माझे सौर ऊर्जा व इतर बरेच पर्यावरणपूरक प्रयोग व उपक्रम

Submitted by प्रमोद् ताम्बे on 30 March, 2014 - 06:11

सौर ऊर्जा निर्मिती (सोलर एनर्जी)
ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून आपण आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लावावा व विजेची राष्ट्रीय बचत व्हावी केवळ या बहुउद्देशानेच मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या “ सौर ऊर्जा निर्मिती “ चा वापर करायचे ठरवले
 सोलर पॅनेल्स xxx.jpg व इन्व्हर्टर xxx.jpg
त्यासाठी मी माझ्या जुन्या घराच्या छतावर (वाड्याच्या गच्चीवर) दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्स आणि माळ्यामध्ये एक १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सची बॅटरी व एक इन्व्हर्टर बसवून घेतला असून त्यापासून १ जानेवारी २०११ पासून घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर दिवाणखान्यातील १८ वॅटची एक एल.ई.डी ची ट्यूब (जिचा प्रकाश नेहमीच्या ४० वॅटच्या फ्लूरोसंट ट्यूब एव्हढा मिळतो) ,स्वयंपाकघरातील १८ वॅटची एक एल.ई.डी ची ट्यूब , जिन्यातील ९ वॅटचे एल.ई.डी. .चे चार दिवे (ज्यांचा प्रकाश नेहमीच्या ६० वॅटच्या ग्लोब एव्हढा पडतो), व गच्चीवरील एक ९ वॅटचा दिवा असे घरातील सर्व दिवे आता पुर्णपणे सौर उर्जेवरच चालतात. साधारणपणे सायंकाळी ६.३० ते रात्री १० पर्यन्त (३.५० तास) व पहाटे ५.०० ते ६.३० (१.५० तास) असे एकूण ५ तास ही सौर ऊर्जा पुरते. माझ्या एम.एस.ई.बी. वीज कंपनीच्या मासिक बिलात दरमहा सुमारे १०० रुपयांची बचत होऊ लागली आहे. हा संच (दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्स + एक १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सची बॅटरी व एक इन्व्हर्टर + स्वतंत्र वायरिंगसह दोन ट्यूब फिटिंग व एल.ई.डी.चे ९ वॅटचे चार दिवे) उभारणीसाठी मला एकूण ६०,००० रुपये एव्हढा खर्च आला होता व सर्व काम १० दिवसात पूर्ण झाले. (विशेष टीप: वरील सर्व ठिकाणचे पूर्वी असलेले व एम.एस .ई. बी. च्या वीजे वर चालणारे ट्यूब किंवा दिवे हे तसेच असून जरूर असेल तेंव्हा मी ते वापरूही शकतो, त्याखेरीज टी.व्ही., पंखे, फ्रीज, मायक्रो, इस्त्री, मिक्सर, वॉशिंग मशीन व इतर विद्युत उपकरणे ही सर्व एम.एस.ई.बी. च्या विजेवर चालतात)
गच्चीवर उभारलेल्या दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्ससाठी ५’ x ३’ जागा व माळ्यावर एक १८० वॅट्ची बॅटरी व एक इन्व्हर्टर बसविण्यासाठी ३’ x ३’ जागा लागली. १ जानेवारी २०११ ला प्रत्यक्ष सौर वीजेचा वापर सुरू केल्यापासून आजपावेतो गेल्या ३९ महिन्यात मला फक्त १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सच्या बॅटरीमध्ये महिन्यातून एकदा डिस्टील वॉटर (५० मी.ली.) भरावे लागते. या खेरीज एक पैचाही खर्च केलेला नाही.
यापैकी गच्चीवर बसवलेली दोन सौर पँनेल्स ही ज्यांच्या घराला गच्ची नाही ते आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर लोकांडी ब्रकेट्स लाऊन त्यावरही बसवून घेऊ शकतील. व १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सची बॅटरी व एक इन्व्हर्टर जमिनीवर न ठेवता दरवाजाच्या वर एखादी फळी बसवून घेऊन त्यावर ठेऊ शकतील . फक्त बॅटरीमध्ये महिन्यातून एकदा डिस्टील वॉटर भरण्यासाठी स्टुलावर उभे राहून ते भरावे लागेल एव्हढेच जरासे जिकीरीचे जाईल.
सौर वॉटर हिटर
 वॉटर हिटर xxx_0.jpg

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा गच्चीवर २४ जानेवारी २००१ ला सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २३,५०५/-(दरमहाची बॉयलर व गिझर वीज बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ५') गेल्या १३ वर्षात फक्त एकदा फ्लेक्सिबल होज पाइप बदलावा लागला त्यासाठी २५० रुपये खर्च आला. बाकी मेंटेनन्स शून्य. फक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते.
(विशेष टीप: या सौर वॉटर हिटरच्या खाली दिल्याप्रमाणे काही मर्यादा आहेत)
पहिले म्हणजे यासाठी स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश अभ्राच्छादित (ढगाळ) असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळीगरम पाणी मिळत नाही.
घरी बरीच पाहुणे मंडळी आली असतील त्यावेळी जर वरच्या सोलरच्या गरम पाण्याच्या साठवण टाकीत तयार झालेले गरम पाणी वापरुन संपले तर पुन्हा ती टाकी गरम पाणी तयार होऊन भरण्यास किमान ३ तास लागतात.
सोलर पँनेल ट्रेच्या काचेवर पक्षी विष्ठा टाकतात किंवा काचेवर धूळीचा थर बसून काचेतून पुरेसे ऊन आतील तांब्याच्या नळ्यांवर प[अडत नाही त्यावेळी पाणी गरम होण्यास जास्त वेळ लागतो. ( म्हणूनच महिन्यातून एकदा काच पाण्याने धुवून स्वच्छ करावी लागते)
वरील मर्यादा लक्षात घेऊन जर या ह्या सौर वॉटर हिटरचा वापर केला तर तुम्हाला चोवीस तास केंव्हाही गरम पाणी तर मिळेलच पण पांच वर्षात केलेला खर्च भरून निघेल व उर्वरित आयुष्यभर जवळपास मोफत गरम पाणी मिळेल हे नक्की.

सौर कुकर
 कुकर xxx.jpg
एल.पी.जी.गॅस सारख्या राष्ट्रीय साधन संपत्तीची बचत व्हावी व पर्यावरणास पूरक अशा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास हातभार लागावा म्हणून दिनांक ०७ नोव्हेंबर २००९ पासून मी घरचे रोजचे अन्न (जेवण) शिजवण्यासाठी सौर कुकरचा वापर सुरू केला आहे. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या,बटाटे,चिकन,मटण,पुरण सुद्धा उत्तम शिजतेच पण ह्या कुकरमध्ये दूधाची बासुंदी सुद्धा न करपता होते. (खर्च २,६००/-) (लागणारी जागा ५' x ३')
सोलर कुकर वापराच्या मर्यादा व अडचणी : १. सोलर वॉटर हिटर प्रमाणेच या कुकरलाही मुबलक स्वच्छ सूर्य प्रकाश असणे गरजेचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात जेंव्हा आकाश अभ्राच्छादित (ढगाळ) असते व जेंव्हा सूर्यप्रकाश पुरेसा नसतो त्यावेळी हा कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरता येत नाही.
२. हा कुकर घराच्या गच्चीवर उन्हात ठेवावा लागत असल्याने सकाळी एकदा कुकर लावण्यासाठी डाळ व तांदुळाचे डबे घेऊन वर जावे लागते व कुकर लावून परत खाली यावे लागते आणि दुसर्यांदा पुन्हा तीन तासांनंतर कुकर झाल्यावर म्हणजेच अन्न शिजल्यावर पुन्हा एकदा भर उन्हात वर गच्चीवर जाऊन कुकर मधून काढून वरण भाताचे तापलेले डबे घेऊन खाली यावे लागते व यालाच काही दिवसात बायका कंटाळतात व काही महिन्यात हा कुकर वापरणेच बंद करुन टाकतात असा माझा अनुभव आहे.
गांडूळ खत प्रकल्प
 खत निर्मिती पेटी xxx.jpg

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा ओला कचरा ( शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपल्याचा टाकाऊ भाग),निर्माल्य महानगरपालिकेच्या कचाकुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी १२ सप्टेंबर २०१० पासून माझ्या घराचा गच्चीवर व्हर्मी-कल्चर म्हणजेच गांडूळ खताची निर्मिती पासून सुरू केलेली आहे. त्यापासून निर्माण होणार्याा जैविक खताचा वापरही बायो-कल्चरसाठी केला जातो. प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये २,८००/-(मेंटेनन्स शून्य)
नागरिकांकडून असे पर्यावरणपूरक प्रकल्प जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर राबवले जावेत व अशा प्रकल्पांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा याउद्देशाने प्रोत्साहन म्हणून महानगरपालिकेकडून मिळकत करात १०% सुटही देण्यात येते व त्यानुसार गेली काही वर्षे आम्ही या १०% सवलतीचा लाभ घेत आहोतच, पण कित्येक वेळा महानगरपालिकेचे अधिकारी इतर प्रतिष्ठित नागरिक व पाहुण्यांना आमचे हे पर्यावरणास पूरक असे प्रकल्प दाखवण्यासाठी खास घेऊन येत असतात व येणारी मंडळीही खुश होऊन आमचे कौतुक करून जातात.

बायो गॅस निर्मिती
 गॅस निर्मितीची टाकी xxx.jpg

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा ओला कचरा ( शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचराकुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा म्हणून आम्ही ०१ जुलै २००६ रोजी माझ्या जुन्या घराच्या गच्चीवर बायो-गॅसची निर्मिती संयंत्राची उभारणी केली असून त्यातून निर्माण होणार्याय गॅसचा वापर सुरू केल्यापासून पासून माझ्या L.P.G.गॅस सिलिंडरच्या वापरात २१ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे,त्याचप्रमाणे गॅस निर्मिती सुरू झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे अतिरिक्त सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/- या प्रकल्पासाठी माझ्या गच्चीवरील एका कोपर्याातील ५’ x ५’ जागा लागली. (या प्रकल्पामुळे माझा एल.पी.जी.सिलिंडर २१ दिवस जास्त जाऊ लागला म्हणजेच दरमहा सुमारे २५० रुपयांची बचत होऊ लागली होती. त्यामुळे माझा या प्रकल्पावर झालेला खर्च २.५ वर्षात म्हणजे ३१ जानेवारी २००९ मध्येच भरून निघाला व त्यानंतर मी या बचतीचा लाभ घेत आहे. आता तर सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करायचे ठरवल्यामुळे खुल्या बाजारात गॅस सिलिंडरच्या किमती ८०० रुपयांपर्यंत आहेत हे लक्षात घेतले तर दरमहाची बचत रुपये ६५० पर्यन्त होईल)
खालील प्रमाणे या बायो गॅस प्रकल्पाच्याही काही मर्यादा आहेत :
या बायो-गॅस सायंत्रात आपण घरातील कोणत्याही प्रकारचा ओला कचरा टाकतो व बक्टेरिया तो खातात आणि खातांना त्याचे विघटन करून त्यातील मिथेन गॅस बाजूला करतात. हा मिथेन वजनाने हलका असल्याने वर जातो व तोच गॅस (वायु) नळीवाटे आपल्या स्वयंपाकघरातील शेगडीला जोडला जातो. पण हा मिथेन वायु साठवण ताकीतून ग्रॅव्हिटीने येत असल्याने आपली गॅस साठवण टाकी शेगडीच्या वर असावी लागते ,म्हणजेच ती टाकी आपण रहात असलेल्या घराच्या गच्चीवरच बसवावी लागते,तळमजल्यावर बसवून चालत नाही.
दुसरे असे की हा मिथेन वायु ग्रॅव्हिटीने येत असल्याने त्यास प्रेशर नसते.त्यामुळेच याची आंच (उष्णता) कमी असते. त्यामुळे चहासाथी पाणी उकळायला फार वेळ लागतो,भाजी शिजायलासुद्धा वेळ लागतो.तसेच पोळ्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मात्र ज्यासाठी मंद आंच लागते अश्या लोणी काढवण्यासाठी हा गॅस एकदम उत्तम !
कधी कधी यात मिथेन बरोबर कार्बन वायु तयार होतो व तो पेटत नाही. अशावेळी साठवण टाकीतील सर्व गॅस काढून टाकायला लागतो.
ही गॅस बनण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी हवेतिल टेंपरेचर ३० अंश सेल्सियासपेक्षा जास्त असावे लागते. म्हणून पावसाळ्यात व थंडीत गॅस बनण्याची क्रिया सावकाश व मंद असते.
जैविक बगीचा (बायो कल्चर)
पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा ओला कचरा ( शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचाकुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा म्हणून आम्ही नोव्हेंबर २००९ पासून १४’ x १०’ च्या गच्चीवर घरातील ओल्या कचर्यापपासून बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच जैविक बगीचा लावला असून ओल्या कचर्या’पासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचा चोथा,कोथिंबीर,पालक,शेपू, मेथी, चाकवत, अंबाडी,माठ,चुका,मुळा,करडई इत्यादि पालेभाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व पोरकिडे झालेले धान्य, कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली, बिरड्यांचीसाले, कलिंगड, फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी, लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ, नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही आंबा,पेरु,चिक्कू, डाळिंब, अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) विविध प्रकारची फळझाडे लावली असून (वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.तसेच आम्ही बागेत भाजीपाला (वांगी,टोमॅटो,पालक,मेथी,कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा, मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. याखेरीज या जैविक मातीविरहित बागेत आम्ही फुलझाडे(अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद, झेंडू, निशिगंध ,पारीजातक,रातराणी, अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा, सदाफुली, तगर, ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पन्न घेत आहे.सोबत आमच्या जैविक बागेचे काही फोटो नमुन्यादाखल खाली दिलेले आहेत.
To day's harvest  from my teraace Bio-Garden 02.10.2013 xxx.jpg  xxx.jpg टोमॅटो xxx.jpg शेवग्याला आलेल्या शेंगा xxx.jpg फ्लॉवर xxx.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी कौतुक वाटले तुमचे काका.
एम एस ई बी सोलर पॅनलवाल्याना विज बिलात सवलत देत नाही का?

खुपच छान आणि सविस्तर माहिती.. सौरशक्ती साठवून वापरायचा एक कळीचा शोध लवकरात लवकर लागावा.
म्हणजे सर्व ऋतूंमधे त्याचा वापर होईल.. बाकी सर्व वनस्पतीसृष्टी सौर उर्जेवरच तर अन्न तयार करतात.

मस्त. खूपच छान उपक्रम. Happy

झाडं लावायला वापरलेल्या चौकोनी कुंड्या आहेत की दुसरे काही?
जैविक कचर्‍यातुन झाडे लावायची सविस्तर माहीती लिहीता येईल का? कचर्‍याचा वास येणे / किडे / उंदीर होणे असे काही होत नाही का? रोजच्या रोज कचरा त्यात टाकता की कधी कधी?

व्वा! मस्त उपक्रम Happy
झाडं लावायला वापरलेल्या चौकोनी कुंड्या आहेत की दुसरे काही?>>> ते थर्माकोलचे मोठे बॉक्स आहेत का?

वा काका, सगळेच उपक्रम भारी आहेत - मी पुण्यातच रहात असल्याने एकदा हे सगळे पहायला जरुर येणार आहे तुमच्याकडे ...

झाडं लावायला वापरलेल्या चौकोनी कुंड्या म्हणजे थर्माकोलचे मोठे बॉक्स आहेत . ते वजनाला हलके तर आहेतच पण पाण्याने कुजत नाहीत किंवा त्यांच्या वर सूर्याच्या उन्हाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ओल्या कचर्‍याच्या दुर्गंधीचा कोणताही त्रास होत नाही.अगदी जवळ उभे राहिलात तरी घाण वास येत नाही. डास,चिलटे ,घुशी किंवा उंदरांचाही त्रास होत नाही. किडे मात्र होतात व ते खायला पालीसुद्धा येतात पण त्यांचा मला तरी अजिबातच त्रास झालेला नाही. घरातील कोणत्याही प्रकारचा विघटन होऊ शकेल असा ओला कचरा अगदी दररोज टाकला तरी चालतो,फक्त फळांच्या साली अगर असा ओला कचरा हा रोजच्या रोज एकाच कुंडीत न टाकता विभागून थोडा थोडा प्रत्येक कुंडीत टाकत जावा.

मायबोलीच्या बर्‍याच वाचकांकडून खास विचारणा झाल्याने व वाचकांच्या आग्रहास्तव मी ' जैविक कचर्‍यातुन झाडे कशी लावावीत ' ह्या बद्दलची सविस्तर सचित्र माहीती लिहायला घेतली असून ती पूर्ण होताच लवकरच मी ' स्वतंत्र दुव्यावर' टाकणार आहे.

कुणी होममेड सौर वॉटर हिटर बनविला आहे का? मी सौर वॉटर हिटर घरी टाकाऊ वस्तू (or recycle material) पासून बनवायच्या विचारात आहे. मदत मिळेल का?

वा... मस्त वाटले वाचून.
माझ्या स्वतःच्या घरात मी ह्या गोष्टी नक्की करेन.

>' जैविक कचर्‍यातुन झाडे कशी लावावीत ' ह्या बद्दलची सविस्तर सचित्र माहीती लिहायला घेतली असून ती पूर्ण होताच >लवकरच मी ' स्वतंत्र दुव्यावर' टाकणार आहे.

ह्या दुव्याची वाट बघतोय.

ही सर्व माहिती इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Te tharmakolchi khoki kuthun milali? kinva kuthun uplabdha hou shaktil? Ani shevgakiva tumhi sangitleli itar falzade kalami aahetki sadhi?
He sarva falzade gachhivar mothy kudit lavli aahetka?
Kaka khup chan aahet tumche sarvach prakalpamazyahi gachhivar mi bhajya fule lavli aahet pan phale nahi.mhanun vicharle

थर्मोकोलची रिकामी खोकी मला सदाशिव पेठेतील मेडिकल डिस्ट्रिब्युटरची खूप यूकाआने आहेत त्यांच्याकडे मिळतात. ती वजनाने अतिशय हलकी असल्याने मी त्यांचा कुंड्यांसारखा उपयोग करतो.
अंजीर,पपई,डाळिंब,चिक्कू इ. फळ झाडांची रोपे मी पुण्यातील मंडईजवळच्या रामेश्वर चौकातील एका नर्सरीच्या दुकानातून खरेदी केली. ती कलमे आहेत का याबद्दल मला काही कल्पना नाही.