अपूर्ण आयुष्यगान.. (अजून दोन शेर)

Submitted by रसप on 18 February, 2014 - 02:18

तुझा कळस आकाश असो, मला एक चौथरा हवा
जिथे तुझी सावली वसे, तिथे मला आसरा हवा

तुझ्या कलाने हळूहळू जगायचे मी शिकीनही
जमून येईल तोवरी, जगायला कोपरा हवा

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

जुळून आल्या सुरावटी, जमून आलेत शब्दही
अपूर्ण आयुष्यगान हे, तुझा एक अंतरा हवा

कसे टाळलेस तू प्रिये मला पाहणे शिकव जरा
नको चेहरा जुना मला नवा नवा चेहरा हवा

जराजरासे जगायला, जराजरासे मरायचे
अशी व्यथा अनुभवायला 'शहर' नाम पिंजरा हवा

नवीन क्षितिजांस शोधण्या उडत रहा तू पुढे पुढे
तुझी स्वत:ची अशी नसे कुठेचही पाखरा 'हवा'

सुचेल थोडे कधी तरी, 'जितू' आस ही असे खुळी
खरी शायरी सुचायला हृदयपटावर चरा हवा

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१४

http://www.ranjeetparadkar.com/2014/02/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली रे छानच आहे
पण लय जरा अधिक घट्ट विणायला वाव आहे
नवा नवा चेहरा मध्ये तार जुळली नाही नीट असे वाटते त्यात खूप बदल आवश्यक आहे असे वै म

तुझा कळस आकाश असो, मला एक चौथरा हवा
जिथे तुझी सावली वसे, तिथे मला आसरा हवा

व्वा.
विशेषतः पहिली ओळ फार आवडली.

केवळ एक प्रयत्न ...गै न. प्लीज Happy

तुला जसा पाहिजे प्रिये तसा अता मी कसा बनू
तुला दुजा चेहरा हवा मला तुझा चेहरा हवा

वैभू,

मला असे म्हणायचे आहे - 'मला पाहाणे तू कसे काय टाळलेस ते मला जरा शिकव. कारण मला स्वतःलाही आता मला पाहावेसे वाटत नाही. मला हा जुना चेहरा नको आहे. एखादा नवा चेहरा हवा आहे.'

आधी तिथे 'नवीनसा चेहरा' असं होतं. पण त्यापेक्षा मला 'नवा नवा' जास्त सहज व सोपं वाटलं, म्हणून बदललं.

तू दिलेला शेरही छान आहे. पण त्यातील अर्थ वेगळा आहे, तो स्वतंत्र आहे.

Happy

हो जितू तुझ अर्थ लक्षात आला ..माझा बदली शेर स्वतंत्र शेर झाला हेही मान्य

मग असे करता येइल का .....प्रयत्नच हाही ...

असे मला पाहणे प्रिये म्हणून का टाळलेस तू
नको जुना चेहरा अता मला नवा चेहरा हवा

नाही बहुतेक अजूनही मला तू म्हणतोय्स तसा अर्थ व्यक्त करता येत नाही आहे बदलांमधून
असो राहूदेत्च म्हणतो मी .....:)

हे अजून दोन शेर सुचलेत -

जराजरासे जगायला, जराजरासे मरायचे
अशी व्यथा अनुभवायला 'शहर' नाम पिंजरा हवा

नवीन क्षितिजांस शोधण्या उडत रहा तू पुढे पुढे
तुझी स्वत:ची अशी नसे कुठेचही पाखरा 'हवा'

....रसप....

वरील दोनपैकी पहिला अधिक चांगला वाटला.

'शहर', 'हवा' यांचा अपेक्षित अर्थ अवतरणचिन्हांव्यतिरिक्तही समजू शकतो आहे.
(चिन्हांबद्दल आक्षेप नाही.)

नवे शेर ठी़क वाटत आहेत मलातरी
शहर नाम पिंजरा हे कळले नाही शहर या शब्दाचा निराळा असा उर्दू संदर्भ आहे का तो वापरलाय्स का ? मागे एकदा 'सागर' वापरला होतास तसा