स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Submitted by SureshShinde on 28 February, 2014 - 16:13

स्फटिकांत लपलेला भेसळीचा भस्मासुर आणि विश्वमोहिनी 'डॉ. रेनाते' !

Melamin.jpg

"डॉक्टर, काय झालय माझ्या टॉमीला ?"
टॉमी, एक वर्ष वयाचे डॉबरमन पिल्लू होते. गेले पाच दिवस ते काही खात नव्हते, मलूल झाले होते. मालकीणबाई, मिसेस रॉबिन्सन यांना त्याचा खूपच लळा असल्याने चिंताक्रांत स्वराने त्यांनी त्याला लॉस अँजेलीसमधील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
"म्याडम, टॉमीची तब्ब्येत गंभीर आहे. त्याची दोन्ही मूत्रपिंडे काम करीत नाहीत. त्याला वाचविण्यासाठी त्याचे डायलीसीस करावे लागणार आहे आणि एव्हडे करून तो आणखी किती दिवस टिकेल हे सांगता येणे कठीण आहे."
मिसेस रॉबिन्सन यांनी मटकन बसूनच घेतले.
"आम्ही आमचे सर्व प्रयत्न तर करतोच आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारे किडनी निकामी झालेले आणखी दोन कुत्रे आणि तीन मांजरी देखील याच हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत."
हे ऐकून मिसेस रॉबिन्सन थोड्या चक्रावल्या. सत्तरी ओलांडलेल्या मिसेस रॉबिन्सन या अगाथा ख्रिस्तीच्या निस्सीम भक्त होत्या. अगाथाच्या एकूण एक कथा आणि कादंबर्यांची त्यांनी अनेक पारायणे केली होती. वरील माहिती ऐकून त्यांची चौकस बुद्धी जागृत झाली. डायलिसीस विभागाच्या बाहेर बसून त्यांनी इतर पाळीव प्राण्यांच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीतून एक गोष्ट लक्षात आली कि सर्व किडनी पिडीत प्राण्यांना जे तयार अन्न दिले होते ते एकाच प्रकारचे म्हणजे 'कट्स अण्ड ग्रेव्ही' होते आणि त्यांची ब्रांडहि एकच होता, 'मेनू फूड्स' !
दुसर्याच दिवशी टॉमी निवर्तला. मिसेस रॉबिन्सन आता जास्तच दुखावल्या होत्या. तरीही त्या टॉमीच्या शवविच्छेदनाला उपस्थित होत्या. त्यातून कळले की टॉमीच्या दोन्ही मूत्रपिंन्डामध्ये खडे झाले होते.
एक आठवड्यानंतर शव शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल मिळाला.
"मिसेस रॉबिन्सन, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉमीच्या मूत्रपिंन्डामधील खडे हे अतिशय वेगळे आहेत. ते नेहमीप्रमाणे नसून त्यामध्ये काहीतरी प्लास्टिक सद्दृश पदार्थ दिसत आहे."
मिसेस रॉबिन्सन त्या रिपोर्टची प्रत आणि इतर आजारी प्राण्यांच्या पालकांच्या केस हिस्टरीज घेवून बेधडक पोचल्या ते 'मेनू फूड्स' कंपनीच्या ओन्तरिओ येथील कार्यालयामध्येच ! सुरुवातीला त्यांना कोणीच काहीच ताकास तूर लागू दिला नाही. पण दुसर्या दिवशी मिसेस रोबिंसनच्या वकिलांचा फोन गेल्यावर मात्र कंपनीची चक्रे फिरली. कंपनीच्या वैद्यकीय विभागाने या तक्रारीची दाखल घेवून प्राण्यांवर प्रयोग करण्याचे ठरवले.
ही बातमी झंझावातासारखी सर्वत्र पसरली. हजारो पाळीव प्राण्यांना मूत्रपिंन्डाचे आजार लक्ष्यात आले. मेनू फूड्स कंपनीचे धाबे दणाणले. तोपर्यंत त्यांच्या अंतर्गत चांचणी विभागाने ह्या फूडमुळेच हा त्रास होत आहे असे सांगितले. त्यांनी मांजरांवर केलेल्या प्रयोगामध्ये केवळ एकाच प्रकारच्या फूडमुळे किडनी फेल्युअर होवून मांजरी मेल्या होत्या आणि त्या फूडमध्ये वापरले होते 'व्हीट ग्लुटेन' जे एक सप्लायरकडून प्रथमच घेतले होते ! ही गंभीर बाब होती. कंपनीला पुढील परिणाम कळून चुकले. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुढील धोका टाळण्यासाठी अमेरिकेतील अन्न आणि सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. बाजारामध्ये विक्रीसाठी असलेले तब्बल सहा कोटी कंटेनर्स पुन्हा मागवले. अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक इतिहासातील हा सर्वात मोठा रिकॉल होता ! ही तारीख होती, गुरुवार, १५ मार्च २००७ !
मेनू फूड्सने त्यांचे अनुमान एफडीए ला कळवल्यानंतर केवळ चोवीस तासांतच न्यू जर्सी आणि कान्सास येथील मेनू फूड्स च्च्या प्लांटस मध्ये एफडीए चे निरीक्षक पोचले. त्यांनी शोधले की भेसळयुक्त व्हीट-ग्लुटेन हा चीन मधून आयात केलेला होता. एफडीए ने या संशोधनासाठी नेमले डॉ. रेनाते रायीमस्कुझेल यांना. डॉक्टर रेनाते या जर्मन वंशाच्या असून प्राणी आरोग्य केंद्राच्या मुख्य होत्या. त्यांना किडनीवरील विषबाधा या विषयामध्ये जास्त रुची होती. रेनाते यांनी अनेक प्राणीडॉक्टरांशी संपर्क साधला. अशा विषबाधेने दगावलेल्या प्राण्यांचे किडनीचे नमुने गोळा करून अभ्यास सुरु केला. पंधरा दिवस उलटले तरी काही क्लू मिळेना. आणि मग एके दिवशी एफडीए च्या शास्त्रज्ञांनी एक आशेचा किरण दाखविणारा शोध लावला. त्यांनी शोधले की व्हीट-ग्लुटेन मध्ये 'मेलामाईन' ची भेसळ होती !

मेलामाईन' हा शब्द आपल्याला नवीन नाही. दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक तयार करण्यासाठी, स्वैपाकासाठी वापरली जाणारी भांडी, टेबलाच्या पृष्ठभागावरील चकचकीत थर, शेतीमध्ये वापरली जाणारी खाते, अग्निरोधक असे अनेक ठिकाणी मेलामायीन वापरले जाते. याच्यामध्ये नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण खूपच जास्त असते. मेलामायीनवर खूप संशोधन झाले होते आणि त्याचे काहीही दुष्परिणाम दिसून आलेले नव्हते. शास्त्रज्ञ म्हणत होते की मेलामायीन हे मिठाइतके निरुपद्रवी आहे. मग प्राणी का मरत होते ? डॉ . रेनाते यांना हाच प्रश्न रात्रंदिवस भेडसावीत होता. त्यांनी जगभरातील मेलामयीनच्या विषबाधेसंबंधित सर्व शोधनिबंध शोधले. खूप शोधल्यानंतर त्यांना एक निबंध सापडला ज्यात उंदरांना दोन वर्षे भरपूर प्रमाणात मेलामायीन खावू घातले होते. उंदीर मेले नाहीत पण त्यांना मुत्राशयामध्ये म्हणजे युरिनरी बल्याडरमध्ये खडे झाले होते. ह्या खड्यांचे पृथक्करण केले असता त्यांत मेलामायीन आणि युरीक ॲसिड सापडले. डॉ. रेनाते यांना पहिला क्लू मिळाला होता. जे प्राणी अशा भेसळयुक्त अन्नामुळे दगावले होते त्यांच्या किडनीमध्ये प्राणी-विकृती-तज्ञ डॉक्टरांना सूक्ष्मदर्शकाखाली भरपूर स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स दिसले होते. हे क्रिस्टल्स जरी भरपूर प्रमाणात असले तरी त्यांच्यामुळे किडनी फेल्युअर होवू शकेल असे वाटत नव्हते. पण असे क्रिस्टलस त्यांनी पूर्वी कधीही पहिलेले नव्हते. काही डॉक्टरांनी या क्रिस्टल्सच्या इमजेस एफडीएला पाठवल्या होत्या त्या रेनाते यांनी पहिल्या. त्यांना लक्ष्यात आले कि या क्रिस्टल्समुलळेच मूत्रपिंडान्मधील सूक्ष्म मुत्रनालिका बंद होत असाव्यात जसे मानवी शरीरात युरीक ॲसिड वाढल्यानंतर होते.

nephron.jpg

६ एप्रिल २००७ रोजी म्हणजे सुमारे तीन आठवड्यांनंतर डॉ. रेनाते यांनी मेलामायीन विषबाधेसंदर्भात ही नवी संकल्पना मांडली. पण इतर सहाध्यायी डॉक्टरांनी त्यांना विरोध केला कारण मेलामायीनच्या चाचण्यांमध्ये ते विषारी नाही असेच दिसत होते. त्यांचे म्हणणे होते की दिसलेले क्रिस्टल्स फार कमी होते व त्यांनी असे किडनी ब्लोकेज होणे शक्य नव्हते. पण डॉ. रेनाते ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी शोधले की जेंव्हा मृत प्राण्यांचे अवयव तपासण्यासाठी काढतात तेंव्हा ते सडू नयेत म्हणून फोर्म्यालीन हे औषध वापरतात. त्यांनी दाखवून दिले कि हे क्रिस्टल्स त्या फोर्म्यालीनमुळे विरघळून जात होते व त्यामुळे साहजिकच ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नव्हते. त्यांनी प्रयोग करून असे होते हे सिद्धही करून दाखवले. त्यांनी दाखवले की त्या प्राण्यांच्या मुत्रापिंन्डामधील सूक्ष्म मुत्रनालिका या क्रिस्टल्समुळे पूर्ण बंद झाल्या होत्या. परिणामी किडनीची मूत्र तयार करण्याची क्रिया बंद झाली होती.
पुढे हे नमुने एफडीए च्या फोरेन्सिक विभागात पाठवले असता त्यांनी या क्रिस्टल्सची स्पेक्त्रोस्कोपिक तपासणी करून ते क्रिस्टल मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिडचे असल्याचे शोधले. रेनाते एव्हड्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी माशांना मेलामायीन आणि सायन्युरिक ॲसिड खायला देवून त्यांच्या मूत्रपिंडांचा अभ्यास केला. त्यांनी दाखवून दिले कि केवळ मेलामायीन अथवा सायन्युरिक ॲसिड यांनी किडनीला त्रास होत नाही तर दोन्ही एकत्र दिले तरच होतो. म्हणजे व्हीट-ग्लुटेन मध्ये हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यामुळे हे सर्व विषबाधा कांड घडले होते.

अमेरिकेमधील विल्बर एल्लिस या कंपनीने चीनमधून हे व्हीट-ग्लुटेन आयात केले होते. ते १५० मेट्रिक टन मटेरियल त्यांनी चीनला परत पाठवले. गव्हाच्या पिठामधून पिष्ठमय पदार्थ काढून टाकले असता जो नत्रयुक्त चोथा राहतो तो हा ग्लुटेन ! चीनी कंपन्यांनी नफेखोरी करण्यासाठी ग्लुटेनऐवजी साधे पीठ वापरले आणि त्यात नत्र पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि कस्टमला फसवण्यासाठी स्वस्त मिळणारी मेलामायीन पावडर मिसळली. मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती. पण जास्त नफ्यासाठी काही चीनी कंपन्यांनी भंगारमध्ये मिळणार्या मेलामायीन ची पावडर करून ती वापरली ज्यात मेलामायीन बरोबर सायन्युरिक असिड देखील होते आणि मग त्यामुळे हे क्रिस्टल विषबाधेचे रामायण घडले !

renate.jpg

अमेरिकेने डॉ. रेनाते यांच्या समाजउपयोगी संशोधनाची दखल घेवून पुढील वर्षी त्यांना दहा हजार डॉलर्स आणि सन्मानाचे 'सर्व्हिस टू अमेरिका' हे मेडलही बहाल केले. अभिनंदन डॉ . रेनाते ! आम्हाला आपला अभिमान वाटतो !

पण रेनातेंचे काम इथेच संपले नाही.
सन २००८ ! चीनमध्ये ऑलिम्पिक खेळांची गडबड चालू होती. नेमके तेंव्हाच घडले आणखी एक भेसळ विषबाधा नाट्य ! दोन वर्षे वयापर्यंतच्या तीन लाख शिशूंना किडनी स्टोन्स निर्माण झालेआणि त्यातील सहा बालके दगावली देखील !त्यांच्या किडनी स्टोन्समध्ये सापडले मेलामायीन ! खरे पहिले तर इतक्या लहान मुलांना असे मूतखडे शक्यतो होत नाहीत. पण या बाळांना दिले गेलेल्या दुध पावडरीमध्ये मेलामायीन मिसळलेले आढळले. डॉ . रेनाते यांनी शोधलेल्या शोध निबंधातील उंदरांना जसे खडे झाले होते तसेच खडे या मुलांना देखील झाले होते. चीन सरकारने याची दाखल घेवून सन्लु कंपनीचा सर्व दुध पावडर साठा नाश केला होता. अन्न आणि औषध विभागाच्या प्रमुखाला, ज्याने या ग्लुटेन आणि दूधभुकटीला योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, फाशी दिले व इतर अनेकांना जन्मठेप ! पण एव्हडे होवूनही पुन्हा २०१० मध्ये अशी दुध भेसळ पुन्हा सापडली होती. म्हणतात ना जित्याची खोड ( दुसरे कोणीतरी ! ) मेल्याशिवाय जात नाही हेच खरे !

दूधभेसळ ही सर्वत्र आहे. दुधामध्ये पाणी तर नेहमीचीच बाब आहे. आपल्या महान देशामध्ये एकापेक्षा एक दुध भेसळीचे प्रकार दिसतात. दुधात पाणी घालून घट्ट होण्यासाठी स्टार्च पावडर अथवा युरिया वापरतात. कृत्रिम दुध अथवा केमिकल दूध हा तर एक जीवघेणा प्रकार ! असे दूध विकून अनेक दुध माफिया तयार झाले नसतील तरच नवल. अशा दुधापासून मिठाईदेखील तयार होते. रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या 'चाय गरम' मध्ये पांढरा पोस्टर कलर ,पाणी , स्यक्रिन आणि लाल रंग घातलेला असतो. चहा औषधालादेखील नसतो !

भेसळीच्या या भस्मासुराविरुध्ध डॉ. रेनाते यांनी दिलेला लढा वाचून विष्णूरूपातील मोहिनीचीच आठवण झाली. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू या अशाच आणखी एका भेसळ पुराणासोबत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<"प्लिज केमिकल दूध तयार करण्याची कृती वगळी तर फार बरे होइल">>>>ही कृतीच काय पण अनेक व्हिडीओज युट्यूब वर आहेत. आणि केवळ आपण डोळे मिटल्यामुळे वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. शत्रूला समजून घेवून जीव वाचविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. पटतंय ना ?

चिनुक्स सर,
धन्यवाद !

<<<पण, <मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती.> हे वाक्य अजिबात पटलं नाही.>>>हे वाक्य माझ्या मते सत्य आणि योग्यच आहे. लेख जास्त क्लिष्ट होवू नये म्हणून अनेक स्पष्टीकरणे मी टाळली / गाळली आहेत. डॉ. रेनाते यांनी केलेले संशोधन हे अभूतपूर्व होते, पूर्वीच्या आणि इतर संशोधकांनी केलेल्या संशोधनाची सांगड घालून एक चित्र तयार करण्याचे काम त्यांनीच केले आणि म्हणूनच त्यांना गौरवले गेले. हा लेख लिहिण्यापूर्वी अशा अनेक लेखांचा अभ्यास करूनच मी रंजक स्वरुपात लिहिले आहे.
मिसेस रॉबिन्सन ह्या फिक्टीशियस आहेत. हो, ते नाव,कदाचित आपण पहिला असेल, तर 'द ग्र्याज्यूएट' या चित्रपटाची आठवण यावी म्हणून वापरले आहे.

<<<<त्यांनी दाखवून दिले कि केवळ मेलामायीन अथवा सायन्युरिक ॲसिड यांनी किडनीला त्रास होत नाही तर दोन्ही एकत्र दिले तरच होतो. > हा पेपर शोधला पण सापडला नाही. कृपया लिंक देऊ शकाल का?>>>डॉ. रेनाते ह्या aquaculture तज्ञ आहेत. त्यांनी catfish या माशांचे चार गट करून त्यांना १. कंट्रोल २. फक्त मेलामायीन ३. फक्त सायन्युरिक असिड ४. मेलामायीन आणि सायन्युरिक असिड असे क्यप्श्युल्स चारले म्हणजे नळीने पोटात सोडले. सर्वांच्या किडनीचा अभ्यास केल्यानंतर फक्त ४ नंबरच्या माशांमध्येच क्रिस्टल्स तयार झालेले दाखवले. ही सर्व माहिती एफडीए च्या संकेतस्थळावरील आणि डॉ रेनाते यांच्या ज्या 'द मेलामीन स्टोरी' या व्हिडीओवर हा बराचसा लेख आधारीत आहे तो या दुव्यावर आपल्याला पाहाता येईल,
http://www.fda.gov/AnimalVeterinary/ResourcesforYou/AnimalHealthLiteracy...
प्रत्येकाला आवडेल असा हा व्हिदिओ आहे.
शिवाय हे प्रेझेन्टेशन देखील पहा ,
http://www.learningace.com/doc/2343021/00e098a74f9c47f2b77a2f48c12dc9d1/...

आपल्या हार्दिक प्रतिसादाबद्दल आभार.

कठीण आहे खरंच. आता स्वतःच्या दारात भाज्या पिकवून खाणं आणि घरात गोठा असणंही मस्ट झाल्यासारखं वाटतंय. बाजारू अन्नावर विश्वास ठेवावासा वाटतच नाही. ऑर्गॅनिक तरी किती खरं काय माहीत?!!.
मेलामाईन म्हणजे आपल्याकडे जी क्रॉकरी मिळते तेच मटेरियल ना? त्यात गरम जेवण वाढल्यावर लगेच काही दुष्परिणाम होत असतील का?

इब्लीसराव, खरे आहे ते, पण वेळ फार जातो त्यात ! त्यात आज शनिवार, सुट्टीचा म्हणजे स्वतःचा दिवस, शिवाय 'उत्तम अर्धा भाग' सध्या अमेरिका मुक्कामी त्यामुळे अधिकच मोकळा वेळ !

SureshShinde ,

मेलमाईन हे एक रसायन आहे. मेलमाईनचा वापर आम्ही कार्बन नॅनोट्युबा बनवायला करतो. असा वापर करताना जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये जी काळजी घेतली जात, ती आम्हीही घेत, कारण ते विषारी आहे. तुम्ही

केवळ विकीपीडियाची नोंद बघितली तरी हे रसायन विषारी आहे, हे कळतं. असंख्य पेपरही यावर प्रकाशित झाले आहेत. गूगल केल्यावर सहज सापडतील. हे रसायन विषारी नसतं, तर 'मॅक्झिमम अमाउंट अलाऊड'चा किंवा 'टॉलरेबल डेली इनटेक'चा प्रश्नच उद्भवला नसता. तुम्ही वर दिलेल्या स्पष्टीकरणात केवळ मेलमाईन हे विषारी कसं नाही, हे सांगितलंच नाही. हा निष्कर्ष कसा निघाला, हे जाणून घ्यायला मला आवडेल. Happy

तुमच्या लेखाचा विषय मेलमाईन सायन्युरेट हा असला, आणि मेलमाईन हे मेलमाईन सायन्युरेटपेक्षा कमी घातक असलं, तरी 'ते फारसं विषारी नाही' हे अजिबात खरं नाही.

तुम्ही लेखात ज्या 'फॉर्मालिन'चा उल्लेख 'औषध' म्हणून केला आहे, ते फॉर्माल्डिहाईडही विषारी आहे. युरोपीयन युनिअननं बायोसाइड म्हणून त्याच्या वापरासाठी बंदी घातली आहे.

लेख सोपा हवा, सर्वांना समजेल असा हवा, हे मान्य, पण रसायनांबद्दल चुकीची माहिती प्रसृत न होणंही महत्त्वाचं आहे. Happy

डॉ शिंदे सर,

ह्या लेख लिहील्याबद्दल धन्यवाद !!

भारतातील अन्नामधली भेसळ हा एक मोठा विषय आहे.

ज्या देशात दुधसुद्दा पुर्णपणे भेसळीच मिळु शकते त्या पेक्षा वाईट काहीच नाही. मध्यंतरी बातम्यात दाखवत होते की अशी भेसळ नसुन पुर्णपणे कृत्रीम रित्या बनवलेले दुध सरकारी अन्न व औषध प्रशासनाने पकडले. ते दुध टँकरेने पाठवत होते, म्हणजे कीती मोठ्या प्रमाणावर हे चालू आहे ह्याची कल्पना येईल. प्रशासनाच्या अधिकार्याना देखील हे दुध, भेसळयुक्त आहे हे ओळखता आल नाही.

दुसरे म्हणजे फॉम्हणजे, हे माश्याना लावून त्या मेलेल्या माश्याची सडण्याची प्रक्रीया थांबवण्याचा प्रयन्त करतात हे माशे विकणारे. हॉटेल मध्ये मिळणार्या हिरवे वाटाण्याच्या सर्व डीशेस मध्ये असणारे हिरवे वाटाणे हे सर्रास हीरव्या रंगात रंगवलेले असतात.

टाटा कँन्सर मध्ये दाखल झालेल्या कँसर रुग्णाच्या सरासरीत पश्चिम बंगाल मधुन आलेले रुग्णाची संख्या
काळजीत पडावे ईतके जास्त आहे.
पश्चिम बंगाल मधले शेतकरी आपल्या शेतात भरपुर रासायनीक खते, किटनाशके वापरुन शेती करतात आणी
उत्पादित भाज्या फळे धान्य बाजारात पाठवतात, पण स्वताच्या कुटुंबाला लागणारी भाज्या फळे दुसर्या जमिनीवर शेती करुन करतात ज्यात रसायनीक खते वा किटनाशके वापरत नाहीत.

@िचनूक्स<<<तुमच्या लेखाचा विषय मेलमाईन सायन्युरेट हा असला, आणि मेलमाईन हे मेलमाईन सायन्युरेटपेक्षा कमी घातक असलं, तरी 'ते फारसं विषारी नाही' हे अजिबात खरं नाही.>>>हे वाक्य माझे नाही. मेलामायीनचा विषारीपणा खाण्याच्या मीठाइतका असतो असे विषतज्ञांचे मत आहे. तुम्ही उल्लेखलेले सर्व संदर्भ मला जरूर माहित आहेत. त्यामुळे मी मात्र चुकीची माहिती प्रसृत करतो आहे हे आपले विधान चुकीचे आहे. अजूनही भेसळ करणारे लोक भेसळ करीतच आहेत. प्राण्यांच्या खाद्यात अनेक वर्षे मेलामायीनची भेसळ होतच होती, यावेळी सायन्युरेट मुळे ती लक्ष्यात आली इतकेच !

दुसरा मुद्दा फोर्म्यालीनचा ! आपण बरोबर आहात. मी रसायन हा शब्द वापरायला हवा होता कारण तुमच्या मते ते औषध नाही तर रसायन आहे. पटले ! पण जरी कोणी ही बंदी घातली असली तरी अजूनही हे रसायन जे आमच्या इंडियन फारम्याकोपिया मध्ये 'औषध' म्हणूनच नोंदलेले आहे, शोधा formalin solution IP. अजूनही ऑपरेशन थिएटर निर्जंतुक करण्यासाठी वापरतात. अमेरिकन डॉक्टर तर पायावरील केस घालवण्यासाठी याचे मलम वापरतात. मृतशरीराच्या imbalming साठीदेखील आणि आमच्या आरोग्य संग्रहालयामध्ये सुध्धा !
तसे आम्ही भारतीय डॉक्टर युरोपियनांपेक्षा ज्ञानाने कमीच असे दुसर्या एका धाग्यावर कोणीतरी लिहिले होतेच !

सुशि , तुम्ही मायबोलीचे सुशि (डिटेक्टिव्ह कथा लिहिणारे)झालात अगदी!

इब्लिस, आपल्या क्लबात आलेल्या मेंबराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करा.
Wink

@सायो :<<<मेलामाईन म्हणजे आपल्याकडे जी क्रॉकरी मिळते तेच मटेरियल ना? त्यात गरम जेवण वाढल्यावर लगेच काही दुष्परिणाम होत असतील का?>>>
मेलामायीनची भांडी स्वयंपाकासाठी वापरताना काळजी न घेतल्यास त्यातील फोर्मयालीनशी संयोगित रेझिन मधील मेलामायीन आणि फोर्माल्डीहाईड बाहेर येवून म्हणजे लीच होवून पोटात जाण्याची शक्यता असते. प्रमाणापेक्षा जास्त पोटात गेल्यास दोन्ही विषारी असतात.
लीचींग टाळण्यासाठी खालील काळजी घ्यावी,
मेलामायीनच्या भांड्यात शिजवू नये कारण उष्णतेमुळे मेलामायीन चे लीचींग वाढते. मायक्रोवेव्हमध्ये वापरू नका. गरम सूप अथवा अन्न वाढून खाणे सुद्धा योग्य नाही. थंड पदार्थांसाठी वापरू शकता. ही भांडी डिशवॉशर मध्ये धुवू नका. कोमट साबणपाणी अथवा डिशवॉशर सोप वापरू शकता.स्कोरिंग प्याड्स वापरू नका, चरे पडलेले, फुटलेले , चमक गेलेले भांडे वापरू नका, फेकून द्या. उपलब्ध असल्यास मेलामायीन किचन्वेअर क्लीनर वापरा. थोडक्यात काय, 'से नो टू मेलामायीन !'

@साती :
सातीजी आणी इतर मेम्बरांनो,
आपल्या मैत्रीच्या फुलांचा मोहक सुगंध मनाच्या कोंदणामध्ये माळून ठेवला आहे. Happy

<<<<सुशि , तुम्ही मायबोलीचे सुशि (डिटेक्टिव्ह कथा लिहिणारे)झालात अगदी!>>> म्हणजे अगदी बाबूराव अर्नाळकर कि काय ? नाहीतरी माझे कुलदीपक चि ऋतुपर्ण मला 'बाबूराव' म्हणूनच हाक मारतात. त्यांच्या पथ्यावर पडले अगदी !

>>ऑर्गॅनिक तरी किती खरं काय माहीत?!!.>>

कुणी नुसतेच ऑरगॅनिक म्हणत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. ऑर्गॅनिक म्हणजे खरे तर USDA Certified Oraganic असे हवे. अमेरीकेत USDA Certified Oraganic बरेचदा विश्वासार्ह असते. तरीही अक्रेडीटेड एजंट्सनी सर्टीफाय केलेले प्रॉडक्ट्स ऑरगॅनिक च्या निकषांवर पास न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कायदे आहेत पण एकंदरीत त्या कायद्यांनुसार काटेकोर निकष लावून पाहाणी केली जातेच असे नाही. त्याच वेळी बरेचदा स्थानिक शेतावर सस्टेनेबल प्रॅक्टीसेस वापरुन तयार होणारी भाज्या, फळे ही ऑरगॅनिक असू शकतात पण बरेचदा सर्टीफिकेशनचे झंजट नको असते किंवा उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार एक्झम्पशन असते. त्यामुळे लेबल नसते.

मेलॅमाईन वाईट आहे, आणि त्यातुन गरम पदार्थ खाऊ नयेत हे मी खुप आधी वाचलेले त्यामुळे घरातली मेलामाईनची सगळी ताटे व वाट्या मी बर्याच वर्षांपुर्वी फेकुन दिल्या. पण कालांतराने मी हे सगळे विसरुन गेले.

आता वरचे वाचुन लक्षात आले की हॉटेलात खायला गेले असता तिथे सगळे मेलॅमाईनच्या क्रोकरीत वाढले जाते. एका ठराविक ग्रेडवरच्या हॉटेलात चिनि मातीची क्रोकरी असते पण ती हॉटेले खुप महागडी असतात. असल्या होटेलात जायला कोणाला परवडते?

तसेही माझे हॉटेलातले खाणे खुप कमी झालेय, तुमचा लेख वाचल्यावर मेलॅमाईनचे परत लक्षात आले. आता पुढच्या वेळॅस हॉटेलात गेले की हेच आठवेल आणि खाणे घशाखाली उतरणार नाही. मुळात हॉटेलात जावेसे वाटेल का हा प्रश्न अहे आता.

<मेलामायीनचा विषारीपणा खाण्याच्या मीठाइतका असतो असे विषतज्ञांचे मत आहे.>

ही विशेषज्ञ म्हणजे एमिली मोनोसन. दटॉक्सिकोलॉजिस्ट या ब्लॉगचा दाखला तुम्ही दिला आहे, असा माझा अंदाज आहे. ही माहिती २००८ सालची आहे. दरम्यान बरंच संशोधन झालं आहे. 'मर्क'ने मेलमाईनची भेसळ आणि टॉक्सिसिटी पडताळण्यासाठी चाचण्या विकसित केल्या आहेत.
फॉर्मल्डीहाईड काअर्सिनोजेन आहे. शक्यतो वापर टाळावा.
मेलमाईन रेझिनमध्ये फॉर्मालिन नसतं.
असो.
हेमाशेपो.

>>फॉर्मल्डीहाईड काअर्सिनोजेन आहे. शक्यतो वापर टाळावा.<<

बापरे!
उद्याच फुल्ल बॉडी स्क्यान करून घेतो.
खरंच कठीण आहे. जगावं कसं सर्जन्सनी? ओटी फ्युमिगेशनला फॉर्मॅलिन तर लागतेच वरतून त्यात पोट्याशियम परमँगनेटही घालतात हो आमच्याकडे... Sad कृपया पर्यायी व्यवस्था सुचवता येईल का?

क्यान्सरने मेलेल्या ओटी कर्मचार्‍यांचा विदा कुठे मिळतोय का पहायला हवा...

ती नवी आयडी काढायचंही मनावर घ्यायलाच हवं.

इब्लिस,
तुम्हांला समजेल अशा शब्दांत सांगतो. गूगल उघडा. त्यात formaldehyde आणि carcinogen असे शब्द भरा. मग एंटर दाबा. काय लिहून येतं ते वाचा.
आणि म्हणूनच फ्युमिगेशन करण्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉल्स असतात. एक्स्पोजर लिमिट २पीपीएम ठरवलेली असते. पर्यायी व्यवस्था हवी असेल तर व्हेपराइज्ड हायड्रोजन पेरॉक्साइड वापरा.
यापूर्वी अनेकदा तुमच्याशी नीट संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हांला प्रतिवाद करता येत नसेल, तर लिहिण्याचा भानगडीत पडू नका.

महोदय,
सेफ्टी प्रोटोकॉल्स वापरून जर अमुक औषध/केमिकल वापरले तर ते सेफ असते, हे जर आपणास ठाऊक आहे, तर आपण नुसतेच 'फॉर्मॅलीन कार्सिनोजेन आहे. टाळा' इतकेच बोलून का थांबलात? तिथे डीटेल माहिती नको द्यायला? इतरांनी किचकट शास्त्रीय माहिती सोपी करून सांगताना थोडे अघळपघळ शब्द वापरले की त्यांना आपण पट्कन दुरुस्त करता. अशावेळी आपल्याकडून अँबिग्युअस स्टेटमेंट्स लोकांनी का स्वीकारावीत?

डॉक्टरसाहेबांनी फॉर्मॅलिनच्या 'औषध' असण्याबद्दल लिहिले, तर त्यांचा त्याबाबतचा अभ्यास शून्यच आहे, असे प्रतित व्हावे असे तुमचे लिखाण दिसले, म्हणून लिहावे लागले.

बाकी माझ्या बाबतीत तरी, तुम्हाला फक्त वाद घालता येतो, प्रतिवाद समजून घेण्याचीही इच्छा नसते असेच दिसले मला आजवर.

@
<<<मेलमाईन रेझिनमध्ये फॉर्मालिन नसतं.>>हा दुवा पहा http://noncreativemom.wordpress.com/2012/01/19/melamine-dishes/

On SafeMama.com they mention:
“a report from the National Toxicology Program that states,Melamine resin, a hard thermosetting polymer made from melamine and formaldehyde, is widely used in the US in the form of kitchenware, including plates, bowls, mugs and utensils. Reports in the literature indicate that some kitchenware based on melamine resin leach considerable amounts of melamine monomer. A migration of up to 2.5 mg melamine/ 100 cm2 was observed under conditions that simulate an exposure to hot acidic foods…”

<<<फॉर्मल्डीहाईड काअर्सिनोजेन आहे. शक्यतो वापर टाळावा.>>>योग्य आहे.

माझे वाक्य पुन्हा वाचावे. "मेलामायीन आरोग्याला फारशी घातक नसल्यामुळे ही भेसळ इतके दिवस लक्ष्यात येत नव्हती. " मी ते घातक अथवा विषारी नाही असे म्हटलेले नाही. नेमके तेच आपल्या लक्ष्यात येत नाहीये !

या धाग्यावर आपल्याशी झालेल्या संवादाचा आनंद वाटला. एकूण आपल्या अभ्यासू वृत्तीचे आणि चर्चेचे खरोखर कौतुक वाटते. (कृपया हे उपरोधिक समजू नका !)
असो,
मनःपूर्वक धन्यवाद !

शिंदेसर,

फॉर्मॅलिन आणि फॉर्माल्डिहाईड ही तशी वेगळी रसायनं आहेत. फॉर्मालिनमध्ये फॉर्माल्डिहाइड असतं, पण फॉर्माल्डिहाईड म्हणजे फॉर्मालिन अजिबातच नव्हे. फॉर्मॅलिनमध्ये अनेकदा मेथनॉल असतं, नेमहीच पाणी असतं आणि उरलेलं फॉर्माल्डिहाईड असतं. मेलमाईन रेझिनमधले मोनोमर्स हे फक्त मेलमाईन आणि फॉर्माल्डिहाईड असतात. फॉर्मालिन नसतं त्यात...

<मी ते घातक अथवा विषारी नाही असे म्हटलेले नाही. नेमके तेच आपल्या लक्ष्यात येत नाहीये !>

तुम्ही मेलमाईनची मिठाशी तुलना केली होती.

असो. मला लिहिण्याची इच्छा नव्हती. तरी हे पोस्ट वाचून राहावलं नाही.

इब्लिस,
तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी.
फॉर्मॅलिन हे फॉर्माल्डिहाईडचं अ‍ॅक्वस सोल्यूशन आहे. मी 'फॉर्मल्डीहाईड काअर्सिनोजेन आहे. शक्यतो वापर टाळावा.' असं लिहिलं. फॉर्मॅलिन कार्सिनोजेन आहे, असं लिहिलेलं नाही. दुसरं - फॉर्माल्डीहाईड कशासाठीही वापरलं तरी ते 'नोन कार्सिनोजेन' आहे. यात अ‍ॅम्बिग्वस काय आहे? नोन कार्सिनोजेन असेल तर ते वापरणं टाळावं, हा कॉमनसेन्स आहे. फॉर्माल्डीहाईड अनेक उद्योगांमध्ये वापरलं जातं, ते टाळण्यासारखं नाही. पण किती आणि कसं वापरावं, याचे संकेत आहेत. मेलामाईनचा वापर टाळता येतो. मेलामाईन रेझिनबद्दल प्रश्न विचारणारे काय ओटीचं फ्युमिगेशन करणार आहेत? आणि 'शक्यतो' हा शब्द वाचला नाही का?

सर्वांत महत्त्वाचं - योग्य आणि शास्त्रीय माहिती शास्त्रीय भाषेत देणं हे कोणाहीकडून अपेक्षित आहे. किचकट माहिती सोपी करून सांगताना अशास्त्रीय भाषा वापरली तरी चालते, हा गैरसमज आहे.

प्रतिवाद योग्य असेल, तर समजून घेता येतो.

ओटी फ्युमिगेशनच्या पर्यायी व्यवस्था सुचविण्यासाठी का होईना, हेमाशेपोनंतरही टंकनश्रम घेतल्याबद्दल धन्यवाद!
शुभरात्री Happy

इब्लीसजी,
आपल्या पुष्पगुछ्याबद्दल आभार !
बाकी अबोली रंगाची फुले देवून आता बोलू नका असे तर सुचवयाचे नाही ना ?

आणी हो, आपली पोस्ट मी नंतर वाचली. माझ्याशी सहमती लिहून दर्शविल्याबद्दलही आभार.
काही CARCINOGENS ची नावे पहा - जास्त भाजलेला टोस्ट, फूड अडीटिव्हज, शुगर सबस्टीट्युटस , ट्रान्सफ्याटस, ई ई.
काय काय टाळावे ?
शब्दत्छल फार झाला, जावू द्या !

@विवेक नाईक :<<<टाटा कँन्सर मध्ये दाखल झालेल्या कँसर रुग्णाच्या सरासरीत पश्चिम बंगाल मधुन आलेले रुग्णाची संख्या
काळजीत पडावे ईतके जास्त आहे.>>>>हे माझ्यासाठी नवीन ज्ञान आहे. मला असे वाटते कि याचे कारण बंगालमधील पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेला अर्सेनिक हा दुषित घटक असावा. अर्सेनिक हे नोन(माहित-असलेले) कार्सिनोजेन आहे. बंगालमध्ये पिण्याच्या पाण्यातील अर्सेनिक हा फार मोठा पब्लिक हेल्थ प्रश्न आहे. त्याविषयी मी येथे लिहिणारच आहे. कीटक नाशके भारतात सर्वत्रच वापरली जातात व त्यामुळेच क्यान्सर होतो असे वाटत नाही.

यापुढे कधी 'चाय गरम' पीता येईल असे वाटत नाही. माहीतीपूर्ण लेख आणि प्रतिसाद. धन्यवाद डॉक्टर शिंदे.

Pages