास्त वापर झाल्याने रसभंग होत असावा
२. अनेक ठि़काणी काफिये चपखल वाटत नाही आहेत
३. बर्‍याच शेरांमध्ये दोन मिसर्‍यांमध्ये राबता नीट नाही आहे

त्यामुळे ही गझल कमकुवत आहे

(माझ्या इतर गझलांमध्ये अशा अनंत चुका आहेतच Happy )

प्रयत्न करतोच आहे. Happy

लोभ असावा.

जयदीप

४. सानी मिसर्‍यातील काफिया काय असेल हे उल्यातच स्पष्टपणे कळून येत आहे
>> ही त्रूट आहे असं नाही वाटत. Happy

४. सानी मिसर्‍यातील काफिया काय असेल हे उल्यातच स्पष्टपणे कळून येत आहे<<<

खरे तर तसे कळून येत आहे असे तुम्हीच म्हणत आहात, मला तरी तसे काही वाटले नाही. Happy