अजूनही

Submitted by बेफ़िकीर on 26 February, 2014 - 08:46

कसाबसा संपतो दिवस
कुठेतरी हात झटकुनी
फरारतो सूर्य एकटा

निराश उडतात पाखरे
नटून कोणी विवाहिता
उगीच गच्चीत थांबते

प्रचंड आवाज हॉर्नचे
अखंड ट्रॅफीक तुंबते
हरेकजण वाट काढतो

प्रकाश अंधार होउनी
मनास आणून काजळी
क्षितीज ढकलत दुरावतो

विषण्णता आणते हवा
छचोर स्वप्ने फवारुनी
शरीर बनतात माणसे

थकून गेले निजून जग
बघून मी मग उफाळतो
रिकामरस्त्यांत धावतो

विचार करतो कितीतरी
कितीतरी ओढतो बिड्या
अनेक निष्कर्ष काढतो

तरी न कळते अजूनही
हवीहवीशी सकाळ पण
मजेत जाते दुपार पण
खुषीत रात्री जगून पण
उदास का वाटते मला
जशी तिन्हीसांज व्यापते

कशीबशी सांज सोसतो
कशीतरी कात टाकतो
तुझा दुरावा अजूनही
मनास तितकाच बोचतो.

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी न कळते अजूनही
हवीहवीशी सकाळ पण
मजेत जाते दुपार पण
खुषीत रात्री जगून पण
उदास का वाटते मला
जशी तिन्हीसांज व्यापते

कशीबशी सांज सोसतो
कशीतरी कात टाकतो
तुझा दुरावा अजूनही
मनास तितकाच बोचतो.>>.. जबरी!

व्वा ! संयत शब्दात पण प्रभावीपणे विरहव्यथा व्यक्त होतेय कवितेतून..... छानच.

सहजसुंदर
फार आवडली

पहिली ७ कडवी अतिउत्तम अश्या ७ हायकूंसारखी वाटत आहेत त्या नजरेतून पाहता अधिकच आवडत आहेत
शेवटचे कडवे म्हणजे एक रुबाई आहे ना..? ..उत्तम आहेच तीही

धन्यवाद बेफीजी

....फरारतो सूर्य एकटा,

....क्षितीज ढकलत दुरावतो,

....कितीतरी ओढतो बिड्या
अनेक निष्कर्ष काढतो,
>>> जास्त आवडले<<<<

वेगळी रचना, खूप आवडली.

< विषण्णता आणते हवा
छचोर स्वप्ने फवारुनी
शरीर बनतात माणसे >

… क्या बात है !