५६ वा सवाई गंधर्व महोत्सव ...

Submitted by pahaat on 15 December, 2008 - 01:34

जमावबंदी .. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं सावट .. प्रवेशद्वाराजवळचा कडेकोट पोलीस बंदोबस्त .. गुरुवारपासून कार्यक्रम जास्तीत जास्त वेळ ऐकता यावा म्हणून गेले तीन दिवस office मधे जास्त काम केल्याचा ताण .. पं. अजय चक्रवर्ती, देवकी पंडीत यांचं शास्त्रीय गायन प्रथमच live ऐकायला मिळणार असल्याची उत्कंठा ... अशा संमिश्र भावना घेऊन आपण स्वरमंडपामधे प्रवेश करतो काय ... नि एखाद्या जादुई महालात गेल्याप्रमाणे स्वरबरसातीमधे चिंब होऊन आतून बाहेरून निर्मळ होऊन बाहेर पडतो काय .. सारंच भारून टाकणारं ....!
'सवाई गंधर्व महोत्सवा' मधे रसिक दर वर्षीच हा अनुभव घेतात ... हे वर्ष ही त्याला अपवाद नव्हतं ..

शास्त्रीय संगीताचा (गायन, वादन, नृत्य) अभ्यास करणार्‍या लहान-मोठ्या सर्वच कलाकारांसाठी 'सवाई गंधर्व महोत्सवा'चा स्वरमंच एखाद्या तीर्थक्षेत्रासारखा आहे .. तीर्थक्षेत्री जाऊन ज्याप्रमाणे माणूस स्वत:ला पूर्णपणे समर्पित करतो, त्याचप्रमाणे आत्तापर्यन्त शिकलेली/अभ्यासलेली कला या स्वरमंचाला वाहून टाकण्याची भावना इथे सादरीकरण करताना कलाकारांची असते. या वर्षीचा महोत्सव ज्येष्ठ कलाकारांनी तर गाजवलाच, पण युवा कलाकारांनीही संस्मरणीय बनवला.
पं. शिवकुमार शर्मा .. पं. अजय चक्रवर्ती .. मालिनी राजूरकर .. पं. जसराज .. पं. राजन साजन मिश्रा .. यांचं प्रस्तुतिकरण पुन्हा पुन्हा ऐकूनही नित्यनूतन अनुभव देत राहतं .. स्वराचा आशिर्वाद मिळवण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना क्षणोक्षणी जाणवत राहते .. सुरासुरातून भारावून टाकते .. पं. अजय चक्रवर्तीचं live गाणं ऐकण्याची ही पहिलीच वेळ होती .. अतिशय नितळ आणि भावपूर्ण आवाज हे गाण्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल .. या गाण्याने रसिक भारावून तर गेलेच पण अचंबितही तेवढेच होते .. तीनही सप्तकांमधे लिलया फिरणारा आवाज, क्षणात खाली तर क्षणात तार सप्तकातली (उंच स्वरापर्यन्तची) झेप स्वरांची मेहनत दाखवून देत होती .. त्यांनी गायलेली खमाज रागामधली चीज 'आज मोरी कलाई मुरक गयी ..' मनात घर करुन गेली..

गायनाबरोबर वादनही बहारदार होतं .. पं. गणेश आणि कुमरेश यांची violin जुगलबंदी खूप रंगली .. ८-१० हजार रसिक स्तब्धपणे हे वादन ऐकत होते .. स्वरमंडप violin मय झाला होता .. वादनामधे तालवाद्य कचेरीही नमूद कराविशी वाटते .. पं. अखिलेश गुन्देचा यांची मूळ संकल्पना असलेला हा प्रयोग म्हणजे विविध वाद्यांच्या (पखवाज, ढोलक, तबला आणि इतर तालवाद्य) जुगलबन्दीचा आनंद देऊन गेला .. वादनाबरोबरच कथक नृत्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं .. स्मृती आणि अनुज मिश्र या भावंडानी आपल्या अदाकरीने रसिकांना जिन्कून घेतलं ... एवढ्या लहान वयामधे या दोघांची तयारी थक्क करणारी होती .. कथक मधली सर्वात अवघड चक्ररचना (स्वतःभोवती गिरकी) अनुज मिश्र याने सलग १०३ गिरक्या घेउन सादर केली .. प्रेक्षकान्च्या समुदायाने या प्रयत्नाला उभं राहून दाद दिली नसती तरचं नवल ..
कार्यक्रम पत्रिका वाचल्यापासून पं. हरिप्रसाद चौरसियांच्या नावाची राहून राहून उणीव जाणवत होती .. पं. रोणू मुजुमदारांच्या बासरी वादनाने ही कमी निश्चितच पूर्ण केली .. रविवारच्या मंगल प्रभाती त्यांचा 'मंगल भैरव' अतिशय प्रसन्न वाटला ..
अरुणा साईराम यांचं कर्नाटकी गायनही अप्रतिम .. सत्रावर त्यांच्या गायनाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला .. स्वतःच्या शैलीत 'तीर्थ विठ्ठ्ल' गाऊन त्यांनी भीमसेनजींना मानवंदना तर दिलीच, त्याचबरोबर रसिक मनंही जिन्कून घेतली ..

महोत्सवाची सांगता किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका Dr. प्रभा अत्रे यांच्या गाण्याने झाली .. वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा अतिशय मधूर, वजनदार, सुरेल आणि भावपूर्ण गायनाचा आनंद त्यांनी रसिकाना दिला .. सवाई गंधर्वांच्या भैरवी ने (record) महोत्सवाची सांगता करण्यात आली .. कलाकारांबरोबरच आनंद देशमुख यांचं निवेदन आणि पोलिसांनी केलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख करायलाच हवा ..

'सवाई गंधर्व महोत्सवा' भोवती पं भीमसेन जोशी या नावाचं कायमच वलय असतं .. गाण्यावरची अखंड निष्ठा आणि अलोट गुरुभक्ती याचं आदर्श घालून द्यावा तर त्यांनीच ... या वर्षी चा दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांना मिळालेला 'भारतरत्न' पुरस्कार ... पंडितजींचं गाणं ऐकायला मिळावं या साठी इथे प्रत्येक जणच आसुसलेला असतो .. त्यांची छबी दिसली तरी अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं .. पंडितजींनीही रसिकांना नाराज न करता आपलं, स्वरभास्कर रूपी दर्शन घडवलं .. पं जसराजांच्या त्यांच्या बद्दल च्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या .. ते म्हणाले .. 'आम्ही त्याना देव मानतो .. त्याना follow करायचा प्रयत्न करतो .. कधीकधी वाटतं की आपण त्यांच्यापर्यन्त पोहोचलो ही .. पण तोपर्यन्त ते खूप पुढे निघून गेलेले असतात .. आणि आम्ही परत त्याच circle मधे अडकून पडतो ..' याच धर्तीवर Dr. प्रभा अत्रे लिहितात .. 'एखादा कलाकार जेव्हा कलेवर विलक्षण प्रभुत्व मिळवतो, तेव्हा कला आणि कलाकार एकरूप होतात. भीमसेनजी याचं आदर्श उदाहरण आहेत ..' महोत्सवातील कलाकार आणि रसिक थोडयाबहुत प्रमाणात याच भावनेची पुनरावृत्ती करत होते ..

हा ४ दिवसांचा स्वरसोहळा कधी संपला ते समजलच नाही .. भीमसेनजींना उदंड आयुष्य चिंतत, त्यांचं गाणं परत एकदा ऐकायला मिळावं अशी आशा करत आणि पुढच्या सवाई गंधर्व महोत्सवाची आस लावून, सूर मनात आणि कानात साठवून भारावलेल्या अवस्थेत आम्ही घराकडे निघालो ...

गुलमोहर: 

यावर्षी हा सोहळा अनुभवायला मिळाला नाही, पण हा लेख वाचून थोडीफार कसर भरुन निघाल्यासारखं वाटलं. धन्यवाद.

सोहळ्याचा धावता आढावा छान घेतला आहे.

मस्त.
याला म्हणतात गंधर्व महोत्सव.

मस्त... Happy

काही रेकॉर्डिन्ग वगैरे केलं असेल तर टाक इथे जमल्यास....

कोणत्याही संगीत महोत्सवाचे परवानगीशिवाय ध्वनिमुद्रण करणे हे बेकायदेशीर आहे. 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवात' असे ध्वनिमुद्रण केले जाऊ नये, असे आवाहन केले जात असते.
शिवाय, कलाकाराच्या परवानगीशिवाय अशी ध्वनिमुद्रणं संकेतस्थळांवरून प्रक्षेपित करणे, हासुद्धा एक गुन्हा आहे.
अनेक कलाकारांचे कॅसेट कंपन्यांबरोबर करार झालेले असतात, आणि त्यामुळे इतर कुठेही त्यांची ध्वनिमुद्रणं प्रकाशित केली जाऊ नये, याकडे लक्ष दिले जाते.
'अलुरकर म्युझिक हाऊस' पूर्वी या संगीत महोत्सवाची ध्वनिमुद्रणं बाजारात आणत असत. पण या कायद्यांमुळे ही प्रथा पुढे मोडीत निघाली.

चिनूक्स चे म्हणणे पटले.. पण मला त्या आवाहनाबद्दल अगोदर माहितच नव्हते.. बर्‍याचदा अशा प्रकारचे ध्वनिमुद्रण पुनप्रत्ययासाठीच केलेले असते त्यात कुठलाही व्यावसायिक हेतू नसतो.

पहाट, छान लिहिलय... थोडक्यात (पण तगमग वाढवणारं... पुढल्या वर्षी जायलाच हवं म्हणायला लावणारं)

पहाट... वा काय आयडी आहे!!!! मस्त लिहिलं आहे. वाचून स्वरांचा स्पर्श झाला आहे असे वाटले.

पहाट्.. धन्यवाद..
ह्यावर्षी यायचं चूकलं..पण पुढल्यावर्षी नक्की असेन मी..

वाह्..क्या बात है...
यावर्षी नेम़कं कलकत्त्याला जावं लागल्याने नाही जमलं हा महासोहळा अनुभवणं.
पण तुमच्या लेखाने बर्‍याच अंशी ती कसर भरुन काढली.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

पहाट.... धन्यवाद.. धन्यवाद... Happy
पंढरीच्या वारीला जाऊन आलेला भेटला की वारीला गेल्याचे पुण्य मिळते .. तसंच तुम्ही माझ्या पंढरीला जाऊन आलात.. ह्या लेखामुळे सवाईच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
चिनूक्सचे म्हणणे बरोबर आहे...ह्यावर्षीच्या सवाईची क्षणचित्रे बघायचा योग्य / कायदेशीर मार्ग म्हणजे www.esakal.com तिथे उजव्या बाजूला 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' म्हणून दुवा आहे. त्या दुव्यावर कार्यक्रमांचा वृत्तांत आणि व्हिडीयो क्लिप्स पहायला मिळतील. अनुज मिश्रांच्या १०३ गिरक्यांचा व्हिडीयो पाहून अवाकच झालो Happy
---
पहाटः व्वा ! काय सुरेख आय डी घेतलायत... डोळ्यांसमोर एकदम 'पूरब से सूर्य उगा'चा भटियार, 'तेजोनिधी लोहगोल..'चा ललत, 'झूठे नैना बोल...' चा बिलासखनी तोडी आणि 'अलबेला सजन्'चा अहिर भैरव .. एकत्र उभे राहिले. Happy
www.atakmatak.blogspot.com

चानच झाला आहे लेख..:)
महोत्सव दर वर्षिप्रमाणे बहारदार झाला, यावेळेस कर्नाटक संगिताच्या संगितकारांनी चांगली छाप पाडली महोत्सवावर.

लेख छान लिहिला आहे पण दर वेर्षीप्रमाणे यावेळेस काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते पंडितजी यांनी ज्या भावनेने हा उत्सव स्वरांचा सुरू केला आहे त्यातील भाव कुठेतरी हरवाल्याची भीती जाणवायला लागली आहे ठराविक पेरफॉर्मेन्सेस सोडता यावेळेस मला तरी वेगळे पण असे नाही जाणवले आखीकलेश गुनडेचा यांनी एक वेगळा प्रकार नक्कीच प्रयत्नपूर्वक सुरू केला आहे पण त्यात म्हणावी तशी सृजनता नाही जाणवली ( लेहरयावर प्रत्येकाने रियाज केला असे काही तरी वाटले ) आणि जिथे कार्यक्रम कुठे सुरू ज़ाला आहे असे वाटत असताना तो संपला देखील.पंडित जासराज ,पंडित अजय चकरवर्ती ,वाइयोलिन जुगलबंदी ,कथ्थक ,रोनू मुजुमदार ,राजन साजन मिश्रा ,अरुणा साईराम ही दिग्गज मंडळी यांनी त्यांच्या परीने मनापासून गुरुचरणी सेवा प्रदान केली.खूप कमर्षियल आणि रिजिड असे काहीतरी स्वरुप त्या महोत्सवास येऊ लागले आहे त्यातील भाव नक्कीच हरवत चालला आहे मी अजुन खूप लहान आहे असे काही बोलण्यास पण मनापासून जे काही जाणवले तेच लिहीत आहे .
गेले ५६ वर्ष हा महोत्सव पुणे येथे साजरा होत आहे पूर्वीची परंपरा आणि सादरीकरण यात काळानुसार बदल होणे अपेक्षित होतेच आणि तसे ज़ाले देखील पण रात्रीच्या वेळेस होणारा हा महोत्सव कायद्याच्या बंधनात सापडल्यामुळे त्याचे स्वरुप बदलले गेले आम्ही पुणेकर पण हे निमुट पणे सहन करतो अजूनही रात्रीच्या वेळेस गणपतीत होणारा आवाज आम्हास चालतो पण जे संगीत आजार सुध्धा बरे करते असे शास्त्रीय आपले संगीत त्याचा मात्रा लगेच त्रास होतो त्यामुळे आता याची वेळ बदलली आहे तरीही लोक येतात कारण त्यांचे प्रेम पंडितजी यांच्या वरील आणि त्यांनी सुरू केलेल्या या स्वरांच्या महोत्सव वर कायम राहणार आहे ,होते आणि कायम राहील .

प्रतिक्रियां बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ...
आता 'वसंतोत्सवा'ची वाट पाहते आहे .. Happy
मागच्या वर्षी हाही कार्यक्रम अगदी सुरेख झालेला .. या वर्षी पण तीच अपेक्षा आहे ..