गिर्यारोहक बिमला नेगी देऊस्कर : मुलाखत

Submitted by मंजूताई on 24 February, 2014 - 00:33

Strength does not come from winning. Your struggles develop your strength and decide not to surrender. That is strength. हे वाक्य ज्यांचं चपखल वर्णन करतं त्या म्हणजे बिमला नेगी देऊस्कर! बिमला नागपूरातील 'नॅशनल अ‍ॅड्व्हेन्चर फाऊंडेशन'च्या संस्थापिका आहेत. जून महिन्यात केदारनाथला झालेल्या ढगफुटीच्यावेळेस बिमला त्या भागात होत्या व त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवले. त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा खास मायबोली व संयुक्ता वाचकांसाठी!

bimla-negi-deoskar.jpg

बिमला नेगी

जून महिन्यात हिमालयात जी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यावेळी तुम्ही तिथे होतात. तुम्ही आपल्या चमूला व अनेक जणांना सुखरूप परत आणले त्याबद्दल तुमचे अभिनंदन. त्या मोहिमेबद्दल व तिथल्या मदतकार्याच्या अनुभवाबद्दल सांगाल का?

आपल्या भारतातील पर्वतारोहणाची अ‍ॅपेक्स बॉडी 'इंडियन माऊंटेनियरींग फेडेरशन' ही दिल्ली येथे आहे. हिमालयातील गिर्यारोहण क्षेत्रातलं नियोजन किंवा निर्णय ही बॉडी करते. दर वर्षी महिलांकरिता एक किंवा दोन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. मला 'भागीरथी दोन' शिखर मोहिमेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. उंचीप्रमाणे इथल्या शिखरांची नावे ठेवण्यात येतात. भागीरथी नावाची एक, दोन व तीन अशी तीन शिखरं आहेत. इथल्या निसर्गाबद्दल काही बोलायचं झालं तर एकाच शब्दात सांगेन- 'स्वर्ग!' तो मला नेहमीच खुणावत असतो. माहेरची ओढ कुठल्या मुलीला नसेल? देशभरातून बारा मुली निवडायच्या होत्या. ही एक कठीण प्रक्रिया असते व मोहिमेचं यशापयश ह्या निवडीवर अवलंबून असतं. गिर्यारोहण हा एक खर्चिक व जोखमीचा खेळ आहे हे ध्यानात ठेवून मी काही अनुभवी तर काही नवीन मुलींना व त्यातल्या त्यात साधारण आर्थिक परिस्थितीतल्या पण सक्षम मुलींना संधी दिली.

I bhagirathi ii (6).jpg

भागीरथी शिखर

एक जूनला आम्ही बारा मुली व एक डॉक्टर दिल्लीहून निघून उत्तरकाशीला आलो. रेशन उत्तरकाशीला घेतलं आणि गोमुखाकडे कूच केलं. आय.एम.एफ.तर्फे आमच्या संघात आशा नावाची हिमनगाचा अभ्यास करण्यासाठी आलेली एक वैज्ञानिक मुलगी होती जिने कधीच गिर्यारोहण केलेलं नव्हतं. आम्ही भूजबासाला पोचेस्तोवर ती पार ढेपाळून गेली होती. तिलाही तिची क्षमता लक्षात आली आणि ती मागे फिरली. आम्ही नंदनवनला पोचलो जो आमचा 'बेस कँप' होता. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी व पुढच्या प्रवासाची आखणी करण्यासाठी इथे आम्ही चार दिवस राहिलो. इथून पुढे खरी चढाई सुरू होणार व रोज नयी रात नया आशियाना!

क्लायंबिंग हाय स्लीपिंग लो सुरू झालं. एका मुक्कामी पोचत नाही तो आशा वर चढून आलेली! मोठा कठीण प्रसंग! मी काहीच बोलले नाही. तिलाही आश्चर्यच वाटलं. इथून 'जा बाई आता बस पकडून घरी' असे म्हणू शकत नव्हते कारण हे अशक्य होते आणि बरोबर घेऊन जाणं फार मोठं जिकिरीचं काम होतं. स्वच्छ व सुंदर वातावरणात तिच्यासह चढाई सुरू झाली.

IN bhagirathi II (38).jpg

आनंदाने चढाई

हिमालयाची शिखरे चढतानाचे काही नियम असतात. एक चमू पुढे जातो, नंतर मधली फळी व त्यामागे शेवटची टीम असा प्रवास असतो. ज्या मुली पुढे होत्या त्या सोळा तारखेला आमची मोहीम फत्ते करणार होत्या. मी मधल्या फळीत होते व काही अजून खालच्या कँपमध्ये होत्या. पण पंधरा तारखेला इतका जबरदस्त हिमवर्षाव झाला की विचारायची सोय नाही. आमच्या समोरील केदारनाथ शिखरावर ढगफुटी झाल्यामुळे जी आपत्ती आली होती, तीच आमच्यावर बर्फाच्या रूपात कोसळत होती. माझ्या वीस-पंचवीस वर्षाच्या अनुभवानुसार हा काळजीत टाकणारा हिमवर्षाव होता. मी अत्यंत कठोर मनाने पुढे गेलेल्या मुलींना माघारी फिरायला सांगितलं. माझ्या दृष्टीने सगळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची होती. हम सलामत तो मोहिमा पचास! दृष्टिपथात आलेलं भागीरथीचं टोक न गाठता परत फिरणं मुलींच्या किती जीवावर आलं असेल हे माझ्याशिवाय इतर कोण समजू शकेल! पण निसर्गाशी दोन हात करायचे नसतात. ताज्या बर्फावरून चालणे अतिशय अवघड असते. कशाबशा खालच्या मुली तर वर आल्या, पण मला वरच्या मुलींची काळजी होती. त्या दिसल्या आणि माझा जीव भांड्यात पडला. ह्या क्षणी आम्ही एकत्र असणं खूप गरजेचं, महत्त्वाचं होतं. तंबू उडून जाऊ नये म्हणून आम्ही सतराजणींनी तंबूला घट्ट धरून ठेवत एक रात्र जागून काढली.

दुसर्‍या दिवशी आम्ही खोर्‍यातून उतरायला सुरुवात केली. नदी, नाले बर्फाने झाकले गेले होते. त्यामुळे उतरणं अवघड होऊन बसलं होतं. मला ज्याची भीती वाटत होती, तेच घडलं! दोन मुली नदीत पडल्या. चेहरा काळा ठिक्कर, आतून बाहेरुन ओल्याचिंब! खाली बर्फ, वरून बर्फ पडतोय अशा अवस्थेत चालणं दिव्यच! पण दुसरा पर्यायच नव्हता! मुलींना आंजारत गोंजारत तर कधी रागावत मुंगीच्या चालीने उतरत होतो. एका मुलीने तर चक्क आपलं सामान फेकून दिलं. त्यात काही नवल नाही. अशा बिकट परिस्थितीत मनाचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. वैज्ञानिक आशाची अवस्था तर पाहवत नव्हती. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक असतं. दुसरा कोणी मदत करण्याच्या अवस्थेतच नसतो. आता ताज्या हिमवर्षावाने दडपलेलं गंगोत्री हिमनग पार करून भूजबासाला जायचं होतं. कुठल्या मार्गाने जावं? कोपर्‍या कोपर्‍याने गेलो तर दरड कोसळण्याची भीती अन् मधून गेलो तर अत्यंत खोल अश्या हिमनगात पडण्याची भीती. अत्यंत सावधतेने एकेक पाऊल टाकत भूजबासाला पोचलो. हायसं वाटलं. मनोमन देवाचे आभार मानले. आमच्या शेर्पांनी जी अतुलनीय कामगिरी केली त्याला तोड नाही. त्यांची मी कायम ऋणी राहीन! सुखरुप पोचल्याच्या आनंदात होतो.

IN bhagirathi II (36).jpg

उतरण महाकठीण

भूजबासाला पोचेपर्यंत जगात काय चाललंय ह्याबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हतं. तिथे अडकलेल्या लोकांनी आश्चर्यानेच विचारलं 'तुम सारी लडकियाँ आ कहाँसे रही हो?' अति बर्फवृष्टीवरून काही अघटित घडले असण्याची अंधुक शंका होती. पण एवढी भयानक आपत्ती कोसळली असेल स्वप्नातही वाटले नव्हते. खरं सांगू का, नागपूरला आल्यावरच जेव्हा टीव्हीवर बघितलं तेव्हा नक्की काय, कसं व किती भयानक घडलं, हे कळलं. तिथल्या लोकांचे हाल व परिस्थिती बघून मन विदीर्ण झाले. म्हातारेकोतारे, लहान मुलं, बायका, अंगावर एक कपडा, जवळ सामान नाही, थंडी मी म्हणतेय.. आजही ते दृश्य डोळ्यासमोर आलं की मन हेलावून जातं. हेलिकॉप्टरची वाट बघत बसलेले म्हातारे, लहान मुलं, बायका! कसंही करून बाहेर पडण्याची चाललेली धडपड. आमच्याकडे बघून त्यांच्या डोळ्यात विश्वास दिसला की ही गिर्यारोहक मंडळी आपल्याला मदत करतील. आम्हीही त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आम्ही व आमच्या शेर्पांनी लोकांना तिथून बाहेर काढायला मदत केली. आम्ही लोकांना मदत करत हर्सिलला पोचलो. कुठेही अंग टाकायला जागा नाही. आम्ही आमचं स्वतःचं सामान, गरम कपडे, स्लीपिंग बॅग वगैरे गंगोत्रीतच सोडून आलो होतो.

IN bhagirathi II (41).jpg

मदतकार्य

आर्मीवाले सर्वतोपरी मदत करत होते. त्यांच्याजवळही मर्यादित अन्नधान्य होतं. ते तरुण, धडधाकट व ट्रेकर्सना चालत खाली जाण्याचं आवाहन करत होते. पण जाणार कसं? रस्ता तर हवा ना! स्थानिक लोकांच्या मदतीने दोर लावून जाणं आमच्यासाठी अवघड नव्हतं, पण ज्यांनी कधी आयुष्यात कल्पनाही केली नसेल असे लोक जीवावर उदार होऊन त्या दोरीच्या साहाय्याने पलीकडे जात होते. मरता क्या न करता! आता भटवारी दोन किलोमीटर वर राहिलं होतं. मुली इतक्या थकल्या होत्या की त्यांनी रस्त्यावरच अक्षरशः लोळण घेतली. सरळ रस्त्यावर चालताना तुमचे सगळे स्नायू काम करत नाहीत त्यामुळे लवकर थकवा येतो. उत्तरकाशीला पोचेपर्यंत बिकट वाट ही वहिवाट! काय काय अग्निदिव्यं करावी लागली त्याला काही सीमाच नाही. लोकांचे हाल बघून हृदय पिळवटून निघाले. उत्तरकाशीहून कशीबशी एक सरकारी बस मिळाली अन आम्ही हृषीकेश- दिल्लीला पोचलो.

IN bhagirathi II (75).jpg

पुरात वाहून गेलेले रस्ते

ह्या मोहिमेबद्दल मी म्हणेन 'मी जिंकले, मी हरले!' मी माझ्या बारा मुलींना सुखरूप घेऊन परतले. पीडितांना, आपद्ग्रस्तांना आमच्याकडून जी मदत केली त्याचं जे समाधान आहे ते मोहीम यशस्वी होण्याच्या मानाने कितीतरी पट अधिक आहे. मी आत्तापर्यंत अनेक मोहिमा केल्या. त्यात ही एक नक्कीच अविस्मरणीय होती, ज्यातून मला खूप काही शिकता आले.

सामान्य मुलींना अशा मोहिमांमध्ये भाग घेता येऊ शकतो का?

नाही, असा सर्वसामान्यांना भाग घेता येत नाही. आपल्या इथे चार (मनाली, उत्तरकाशी, जम्मू व दार्जिलिंग) चांगल्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था आहेत. ह्या संस्थांमध्ये निव्वळ भारतीयच नव्हे तर इतरही देशातून खेळाडू प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. इथे बेसिक व अ‍ॅडव्हान्स असे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. दिल्लीस्थित आय.एम.एफ. वर्षातून दोन किंवा तीन मोहिमांचे आयोजन करत असते. जानेवारी महिन्यात प्रशिक्षितांना अर्ज करून ठेवावा लागतो. ह्याची जाहिरात वर्तमानपत्रात अथवा इतर माध्यमात येत नाही. पण त्यांच्या वेबसाईटवरून माहिती कळू शकते.

आतापर्यंत तुमच्या किती मोहिमा झाल्या? त्यातल्या यशस्वी - अयशस्वी किती आणि त्याची काय कारणे?

जवळपास सोळा-सतरा मोहिमा झाल्या. त्यातल्या तीन मोहिमांची मी संघप्रमुख होते. संघप्रमुख होणं ही मानाची बाब असते. त्यातल्या बारा यशस्वी झाल्या. अयशस्वी होण्याचं मुख्य कारण निसर्ग! तुम्हाला निसर्गाची साथ मिळाली तर इतर अडचणींवर मात करता येऊ शकते. एका मोहिमेत असाच निसर्ग कोपला होता. अतिहिमवृष्टी! तीन दिवसांनी स्वच्छ वातावरण. पण असे तीन-चार दिवस वाट बघत बसणं शक्य नसतं, कारण खाण्या-पिण्याचं सामान, इंधन योजनेनुसार ठराविकच व मर्यादित असतं. आयएमएफच्या गोल्डन ज्युबिली वर्षात मी संघप्रमुख म्हणून 'सतोपंथ' ही यशस्वी मोहीम केली जी तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण होती. ह्या मोहिमेच्या वेळेला माझी खूप द्विधा मन:स्थिती झाली. जावं की न जावं? मी विचार केला, मी नाही तर अजून कोणी करेल, मला ज्या अडचणी येतील त्या इतर कोणालाही येतीलच ना! जीवनमें आगे बढने के लिये परेशानियाँ तो उठानेही पडेंगी. आजवर सगळ्यात उंच शिखर 'कामेट' केलंय. ज्याची उंची २५,४४७ फूट आहे. २५,३४७ फुटापर्यंत आम्ही चढलो होतो फक्त शंभर फूट राहिलं होतं. एक फुटावरचंही काही दिसत नव्हतं. मागे फिरलो. दुसर्‍या दिवशी वातावरण स्वच्छ! दहा पावलं चढलो असतो तर........

काही शिखरे उंच असतात पण तितकी अवघड नसतात. उलट काहींची उंची कमी असते पण चढाईला अत्यंत कठीण. त्यापैकीच एक सतोपंथ. दोन्ही बाजूला खोल दरी. जेमतेम पाऊल मावेल एवढी फक्त वाट. हिमालयातील प्रत्येक ठिकाणाचं सौंदर्य जसं वेगळं तशाच तिथल्या वाटाही. निसर्गाजवळ जाण्याची ही एक पर्वणीच असते. तो एक आनंद असतोच शिवाय निसर्गाकडून तुम्हाला जे शिकायला मिळतं ते तुम्हाला इतर कुठल्याही शाळा- कॉलेजात वा गुरुकडून शिकायला मिळणार नाही. कठीण परिस्थितीत तुमचे गुण-अवगुण तुम्हाला व इतरांनाही कळतात. एका नवीन संकटातून एक नवीन धडा मिळत असतो. परिस्थिती तुम्हाला मार्ग दाखवत असते त्याचे कुठे रेडीमेड गाईड बुक नसतं. निदान आमच्या ह्या खेळात तर नक्कीच नाही. तुम्हाला तुमच्या 'स्व'ची खर्‍या अर्थाने ओळख होते.

ह्या क्षेत्रात तुम्ही कशा आलात? ठरवून आलात का?

मी ह्या क्षेत्रात अपघातानेच आले. ठरवून तर अजिबातच नाही. मी पंचाऐंशी साली बेसिक कोर्स केला. मी राहणार उत्तरकाशीची, हिमालयातलीच! त्याचा मला खूप फायदा झाला. मी अगदी निम्न मध्यमवर्गातून आलेली मुलगी. एक गंमत सांगते - गिर्यारोहण वगैरे बाहेरच्या लोकांसाठीच असतं, आपल्यासाठी नसतंच, असं त्या वेळेला आम्हाला वाटायचं. स्थानिकांना शिष्यवृत्ती मिळायची म्हणून मी बेसिक व अ‍ॅडवान्स कोर्स केले. ह्या खेळात फक्त पहाड चढणं - उतरणंच नाही शिकत तर आपण लाईफ स्किल्स शिकतो. आपल्या क्षमता कळतात. दिल्लीतील सीसीई तर्फे मला एका मोहिमेबद्दल विचारण्यात आलं, त्याकरिता पाचशे रुपये भरायचे होते. ते मी कसेबसे जमवले. त्यानंतर संधी येत गेल्या, मोहिमा करत गेले. सहज म्हणून जे शिकले त्यात इतकी आवड निर्माण झाली की तेच उपजीविकेचं साधन झालं.

ह्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक ताकद लागते. त्यासाठी खास काय करता?

हो, नक्कीच! मानसिक व शारीरिकरीत्या तंदुरुस्त असणं अतिशय आवश्यक आहे. सायकल चालवणे किंवा पायी फिरणे एवढेच मी करते, पण त्यात सातत्य नसते. पण एखाद्या मोहिमेवर जायचं असेल तर मात्र मी नियमित सायकलिंग करते. हा खेळ माझी पॅशन आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य नेहमीच उत्तम असतं आणि अर्थात ते असेल तरच तुम्ही ह्या खेळाचा विचार करू शकता. केलेल्या मोहिमेतून जे टॉनिक मिळतं ते पुढच्या मोहिमेसाठी पुरेसं असतं, चार्ज्ड होऊन येते. खास आहार असा काही घेत नाही.

तुम्ही एक गिर्यारोहक महिलांची एक संस्था काढली आहे. तिच्याबद्दल सांगाल का?

२००८ साली आम्ही एक संस्था सुरू केली जिचं नाव वानी (विमेन अ‍ॅडवेन्चर नेटवर्क ऑफ इंडिया). आपल्याकडे बर्‍याच महिला गिर्यारोहक आहेत, पण सगळ्याजणी विखुरलेल्या आहेत. त्यांना एकत्र आणून स्त्रियांसाठी काही करता येईल ह्या विचाराने २००८ मध्ये त्यांना नागपूरला बोलावले. हिमाचल, मणीपूर, उत्तरांचल, बंगळूर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून पंधराजणी आल्या. मला तर आश्चर्यच वाटलं! कारण प्रत्येकीचे नोकरी व्यवसाय आहेत, घर-संसार आहेत. २००५ साली एव्हरेस्ट सर करणारी मेजर अश्विनी आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन आली होती. आम्ही तीन दिवस एकत्र राहिलो. एव्हरेस्ट सर करणारी प्रथम भारतीय महिला बचेंद्री पाल, अंटार्क्टिकावर स्किईंग करणारी रीना धर्मसक्तु, पद्मश्री अनितादेवी, एव्हरेस्ट सर करणारी सुमन कुटियल अशा यशस्वी महिला आल्या होत्या. विचारविनिमय केल्यावर काहीतरी ठोस करायला हवं हे जाणवलं.. आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे तो महिलांना सशक्त, सक्षम करण्याचा, 'स्व' ची ओळख करून देण्याचा. प्रत्येकीतच काही ना काही हुन्नर असतं, सुप्त गुण असतात. त्यांची त्यांना जाणीव करून देत, स्वतःची व पर्यायाने कुटुंबाची उन्नती साधण्यासाठी, त्याचं महत्त्व पटवून देत त्यांना प्रेरित करण्याचा. अशा तर्‍हेने वानीची स्थापना झाली, ज्याच्या अध्यक्षा बचेंद्री पाल आहेत.

IN DSC_6841.jpg

बचेन्द्री पाल व बिमला नेगी

IN DSC_8643.jpg

गावात कार्यक्रम

संघटित होऊन मोठ्या प्रमाणावर काही करायचं म्हणजे पैसा लागतो. इच्छा तिथे मार्ग! पैशाची सोय होत गेली. हर्क्युलस सायकल कंपनीने त्यांच्या गियरवाल्या सायकली दिल्या अन आम्ही एक सायकल मोहीम केली. त्याला नाव दिलं 'गो ग्रीन गर्ल १'. २६ जानेवारीला २०११ ला कलकत्त्याहून निघालो व २८ फेब्रुवारीला कन्याकुमारी पोचलो. त्यात किमान वय २२ ते कमाल ७५ वर्षे अशा वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. हा झाला एक मोठा इव्हेंट. त्यात आयएमएफ, बचेंद्री दिदी, रोटरी क्लब, लायन्स क्लब व स्थानिक लोकांची मदत मिळाली. अशी मोहीम करणं सोपी गोष्ट नाही. चार दिवस आपण कुठे फिरायला जातो तर आपण त्याचं प्लॅनिंग करतो. त्यावरून कल्पना येईल की किती बारीक सारीक गोष्टींचा बारकाईने विचार करून अशा मोहिमांचं प्लॅनिंग करावं लागत असेल! असे मोठे इव्हेंट वारंवार करणं कुठल्याच दृष्टीने शक्य होत नाही. म्हणून मग प्रत्येकीने आपापल्या गाव - शहर पातळीवर महिलांना सक्षम करण्याचं, पर्यावरण राखण्याचं किंवा इतर काही स्थानिक समस्या, गरजा ओळखून काम करावं, असं ठरवलं. त्याप्रमाणे सगळ्याजणी काम करत आहेत. मागच्या वर्षी मी आयएमएफला विनंती करून एक कार्यक्रम मागून घेतला. मूक-बधिर, अंध, अपंग, मतिमंद मुलं अशा एकूण पन्नास मुलांसाठी चार दिवसांचं साहस शिबीर घेतलं. तो एक छान अनुभव माझ्या खात्यात, तर त्यातले उरलेले पैसे वानीच्या खात्यात जमा झाले.

IN DSC_8627.jpg

कडेवर बाळ घेतलेली मेजर अश्विन

'गो ग्रीन गर्ल २' - ५ जाने ते ८ फेब्रु.. भूज ते कोची अशी सायकल मोहीम आहे त्यातही असाच वयोगट आहे व मेजर अश्विनी आपल्या अकरा महिन्यांच्या मुलाला घेऊन ही मोहीम करणार आहे हे विशेष! जिथे जिथे आम्ही थांबतो तिथे स्थानिक लोकांसाठी दृकश्राव्य कार्यक्रम करतो ज्याद्वारे महिलांना प्रेरणा मिळावी. पर्यावरणाचं, महिला साक्षरतेचं महत्त्व, प्रदूषण कसे टाळावे अशा अनेक गोष्टी समजावून सांगतो. ज्या स्त्रियांना समाजाकरिता काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी हा मंच आहे. आज आपण स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कंधे से कंधा मिलाकर सगळ्या क्षेत्रात काम करतोय, पुरुषांच्या दुप्पट काम करतोय - पण त्या स्त्रिया आपल्या आरोग्याविषयी किती सजग आहेत? नाही! मी म्हणेन, थोडा स्वत:साठी वेळ काढा. स्वतःसाठीपण जगा. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मुलांचं पालनपोषण ह्यात वयाची पंचेचाळीस वर्षे कशी उडून जातात कळत नाही. मग त्यांना जाग येते. तेव्हा असं न होवो की उशीर झालेला असावा. वेळीच जाग्या व्हा!

col2.jpg

सायकल रॅली वरच्या उजव्या फोटोत एक तरुणी व एक आजी

तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा किती फायदा मिळतो?

खूप! आमच्या ह्या गिर्यारोहणाच्या खेळात वळणावळणावर धोकेच धोके आहेत. सगळ्यात मोठा धोका आहे तो हवामान! मागच्या वर्षी सहाशे लोक एव्हरेस्टावर गेले. ते कशामुळे? मोसम विभागाने सांगितलं होतं सहा दिवस हवामान स्वच्छ राहील म्हणून. तिथलं काहीच बदलले नाहीये. ना उंची, ना त्यातले धोके! तंत्रज्ञानामुळे अपघात टळतात, खर्च वाचतो, इंधन वाचतं, आपली ऊर्जा वाचते. जीपीएसमुळे भौगोलिक माहिती व रस्ता शोधणं खूप सोपं झालं आहे. वॉकीटॉकीचे आकारमान व वजन कमी झालं आहे. नवीन इक्विपमेंट्स खूप सोयीचे व हलके आहेत. तेनझिंग, नॉर्गे यांनी वापरलेली इक्विपमेंट्स व आता वापरत असलेली इक्विपमेंट्सची तुलना केली तर कल्पना येते व त्यावरून त्यांची महती कळते. एखादी मोहीम करून आलो की मॅगी शब्द ऐकला तरी मळमळायला व्हायचं. रेडी टू इट मुळे पंचवीस हजार फुटावर विविध पदार्थ खातोय, त्याचा मनावर नक्कीच चांगला परिणाम होतो. ह्याचं श्रेय जातं ते अर्थात प्रगत तंत्रज्ञानालाच.

तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?

मी ९३ साली माऊंट एव्हरेस्ट मोहीम केली. काय म्हणावं, प्रकृतीने साथ दिली नाही आणि मी वरपर्यंत पोचू शकले नाही. पण आमच्या टीम मधल्या सहाजणींनी ही मोहीम पूर्ण केली. १९९५ पासून तेनझिंग नॉर्गे नॅशनल अ‍ॅडव्हेंचर पुरस्कार (पूर्वी ह्याचं नाव नॅशनल अ‍ॅडव्हेंचर पुरस्कार होतं), ज्याचा दर्जा अर्जुन पुरस्काराच्या बरोबरीचा आहे तो दिला जातो. आमची टीम ह्या पुरस्काराची प्रथम मानकरी ठरली. बचेंद्री पाल ह्यांनी पुरस्कार फक्त यशस्वी सहाजणींना न देता तो संपूर्ण टीमला देण्यात यावा अशी विनंती सरकारला केली. हे यश फक्त त्या सहाजणींचं नाही. आमचा संघ तीन वर्षांपासून ह्या मोहिमेची तयारी करत होता, मेहनत घेत होता. ती विनंती मान्य झाली अन् आमच्या पूर्ण संघाला हा पुरस्कार तत्कालीन क्रीडा मंत्र्याच्या हस्ते देण्यात आला. आमच्या टीमने त्या वर्षी सात जागतिक विक्रम केले. त्यानंतर मात्र हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात इतर खेळांच्या पुरस्कारांबरोबरच राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो. मला राष्ट्रसेविका समितीतर्फे संघमित्र प्रतिष्ठानचा 'सिंधू सुमन' पुरस्कार नुकताच मिळाला. मला असं वाटतं की माझी टीम लीडर म्हणून झालेली निवड, हे मला मिळालेले तीन पुरस्कारच आहेत. माझ्या नेतृत्वाखाली तीन मोहिमा आखल्या गेल्या आणि त्या यशस्वी झाल्या. (त्यातली ही आताची एक मोहीम लौकिक अर्थाने अयशस्वी असली तरी आम्ही त्याला यशस्वीच म्हणू.) प्रत्येक मोहिमेनंतर टीममधल्या इतर खेळाडूंकडून तुमचा फीडबॅक घेतला जातो, अन् तो जर चांगला असेल तरच तुम्हाला संधी दिली जाते. तो तुमचा सन्मान, गौरव असतो. त्याचबरोबर दुसर्‍यांसमोर तुम्ही एक आदर्श निर्माण करत असता.

आयुष्यात काही खंत वाटते?

माउंट एव्हरेस्ट सर नाही करू शकले ही फार मोठी खंत आहेच! मला वाटतं, मी आयुष्यात काही केलं नाही. खूप काही करायचं आहे. कुठेतरी एक अतृप्ती मनात सलत असते. दुसरी खंत - खंत नाही म्हणणार, पण अस्खलित, फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही. मराठी लिहिता, बोलता व वाचता आलंच ना, इंग्रजी पण येईल! खूप काही करायचं होतं त्यापैकी सध्या नाच व चित्रकला शिकतेय. माझ्यातला अवगुण म्हणजे 'सातत्याचा अभाव'. त्यामुळे इच्छा असूनही फक्त शिकते, प्रावीण्य मिळवू शकत नाही. आणि गमतीने एक गोष्ट सांगते हं, जर का पुनर्जन्म असेल ना, तर माझा जन्म त्याच घरात, त्याच देवभूमीत व्हावा! तुम्हा मराठी लोकांसारखं आमच्याकडे जावयाचं कौतुक नसतं. लाड करून घेण्यासाठी, कौतुक ऐकण्यासाठी 'जावई' व्हावं! Happy

भविष्यात पुढे काय योजना, स्वप्नं आहेत?

प्रत्येक गिर्यारोहकाचं अंतिम ध्येय किंवा स्वप्न म्हणजे माउंट एव्हरेस्ट! माझी मुख्य अडचण आहे ती म्हणजे पैसा. तो काही माझ्याजवळ आज तरी नाही. केव्हा होईल, कसं होईल माहीत नाही. मी एक मध्यमवर्गीय, कुटुंबवत्सल संसारी बाई आहे. सध्या तरी मी जास्तीत जास्त मुलांना ह्या खेळाची ओळख करून देण्याचा व त्यायोगे त्यांना ह्या खेळातून निसर्गाच्या जवळ जाण्याची, स्वतःला ओळखण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतेय. हा खेळ तुमच्या उपजीविकेचं साधन होऊ शकत नाही, पण छंद होऊ शकतो. जीवावर उदार होऊन खेळ खेळायचा अन् परत आल्यावर पाठीवर शाबासकीची थाप देणारं कोणी नसतं. लोक वेड्यात काढतात, विचारतात, कशासाठी? मी विचारते, तुम्ही एखादा खेळ खेळता, तो कशासाठी? एखाद्या खेळाडूच्या हरल्या - जिंकल्यानंतरच्या जशा भावना असतात तशाच एका गिर्यारोहकाच्या असतात असं मला वाटतं. पण ह्या खेळाचं वैशिष्ट्य असं की ह्यात प्रतिस्पर्धी नसतो. स्वत:च स्वत:वर मिळवलेला विजय असतो. Yes, I did it. तो आनंद शब्दातीत आहे!

मला जे काही करायचं आहे ते ह्याच क्षेत्रात करायचं आहे. १९९४ पासून नॅशनल अ‍ॅडवेंचर फाउंडेशन हा नोंदणीकृत क्लब मी चालवते. भारतात एकंदर असे तेहतीस क्लब आहेत. आम्हाला जी शिबिरं घ्यायची असतात ती स्पोर्ट्स खात्याकडून येतात. स्किईंग असेल तर हिमाचल, वाळवंटातील राजस्थानात वॉटर स्पोर्ट्स असतील तर केरळमध्ये.. अशा अनेक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे घेतली जातात. काही सरकारी मोहिमा आल्या तर मला त्या प्राधान्याने करायच्या आहेत. हिमालयात 'स्वच्छता अभियान' करायचं आहे.

तुमचे पती ह्याच क्षेत्रातले, तुमचा प्रेमविवाह, असे असले तरी हे सगळं कसं काय सांभाळलं?

घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं. इतर खेळांसारखा हा एक खेळच आहे. पण त्याचं महत्त्व लोकांना फारसं कळत नाही. जीवनात समतोल असायला हवा. हा समतोल साधण्याचे कसब हा खेळ शिकवतो. ह्या खेळात स्वतः तोल सांभाळत इतरांनाही, तुमच्या सवंगड्यांनाही सांभाळावं लागतं. त्यासाठी शारीरिक व मानसिक दोन्हीचं संतुलन राखण्याची गरज असते. आम्ही जेव्हा चढत असतो तेव्हा एकमेकींना दोराने बांधलेल्या असतो. एकाच वेळी स्वतंत्र पण सगळ्यांबरोबर चालत असतो. कुटुंबात ह्यापेक्षा वेगळं काय असतं? हे तत्त्व सगळीकडेच लागू पडतं ना! आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'स्वीकार'. अविनाश, माझे यजमान, टाटा कंपनीत जमशेदपुरामध्ये नोकरीला होते. ते तिथल्या कर्मचार्‍यांना घेऊन ट्रेकिंग कँपला यायचे. त्याच दरम्यान आमची ओळख झाली. मी अविनाशला त्यांच्या घरच्यांसह स्वीकारलं व त्यांनी मला. सुरुवातीला काही काही गोष्टी आत्मसात करायला वेळ लागला, कारण संस्कृतीत असलेली प्रचंड भिन्नता. आज मी सगळे कुळाचार, व्रतवैकल्ये अगदी मराठी पद्धतीने, नियमानुसार, आनंदाने करते.

हे सगळं करायला तुम्हाला बळ कोठून मिळतं?

माझा देवावर खूप विश्वास आहे. रोज पूजा वगैरे करत नाही पण 'पसायदान' नक्की म्हणते. मेडिटेशन करत नाही पण मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवत असते - खास करून मोहिमेच्या दरम्यान. माझ्या मोहिमेतील मुलींना टेन्शन येईल, त्रास होईल असं न वागण्याची खबरदारी घेते. इतक्या दूर दुर्गम भागात असताना मला वाटते आपण देवाच्या अगदी जवळ आहोत. खूप पूजापाठ करण्यापेक्षा भगवानको हमेशा याद करते रहो, चांगल्या - वाईट दोन्ही प्रसंगात! मेरे लिए श्रद्धा शक्ती है, वही रास्ता दिखाती है, दुसरों के साथ काम करनेकी इच्छा प्रबल करती है, अच्छे अच्छे काम करने के लिए प्रेरित करती है...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता ओझरती नजर टाकलीये, नंतर वाचेन सावकाश.

मंजू, हे दुरुस्त करणार का प्लीज?

आयएमएफच्या गोल्डन ज्युबिली वर्षात मी संघप्रमुख म्हणून 'संथोपंथ' ही यशस्वी मोहीम केली जी तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण होती. >>>> हे 'सतोपंथ' हवं.

चांगली झालीये मुलाखत.

फोटो लोड होत नाहीयेत कां?

बिमला नेगी उत्तरकाशीच्या म्हणजे त्यांचे कोर्स पण नीममधूनच असतील नां?

अतिशय सुंदर झाली आहे मुलाखत. अगदी प्रेरणादायी झाली आहे मुलाखत. प्रश्न आणि उत्तरे दोन्ही उत्तम!!!

मेडिटेशनही करत नाही पण मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवत असते >>> शेवटच्या उतार्‍यात "मेडिटेशनही" एवजी "मेडिटेशन" असे हवे आहे.

आणि हो मुलाखत कुणी घेतली हे लिहायलाच हवे होते. तुमचा हा ग्रुप भरपुर मोठा आहे. नावे नाही लिहूण मिसगिव्हींग केल्याची भावना आली माझ्या मनात. असो.. जिनी कुणी मुलाखत घेतली असेल तिचे आभार आणि अभिनंदन!!!

धन्यवाद आडो, पराग व अकु!
@आऊटडोअर्स हो त्यांनी निफमधूनच कोर्स केले.
@ पराग - नीटफॉर्मॅट करायला हवी म्हणजे काय बदल करायला पाहिजे. सूचना स्वागतार्ह!

Dhanyavaad Manju!
Mulakhat chaan zalee aahe!
Eka vegaLya kshetrat kaam karaNarya mahilechee mulakhateetun zaleli olakh aavaDalee.

धन्यवाद माझ्याकडून व बिमलाजींकडून! तीन दिवसीय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात साहसी खेळांचा समावेश' असा सेमिनार घेतला त्यानिमीताने जनरल बक्षी व कॅप्टन एम एस कोहली एव्हेस्टर ह्यांना ऐकण्याची संधी मिळाली. सध्या बिमलाजी सत्कार व मोटीवेशनल लेक्चर्स देताहेत. मला, खूप भावलेलं असं, हे व्यक्तिमत्व !

मंजूताई लेख छानच झालाय. अभिनंदन !
1994 ला मी पहिल्यांदा बिमला मॅडम आणि अविनाशसर ह्यांच्या सोबत पचमढी ट्रेक ला गेली होती. तेव्हा पासून आजपर्यंत ह्या दोघांच्या संपर्कात आहे. नागपूर मध्ये 'गिर्यारोहण' लोकप्रिय करण्यामध्ये ह्या दोघांचा सिहांचा वाटा आहे. ह्यांच्या अनेक उपक्रमातूनच अनेक युवकांना हिमालयाच वेड लागलं. 20 वर्ष मी बघतेय, दरवर्षी तेवढ्याच उत्साहानी हे हिमालयात जातात. नवी नवी आव्हानं स्वीकारतात. मुख्य म्हणजे येवढ सगळ करत असतानाही 'मी ' - 'माझं' असा अभिनिवेश नाही. अजूनही तिच सहजता, तोच साधेपणा ! नम्रता, आणि प्रचंड Patience.
बिमला मॅडम आणि अविनाश सर ह्यांच्या कडून अजूनही कितीतरी शिकण्यासारख आहे.
मंजुताई, त्यांची प्रत्येक मोहीम म्हणजे एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

स्नेहा, अंजु धन्यवाद!
दरवर्षी तेवढ्याच उत्साहानी हे हिमालयात जातात. नवी नवी आव्हानं स्वीकारतात. मुख्य म्हणजे येवढ सगळ करत असतानाही 'मी ' - 'माझं' असा अभिनिवेश नाही. अजूनही तिच सहजता, तोच साधेपणा ! नम्रता, आणि प्रचंड Patience.
बिमला मॅडम आणि अविनाश सर ह्यांच्या कडून अजूनही कितीतरी शिकण्यासारख आहे.>>> +१

मंजु ताई,

अप्रतिम मुलाखात! तुम्ही नेहमीच खुप छान छान व्यक्तीमत्व लेखना द्वारे समोर आणता,
त्या बद्द्ल तुमचे खुप कौतुक..

बिमला ताई, गिर्यारोहण हा खरच जोखिमीचा खेळ असुन त्यात तुम्ही खुप मोलाचे कार्य करत आहात.
गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थे बद्दल बहुमुल्य माहिती आपल्या कडुन मिळाली.साधारण आर्थिक परिस्थिती
असलेल्या मुलिंना आपण संधी देता, हे एक प्रकरचे समाज कार्यच आहे... त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक
करावेसे वाटते.

जुन महिन्यात हिमालयात जी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यामुळे संपुर्ण देश हादरुन गेला होता.
अशा बिकट परिस्थितीत आपण अतिशय अचुक निर्णय घेतला.ढगफुटीच्या महाभिषण परिस्थितीत आपल्या कडुन तिथे अडकलेल्या लोकांना बहुमुल्य मद्त झाली.त्यामुळे या मोहिमीत तुम्ही जिंकल्या पेक्षा अव्वल आल्यात असे मला वाटते... तसेच आत्तापर्यंत अशा प्रकरच्या तुमच्या सोळा-सतरा मोहिमी झाल्यात. त्यातल्या तीन मोहिमींचे संघप्रमुखत्व तुम्ही केलेत आणि त्यातल्या बारा यशस्वी झाल्यात... त्याबद्द्ल तुमच खुप अभिमान वाटतो.खरच, स्त्रि-शक्ती ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपण बर्‍याच पुरस्कारांनी पुरस्क्रुत आहात..नुकताच मिळालेला सिंधू सुमन' पुरस्कारा बद्द्ल तुमचे खुप खुप अभिनंदन..
तसेच विमेन अ‍ॅडवेन्चर नेटवर्क ऑफ इंडिया साठी तुमचे विशेष आभार. आपण खरोखर एक प्रेरणादाई व्यक्तीमत्व आहत.

अजुन एक बाब इथे नमुद करावीशी वाटते की, तुम्ही मराठी नसुन सुद्दा, या संस्क्रुतीला आपलेसे केले, हे खरोखर स्तुत्य आहे..

तुमचे माउंट एव्हरेस्ट गाठ्ण्याचे स्वप्न, हे लवकरच पुर्ण व्हावे अशी मी देवा जवळ प्रार्थेना करते... तसेच तुमच्य पुढच्या प्रवासा साठी खुप खुप शेभेच्छा!!!

बिमला ताई, गिर्यारोहण हा खरच जोखिमीचा खेळ असुन त्यात तुम्ही खुप मोलाचे कार्य करत आहात.
गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थे बद्दल बहुमुल्य माहिती आपल्या कडुन मिळाली.साधारण आर्थिक परिस्थिती
असलेल्या मुलिंना आपण संधी देता, हे एक प्रकरचे समाज कार्यच आहे... त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक
करावेसे वाटते.

जुन महिन्यात हिमालयात जी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यामुळे संपुर्ण देश हादरुन गेला होता.
अशा बिकट परिस्थितीत आपण अतिशय अचुक निर्णय घेतला.ढगफुटीच्या महाभिषण परिस्थितीत आपल्या कडुन तिथे अडकलेल्या लोकांना बहुमुल्य मद्त झाली.त्यामुळे या मोहिमीत तुम्ही जिंकल्या पेक्षा अव्वल आल्यात असे मला वाटते... तसेच आत्तापर्यंत अशा प्रकरच्या तुमच्या सोळा-सतरा मोहिमी झाल्यात. त्यातल्या तीन मोहिमींचे संघप्रमुखत्व तुम्ही केलेत आणि त्यातल्या बारा यशस्वी झाल्यात... त्याबद्द्ल तुमच खुप अभिमान वाटतो.खरच, स्त्रि-शक्ती ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपण बर्‍याच पुरस्कारांनी पुरस्क्रुत आहात..नुकताच मिळालेला सिंधू सुमन' पुरस्कारा बद्द्ल तुमचे खुप खुप अभिनंदन..
तसेच विमेन अ‍ॅडवेन्चर नेटवर्क ऑफ इंडिया साठी तुमचे विशेष आभार. आपण खरोखर एक प्रेरणादाई व्यक्तीमत्व आहत.

अजुन एक बाब इथे नमुद करावीशी वाटते की, तुम्ही मराठी नसुन सुद्दा, या संस्क्रुतीला आपलेसे केले, हे खरोखर स्तुत्य आहे..

तुमचे माउंट एव्हरेस्ट गाठ्ण्याचे स्वप्न, हे लवकरच पुर्ण व्हावे अशी मी देवा जवळ प्रार्थेना करते... तसेच तुमच्य पुढच्या प्रवासा साठी खुप खुप शेभेच्छा!!! >>> +१

मंजू, हे बघा.

आतापर्यंत तुमच्या किती मोहिमा झाल्या? त्यातल्या यशस्वी - अयशस्वी किती आणि त्याची काय कारणे?>> ह्या परिच्छेदात
आयएमएफच्या गोल्डन ज्युबिली वर्षात मी संघप्रमुख म्हणून 'सतोपंथ' ही यशस्वी मोहीम केली जी तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण होती.

इथे बदल झालेला दिसतोय.

त्याच परिच्छेदात इथे हवाय बदल. आजवर सगळ्यात उंच शिखर 'कामेठ' केलंय. >>>>> हे 'कामेट' हवं.

त्याच्याच पुढच्या परिच्छेदात इथे बदल हवाय.

काही शिखरे उंच असतात पण तितकी अवघड नसतात. उलट काहींची उंची कमी असते पण चढाईला अत्यंत कठीण. त्यापैकीच एक संथोपंथ.

इतक्या सुधारणा सुचवल्याबद्दल सॉरीच.

बिमला ताई, गिर्यारोहण हा खरच जोखिमीचा खेळ असुन त्यात तुम्ही खुप मोलाचे कार्य करत आहात.
गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थे बद्दल बहुमुल्य माहिती आपल्या कडुन मिळाली.साधारण आर्थिक परिस्थिती
असलेल्या मुलिंना आपण संधी देता, हे एक प्रकरचे समाज कार्यच आहे... त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक
करावेसे वाटते.>>>>> हे वाचलं परंतू मला नक्की लक्षात नाही आलं. साधारण परिस्थिती असलेल्या मुलींना संधी देतात म्हणजे नक्की काय आणि कसं?

आडो, स्वाती२, मानुषी, अल्पना धन्यवाद!
@आडो - बदल केले. चूका निदर्शनास आणून दिल्याबद्दल खरंतर !
साधारण परिस्थिती असलेल्या मुलींना संधी देतात म्हणजे नक्की काय आणि कसं?>>> मोहिम ठरल्यानंतर निवडीसाठी संघप्रमुखाकडे अर्ज येतात. बिमलाजी जश्या साधारण परिस्थितीतल्या पण शिष्यवृत्ती मिळाली म्हणून कोर्स केले नंतर त्यात आवड निर्माण झाली. त्यांच्याप्रमाणेच शिष्यवृती मिळते म्हणून प्रशिक्षण घेणार्‍या बर्‍याचजणी असतात पण आवड्/छंद म्हणून पुढे जोपासू शकत नाही. बिमलाजी अनेक वर्षापासून ह्या क्षेत्रात आहेत बर्‍याच ओळखी आहेत.. मुलींची माहिती/बायोडेटा ह्यांच्याकडे आला की स्वतः मुलींशी बोलतात, त्यांच्या शिक्षकांकडून त्यांच्या विषयी जाणून घेतात, सक्षम असतील तर त्यांना संधी देतात.

Pages