लीलावती हॉस्पिटल :सुमंदारमाला वृत्त

Submitted by भारती.. on 26 March, 2014 - 07:06

लीलावती हॉस्पिटल :सुमंदारमाला वृत्त

जुन्या शिल्पशाळेत छिन्नीप्रमाणे घुमे ताल दु:खार्त प्राणातला
असा भव्य प्राकार स्थापत्यविस्तार माझ्या घराच्या पुढे थाटला
जरा वाट जाते वळूनी जिथे त्या तिठ्याशी दिशा भाबड्या थांबती
कुणाला कशाला कितीदा स्मरावे कुठे काय उत्पात ओसंडती

अमर्याद वर्षे कशी लोटती ध्वस्त पंखात आकाश घ्यावे कसे
अता झुंजता श्वास गुंगीत जातो मनाला अशी व्यर्थ चिंता नसे
पहावे स्वत:ला दुज्या भावनेने कसा देह वाहे प्रवाहासवे
कसा सोहळा साजरा हो क्रमाने जुना भोग शृंगार त्याचे नवे

इथे गारठा वेढतो हा जिवाला अमानूष न्यायापरी स्तब्ध-सा
अतीन्द्रीय गंधात अस्तित्व नाहे भयाचा दिसे देखणा स्वर्ग-सा
मला मोह नाही मला नाव नाही विशुद्धातली ऊर्ध्वपातीत मी
नियंत्रीत आकांत आत्म्यातला मी तुझी प्रार्थना रक्तरंजीत मी

निजे शल्यमंचावरी स्तब्ध काया अनास्थेशिया जाणिवा घेरता
दिसे खोल भासातळाशीच दीप्ती असा मोक्ष गात्रांत हिंदोळता ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ग्रेसांच्या स्मृतीदिनी त्यांच्या अत्यंत आत्मगत संदर्भ असलेल्या शैलीच्या अंगाने माझ्याकडून लिहिली गेलेली ही सुमंदारमाला वृत्तातील ही रचना इथे द्यावीशी वाटली.

इथे गारठा वेढतो हा जिवाला अमानूष न्यायापरी स्तब्ध-सा - गालबोट लागू नये म्हणून हे प्रतिसादाचे गालबोट समजा.

गद्याच्या गाभार्‍यात गुंतलेल्या माझ्यासारख्याने तुझ्या बोटातून इथे प्रकट झालेल्या या पद्यातील शब्दफुलोर्‍याबद्दल काही लिहावेसे वाटले तर तितकी माझी पात्रता आहे की नाही हा प्रश्नही माझ्यासमोर उभा राहत नाही...कारण तशी माझ्याकडे नाहीच हे मी नक्की जाणतो....तरीही तुझी ही कविता आणि त्यातून प्रकटणारे भावदर्शन यांची जी प्रतिमा पसरली आहे ती मला मोहित करणारी आहे....प्रत्येक शब्द हृदयात घर करीत आहे.

कुठून शोधून काढतेस हा शब्दखजिना ?
कशा सुचल्या जातात ह्या अंतःकरणाच्या दिव्यांनी उजळणार्‍या ओळी ?
भाग्यवान मी खराच मला निदान तन्मय होता येते तुझ्या प्रतिभेच्या पंखांशी.

भारती....तू फक्त असेच लिखाण करत राहा.

सई.....तुझा आ वासलाय....पण माझा बंदही होईना.

अवल....आता तुला कळालं ना की आम्ही 'पुढच्या वाचन कट्ट्याला भारतीने येणे गरजेचे आहे' असे का म्हणत होतो ते ? शी इज सो जीनिअस...बियाँड डेफिनिशन.

अप्रतिम भारतीताई,

<<मला मोह नाही मला नाव नाही विशुद्धातली ऊर्ध्वपातीत मी
नियंत्रीत आकांत आत्म्यातला मी तुझी प्रार्थना रक्तरंजीत मी>> काय म्हणायचं तरी काय या ओळींना _/\_

सुंदर सुनीत, ग्रेसांच्या स्मृतीदिनाशी शब्दबंध जोडणारं !

मनाच्या या भावावस्थेतसुद्धा तुला असं सुचू शकतं भारतीताई??

हाडाची कवयित्री आहेस...

कवितेबद्दल म्या बापडीने काय बोलावे.. अफाट!!

अप्रतिम. मला नेमकं नाही शब्दात सांगता येणार पण मामांना अनुमोदन त्यांनी जे काही म्हटलंय, तसंच काहीसं वाटतंय.

सर्वांचे आभार , ही कविता देताना साशंक होते इतका अनेकपदरी अवघड अनुभव, अत्यंत व्यक्तिगत. पण व्यक्तिगत तेच सार्वत्रिक असतं ! बेफिकीर आणि अशोक अशा अपघातानंतरच्या हॉस्पीटलायझेशनच्या सोहळ्यातून प्रत्यक्ष गेले असतील, पण तो कुणाचाही म्हणून ही कविता सर्वांचीच हे रश्मी, अवल , सई, अन्जू यांच्या प्रतिसादामुळे जाणवून हायसं वाटलं.
खूप आभार बेफिकीर, चूक सुधारतेय.
अमेय, तुझं आवडतं वृत्त हे.
वैभव, मी ठीक आहे , follow up चालू असताना हे लेखन झालं.
अंजली ..

ओह..! बाप रे..! उच्च..! आयुष्यातले मागले सगळे संदर्भ सर्रकन तरळून गेले..! __/\__ !

भारतीताई,

हे कसं सुचतं तुम्हाला? मीही मरायला टेकलो होतो, पण असं काही नव्हतं हो! हे फारच भीतीदायक असावंसं वाटतंय! Sad

शब्द तर अफाट आहेतच! वादच नाही!! पण ती भावनाही ज्या समर्थपणे आणि अलिप्तपणे तुम्ही हाताळलीये ते पाहून वाचक आचंबित होतो.

आ.न.,
-गा.पै.

भारती,किति खदखदत असेल ग तुझ्या मनात?तु लिहिलि गेलि अस लिहिलस्.असा आपोआप होण्,ग्रेस यान्चि शैली,वृतात लिहिल जाण सग्ळच किती कठीण. तुझी बुद्धी,तुझा विवेक्,तुझ शब्द सामर्थ्य,किती किती गोष्टिन्च थेट आर्पार भिड्णार रसायन झालय्. तुझ्यासार्खी कवयित्री आम्च्या परीवारातली आहे याचा अभिमान वाटतो.माय्बोलिमुळे अशा हिर्‍यान्पर्यन्त पोचता आल. माय्बोलिचे आभार.अमेय पन्डितान्ची याच वृत्ततली कविता फेसबू़कवर वाचली..

छान

सर्वप्रथम साष्टांग दंडवत, भारती ताई ! निव्वळ अफाट लिहिलंयत !!
अपरिहार्यपणे ह्या खोल डोहात उडी मारतो आहे. हे माहित आहे की मी भरकटणार आहे, तरीही !

जुन्या शिल्पशाळेत छिन्नीप्रमाणे घुमे ताल दु:खार्त प्राणातला

ही पहिली ओळ, ह्यातील प्रत्येक शब्द अत्यंत आर्त वाटला. शरीराला/ जीवनाला शिल्पशाळा - जी उगाचच सजीव भासते, प्रत्यक्षात मात्र साफ निर्जीव असते - म्हणणे, तेही 'जुनी शिल्पशाळा' म्हणणे आणि तिथे घुमणारा नाद 'छिन्नीचा' म्हणजे अजूनही जडणघडण सुरूच आहे, हे सगळे चित्र करुण आहे. ही उपमा प्राणाच्या आर्त नादाला देणे, ही तर कारुण्याची परिसीमाच !
कविता ह्या पहिल्या ओळीतच अर्धा जीव घेते आणि ही कल्पना येते बाकी अर्धाही पुढील भागात जाणारच आहे.

असा भव्य प्राकार स्थापत्यविस्तार माझ्या घराच्या पुढे थाटला

ह्या ओळीतून पहिल्या ओळीला एक अत्यंत वेगळीच कलाटणी मिळते.
प्राणांतिक कारुण्य हे एका इमारतीला उद्देशून आहे!

जरा वाट जाते वळूनी जिथे त्या तिठ्याशी दिशा भाबड्या थांबती

शीर्षक आधीच वाचले असल्याने व त्या भागात बराच फिरलो असल्याने मला ह्या ओळींमुळे एका बाजूला रंगशारदा आणि दुसर्या बाजूला कुठलीशी Management Institute असलेला 'C' आकाराचा, लीलावतीला वळसा घालून, दोन्ही दिशांना खरोखरच किंचितसा गोंधळलेला वाटणारा रस्ता आठवला.

कुणाला कशाला कितीदा स्मरावे कुठे काय उत्पात ओसंडती

ह्या ओळी, ह्या कडव्याला पूर्णत्व देण्याचे कर्तव्य व्यवस्थित निभावत आहेत. आठवांचे ओसंडणारे उत्पात, ही कल्पनाही अप्रतिम !

अमर्याद वर्षे कशी लोटती ध्वस्त पंखात आकाश घ्यावे कसे
अता झुंजता श्वास गुंगीत जातो मनाला अशी व्यर्थ चिंता नसे

'गालिब' (बहुतेक) ची एक ओळ नुकतीच ऐकली, ती आठवली. अशीच आहे की नाही लक्षात नाही, पण साधारण भावार्थ असा -
दर्द जब हद से गुजरता है, तो दवा हो जाता है

पहावे स्वत:ला दुज्या भावनेने कसा देह वाहे प्रवाहासवे
कसा सोहळा साजरा हो क्रमाने जुना भोग शृंगार त्याचे नवे

स्वत:कडे त्रयस्थ नजरेने पाहणे आणि हे जाणवणे की 'जुना भोग शृंगार त्याचे नवे' हे सगळंच विलक्षण !

इथे गारठा वेढतो हा जिवाला अमानूष न्यायापरी स्तब्ध-सा
अतीन्द्रीय गंधात अस्तित्व नाहे भयाचा दिसे देखणा स्वर्ग-सा
मला मोह नाही मला नाव नाही विशुद्धातली ऊर्ध्वपातीत मी
नियंत्रीत आकांत आत्म्यातला मी तुझी प्रार्थना रक्तरंजीत मी

अनेकदा ग्रेसांचा भास देणारी तुमची कविता, अनेकदा शब्दांचा नेमका अर्थ न कळताही त्यातील आर्तता खोल अंतरात पोहोचवत असते. तश्याच ह्या ओळी. 'अतीन्द्रीय गंधात अस्तित्व नाहे' व 'विशुद्धातली ऊर्ध्वपातीत मी' ह्याचा मला नेमका अर्थ कळला नाही, पण तो जाणून घेण्याची आवश्यकताही वाटत नाहीये!
'नियंत्रीत आकांत आत्म्यातला मी तुझी प्रार्थना रक्तरंजीत मी'
इथे मात्र असं वाटलं की प्रार्थना 'रक्तरंजित' आहे म्हणजे मर्यादेबाहेर आहे तर आकांत 'नियंत्रित' का ? इथे अनियंत्रित/ अमर्याद आकांत अधिक समर्पक असतं का ?
पण ते किरकोळ.

निजे शल्यमंचावरी स्तब्ध काया अनास्थेशिया जाणिवा घेरता
दिसे खोल भासातळाशीच दीप्ती असा मोक्ष गात्रांत हिंदोळता ..

सुमंदारमालेतलं सुनीत मी प्रथमच वाचले.
हे सगळे चित्र मनात, बंद डोळ्यांच्या आड चाललेले रंजन होते. प्रत्यक्षात जाणीवा बधीर झाल्या आहेत. गुंग झाल्या आहेत. हे अखेरचे काही क्षण असावेत, जेव्हा त्या अखेरच्या क्षणांच्या आधीचे काही अखेरचे क्षण पुन्हा पुन्हा (बंद) डोळ्यांसमोर तरळत आहेत.

अफाट शब्दकळा, प्रवाही वृत्त व अतिशय सहज हाताळणी ह्यांमुळे ही कविता - हे सुनीत - पहिल्यापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कुठल्याही जागी आर्तता ओसरत नाही.
अप्रतिम !

धन्यवाद !
___/\___

....रसप....

Pages