शुभ्र मोग-याची कळी

Submitted by अनुराधा म्हापणकर on 24 March, 2014 - 09:25

जाई जुई दरवळ
घमघमते सायली
कुंद फूल नाजूकसे
परिमळ ती चमेली

धुंद बाग उमलली, सुगंधाची मांदियाळी
परी उगा खाते भाव, शुभ्र मोग-याची कळी

सुवासाची लयलूट
प्राजक्त का पायदळी
केशराची लाल रेघ
दव ओलेती पाकळी

प्राक्तनात कोमेजेणे, त्यासी मनोमनी जाळी
कचपाशात शोभली, शुभ्र मोग-याची कळी

जास्वंदी गं स्वच्छंदीच
वाहिलेली देवा भाळी
देव्हा-यात शोभिवंत
जसे कुंकुम उधळी

देवघराची ती वेस, कधी नाही ओलांडली
गावभर मिरविली, शुभ्र मोग-याची कळी

झेंडू फांदी फांदी डुले
केशराची ती नव्हाळी
ओढलेले रेशमाचे
पांघरूण मखमाली

निर्माल्याचेच नशिब, पाकळ्यांची की रांगोळी
रंगाविना रंगलेली, शुभ्र मोग-याची कळी

काही बोलेता बोलेना
तिच्या नावात अबोली
भाव रंगात सांगूनी
अशी गालात लाजली

कुणी नाही लिहिलेली, तिच्यासाठी गं चारोळी
प्रेमिकांच्या कवितेत, शुभ्र मोग-याची कळी

फुलबाग बहरली
फुले लाल शुभ्र निळी
रंग रंग उधळले
गंधाळूनी कोमेजली

परी नाही कुणासाठी, कुणी ओवीही रचली
ज्ञानदेवाला दिसली, शुभ्र मोग-याची कळी

- अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users