मी परदेशी (एक ब्रेथ्लेस)

Submitted by अज्ञात on 20 March, 2014 - 03:07

कुणास मी का
केले अवघड ?.....
प्रेमच अनघड काय करू ?....

येता जाता
दिसते माया
रुधिर उसळते
जाग जराशी
हृदयापाशी
काजळ राशी
वादळ उठते
हलते तारू

कोण कुणाचा
नसते काही
झुरते काया
रचने पायी
बचनागी हे
मंथन अवघे
दैव दानवी
घुसळे मेरू

मीच भुकेला
एकांताचा
स्वप्न पहातो
रात्र जाळतो
हसतो रडतो
चितारतो ते
शब्दांमधुनी
सापडलेले
तुटके फुटके
शब्दच वेडे
एकल कोडे
सुटते वाटे
पण सुटते ना
कविता होते
गूढ वेदना
खरी न खोटी
वाट खुंटते
दरी वाढते

शिल्लक उरते
शून्य पोकळी
अर्थ निरर्थक......
.......... मी परदेशी

…………. अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users