मनाला कधी वीट होता न आले...

Submitted by चैतन्य दीक्षित on 13 February, 2014 - 23:29

तुझ्याएवढे धीट होता न आले
तुझ्यासारखे नीट होता न आले |

फुलांची तुला रूपके योजिली मी
परी गालिची तीट होता न आले |

दुरावा तुझा "क्रूरता" सिद्ध झाला
तुझ्या वागण्या रीत होता न आले |

लढा इंच-इंचावरी चाललेला
जयिष्णूपणां वीत होता न आले |

विरोधावरी मात केली लढ्याने
मला बंद पाकीट होता न आले |

विठू रोजच्या रोज दारात आला
मनाला कधी वीट होता न आले |

- चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विरोधावरी मात केली लढ्याने
मला बंद पाकीट होता न आले |

विठू रोजच्या रोज दारात आला
मनाला कधी वीट होता न आले |<<< वा, मस्त!

रीत, वीत हे काफिये ह्या जमीनीत घेणे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरावे.

धन्यवाद बेफि,

>>रीत, वीत हे काफिये ह्या जमीनीत घेणे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरावे.
हे मान्य आहे.
पण 'ईट' ने संपणारे मराठी शब्दही कमीच आहेत.
आणि असलेले शब्द वापरण्याबद्दल माझी क्षमता कमी पडते आहे हेही आहेच.
पण ट च्या ऐवजी त हा अगदीच अमान्य ठरतो का? हा मला तरी पडलेला प्रश्न आहे.

पण ट च्या ऐवजी त हा अगदीच अमान्य ठरतो का? हा मला तरी पडलेला प्रश्न आहे.
>> या रचनेला गझल म्हणायचे असल्यास 'ईट' यायला हवे. अन्यथा ही कविता आहेच. तिथे कशाचेच बंधन नाही. Happy

अन्यथा ही कविता आहेच. तिथे कशाचेच बंधन नाही>>
मित्रा.. कवितेची पहिली ओळ लिहिली गेली की बंधन सुरू होतेच रे....
माझा प्रश्न अशा साठी होता, (या रचनेला गझल म्हणाच असा अट्टाहास नाहिच्चे), की...
जर आशय असेल आणि केवळ एका वर्णामुळे (ट ऐवजी त) तो शेर गझलेतून बाद ठरत असेल तर ते खरंच कितपत योग्य. (ही माझी रचना आहे म्हणून असा प्रश्न पडला असेही नाहीच)..
असो..

माझंही मत तंत्राबद्दलच आहे फक्त. " पण ट च्या ऐवजी त हा अगदीच अमान्य ठरतो का?" ही अ/मान्यता तो शेर गझलेत शामील करण्याबद्दलची आहे, असा अर्थ घेतला मी (आणि तसाच तुझा प्रश्न असावा). आणि अरे, अगदीच अमान्य असं काही नसतं/नाहीये. काफियात सूट, र्‍हस्व-दीर्घमध्ये सूट घेऊनही 'गझल'च म्हणवल्या गेलेल्या रचनाही आहेत की! गझलांच्या अनेक पुस्तकांमध्येही सगळ्याच गझला तांत्रिकदृष्ट्या १००% गझला नसतात. तात्पर्य, या रचनेला गझल म्हणू शकतोसच तू.

पहिली आणि शेवटची द्विपदी जितकी गझलेमधली वाटते ना, तितक्या ३,४,५ नाही वाटल्या मला. त्यामुळे मी या रचनेला कविता म्हणेन. Happy

अवांतरः तुझी गझल याआधी कधी वाचल्याचं आठवत नाही, त्यामुळे सुरुवातीच्या फेजमध्ये तंत्र अगदी बरोबर असलेलं बरं, अशा विचाराने मी लिहिलं.

जर आशय असेल आणि केवळ एका वर्णामुळे (ट ऐवजी त) तो शेर गझलेतून बाद ठरत असेल तर ते खरंच कितपत योग्य<<<

चैतन्य, फंडामेंटल्सवर अर्ग्यूमेंट असेल तर अनेक प्रश्न उद्भवू शकतात.

१. आशय आहे हे सापेक्ष नाही का?
२. हा प्रश्न तुम्हाला ही रचना तुमची आहे म्हणूनच पडला असे नाही, हे म्हणताना या आधी असा प्रश्न कुठेच उपस्थित का केला नाहीत असे मनात येऊ नये का?
३. तुम्हाला हा नियम माहीत आहे हे मला तरी नक्की ठाऊक आहे. असे असताना ही रचना गझल म्हणून प्रकाशित करणे ही एक विशिष्ट भूमिकाच होत नाही का?

बाकी कोणत्याही कलाकृतीचा आत्मा तीमधून दिला गेलेल संदेश, विचार हाच असल्यामुळे तंत्रापेक्षा आशय महत्वाचा ह्यावर वाद असू शकत नाहीच.

पण गझलकारांनी प्रयत्नपूर्वक तंत्र सांभाळण्याची जुनी परंपरा असताना (पुन्हा एकदा) ही चर्चा का निघावी हे समजत नाही.

टीप - 'ई' अलामत असलेल्या व 'ट' ने संपणार्‍या काफियाऐवजी 'त' ने संपणारा काफिया वापरणे ही सूट होत नाही, ती गझलतंत्रानुसार 'चूक' ठरते. हे तंत्रच मुळात मान्य करायचे की नाही ही बाब वेगळी आहे.

नचिकेत,
तुझी पोस्ट पटली आहे. मला जेन्युइन काही शंका आहेतच.
याआधी मी गझल (मला गझल वाटते अशी कविता) लिहिली आहे... म्हणूनच मी अर्धवट आहे गझलेच्या बाबतीत.

बेफि,
१.आशय सापेक्ष- मान्य
२. इथे (मायबोलीवर) किंवा अन्यत्र प्रश्न उपस्थित केला नाही= तसा प्रश्नच नव्हता असेही ठरू नये.
(अवांतर- गझलतंत्राबद्दल लिहितानाचे अनेकांचे आवेश बघून/ वाचून गझलेच्या फार वाटेला गेलोच नव्हतो खरे तर...
पण कधी कधी सुचतानाच असं काही सुचतं की व्यक्त होण्यासाठी कवितेला गझलेचा फॉर्म येतो. असो.. याबद्दल कदाचित मतांतर असू शकेल तेव्हा तुमचं जे काही मत असेल त्याचा आदरच आहे)

३.तुम्हाला हा नियम माहीत आहे हे मला तरी नक्की ठाऊक आहे. असे असताना ही रचना गझल म्हणून प्रकाशित करणे ही एक विशिष्ट भूमिकाच होत नाही का?

नियम माहिती आहे पण काही शंकांसह. ज्यातली ही एक ईट ऐवजी ईत का चालू नये? (माझ्या मते चालावा... पण माझं मत म्हणजे गझलचं तंत्र असू शकत नाही...त्यामुळे ही 'कविता' मी कविता विभागात हलवतो.
आणि अर्ग्युमेंट नाही हो. चर्चा म्हणा हवं तर. माझी लिहायची पद्धत चुकली असेल तर क्षमा असावी Happy

> 'ई' अलामत असलेल्या व 'ट' ने संपणार्‍या काफियाऐवजी 'त' ने संपणारा काफिया वापरणे ही सूट होत नाही,

ठीक.
पण प्रश्न उरतोच की मग ई अलामत असलेल्या व ट ने संपणार्‍या काफियांत 'सूट' मानायचीच झाली तर कोणते शब्द सूट म्हणून गृहित धरले जातील?
'ट' वर्गातले का? म्हणजे ईठ, ईड, ईढ?
हा जेन्युइन प्रश्न/शंका आहे.

तीट आणि वीट हे शेर सर्वात छान वाटले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

"कोणते शब्द सूट म्हणून गृहित धरले जातील?
'ट' वर्गातले का? म्हणजे ईठ, ईड, ईढ?
हा जेन्युइन प्रश्न/शंका आहे." >>> चैतन्य, वर बेफीजींनी स्पष्ट केलंय की,
"'ई' अलामत असलेल्या व 'ट' ने संपणार्‍या काफियाऐवजी 'त' ने संपणारा काफिया वापरणे ही सूट होत नाही, ती गझलतंत्रानुसार 'चूक' ठरते. "
त्यामुळे 'त' ऐवजी कुठलंही अक्षर चालणार नाही, तसं वापरलं गेल्यास ती सूट नव्हे तर चूक ठरेल.
हे स्पष्ट केल्यावर 'ट' वर्गातल्या अक्षरांचा संबंध येत नसावा असे मला तरी वाटते.

असो.... याबाबत तज्ज्ञ त्यांचे मत सांगतीलच.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

आणखी एक वैयक्तिक मत :
आशय, अभिव्यक्ती इ. गोष्टी महत्वाच्या असतातच.
तरीही गझल ही तंत्रशुद्ध असलीच पाहिजे हा आग्रह असण्यात गैर काहीच नाही.

ट च्या ऐवजी त न चालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण की प्रश्न कवाफीचा आहे अलामती नंतर अक्षर बदलू नये असे नियम आहेत आपली अपेक्षित अलामत तो ई हा स्वरच आहे त्यानंतर ट आणि त असा बदल झाला तर रसभंग होतो
>>लगागालगा.ईट होता न आले .....लगागालगा.ईट होता न आले.....लगागालगा.ईट होता न आले<<< हा भाग वारंवार रिपीट होण्याने एक आल्हाद निर्माण होतो तो आल्हाद देणारा न बदलणारा भाग आणि लयीत येणार्या इतर व्यंजना -स्वरांमुळेचे लटके झटके हीच गझल "तंत्रा"ची बेसिक मजा असते !!

उच्चारशास्त्राप्रमाणे ट चा उच्चार व त चा यात जाणवून येण्याइयपत वेगळेपणा आहे ...आता उच्चार करणारा चुकीचे उच्चार करत असल्यास बात वेगळी Happy

तडजोड म्हणून त-ट ..श-ष ..ण-न स्वीकारतात लोक पण........
पण हे नियम आपल्यासाठी असतात ..आपण ते केलेले असतात ... (गझलेने नव्हे !!) आपण स्वत:च ते पाळायचे की नाही...आणि कितपत ... हे ठरवायचे असते ...ह्या परंपरा आणि हे नियम युगानुयुगे माणसाने काव्यशास्त्रात केलेल्या संशोधनातून आलेले आहेत ,...

ही बंधने नाहीत ह्या मर्यादा आहेत !! (म्हणजे आपले हात पाय कुणी बांधलेले नसतात आपणच आपले मर्यादांचे भान राखून ते हालवतो वगैरे ..असे!)

बेफीजींचा शेर आहे एक ......मला त्यातून एक असा अर्थ लागला होता एकदा...फार छान शेर आहे नीट लक्षपूर्वक वाचा आपल्याला कळेल ....खासकरून पहिली ओळ ...मग ही गझलेची गम्मत् काय आहे ते लक्षात घेवू शकालच

मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गम्मत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे

असो
मला सगळे शेर छान वाटले जास्तकरून मतला पाकीट आणि ..साहजीकच .. वीट Happy
धन्यवाद

भिडे काका, रिया
धन्यवाद Happy

वैभव,
खूपच सोप्पं करून सांगितलंत तुम्ही.
'तंत्राची मजा' या तुमच्या शब्दांमुळे माझ्यासारख्या गझल प्रांतात नवख्या माणसाला तंत्राचं दडपण न येता..
पोएटिक खाद्य वाटेल गझल लिहिणे म्हणजे.
मनापासून धन्यवाद.

"माझ्यासारख्या गझल प्रांतात नवख्या माणसाला तंत्राचं दडपण न येता..पोएटिक खाद्य वाटेल गझल लिहिणे म्हणजे.
मनापासून धन्यवाद." >>> चैतन्य, हा तुझा प्रतिसाद मन खुष करून गेला.

गझल हा काव्यप्रकार हाताळणं/न हाताळणं हा मुद्दा अलाहिदा. पण ज्याच्याकडे वृत्त हाताळणीचं कौशल्य आणि शब्दसंपदा आहे अशा माणसासाठी मंत्राला धक्का लागू न देता तंत्र आणि वृत्त सांभाळणे हा एक आनंद असतो.

पोएटिक खाद्य<<<<<<<< पण जपून! सुरुवातीला आपल्याला भूक लागली असावी असे म्हणून माणूस खायला जातो पण हळूच व्यसन जड्तं ही गझलेची भूक वाढ्त जाते मग हळू हळू भस्म्या बनतो ह्या सवयीचा आणि ऐकले असेही आहे की ह्यावर उपाय एकच खात राहणे खातच राहणे . मरेपर्यंत थंबणेच ना !
...पण म्हणे आधुनिक गझल संशोधकांनी ह्यावर संशोधन करून एक औषध शोधले आहे म्हणे त्याची क्लीनीकल ट्रायलही सुरू आहे असे ऐकले ..माबोकर डॉ. ज्ञानेश यांच्याशी संपर्क साधावात ....ते स्वतः एक पूर्वाश्रमीचे विख्यात व प्रस्थापित शायर असून हल्ली गझल अजिबातच रचेनासे झालेत ते ह्या औषधाच्या परिणामामुळेच अशी बातमी हाती आली आहे माझ्या Happy
(हलके घ्या ..मी गम्मत करतोय :))

प्राणही आज मला निंबकडू लागावा
एवढी गोड तुझी ओढ मनाला आहे

Happy

परंपरे विरोधात जाऊन लिहिल्याची मोजकीच का होईना उदाहरणे आहेत.
अगदी मीर गालिब ह्यांनीसुध्दा स्वतःपुरते गझलेचे नियम
काही ठिकाणी शिथिल केलेत. एक उदाहरण देतो. कारण असे आहे की ह्या जमीनीत ढिगाने
काफिया असूनही विशिष्ट शेरासाठी नियम मोडला गेलेला आहे.
मीर ची गझल आहे:

हर जीहयात का है सबब जो हयात का
निकले है जी उसी के लिए कायनात का

उसके फरोगे-हुस्न से झमके है सब में नूर
शम-ए-हरम हो या कि दिया सोमनाथ का

मला वाटतं नियम काय करायचं त्याची दिशा देतात.
नियम कसे लावायचे/घ्यायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
मीरच्या वरील रचनेला गझल म्हणायचे की नाही हे कुणाचे स्वातंत्र्य कुणी घेऊ नाहीत.
तितकेच तिला गझल म्हणायचे मीरचे स्वातंत्र्य अबाधित आहे.

समीरजी,
धन्यवाद.
काफिये खूप असतील पण मला अजून ती दृष्टी नाहिये हो. त्यामुळे नाही लिहू शकलो.
प्रयत्नात आहेच. लिहीत राहीन!