क्रुसावरती बाप

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 March, 2014 - 13:07

क्रुसावरती बाप आमचा
कधी मेलाच नाही
क्रुसावरूनी बाप कधी
खाली उतरलाच नाही
आकाशातील देवही त्याला
उतरवू शकले नाही
आम्हीही कधी त्याला
खाली बोलाविले नाही
क्रुसावरती बाप आमचा
झेलतो आमच्या वेदना
सुखी ठेवा पुत्रांना
करतो आम्हीही प्रार्थना
तो खाली उतरला तर
आमचे काही खरे नाही
पापांना लपवायला
मग दुसरी जागा नाही
रोज सकाळी उठल्यावर
खात्री करतो झोपतांना
क्रूसावरील बाप आमचा
क्रुसावरती आहे ना !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर चव्हाण,

>> बहुतेक लोकांना कविता कळत नाही,
>> अलीकडे असे माझे मत बनत चालले आहे.

मला कवितेतलं फारसं कळंत नाही. तरीपण इथे (=मायबोलीवर) दिग्गज रसिक असतांना हे विधान फारच धाडसी वाटते. अनेकांना ही कविता आवडली असणार.

कविता जगण्यासाठी स्वत:ला भिडायची वीरवृत्ती अंगी मुरावी लागते. रसिकत्व व्यक्त करायला सुद्धा अशाच वीरवृत्तीची गरज भासू लागली आहे! तशी ती दाखवल्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद गा.पै.,समीर .
मायबोलीवर कविता टाकतांना खडूस teacher पेपर तपासणार हे माहीत असते.त्या मुळे काठावर पास झाले तरी बरे वाटते .बरेचदा नापासच होतो .पण हरकत नाही .आणि हा मित्र परिवार असल्यामुळे त्यात घुसणे हा दुसरा प्रॉब्लेम आहे .नाही म्हटले तरी ४ /५ चांगले मित्र इथे मिळाले हे सुद्धा भाग्य आहे .

अनेकांना ही कविता आवडली असणार.

असे असेल तर प्रतिसाद देताना खडूसपणा का करावा ?
सुमार, वृत्तशरण, कृत्रिम रचनांना बेसुमार प्रतिसाद पाहून तर अधिकच वाईट वाटतं.
माझा प्रतिसाद एक नाराजी म्हणून घ्याल ही अपेक्षा.

समीर चव्हाण,

>> असे असेल तर प्रतिसाद देताना खडूसपणा का करावा ?

अहो, काय सांगायचं आता! त्याचं काय आहे की, विद्रोही कवितेने फक्त विशिष्ट धर्माच्या विशिष्ट वर्गास झोडपायचे असते. जरा म्हणून वाळवंटी पंथाशी संबंधित शब्द दिसला की अनेकांचा विशिष्ट भाव जागृत होऊन ते चिडीचूप बसतात.

ज्याच्या अंगी तुमच्यासारखी वीरवृत्ती आहे तो कशासाठी घाबरेल?

आ.न.,
-गा.पै.

समीरजी,
माझ्या मते, वैयक्तिक आवड/नावड आणि एखाद्या गोष्टीची गुणवत्ता या दोन भिन्न गोष्टी आहेत.
उदाहरणार्थ मला अमिताभ बच्चन आवडत नाही. परंतु, तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे हे मी मनापासून मानतो.
त्याच्या अभिनयातील बारकावे, उंची, खोली समजू शकतो.
माझा हा प्रतिसाद, या किंवा कुठल्याही विशिष्ट कवितेच्या अनुषंगाने नसून एक जनरल विधान आहे हे कृपया ध्यानात घ्यावे.

"बहुतेक लोकांना कविता कळत नाही,
अलीकडे असे माझे मत बनत चालले आहे." >>> कळत नाही असं म्हणण्यापेक्षा बरेच लोक कविता समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत असं असावं.
(कविता समजून घ्यायची पाळी का यावी, तशी गरज का भासावी
असेही चर्चेचे/वादाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात म्हणा..... Happy )
---------------------------------------------------------------------------------------------------------------
विक्रांतजी,
"मायबोलीवर कविता टाकतांना खडूस teacher पेपर तपासणार हे माहीत असते.त्या मुळे काठावर पास झाले तरी बरे वाटते "
व्वा ! हे तुमचं वाक्य मस्त आहे. असे ’खडूस teacher’ मिळणं हे भाग्यच नाही का !

तोंडदेखल्या स्तुतीपर प्रतिसादांपेक्षा प्रांजळ, परखड, तर्काधिष्ठित प्रतिसाद अधिक महत्वाचे.
आणि ’अनुल्लेख’ हाही माझ्या मते प्रतिसाद असतो.

विद्रोही कवितेने फक्त विशिष्ट धर्माच्या विशिष्ट वर्गास झोडपायचे असते. जरा म्हणून वाळवंटी पंथाशी संबंधित शब्द दिसला की अनेकांचा विशिष्ट भाव जागृत होऊन ते चिडीचूप बसतात.

पहिली ओळ पूर्वग्रहदूषित वाटली.
दुसरी ओळ अगदी बरोबर मानली तर आपल्याला कळेल की बहुतेक लोकांना कविता कळत नाही किंवा कळून घेण्याकडे कल दिसत नाही. असो, आपल्याही अंगी काही कमी वीरवृत्ती नाही असे जाणवले.

धन्यवाद.

समीर चव्हाण,

>> पहिली ओळ पूर्वग्रहदूषित वाटली.

मला साहित्यात फारशी गती नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं असू शकेल. विद्रोहीच्या मुद्रेखाली जे काही साहित्य खपतं त्यावरून बांधलेला अंदाज आहे. जाणकार लोकं अधिक प्रकाश टाकू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

समीर .<<<अनुल्लेख’ हाही माझ्या मते प्रतिसाद असतो.>>हे खर आहे . अजून चागली हवी या अर्थी !
<<<सुमार, वृत्तशरण, कृत्रिम रचनांना बेसुमार प्रतिसाद पाहून तर अधिकच वाईट वाटतं.>>>.मला वाटते याचे कारण इथे निर्माण झालेले मैत्री संबंध असावे .आपण मित्राला प्रोहत्सान देतो ना .अगदी लंगडी बाजू सावरून ही .तसा हा प्रकार आहे .
गा .पै. तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच अर्थपूर्ण असतात . ! चा अर्थ मी सोयीस्कररित्या positive घेतला आहे .

मला आवडली
पण माझ्या माहितीप्रमाणे येशु परमेश्वराचा पुत्र आहे ना म्हणजे आपला बांधव आहे मग त्याला बाप का म्हटले ते समजले नाही
की नामदेवाने माउलीना समाधीच्या वेळच्या अभंगात बाप ज्ञानेश्वर असे म्हटले त्या चालीवर तुम्ही म्हणत आहात

गामांचा पहिला प्रतिसाद बुचकळ्यात पाडणारा
समीरजींनी व गामाजींनी चर्चेसाठीचे श्रम वाया घालवावेत अशी ही जागा नक्कीच नव्हे आणि प्रसंगही Happy

असो धन्यवाद सर्वांचे

वैभव ,प्रश्न विचारला अन उत्तरही देवून टाकले ... पण भावार्थ तोच आहे .ख्रिश्चन लोकांसाठी तो कुणी का असेना पण माझ्यासाठी बाप आहे .
अश्विनी सहमत आहे .धन्यवाद .