'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

आमच्या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात दोन महत्वाच्या मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. एक म्हणजे आमच्याच एका सेंटरवर दोन तीन कंपन्यांना बोलावले व त्यांच्यातर्फे 'काँप्लिमेंटरी' रिक्रूटमेंट ड्राईव्ह आयोजीत केला. ह्या ड्राईव्हमध्ये मुलाखती द्यायला विविध महाविद्यालयातील आधीच पास आऊट झालेले, ह्या वर्षी पास आऊट होणार असणारे असे अनेक विद्यार्थी बोलावलेले होते. मिळालेल्या गुणांचा निकषही असा होता की बहुसंख्य विद्यार्थी येऊ शकतील.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी स्वतः त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या प्राध्यापक व टीपीओ (ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर) समोर घेतलेल्या सेमिनारमध्ये खालील माहिती दिली होती.

येणार्‍या कंपन्या
गुणांचे निकष
पास आऊट इयरचे निकष
उपलब्ध जागा (ज्या एकुण ३८० होत्या, येस यू रेड इट करेक्टली)
पगारची रक्कम (पहिली नोकरी करणार्‍यांसाठी नक्कीच आकर्षक आकडे होते)
आमच्या सेंटरचा पत्ता, फोन नंबर, संपर्कासाठी नावे, तारीख, वार इत्यादी
सोबत कोणकोणती कागदपत्रे आणायची ह्याची माहिती
पोषाख, हेअर स्टाईल, मेक अप, फूट वेअर ह्या बाबतच्या मेल व फिमेल कँडिडेट्सकडून असलेल्या सामान्य व्यावसायिक अपेक्षा
वर्तन कसे असावे
वेळेचे नियोजन कसे करावे
इंग्लिश नीट येत नसल्यास ते आधीच नम्रपणे नमूद करून टोन कसा सेट करावा
सर्वसाधारणतः काय प्रश्न विचारले जातात
अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असल्यास ती किती गुणांची, किती कालावधीची व सहसा कशी असते
अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे

माझा प्रत्येक सेमिनार त्यामुळे जवळपास एक तासाचा झाला व असे आठ ते दहा सेमिनार्स झाले. हा ड्राईव्ह काँप्लिमेंटरी असल्याने सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. हे सर्व करण्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन दिवस आधीपासून आमच्या केंद्रावर बोलावून टेक्नॉलॉजी व कम्युनिकेशन ह्या विषयांचे 'काँप्लिमेंटरी' ग्रूमिंग सेशन्स आयोजीत केले.

आता हे सगळे का केले? तर ह्या माध्यमातून अर्थातच संस्थेची मोठी, प्रभावी जाहिरात होते, नांव कर्णोपकर्णी होते आणि अंतिमतः व्यवसायवृद्धीची शक्यता वाढते.

तर हे विद्यार्थी ग्रूमिंग सेशन्सना कडक हजेरी लावून गेले. अपेक्षेप्रमाणे ड्राईव्हच्या दिवशी आपापले 'बेस्ट' निकष लावून सगळे हजरही झाले व टेस्ट, मुलाखती ह्या सर्व सोपस्कारांमधून गेलेही. ५४ विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एकुण तीन कंपन्यांकडून निवडले गेले व बाकीचे रिजेक्टेड विद्यार्थी परतले.

ह्या रिजेक्टेड विद्यार्थ्यांना आम्ही फीडबॅक सेशनला परत बोलावले व बहुतेकांसाठी असलेला फीडबॅक हाच होता की एखाद्या विशिष्ट टेक्नॉलॉगीत आणि संवादकौशल्य व इंग्लिश बोलण्याच्या हातोटीत ते फार मागे पडत होते. पुढील काँप्लिमेंटरी ड्राईव्हसाठी त्यांनी निदान इंग्लिशची तरी तयारी करावी व ती आम्ही करून घेऊ हेही सांगितले. (अर्थातच, ही इंग्लिशची तयारी फुकट असणार नव्हतीच).

दरम्यान चारच दिवसांनी आमची दुसरी मोठी मार्केटिंग अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे एक अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, जी विद्यार्थ्याचे आय टी क्षेत्रात काम करण्यास योग्य अ‍ॅप्टिट्यूड आहे की नाही हे सप्रमाण सिद्ध करते, ती आयोजीत करण्यात आली. आधीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी येथे हजेरी तर लावलीच, पण ही टेस्ट कोणत्याही वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असस्ल्याने एफ वाय (/एफ ई) पासून सगळेच विद्यार्थी आले होते. ह्या विद्यार्थ्यांमधून ७० पेक्षा अधिक (७०/१००) स्कोर करणारे फक्त १४ विद्यार्थी निघाले व एकुण टेस्ट देणार्‍यांची संख्या होती २१२.

ह्याही सर्वांना आम्ही फीडबॅक दिला व ह्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच दोन प्रॉब्लेम्स होते. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे न येणे व इंग्लिश न येणे!

इतक्या मोठ्या प्रमाणावर काम केल्यानंतर आम्ही परोपरीने ह्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की पुढच्या ड्राईव्हच्या आधी इंग्लिशची बॅच लावा.

पण गंमत म्हणजे आजवर अतीउत्साहाने आमच्या केंद्रावर येऊन धडकणार्‍या ह्या विद्यार्थ्यांपैकी एकानेही, लेट मी रीपिट, एकानेही त्यात उत्सुकताही दाखवली नाही.

आमचे नांव झाले, त्याचा परिणाम म्हणून काही इतर विद्यार्थी स्वतःहून आले वगैरे बाबी वेगळ्या!

पण ज्या घटकाला संधी मिळत नाहीत असे मागच्या एका लेखात म्हंटले होते त्या घटकाला एका संधीचे सोने करता आले नाही म्हणून दुसरी संधी घेण्याआधी मेहनत करा म्हंटले तर तो घटक पूर्णपणे उदासीन होता. ह्यात महाराष्ट्रातील सर्व शहर, गावांमधून आलेले विद्यार्थी होते. कोकणापासून विदर्भ आणि सोलापूरपासून जळगावपर्यंत सगळे!

ह्यांच्यातील प्रत्येकाच्या पालकांनी सुमारे वीस हजार ते ऐंशी हजार अश्या रकमांची फी भरून त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिलेला आहे. होस्टेलवर राहणार्‍यांचे इतर खर्च वेगळेच! मात्र ह्या एका मोठ्या घटकाला तूर्त तरी कसलेही गांभीर्य नाही.

त्यांचा रागही नाही आला आणि कीवही नाही आली. त्यांच्याबद्दल फक्त मनात हा विचार आला की आपल्या आधीच्या पिढीतील मेहनती / कष्टाळू वृत्ती, गांभीर्य आणि प्रयत्न करण्याची इच्छा ह्या लोकांमध्ये अभावानेच दिसत आहे. जणू ह्यांची करीअर्स आधीच कोणीतरी तयार ठेवली आहेत आणि हे पास आऊट झाले की आरामात तिथे नुसते जाऊन बसणार आहेत.

खरे तर ह्या जनरेशनसमोर स्पर्धेच्या तीव्रतेचे भय कधी नव्हे इतके आहे. पण चित्र उलटे दिसत आहे. 'बघू पुढे कधीतरी' हा भाव सार्वत्रिक असावा तसा आढळत आहे. हे सर्वत्र असेच आहे का, असल्यास असे का, इत्यादी!

आपल्यापैकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर कारणमीमांसेची चर्चा करावी अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(मायबोलीवर आता 'ललित' आणि 'लेख' हे एकाच सदरात लिहावे लागतात, ह्याबाबत मागे एकदा विनंती केलेली होती. ललित व लेख हे दोन वेगळे भाग झाले तर बरे होईल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅटिट्यूड ठेवणे कसे घातक आहे>>>>..... ह्यावर अजुन थोड लिहा ना.
हा मुळ विषय नसेल ही ...पन मला जाणुन घ्यायच आहे.

चर्चा वाचते आहे.

माझ्याबरोबर कॉलेजात जी मुलंमुली होती त्यांमधील बरीच (जवळपास ४०-५०%) मुलं ग्रामीण / निमशहरी किंवा परप्रांतातून शिकायला आलेली होती. त्यातील निम्म्याहून अधिक मुलांची इंग्रजीच्या नावाने बोंब होती. बोलताना सलग एक वाक्य इंग्रजीतून बोलू न शकणारी, बोलायला बिचकणारी मुलं होती. लिहिताना तर आणखी गोंधळ. परीक्षेत काठावर पास होणे, वर्षभर लेक्चर्स बंक करणे, त्या वेळेत इतर ठिकाणी उंडारणे, परीक्षेत एकमेकांच्या (आणि त्याही चुकीच्या!) कॉप्या मारणे हे उद्योग चालत. आपले काही झाले नाही तर आईवडीलकाकामामादादा वशिला लावून आपल्या चरितार्थाचे बघतील ह्याची मुलांना खात्री होती. मुलींना लग्नासाठी पदवी आवश्यक वाटत होती. नंतर नोकरी व्यवसाय केला नाही तरी चालतो, काही जबरदस्ती नसते, अशी भावना होती. मुलग्यांना वशिल्याने नोकरी किंवा घरातले लोक व्यवसायाचा जम बसवून देतील ह्याची खात्री व मुलींना गरजेपुरते मार्क्स मिळवले की आपले एखाद्या सुखवस्तू घरात लग्न लावून दिले जाईल याची खात्री...

आज ह्या मुलामुलींचे काही अडले असे दिसते का? तर (काही अपवाद वगळता) त्यांचे (त्यांच्या मते) खूप काही अडले नाही. आईवडिलांनी, मामा-काकांनी यांचे बस्तान बसवून द्यायला मदत केली. काहींचे पिढीजात व्यवसाय होते, तर काहींच्या सरकार दरबारी ओळखी होत्या. पैसे आईवडिलांनी, नातेवाईकांनी उभे केले. वेळप्रसंगी कर्ज काढले. लग्न जुळवताना आर्थिक किंवा व्यावसायिक फायद्याचे स्थळ बघितले. आता ह्या मुलांची मुले (पाल्य) शाळा-कॉलेजांतून शिकत आहेत. अगदी सुरुवातीपासून शिकवण्या लावल्या आहेत. आईवडिलांचे इंग्रजी कच्चे का असेना, मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे.

मला सर्वात ठळक गोष्ट ही जाणवते की ह्या सर्व मुलांना खात्री होती की आपले आईबाप आपले आयुष्यात आर्थिक - व्यावसायिक बस्तान नीट बसवून देतीलच!! आपल्याला 'सेटल' केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत!! मग वयाची पंचविशी, तिशी का उलटेना! 'आपला अभ्यास - आपण कमावलेले ज्ञान याच्या जोरावरच आपण यशस्वी होणार आहोत' असे वाटण्याची या मुलांना गरजच नव्हती. [जिथे गरज होती त्या मुलांनी खूप सिन्सियरली अभ्यास केलेले पाहिलेत, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी झटणारी, स्वतःच्या धडपडीतून वर आलेली मुलेही पाहिली आहेत.] आजही ह्यातील काही मुले संसारी झाली, पोरे-बाळे झाली तरी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालेली नाहीत. वडिलोपार्जित संपत्ती / मालमत्ता - त्यातून येणारे उत्पन्न, आईवडिलांकडून मिळणारा आर्थिक आधार यांवर थोड्या-फार प्रमाणात अवलंबून आहेत. त्यांना ह्या टेकूची खात्री आहे. आईवडिलांनी त्यांना ही खात्री दिली आहे.

मला सर्वात ठळक गोष्ट ही जाणवते की ह्या सर्व मुलांना खात्री होती की आपले आईबाप आपले आयुष्यात आर्थिक - व्यावसायिक बस्तान नीट बसवून देतीलच!! आपल्याला 'सेटल' केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत!! मग वयाची पंचविशी, तिशी का उलटेना! <<<

अचूक निदान!

सिंडी ++
आमच्या शाळेच्या काळी तरी, पुण्यातली पोरं भयानक अभ्यास आणि मार्क ह्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेली दिसायची.. अदर अ‍ॅक्टिविटिज असतील तर त्याही कॉम्पिटिशन म्हणून..
मी ज्या छोट्या गावात वाढले तिथे मला काही शिक्षक/प्राध्यापक भेटले जे विषयाशी, मुलांशी बांधिलकी ठेवून होते - त्यामुळे तारे निरिक्षण, अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट्स बरोबर दिवस घालवणे, त्यातून वेगवेगळ्या संकल्पना समजणे, दहावीच्या गणिताच्या परिक्षेपलिकडे जाऊन गणितातली मज्जा घेणे, मराठीतली विज्ञानविषयक पुस्तकांची लायब्ररी अशा अनेक गोष्टी घडल्या. ट्रेकिंग चा भ्रमंती म्हणून गृप, खादंती, पक्षिनिरिक्षण, अनेक वक्तृत्व स्पर्धा, गाणी, सांस्कृतिक उत्सव, नाटकं, बालनाट्य, वसंत व्याख्यानमाला असे अनेक प्रकार चालायचे.. सगळ्याला सगळेजण जात नसले तरी अनेक जण काही ना काही करायचेच.

सध्यापण पुण्यातली जी स्थिती बघतेय ती भयावह आहे.. प्राथमिक शाळेला वर्षातून जितक्या परिक्षा असतात ते बघता, आपला काही संबंध नसतानाही आपण तक्रार करावी असं वाटतं. (परिक्षेवर कायद्यानं बंदी आहे ना?)
येवढ्या परिक्षा असताना मुलांचा पाट्या टाकण्याकडे कल असल्यास मला काही चूक दिसत नाही..
+ अनेक पालकही मूर्ख वाटतात. त्यांना भरपूर अभ्यास आणि परिक्षा गरजेच्या वाटतात.

-----------
बेफिकिरांनी जे लिहिलय ते ऑफिसमधे ही काही प्रमाणात अनुभवायला मिळालय.. आपल्याला मंथली पगार देणे ही कंपनीची जबाबदारी आहे असं वाटणारे अनेक न्यु जॉईनीज दिसतात. आपण झटून काही करावं, स्वतःला प्रूव करावं असही अनेकांना वाटत नाही..

अकु,
मनातलं बोललात.
थोडक्यात equilibrium साधला गेलाय तर. ज्यांना आपले पालक नैपुण्य मिळवण्यासाठी मदत करतील असे वाटते ती मुलं व्यवस्थित अभ्यास करून नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर ज्यांचे पालक लहानपणा पासून मुलांना चमच्याने भरवतात, आणि काहीही झाले तरी मी (पालक) ते सुधारीन आणि तुला काहीही कमी पडू देणार नाही, माझा व्यवसाय तुलाच चालावायचाय, माझ्या खूप ओळखी आहेत असे सांगतात ती मुले chill राहतात. अशा मुलांचं प्रमाण जास्त झालं तर वातावरणाचा समतोल दुसरीकडे झुकतो.
काही प्रमाणात ते ठीकच नाही का? संधी आणि मुले याचं व्यस्त प्रमाण बघता इतके इंजिनियर नकोचेत. Happy

प्रगत देशांमध्ये बस चालकाचा पगार आणि संगणक अभियंत्याचा पगार यात फार फरक नाही (टोरोंटो मध्ये TTC चालक ६ आकडी कमावतो, कामाचे जास्त तास मोबदला धरून. बस चालकाला हिणवण्याचा अजिबातच हेतू नाही). मुलं handy jobs हौशीने करतात, कारण जास्त शिकून जेवढे पैसे कमावणार ते लगेच मिळणार असतील तर काय वाईट हा विचार असावा. १६-१७ वर्षानंतर पालकांच्या घरात राहणे हे ही कमीपणाचे मानले जाते, दोन्ही बाजूंनी (पालक आणि मुले).
अर्थात पदवीपर्यंत मी तुझं शिक्षण बघीन पुढे मला परवडलं तर ठीक अन्यथा तू हातपाय हलवले पाहिजेत हे माझ्या घरी इतक्या स्पष्ट शब्दांत नसलं तरी अध्याहृत होतं. क्लिशे पण संस्कारावर ढकलू या का?

[जिथे गरज होती त्या मुलांनी खूप सिन्सियरली अभ्यास केलेले पाहिलेत, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी झटणारी, स्वतःच्या धडपडीतून वर आलेली मुलेही पाहिली आहेत.] आजही ह्यातील काही मुले संसारी झाली, पोरे-बाळे झाली तरी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालेली नाहीत. वडिलोपार्जित संपत्ती / मालमत्ता - त्यातून येणारे उत्पन्न, आईवडिलांकडून मिळणारा आर्थिक आधार यांवर थोड्या-फार प्रमाणात अवलंबून आहेत. त्यांना ह्या टेकूची खात्री आहे. आईवडिलांनी त्यांना ही खात्री दिली आहे. >>> जोरदार अनुमोदन...!

Pages