स्पोकन इंग्लिश वर्ग : एका अभिनव उपक्रमाचा प्रवास व हृद्य समारोप

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 March, 2014 - 05:53

गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्‍यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्‍या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्‍या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही. त्यातून सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमातून अशा उपक्रमासाठी कितपत प्रतिसाद मिळेल आणि तो कितपत टिकेल याबद्दलही काहीच कल्पना नव्हती. परंतु कळवायला आनंद होतो की आपल्या मायबोलीकर स्वयंसेवक शिक्षकांनी ही कमिटमेन्ट तर घेतलीच शिवाय ती उत्तम प्रकारे पूर्णही केली!

मायबोलीकर साजिरा, समीर देशपांडे, अनया, मुग्धमानसी, अश्विनी डोंगरे, शकुन, शैलजा, हर्षलसी या मंडळींबरोबरच आर्या, निकिता, सिद्धेश, मुक्ता आणि तेजस्विनी हेदेखील स्वयंसेवक शिक्षक चमूत सामील झाले. सुरुवातीस भेटीगाठी, चर्चा, इमेल्स इत्यादींमधून कल्पना, परस्पर विचारांची देवाणघेवाण झाली. शाळेला, तेथील मुलांना प्रत्यक्ष भेट देऊन झाली. नक्की काय शिकवायचे, कसे शिकवायचे, काय संकेत पाळायचे याबद्दल थोडेफार बोलणे झाले. परंतु प्रत्यक्षात तिथे वर्गात मुलांची काय तयारी आहे हे जोखून त्यानुसार त्यांच्या कलाने त्यांना शिकविणे ही फार वेगळी गोष्ट होती. प्रारंभीच्या काही तासांमध्येच सर्व शिक्षकांना हे लक्षात आले. रुढ पद्धतींनुसार शिकवून येथील मुलांना ते समजेलच ह्याची शाश्वती नव्हती. सुरुवातीला चौथी ते सातवीच्या वर्गांनाच शिकवायचे असे ठरले होते. परंतु शाळेच्या विनंतीवरून इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या वर्गांनाही इंग्रजी शिकवण्यास सुरुवात झाली. मुलांना अगदी प्राथमिक पातळीवर, मुळाक्षरांपासून इंग्रजी शिकवावे लागत होते. अनेक मुले मराठी जाणणारी असली तरी त्यांची मातृभाषा वेगळी. प्रत्येकाची बौद्धिक कुवत वेगवेगळी. काही मुले अतिशय दंगेखोर, हूड तर काहींचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही. काहीजण विलक्षण बोलघेवडे तर काही मुले लाजरी, अबोल. काहीजण अचानक गायब होणारे तर काही अतिशय चुणचुणीत, सिन्सीयर! अशा सर्व मुलांना रुचेल, आवडेल अशा तर्‍हेने, त्यांच्याशी संवाद साधत त्यांना इंग्रजी भाषेची गोडी लावायची होती.

मग आपल्या सर्व स्वयंसेवक शिक्षकांनी एकमेकांशी बोलून व इमेलद्वारे आपण दर तासाला कोणत्या प्रकारे काय गोष्टी शिकवल्या, त्यातल्या कोणत्या गोष्टींना मुलांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, कोणत्या गोष्टी फारशी दाद मिळवू शकल्या नाहीत, मुलांना कशा प्रकारे शिकवलेले आवडते आहे ह्या सर्व अनुभवांची व आपल्या नवकल्पनांची देवाणघेवाण सुरु केली. त्याचा एक अतिशय चांगला उपयोग असा झाला की दर आठवड्याच्या तासांना काय शिकवले, कसे शिकवले याचे उत्तम दस्ताऐवजीकरण तर झालेच; शिवाय एकमेकांकडून स्फूर्ती घेऊन शिक्षक नव्या नव्या क्लृप्त्यांद्वारे मुलांना इंग्रजी भाषेची गोडी लावण्यात यशस्वी होऊ लागले. शिक्षक मुलांमध्ये इतक्या आपुलकीने, आत्मीयतेने मिसळत होते की मुलेही दर शनिवारी मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या शिक्षकांची व इंग्रजीच्या तासाची वाट बघू लागली. कधी शिक्षकांनी तासाला घेतलेला खेळ रंगला तर तास उलटून गेल्यावरही मुलांची शाळेत थांबून पुढे शिकायची तयारी असायची. आपले शिक्षक मुलांना खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, कोडी, अ‍ॅक्टिविटीजच्या माध्यमांतून, त्यांच्याशी संवाद साधत त्यांना शिकवत होते. त्यांच्यातील इंग्रजी भाषेविषयीचे कुतूहल जागृत करत होते.

ह्या सर्व प्रवासात अडचणीही काही कमी आल्या नाहीत. अनेकदा शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमही नेमके शनिवारीच असायचे. कधी स्वयंसेवक शिक्षकांना आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे शाळेत येणे अवघड ठरायचे. त्या वेळी बाकीची स्वयंसेवक मंडळी सरसावून पुढे यायची व त्या शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वर्गावर शिकवायची. मुलांच्या अभ्यासातील अडचणी समजून त्यांना मार्गदर्शन करायची. आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अडचणी समजल्यावर तितकीच कळवळायची, हतबुद्ध व्हायची, त्याबद्दल काही करता येईल का याचा विचार करायची. आम्ही सर्वजणच ह्या बाबतीत एकमेकांना मानसिक धीर देत होतो. एकमेकांच्या संपर्कात राहात असल्यामुळे जणू सर्वच वर्गांमधील मुले ही 'आपली मुले' आहेत असे वाटू लागले होते. अर्थात तरीही प्रत्येक शिक्षकाचे ते शिकवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी एक खास असे वेगळे नाते निर्माण झाले होतेच!

मग अनया ताई बालमित्रच्या पुरवण्या घेऊन जायला लागली तशा मुलांच्या त्या पुरवण्यांवर उड्या पडू लागल्या. त्यातली कोडी, जोक्स वाचण्यासाठी मुलं धडपडू लागली. शकुनने मुलांसाठी वाचायला म्हणून रंगीबेरंगी चित्रांचे, मोठ्या अक्षरांतील छपाईचे गुळगुळीत असे गोष्टीचे पुस्तक नेले होते. ते पुस्तक पाहून मुले हरखूनच गेली. एका तासाला दीपकदादाने मुलांना एम एस पेन्टचे माध्यम वापरून मजेमजेच्या गोष्टी शिकविल्या. एक ना दोन, अशा तर्‍हेच्या वेगवेगळ्या युक्त्या योजून मुलांचा नवी भाषा शिकण्यातील व त्या भाषेचा सराव करण्यातील रस वाढवण्यासाठी आपले शिक्षक हर तर्‍हेने प्रयत्न करत होते.

बघता बघता मार्च २०१४ आला आणि आपल्या स्वयंसेवक शिक्षकांच्या मनांत उलघाल सुरु झाली. अरे! एकच महिना उरला. आता शाळा संपणार! प्रत्येक शनिवारची दुपार या मुलांसमवेत कशी जायची तेच कळायचे नाही. आता हे संपणार. इयत्ता सातवीची मुले वेगळ्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर परत भेटतील का? गावी किंवा सुट्टीला गेलेली मुलं मुली शाळेत परत येतील ना? त्यांना आतापर्यंत शिकवलेलं इंग्रजी त्यांच्या लक्षात राहील ना? एक ना दोन प्रश्न.

आणि असे म्हणतच २९ मार्च उजाडला. आजचा शाळेतला इंग्रजीचा तास हा ह्या शैक्षणिक वर्षातला शेवटचा तास. काय शिकवायचं आज? पण हा प्रश्न शाळेनेच सोडवून टाकला. २९ मार्चला शाळेने खास सरस्वती पूजन व पाटी पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. नेहमीपेक्षा लवकरच, म्हणजे सकाळी १० वाजता सर्व स्वयंसेवक शिक्षक, विद्यार्थी, शाळाप्रमुख आणि शाळेतील शिक्षक सजून, नटून शाळेत उपस्थित होते. आपले मायबोलीकर श्री. दीपक ठाकरे उर्फ साजिरा यांना अध्यक्षस्थानी बसवून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सरस्वतीपूजा व पाटीपूजा पार पडल्यावर शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इंग्रजीच्या तासांचा आपल्याला कसा फायदा झाला आहे किंवा होतो आहे, या तासांमधून आपल्याला नेमके काय मिळाले याबद्दल मुलांचे विचार ऐकण्यासारखे होते. अध्यक्षांनीही आपला अनुभव सांगितला. थोडा अल्पोपाहार झाल्यावर आपल्या शिक्षकांमधील समीर व सिद्धेश यांनी मुलांना एक 'सरप्राईझ' दिले! मुलांसाठी त्यांनी खास 'जंगलबुक' चित्रपटाची सीडी शाळेतील मोठ्या टीव्हीवर दाखविण्याचे आयोजन केले होते. मग काय! मुलांच्या आनंदाचे काय वर्णन करावे!! अशा तर्‍हेने जुलै २०१३ मध्ये सुरु केलेल्या 'स्पोकन इंग्लिश' शिकवण्याच्या ह्या उपक्रमाची ह्या वर्षीची सांगता आनंदात, जल्लोषाच्या वातावरणात झाली.

पुढील वर्षीही हा उपक्रम चालू ठेवावा अशी विनंती शाळेने तर केली आहेच, शिवाय मुलेही मोठ्या आतुरतेने पुढच्या वर्षीही हे शिक्षक ताई-दादा येऊन आपल्याला नव्या काय काय गोष्टी सांगतील - शिकवतील याची वाट बघत आहेत. मुलांसाठी आपला अमूल्य 'वेळ' देणारे हे ताई-दादा ज्याप्रमाणे मुलांना दर भेटीत आतापर्यंत काही वेगवेगळे शिकवत आहेत तसेच ह्या मुलांकडूनही ते बरेच काही शिकतही आहेत - शिकले आहेत. त्यांचे अनुभव, त्यांचा हा प्रवास आणि त्यांचे मनोगत त्यांनी आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये मांडावे अशी मी त्यांना विनंती करते!

सिध्देशने टिपलेली सरस्वती पूजा व समारोप कार्यक्रमाची ही काही छायाचित्रे :

१.

collage1.jpg

२.

collage2.jpg

मायबोलीने हा उपक्रम सुरु करण्यासाठी व तो चालू ठेवण्यासाठी जो प्लॅट्फॉर्म उपलब्ध करून दिला त्यासाठी मायबोलीचे मनःपूर्वक आभार! तसेच अनेकांना ह्या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही तरी त्यांनी वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले, सूचना दिल्या, माहिती पुरविली व पाठीवर कौतुकाची थाप दिली - सर्वांचा उत्साह वाढवला... तुमचे प्रेमाचे हे सहकार्य असेच सातत्याने लाभत राहो! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!! ग्रेट! फारच कौतुकास्पद काम केलंत तुम्ही सगळ्यांनी! खरंच हे सोपे नाही पण तुम्ही ते करुन दाखवलंत!!हॅट्स ऑफ टु यू!! पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! Happy

मस्तच उपक्रम खरंच. ज्या माबोकरांनी आपला वेळ देऊन हे काम केलं त्याचं विशेष कौतुक.

अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे हा! सगळे स्वयंसेवक आपापल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून किती नेटाने आणि छान काम करत आहेत.
सगळ्यांनाच खूप धन्यवाद!!

वा!! ग्रेट! फारच कौतूकास्पद काम केलंत तुम्ही सगळ्यांनी! खरंच हे सोपे नाही पण तुम्ही ते करुन दाखवलंत!!हॅट्स ऑफ टु यू!! पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! >> ++
मस्तच उपक्रम.

छान उपक्रम.असा उपक्रम सुरु केल्याबद्दल अरुन्धती तुझे आणि सह्भागी सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन

फार कौतुकास्पद उपक्रम आहे!!
सर्व सहभागी माबोकरांचे तसेच इतर कार्यकर्त्यांचे अभिनंदन!!

_/\_

मन:पूर्वक अभिनंदन!

दिलेला शब्द पाळून एक पूर्ण वर्षभराची कमिटमेंट निभावणे ही सोपी गोष्ट नाही... अत्यंत सेवाभावी वृत्तीने तुम्ही सर्वांनी केलेल्या या कामासाठी माझ्याकडून हॅट्स ऑफ! Happy

धन्यवाद अरुंधती, इथे धागा काढून माहिती दिल्याबद्दल.

इथं कौतुक करणार्‍यांनाही खूप धन्यवाद. नेहेमीसारखं मूठभर मांस येण्यापलीकडेही बराच आधार या कौतुकाने दिला आहे. गेल्या वर्षभरात 'आपल्याला जमेल की नाही' असे प्रश्न पडण्यापासून ते थेट निराश होण्याचेही क्वचित प्रसंग आले. त्यातून निभावून नेऊ शकलो ते फक्त तुमच्या कौतुकाच्या आणि आधाराच्या शब्दांमुळे.

---

परवाच्या पाटीपूजन समारंभाचं निमंत्रण दोनेक आठवड्यांपूर्वी मुख्याध्यापक बाईंनी दिलं होतंच, शिवाय मुलंही अधून मधून 'येणार ना नक्की' विचारून जाहिरात करत होती. परवा नेहेमीपेक्षा तासभर आधीच शाळेत पोचलो तेव्हा प्रचंड उत्साह आणि गडबड आधीच सुरू झालेली दिसत होती. काहींनी नेहेमीचे गणवेश बाजूला ठेऊन ठेवणीतले कपडे घातलेले दिसत होते. शाळेत आल्या आल्या आपापले नवे कपडे आम्हाला दाखवायची एकच झुंबड!

मुख्याध्यापक मानकर बाईंनी रीतसर सभेचं वातावरण तयार केलं. खुर्च्यांवर बसून भाषणं वगैरे 'काहीतरीच' वाटतं खरं, पण त्यांचा प्रेमळ आग्रह अर्थातच मोडवला नाही. मग असं खुर्च्यांवर बसल्यावर मुलांनीही हात उंचावत हसून दाखवत आपण दादा-ताईचे 'खास जवळचे' असल्याचं पक्कं करून घेतलं. नेहमी शेजारी आपल्याच बाकावर बसून रांगेत फिरून शिकवणारे आज समोर खुर्च्यांत आणि 'व्यासपीठावर'- याचं त्यांनाही जरा कौतुक होतंच.

मानकर बाईंनी भाषण सुरू केलं. या बाईंना वर्षभर हसतमुख आम्ही बघत आलो. मुलांचं असो, की आमचं- कौतुक करताना, गोड बोलताना त्या कधीच थकल्याचं कंटाळल्याचं दिसल्या नाहीत. आताही त्या भरभरून बोलत असताना आम्ही सारे संकोचत होतो, पण त्याचवेळी त्या किती मनापासून, ओघवतं आणि नैसर्गिक बोलत आहेत- हेही कळत होतं. 'आम्हा सार्‍यांना तुमची फार आठवण येईल..' असं शेवटी त्या आम्हाला उद्देशून म्हणाल्या तेव्हा जरा चरकायला झालंच.

बाईंनी सांगितलं होतंच, पण मुलांनीही आग्रह करून आधी गुपचूप 'तुम्ही भाषण करणार ना?' असं प्रश्नार्थक बजावून ठेवलं होतं. मी ''आठवण येईल- असं वगैरे बोलू नका, कारण सध्या फक्त एक छोटा ब्रेक घेणार आहोत, आणी जूनमध्ये परत नव्या दमाने काम सुरू करणार आहोत.. पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गोष्टी, नवे उपक्रम आपण सुरू करतो. आपण आता या वर्षभराच्या उपक्रमाची सांगता किंवा समारोप करतो आहोत- असं न समजता या पथदर्शी प्रकल्पाची यशस्वीरीत्या मुहूर्तमेढ आपण रोवून दाखवली आहे- असं समजा.. तुम्हाला आणि तुमच्या शिक्षकांना कल्पना नसेल, पण या प्रकल्पाचं स्वतंत्र आणि रीतसर डॉक्युमेंटेशन वर्षभर होतं आहे- ज्यामुळे यापुढेही आम्हाला नेहेमीच मदत करत राहील, दिशा दाखवत राहील. या पायलट प्रोजेक्टचाच एक छोटा भाग म्हणून एका मोठ्या मराठी संकेतस्थळावर ही सर्व माहिती आम्ही टाकत आहोत. तिथले लोक आमचं आणि तुमचंही खूप खूप कौतुक करत आहेत.. गेल्या वर्षभरात तुम्ही थोडंफार शिकलात तसं आम्हीही भरपूर शिकलो आहोत- याबद्दलही तुम्हा सार्‍या गोड मुलांचे आणि तुमच्या शिक्षकांचे आभार मानतो.." अशा स्वरूपाचं बोललो. अनया, ज्योती, समीर, निकिता- सारे बोलले- तेही इथं लिहितीलच.

मुलांची भाषणं- हे तर या कार्यक्रमाचं हायलाईट! एरवी न जास्त बोलणारी मुलं भरभरून आणि हौसेने बोलताना बघून काय वाटत होतं, ते शब्दांत सांगता येणार नाही.

प्रतिभा नावाच्या मुलीबद्दल मी मागे लिहिलं होतं (http://www.maayboli.com/node/43787?page=3). या मुलीला बोलतं करण्यात आम्ही वर्ष घालवलं. सतत कपाळावर आठ्या आणि घट्ट मिटलेले ओठ घेऊन वावरणारी ही मुलगी शेवटी शेवटी कशीबशी आम्ही सांगू ते करायला तयार होऊ लागली होती. मात्र तोंड घट्ट मिटलेलंच. काहीतरी जबरदस्तीने आतच ठेवायचं, स्वतःपाशीच ठेवायचं असा हट्ट केल्यागत. वही कुणाला दाखवायला तयार नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. बाकावर शेजारी बसून मायेने गोंजारत काही बोललं तरी ढिम्म. एकदा तिच्या नकळत तिची वही बघितली, तर सुंदर अक्षरांत फळ्यावर लिहिलेलं वहीत लिहिलेलं. बर्‍याच चुका होत्या. शिवाय दिलेलं होमवर्कही कसंबसं तोडकं मोडकं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला. आपण बरोबर रस्त्यावर आहोत- हे तेव्हा कळलं. ही अगदीच अलीकडची, म्हणजे मागल्या महिन्यातली गोष्ट.

परवा प्रतिभा छान नटून आलेली. आल्या आल्या ओठ घट्ट मिटूनच, पण हसून तिने तिचा नवा ड्रेस दाखवला. तिला शाबासकी दिली. मग सारं आटोपून आवराआवरी होत असताना प्रतिभा जवळ आली, आणि हात घट्ट पकडत, नेहेमीचं ते आठ्यांचं जाळं बाजूला सारत गोड आवाजात म्हणाली, 'दादा सुट्ट्यानंतर तुम्ही नक्की येणार ना पुन्हा?'

मी मान डोलावली खरी, पण काही बोललो तर आवंढा येईल या भितीने तिला जवळ घेत चटकन मान फिरवली. तेव्हा वाटलं- सारं वसूल झालं. आपण केलं त्यापेक्षा किंचित उजवंच दान पदरात पडलं. हा आधार भक्कम आहे, आता बाकी काही नको.. Happy

उपक्रम जितका उपयुक्त सिद्ध झाला तितकेच हेही या निमित्ताने समोर आले की आपल्याकडे मनापासून काम करू इच्छिणार्‍या स्वयंसेवकांची कमतरता पडत नाही. स्वतःची नित्याची कामे-कुटुंब सांभाळून ज्यानीज्यानी या प्रकल्पात भाग घेतला त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

श्री.साजिरा यांचे "...नेहेमीसारखं मूठभर मांस येण्यापलीकडेही बराच आधार या कौतुकाने दिला आहे. ..." हे वाक्य खूप बोलके आहे.

अतिशय कौतुकास्पद उपक्रम! या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे फार कौतुक वाटते.

साजिरा,
>>आपण केलं त्यापेक्षा किंचित उजवंच दान पदरात पडलं. हा आधार भक्कम आहे, आता बाकी काही नको.. >> भावना पोहोचल्या.

आम्हाला शिकवताना खूप मजा आली. मुल शिकली पण त्यापेक्षाही आम्ही जास्त शिकलो. समाजातल्या ज्या थराला आपण वगळलेल असत, त्या थरातली मुल इतक्या आनंदाने, जिद्दीने शिकताना बघून छान वाटायच.

त्या अनुभवाबद्दल उद्या सविस्तर लिहिनच. आत्ता इतकच. हे सगळ जुळवून आणणार्‍या साजिरा आणि अरुंधतीचे आभार!

Pages