पुन्हा लाजले हासले चांदणे

Submitted by जयदीप. on 4 March, 2014 - 21:48

नव्याने जुने युद्ध मी छेडले
जुन्या वादळांनी जसे घेरले

पुन्हा लाजले हासले चांदणे
तुला काल स्वप्नामधे भेटले

पुन्हा एकदा कात मी टाकली
पुन्हा गार वारे मला झोंबले

कधी जात नाही अता मी तिथे
खुळे पाय माझे तिथे चालले!

मला एकदा त्या तिथे भेट तू
जिथे स्वप्न माझे तुझे रंगले

मला तू दिलेले परत घे अता
अता खेळ माझे तुझे संपले

उमटते मनावर पुन्हा एकदा
कितीदा तुझे नाव मी खोडले

तुझ्यासारखे जोडले ना कधी
कितीदा मला तोडले जोडले

जगासारखा रुक्ष मी जाहलो
अता आसवांचे झरे आटले

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान