शतकपूर्ती....लिंगाण्याच्या साक्षीने

Submitted by आशुचँप on 23 February, 2014 - 12:31

प्रचि - ओंकार ओक

लिंगाणा म्हणले की काहीतरी जबरदस्त, तुफानी, भेदक, रौद्रभीषण असेच काहीतरी सुचत जाते. सह्याद्रीमध्ये गिर्यारोहकांचा कस पणाला लावणारे किल्ले काय कमी नाहीत. प्रत्येकाची काहीतरी आगळी वैशिष्ट्ये...पण लिंगाण्याचा जो काही दबदबा आहे त्याला काही तोड नाही.
त्यामुळे जवळपास प्रत्येक भटक्याप्रमाणे आयुष्यात एकदातरी लिंगाणा करण्याचे स्वप्न होतेच. आणि सुदैवाने ते पूर्ण झाले मी शतकाच्या उंबरठ्यावर असताना...
शंभरावा किल्ला हा लिंगाण्यासारखा जबरदस्त असावा हा माझ्यासाठी अगदीच मणिकांचन योग होता.
त्यामुळे वाईल्ड ट्रेक अॅडव्हेन्चर क्लब, पुणे (डब्ल्युटीए) ने जेव्हा त्यांचा बेत जाहीर केला तेव्हा पहिली उडी माझी पडली. पण एकामागून एक कामांची यादी वाढत गेली आणि अत्यंतिक इच्छा असूनही जाणेच शक्य होईना. शेवटी अगदी जिवाच्या कराराने त्यांच्या शेवटच्या बॅचला जाण्याचे जमवलेच.
माझा सख्खा मामेभाऊ अमेय, जो माझ्या बहुतांश भटकंतीमध्ये सोबत होता, तो देखील शतक साजरे करणार होता. आणि आमचे सेलीब्रेशनचे बरेच प्लॅन्स पण ठरले. पण दुर्दैवाने निघण्याच्या आदलेच दिवशी त्याला सपाटून ताप भरला.
सगळाच हिरेमोड झाला आणि मी पण जाणे रद्द करण्याच्या बेतात होतो पण त्याने अगदीच आग्रह केल्याने मनाविरुद्ध नाव नोंदवले.
शनिवारी संध्याकाळी पाबे घाटामार्गे अत्यंत धूळभरल्या रस्त्याने जेव्हा मोहरी गाठले त्यावेळी मस्त गारठा वाढला होता. वाटेत ढगांची दुलई पांघरून बसलेल्या तोरण्याने दर्शन देत प्रवास आणखी सुखद केला.
गेल्या गेल्याच मस्तपैकी चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या, वांगे-बटाट्याचा मसालेदार रस्सा, हिरवागार ठेचा, लोणचे, पापड, खास गावाकडचा वऱ्याच्या तांदळाचा भात-आमटी असे साग्रसंगीत जेवण हाणून आधीच उभारलेल्या तंबूंमध्ये पडी टाकली. आता थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता आणि उद्या आपण कसे काय चालणार याची चिंता करत असतानाच डोळा लागला.

काही जादूचे प्रयोग Happy

पण आयोजकांना काय आराम मान्य नव्हता बहुदा. कारण पहाटे चारला सगळेजण डोळे चोळत उठून तंबूबाहेर आले तेव्हा गरमागरम मॅगी तयार होती, बाजूलाच चुलवणावर चहा उकळत होता.
है शाब्बास असे म्हणत मी त्यांना शाबासकी देऊन टाकली. भक्कम ट्रेकपूर्वी भक्कम नाष्टा हवाच.
तत्पूर्वी आयोजकांनी सगळ्यांना हेल्मेट, कॅरॅबिनर, डिसेंडर, स्लींग, हार्नेस आणि ग्लोव्हसचे वाटप केले. चढाई आणि उतरताना वरून दगड घसरण्याची खूपच शक्यता असते. त्यामुळे शक्यतो हेल्मेट काढायाचेच नाही अशी सूचना देण्यात आली होती आणि ती खूपच आवश्यक होती कारण प्रत्यक्षात असे प्रसंग अनेकदा आले आणि एक चांगला टप्पोरा दगड माझ्या हेल्मेटवर येऊन धडकला. हेल्मेट नसते तर विचारही करवत नाही काय झाले असते ते. असो...
तर झकास नाष्टा वर गरमागरम चहा रिचवून आणि सगळी आयुधे चढवून पूर्वेकडे फटफटायच्या आत निघालो सुद्धा...थंडीप्रतिबंधात्मक म्हणून मी थर्मल, कानटोपी इ. साहित्य चढवले होते पण झपाझपा चालत बोराट्याच्या नाळेपाशी आलो तेव्हा चांगलाच घामाघूम झालो होतो. आणि चांगलाच थकवा पण जाणवायला लागला.
मला चांगलाच धसका बसला..अजून ट्रेकला सुरुवात पण नाही आणि एवढ्यात आपल्याला थकायला पण झाले..आता कसा होणार आपला ट्रेक..आणि गेल्या आठवड्याभरात अजिबात व्यायाम न केल्याबद्दल स्वताला लाखोली पण वाहीली. श्या सगळेच मुसळ केरात...
लिंगाणा न चढताच आपल्याला परत यावे लागणार असे वाटू लागले..त्याने माझा उरलासुरला धीरही खचला आणि मिट्ट काळोखात, बॅटरीच्या किरकोळ उजेडात दगडधोंड्यांनी भरलेली नाळ उतरताना मी धडपडू लागलो. आणि अशातच एक मोठाला धोंडा माझ्या पायामुळे सरकला आणि मी उडी मारून बाजूला व्हायच्या आत झपकन माझ्या पायावर रेलला आणि मी छानपैकी कंबरेवर आपटलो. आणि डावा पाय हलूच शकणार नाही अशा पद्धतीने सांदटीत अडकला. हायला, हे काय आता करत मी जागीच थांबलो.
माझ्या पाठोपाठ येणाऱ्या आयोजकांपैकी एकाने तो धोंडा सरकावून बाजूला केला म्हणून नायतर होते आपले १२७ अवर्स...
पण त्या निमित्ताने मी थांबून छानपैकी विश्रांती घेतली, पाणी प्यालो, कानटोपी वगैरे सगळे काढून टाकले आणि पाय पसरून निवांत बसून राहीलो. ती विश्रांती त्यावेळी खूपच आवश्यक होती आणि मनातले सगळे निगेटीव्ह विचार बाजूला सारत पुन्हा नव्या दमाने सिद्ध झालो.
लिंगाण्याला जाताना बोराट्याची नाळ निम्मी उतरल्यानंतर उजवीकडे जाणारी एक धोकादायक ट्रॅव्हर्स आपले स्वागत करते. पण तिथेही डब्ल्युटीए नी रोप लाऊन ती सुरक्षित केली होती. अतिशय निरुंद अशा वाटेवरून एक दहा मिनिटे चालल्यानंतर लिंगाण्याचे भेदक दर्शन होते आणि सुरेखश्या अशा त्या चांदण्या रात्री ते मला अजूनच भेदक वाटले.

लिंगाणा खिंड पार केल्यानंतर लागते एक ३० फुटांची स्क्री आणि लगेचच समोरा येतो एक कातळटप्पा....
आता पूर्वेकडे लालीमा पसरायला सुरुवात झाली होती आणि आमच्या बॅचने हर हर महादेव करत चढाईला हात घातला.

या कातळटप्प्याबद्दल अनेकांनी लिहीले आहे. सर्वात अवघड आणि फसवा आणि नवशिक्यांचा दम काढणारा वगैरे वगैरे..त्यामुळे आमचा लीडर प्रसादने आम्हाला त्याबद्दल आधीच सूचना देऊन ठेवली होती.
तुम्हाला जर लिंगाणा करायचा असेल तर हा टप्पा महत्वाचा आहे. अजिबात दोराला धरून चढायचा प्रयत्न करू नका. सगळे वजन हातांवर पेलून दोराला धरत गेलात तर तुमची एनर्जी खल्लास झाली म्हणून समजा.
त्यामुळे मी मुद्दामच मागे राहीलो आणि बाकीचे कसे चढतायत याचे बारकाईने निरिक्षण केले. इथे शारिरिक ताकदीपेक्षा महत्व होते कौशल्याला...योग्य ठिकाणी पाय रोवून शरीर वर खेचत योग्य संतुलन राखत त्या सांदटीतून वर जाणे असे काहीसे त्याचे स्वरुप होते. आणि माझ्या आधीचे दोघे धडपडत का होईन वर गेल्यावर मी सरसावलो. हार्नेस कसला, कॅरॅबिनर दोरीत अडकवला आणि डावा पाय छातीएवढा उंचावून एका बारक्याश्या पावटीत रोवला आणि हलकेच दोराला धरून दुसरा पाय उंचावत उजवीकडे रोवला आणि न थांबता दोर सोडून देत डावा हात उंचावत किंचितश्या वर आलेल्या खडकाचा आधार घेत ओव्हरहँगच्या माथ्यावर जाण्यात यश मिळवले. आश्चर्यकारकरित्या मी फारच पटदिशी हा टप्पा पार केला आणि त्याने जो काही आत्मविश्वास वाढला त्याला तोड नव्हती.
आणि मग एका पाठोपाठ एक असे टप्पे पार करत गुहेपाशी जाण्यात फारसा वेळ लागला नाही. वाटेत आयोजकांनीच दिलेल्या लिची ज्युसचे घुटके घेत, लेमन गोळ्या चघळत अगदी आरामात म्हणता येईल अशा पद्धतीने वाटचाल सुरु ठेवली.

मध्ये मध्ये आयोजकांनी तुमचे क्लाईंबिग टेक्नीक छान आहे करत गडाबरोबरच हरबऱ्याच्या पण झाडावर चढवले. त्याची गरज नव्हतीच खरेतर कारण तोपर्यत एक इतकी मस्त लय जमली होती की बस.
जर्नी इटसेल्फ इज ए डेस्टीनेशनच या म्हणीचा पुरता अनुभव घेत होतो त्यावेळी. नुकताच सूर्योदय झाला होता आणि फेब्रुवारीचे मस्त कोवळे उन आसमंतात पसरले होते, किंचितशी गार हवा सुखकारक वाटत होती आणि कुठेही दम न लागता एका पाठोपाठ येणारे कातळटप्पे पार करत होतो. आणि त्यामुळे निम्म्या वाटेत गुहा लागल्यानंतरही मोजून मिनिटभर थांबलो आणि पुन्हा वाटचाल सुरु केली.

पहिला कातळटप्पा यशस्वीपणे पार केल्यामुळे जो आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे बाकी टप्पे पण त्रास देत नव्हते. थोडा वेळ थांबून निट निरिक्षण केले की कसे चढता येईल याची एक रूपरेषा डोळ्यासमोर येत होती. आणि आयोजकांचे कौतुक अशासाठी की त्यांनी काही अवघड ठिकाणे सोडली तर इतर वेळी पूर्ण आमच्यावर सोडून दिले होते. स्लिंग आणि कॅरॅबिनर दोरात अडकवल्यामुळे खाली दरीत पडण्याचा धोका नव्हताच. त्यामुळे ते भराभर दोर लावत पुढे सरकत होते आणि पाठोपाठ आम्ही आमच्या गतीने.

आधीच लिहील्याप्रमाणे मी प्रवासच इतका एन्जॉय करत होतो की अरे बापरे अजून शिखर एवढ्या लांब आहे, अजून एवढे चालायचे आहे इ. इ. विचारसुद्धा मनात डोकावले नाहीत. उलट ज्यावेळी शिखर नजरेच्या टप्यात आले तेव्हा अरेच्या आलोच की आपण असे वाटून गेले.

आहाहा...काय तो अनुभव होता. शिखर गाठल्यागाठल्या समोरच दुर्गदुर्गेश्वर रायगड दर्शन देत होता...उजवीकडे कोकणदिवा, मागे बोराट्याची नाळ, सिंगापूर नाळ, आणि मागच्या रांगेपलिकडून राजगड, तोरणा डोकावून पहात होते.

क्षणभर मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला...आत्ता या क्षणी मी १०० वा किल्ला सर केलाय आणि तोही राजांच्या अत्यंत लाडक्या अशा किल्ल्यांच्या साक्षीने. मला वाटत नाही माझ्या आयुष्यात याईतके अजून काही रोमांचक घडले असेल. त्या भारावलेल्या मनस्थितीतच मी बाकी सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.

गडाचा माथा आहे अगदीच लहानखुरा...जेमतेम ३०-३५ माणसे बसू शकतील एवढा..त्यामुळे थोडा खाऊ पोटात ढकलला..फोटोसेशन केले आणि किल्ला उतरायला सुरुवात केली.

आता खरी कसोटी होती. मी डिसेंबरमध्ये अलंग-मदन-कुलंग ट्रेक केला असला तरी तिकडे वेळेअभावी रॅपलींग न करत सरळसोट दोरी सरकवत खाली उतरवले होते. आता मात्र पुर्णपणे रॅपलींग करत तब्बल १००० एक फुट उतरायचे होते. लीडरने आम्हाला रॅपलींगचे तंत्र समजाऊन सांगितले तरी विश्वास वाटेना कि आपल्याला हे जमेलच याचा. खाली वाकून पाहीले गर्र झाले, पाय लटपटले...त्यामुळे आधीची युक्ती केली...निवांत बसून राहीलो आणि बाकीच्यांना पुढे जाऊ दिले...काहीजण धडपड करत तर काहीजण एकदम सफाईदारपणे उतरून गेले. मग थोडा धीर आला आणि नंबरात उभा राहीलो. लीडरने डिसेंडरला दोर अडकवून दिला आणि जा म्हणाला....

सुरुवातीलाच जो काही पोटात गोळा आला त्याने मला जागच्या जागीच खिळवून ठेवले. पण देवाचे नाव घेत हळूहळू उतरायला सुरुवात केली आणि उजव्या हातानी दोर फीड करत पुर्णपणे पाठीमागे झुकून जसा जसा खाली उतरलो तसे तसे लक्षात आले जेवढे अवघड वाटले होते तेवढे नक्कीच नाहीये.
पण लिंगाण्यावरचे रॅपलींग हे थोडे वेगळे आहे. नुसताच एकसलग असा कातळकडा उतरायचा नसून थोडा कातळटप्पा, मध्येच ओव्हरहॅँग, मध्येच स्क्री, झुडपे, सुटावलेले दगड आदी सगळे प्रकार होते...मिश्र थाळी..त्यामुळे कुठल्या टप्प्यावर स्थिरावलोय किंवा गणित जमून गेलेय असा प्रकार नाही..सतत नविन काहीतरी आणि त्यामुळेच जास्त धमाल येत होती.
त्यामुळे विक्रमी वेगात गुहा गाठली.

तिकडे थोडे फोटोसेशन करून विरुद्ध बाजूचे पाण्याचे टाके गाठले. दरम्यान, वरून बाकी मेंबरचे रॅपलींग सुरुच होते आणि त्यांच्यामुळे वरून येणारे दगड धोकादायकरित्या आजूबाजूला पडत होते. टाक्यापाशी गेल्यानंतर आपण सुरक्षित झालो (कारण त्याबाजून कुणी रॅपलींग करत नव्हते) असे वाटले आणि हेल्मेट काढून त्या थंडगार पाण्याने तोंड धुणार तोच धाडकन आवाज करत काही फुटांवरून चेंडूएवढाला दगड खाली दरीत पडला. नशिबानेच वाचलो म्हणत पुन्हा तातडीने सगळ्यांनी हेल्मेट चढवली.

शेवटचा टप्पा उतरायला घेतला आणि रायलिंग पठारावरून आवाज घुमला...
आशिष आहे का तिकडे...
बघतो तर आपला सह्याद्रीमित्र उर्फ ओंकार ओक...
तो त्याच्या मित्रांना घेऊन येणार म्हणाला होता पण मी चढाई-उतराईच्या नादात साफच विसरून गेलो होतो. म्हणलं आता आलाच आहेस तर फोटो काढ आता झकास. रायलींग पठारावरून लिंगाण्याचे अतिशय भेदक असे दर्शन होते त्यामुळे त्याला मस्त अँगल मिळाला असणार याची खात्री होती.

त्याच आनंदात झपाझपा पुढचे कातळटप्पे पार केले आणि खिंड गाठली. आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढायला लागला होता. त्यामुळे नाळ चढताना कस लागणार याची निश्चिती झाली.
मग जास्त वेळ घालवला नाही. अर्धामुर्धा पॅकलंच घशाखाली घालून लगेचच नाळेच्या दिशेने सुटलो. आता दिवसाढवळ्या तो ट्रॅव्हर्स जास्तच धोकादायक वाटत होता. पण इलाज नव्हता आणि शक्य तितकी खबरदारी घेत नाळेत प्रवेश केला.

इथेही माझा अंदाज चुकलाच आणि जितकी वाट चढताना लागेल असे वाटले होते तितकी लागलीच नाही. कातळटप्पे चढण्याची लय जी लिंगाणा चढताना सापडली होती तीच पुन्हा जुळून आली आणि केवळ एकदाच विश्रांती घेऊन झपाट्याने नाळ चढून आलो देखील.

इथे मात्र आम्ही दोघेच जण होतो आणि बाकीचे अद्याप नाळेत आलेदेखील नव्हते. लीडर लोक्स रोप काढत येत असणार त्यामुळे त्यांना वेळ लागणार होताच. आणि इथून मोहरी गाव गाठायला अनेक ढोरवाटा फुटल्या होत्या. त्यामुळे चुकण्याची भीती होतीच. मग जास्त विचार केला नाही आणि एक छानसे झाड बघून त्याखाली मस्त तण्णावून दिली. या नादात ओंकारशी भेट राहूनच गेली.
सॉरी यार....

विश्रांतीनंतर पुन्हा मोहरी गावात जायला निघालो आणि खरे सांगतो उन्हाचा तडाखा एवढा वाढला होता की आख्ख्या ट्रेकने दमवले नसेल तितके या १५-२० मिनिटाच्या वाटचालीने थकायला झाले. त्यामुळे जेव्हा आमची बस दिसली त्यामुळे मनापासून हायसे वाटले...
कौतुक म्हणजे आम्ही रात्री जिथे मुक्काम केला होता तिकडे कसला मागमूसही नव्हता तिकडे कुठल्या ग्रुपने मुक्काम केला असेल इतकी स्वच्छता डब्ल्युटीए नी केली होती. त्याबद्दलपण त्यांचे कौतुक.

मग बाकी विशेष काही नाही....पुन्हा एकदा त्याच धूळभरल्या कच्च्या रस्त्याने वेल्हे आणि नंतर पाबे घाटाने पुणे गाठले...पण मन मात्र पुन्हा पुन्हा मागे धावत होते. लिंगाणा चढताना जी लय सापडली होती ती इतकी बेभान करणारी होती की तिच्या ओढीने पुन्हा एकदा पावले तिकडे वळणारच याची खात्री होऊनच घरी प्रवेश करतो झालो.

त.टी. - यातील काही प्रचि माझ्या मित्रांनी काढलेली आहेत. काही आपला सह्याद्रीमित्र ओंकार याची आहेत तर काही डब्ल्युटीएचा सागर मनोरे याची आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख केला नसला तरी त्यांचे मनापासून आभार..
प्रचिंची काहीतरी भानगड झाली आहे...सगळे ऑटो मोडवर अपलोड केल्यामुळे पिकासाने स्वतच डोके चालवून ते एडीट केले आहेत असे दिसतेय...आता पुन्हा ते काढून नविन फोटो टाकेन नंतर..आत्ता हे गोड मानून घ्या
आणि हो, यातील प्रचिमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची तोंडी परवानगी घेतलेली आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्याही ट्रेकरच्या आयुष्यातला सगळ्यात अभिमानास्पद क्षण कोणता असेल तर तो लिंगाण्याच्या माथ्यावर ज्याक्षणी पाऊल पडतं तो. आपली क्षितिजं आपणच विस्तारतो…अन हा अभेद्य दुर्ग तुला शतकी खेळीसाठी लाभला याबद्दल शब्दच नाहीत !!! माझा १५० वा किल्ला म्हणजे मदन !!! तोही तितकाच दुर्लंघ्य अन कठीण श्रेणीतला. पण त्याच्या माथ्यावर पाऊल ठेवताचक्षणी डोळ्यांच्या कडा क्षणभर ओलावल्या होत्या !!! विलक्षण Feeling असतं ते !!!
आणि मीही या आनंदाचा काही टक्के भाग माझ्याकडे राखून ठेवलाय कारण मी तुझ्या लिंगाणा मोहिमेचा साक्षीदार आहे !!!
मन:पूर्वक अभिनंदन !!!

जबरी, जबरी रे --- फारच रोमांचकारी वर्णन आणि फोटुही भारी ....

तुझे आणि ओंकारचे मनापासून अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा .....

मस्त !

जबरदस्तच!! तुम्ही ह सगळा अनुभव इतक छान कथन केला आहे की क्षणभर असे वाटले की आपणच हे सारे स्वत: अनुभवतोय. अशक्य थरारक!!

जबरदस्तच!! तुम्ही ह सगळा अनुभव इतक छान कथन केला आहे की क्षणभर असे वाटले की आपणच हे सारे स्वत: अनुभवतोय. अशक्य थरारक!! > +१

ओढीने पुन्हा एकदा पावले तिकडे वळणारच याची खात्री होऊनच घरी प्रवेश करतो झालो. >> पुढल्या वेळी मला नक्की सांग.

धन्यवाद सर्वांना....
इंद्रा - नक्की रे
केदार - जितने थे उतने सब लाया हू मायबाप....
जोक्स अपार्ट - अरे प्रत्येक ठिकाणी थांबून कॅमेरा काढून फोटो काढणे शक्य नव्हते. सुरक्षीत अँकर करून घेतल्यावर मगच कॅमेरा काढत होतो. त्यामुळे लिमीटेडच फोटो आहेत.
तरी बघतो अजून काही मिळाले तर

धन्यवाद मानुषी...
काय करणार....कॅमेरा म्हणलं की सगळे मागे लागायचे फोटो काढ फोटो काढ...

मस्त रे आशु! सुंदर लेख व प्रचि. .. तुझा लेखन विजनवास संपला ही या वर्षाची आमच्यासाठी चांगली बातमी आहे!
१०० व्या तगड्या किल्ल्यासाठी ४ दिवसात १३ किल्ल्याच्या पिलानवर तू पाणी ओतलेस नां! कुठे फेडशील हे पाप.. Lol Lol Lol
ओंकारचे डोळे दिपले असतील... रायगड- लिंगाणा- आशिष..!! Happy

१०० व्या तगड्या किल्ल्यासाठी ४ दिवसात १३ किल्ल्याच्या पिलानवर तू पाणी ओतलेस नां! कुठे फेडशील हे पाप.. Lol हाहा हाहा

काय करतो बाबा....सुट्टीचा लईच घुमशान झालं...हा दीड दिवसांचा पण कसाबसा जमवलाय....त्यानंतर आजतागायत एक दिवसही सु्ट्टी नाही....

ओंकारचे डोळे दिपले असतील... रायगड- लिंगाणा- आशिष..!!
हाहाहाहाहा....अच्छा म्हणून तो गॉगल लाऊन आला होता का... Happy Happy

Pages