बरंच बरंच काही

Submitted by फूल on 10 February, 2014 - 20:27

आकांक्षेच्या भरारीने उजळून निघतं सारं
आणि "जगण्या"च्या काळोखात भरडून निघतं सारं
मनाला उभारी मिळता मिळता ध्यास कोलमडत जातो
हाकेच्या अंतरावरला हेतूही दिसेनासा होतो
तरीही... धावत आलो, धावत असतो, धावत राहणार मी
भविष्याच्या पडद्याआड साचलेलं पहाणार मी
शोधत राहणार सुख-बिख फिरत दिशा दाही
तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही

जाणीव नेणीवेच्या मधेच मी झुलत राहतो असाच
आत बरंच वाटत राहतं, बाहेर काही तिसराच
बदलण्याचा आव... मात्र काळ वहाणारच असतो
हाताची घडी तोंडावर बोट मी खरा असाच असतो
पोखरत असतं हेच सारं पण समोर आणायचं नाही
दाखवत रहायचा वेगळाच चेहरा आपण तसे नाही
बदलत रहायचं कॅलेंडर आज एक उद्या दोन
प्रश्न कधीच पाडायचा नाही तू कोण? मी कोण?
तरीही कुठून येतं सारं बळ कधीच कळत नाही
तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही

डोकावतोस अधे मधे हळूच वाट चुकल्यासारखा
क्षणिक आत वळवतोस बाकी दिसतोस पसाऱ्यासारखा
कान, नाक, डोळे सारे मनाचे दूत होतात
पसरलेल्या पसाऱ्यात क्षणात फिरवून आणतात
हा क्षण आत डोकावण्यापेक्षा कैक पटींनी मोठा होतो
कळत नाही कोण मोठा तिथेच सारा लोचा होतो
"चाचपडत राहणे" वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग होतो
अर्थ मात्र त्याचा इथे "जगणे" असा होतो
दाखवत राहतोस अगणित लीला बघत राहतो मीही
तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही

शोधेन म्हणतो स्वत:ला आतल्या अंधारात
जगेन म्हणतो आतही जसा चाचपडतो बाह्यात
माहितीये मला हे सारं इथेच संपणार नाही
तुझ्या माझ्यात घडत राहणार बरंच बरंच काही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा... आवडली.
तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही... ह्या 'बंंच बरंच' मधेच बरंच काही हाती न लागल्याचा अन शब्दांत न मांडल्याचा जो अर्थ दडलाय.... क्या बात है.
जियो, फुला...
खूपच वेळ जातोय तुझ्या आधीच्या अन पुढच्या लिखाणात. इतकीही वाट बघायला लावू नये... फुलांनीही Happy