वार्डबॉय मारुती...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 February, 2014 - 05:10

कामाला वाघ असलेला
वार्डबॉय मारुती गेला
एका वर्षात क्षयाने झिजून
संपूर्ण क्यॅजूल्टीचा तंबू
आपल्या खांद्यावर वाहणारा
आपल नाव सार्थ करणारा ..
कुणी असो वा नसो बरोबरीला
विना तक्रार ड्रेसिंग करणारा
कॉल नेणारा पेशंट आणणारा
स्टीकिंग कापणारा प्लास्टर लावणारा
रात्री बाराला सगळ्यांसाठी
गरम गरम चहा बनवणारा
सहा फुट मध्यम देहाचा
कठोर चेहरा प्रेमळ मनाचा
सद्गृहस्थ पंनाशीचा ..
कधी काम संपल्यावर
येवून बसे लांब स्टूलवर
आणि आपल्या हुशार मुलीचे
कौतुक सांगे वारंवार
लोक म्हणायचे ,
अगोदर तो व्यसन करून
वाया गेला होता म्हणून
आता ही कधी रुग्णाकडून
घेतो चिरीमिरी म्हणून
पण त्याच्या वागण्यात
बोलण्यात अन काम करण्यात
कधीही लबाडी न आली दिसून..
क्षय झाल्यावर काही दिवस
उपचार घेता असतांना
तो काम करीत होता
आणि दिवस भरीत होता
पण कामाशिवाय बसलेला
उदास चेहऱ्याचा वाळल्या देहाचा
मारुती बघणे म्हणजे
शिक्षाच होती साऱ्यांना
कुठल्याही उपचाराला दाद न देणारा
असाध्य असा एम.डी.आर .
आला होता त्याच्या वाट्याला
शेवटचे तीन महिने तर
मारुती होता खिळलेला
हॉस्पिटलच्याच एका खाटेला
रोज दिसायचा नमस्कार करायचा
मिळालेल्या टोंकिनच्या बाटल्या
आणि व्हिटामिनच्या गोळ्या
मी त्याला द्यायचो कारण
बाकी काहीच करत येत नव्हते..
एक दिवस संतोष वार्ड बॉय
गेला मला सांगून
मारुती सिरिअस झाला म्हणून
त्याला ऑक्सिजन वर ठेवलाय पण ..
तेव्हा इच्छा असूनही
मी वार्डमध्ये गेलो नाही
मारुतीचा अटळ मृत्यू
मला पाहायचा नव्हता
मारुती मनामध्ये
जिवंत ठेवायचा होता
पण सारे सोपस्कर होवून
मारुतीचे डेथ सर्टिफिकेट
शेवटी आले माझ्याचसमोर
मी सही करावी म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users