आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ४

Submitted by वरदा on 3 February, 2014 - 02:33

वर्ष ३रे: दिवस २६वा
या वर्षीच्या फील्डवर्कचा हा शेवटचा दिवस. इतर आर्किऑलॉजिस्ट्सप्रमाणे मीही वर्षातून काही ठराविक काळ या भटकंतीला (किंवा उत्खननाला) देऊ शकते. उरलेले महिने या काळात शोधलेल्या अवशेषांचं अभ्यास आणि विश्लेषण करण्यात जातात. रोजच्या संसारातून, एरवीच्या अभ्यासातून मला काही मोजके आठवडेच या कामाला देता येतात. सुदूर पूर्व भारतातून वर्षात एकदाच महाराष्ट्रात येणं शक्य असतं. त्या महिन्यांमधेच फील्डवर्क, ग्रंथालयातलं संदर्भवाचन, माहेरपण-नातेवाईक, मित्रमैत्रिणी, इतर कामं असा भरगच्च कार्यक्रम कट्टाकट्टी वेळेत बसवलेला असतो. त्यामुळे किमान २ महिने आधी फील्डवर्कची पूर्ण आखणी झालेली असते. आधी जिथे जाणार तिथे ओळख काढून विश्वासू माणसांशी किंवा इतिहासाचे कुणी प्राध्यापक असले तर त्यांच्याशी संपर्क करणे. खात्रीच्या लॉजमधे किंवा भाड्याने खोली घेऊन रहायची सुरक्षित सोय करणे. कुठल्या दिवशी किती आणि कोणती गावं करायची - त्यातली एस्टीच्या टप्प्यात कुठली - कुठली पायी करायची - मदतनीस कोण कोण मिळणार आहे - त्यांच्याकडे मोटरसायकल असली तर उत्तमच, निदान काही गावं मोटरसायकलवर हिंडून पटापटा संपवता येतील - यात कुठेही न बसणारी, दूरची, जिथे एस्टी जात नाही अश्या गावांची यादी करून तिथे जाण्यासाठी निदान २-३ दिवस भाड्याने गाडी ठरवणे - याला किती तरतूद करावी लागेल याचा अंदाज घेणे. म्हणजे जे सगळं कलकत्त्यात बसूनच करता येतं, ते फोनाफोनी करून ठरवून टाकणं. पहिल्या वेळी हे सगळं आखणी करून नियोजन करायचं प्रचंड दडपण आलं होतं ते आठवलं की गंमत वाटते. आता अंगवळणी पडलंय.

आढावा सर्वेक्षणाचा टप्पा धरून माझ्या कामाचं हे तिसरं वर्ष. या तीन वर्षांत सव्वाशेच्या आसपास गावं धुंडाळून झालीत. गावांमधली आणि गावांबाहेरची धरून जवळजवळ १३५ पुरातत्त्वीय स्थळांची नोंदणी करून झाली आहेत. बहुतेक गावात अशी नोंद करणारी, अभ्यास करणारी मी पहिलीच आर्किऑलॉजिस्ट आहे. मी काम करते त्या प्रदेशात पुरातत्त्वीय सर्वेक्षण जवळजवळ न झाल्यातच जमा आहे, त्यामुळे माझ्या कामाशी संलग्न नसले तरी जे काही आतापर्यंत न नोंदले गेलेले ऐतिहासिक पुरावे असतील (अगदी मध्ययुगापर्यंतच्या वस्त्यांचे अवशेष, मूर्ती, देवळं, वीरगळ, तटबंद्या, गढ्या, असं सगळं) त्यांची तपशीलवार नोदणी करते. कारण ज्या वेगाने हे पुरावे नष्ट होत आहेत ते पहाता आणखी ५ वर्षांनी तरी यातलं किती शिल्लक राहील माहित नाही. त्यांची निदान प्राथमिक नोंदणी असावी असं मला वाटतं.

या वर्षी ज्या गावात मुक्काम आहे ते तालुक्याचंही नाही आणि जिल्ह्याचंही नाही. पण बर्‍यापैकी मोठं आहे. माझ्या कामासाठी मध्यवर्ती आहे. एक चटपटीत विद्यार्थी मदतनीसही मिळालाय. त्याला जेव्हा आणि जसा वेळ असेल तसा तो माझ्याबरोबर येतो. त्याच्या आणि गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने जिथे जाणार तिथे सहसा आधी ओळख काढून ठेवते. किंवा ज्या गावात जाईन तिथूनच शेजारच्या गावांमधे कुणाला संपर्क करायचा ते विचारून घेते. शक्य असलं तर तिथूनच फोन लावून त्या गावकर्‍याच्या मध्यस्थीने बोलून घेते. समजा यातलं काहीही झालेलं नसलं तरी आता सरावाने गावकर्‍यांकडून कशी मदत मिळवायची हे व्यवस्थित जमतं.
आज मला ज्या गावांना जायचंय तिथे थेट एस्टी जात नाही. तेव्हा मदतनीस मोटरसायकल घेऊन आला होता. पेट्रोलचे पैसे अर्थातच मी देते. शिवाय मदतनीसाला रोजचा मेहेनताना असतोच. विद्यार्थ्यांना पॉकेटमनी मिळतो आणि मला विश्वासू साथीदाराची सोबत मिळते.

सकाळी ८-८|| ल भरपेट नाश्ता करून निघालो. मी फील्डवर दुपारची जेवत नाहीच. एकतर वेळ जातो आणि जेवल्यावर जी सुस्ती येते त्याने दिवसाच्या उत्तरार्धातलं काम नीट होत नाही. मदतनिसाला हवा असल्यास तो डबा आणतो. किंवा माझ्याकडे 'असूदेत' म्हणून फळं, केक, बिस्किटं असा खाऊ असतो त्यावर चालवून घेतो.

गाव क्र. १ मुक्कामाच्या ठिकाणापासून २५-३० किमी.वर. साधारण १०-१२ किमी नंतर डांबरी रस्ता सोडून आतल्या कच्च्या रस्त्याला लागलो. दोन्ही बाजूंना उभी शेतं. बहुतेक ऊस, थोडी ज्वारी आणि तुरळक गहू. रात्री/पहाटे जेव्हा वीज येईल तेव्हा शेताला पाणी दिल्याने सकाळी थंडगार बोचरे वारे काकडायला लावत होते. पण तासादोनतासात उन्हाचा चटका जाणवायला लागतो त्यामुळे फालतू ओझं वाढवणार्‍या स्वेटरच्या फंदात आम्ही दोघंही पडत नाही. कान-नाक व्यवस्थित झाकून घेतले की झालं. वाटेत दुधाच्या जिपा, डांबरी रस्त्यावरच्या बसथांब्याकडे जाणारे काही लोक अशी तुरळकच वाहतूक होती. येणारेजाणारे कुतुहलाने आमच्याकडे पहात होते. ओढणीसकट सलवारकुर्ता, खाली भरभक्कम ट्रेकिंग शूज, पाठपिशवी घेऊन मी बाहेरची कुणीतरी गावात चाललेय हे स्पष्ट होतं.

या गावाला मी जातेय कारण इथून ६ किमी अंतरावर असलेल्या गावात एक १३व्या शतकातला शिलालेख आहे आणि त्यात या गावातली जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. बहुतेक महाराष्ट्रभर १०-१२व्या शतकात मिळणार्‍या शिलालेख-ताम्रपटांतील गावांची नावं एखादा चुकार अपवाद सोडता आजही फारशी बदलली नाहीयेत त्यामुळे अशी गावं शोधणं सोपं जातं. गाव किमान हजारभर वर्षं तरी जुनं आहे हे निश्चित. पण आता या भूप्रदेशात इतकी भटकंती करून, अनेको गावं पाहून झालेल्या मला आतनं सारखं वाटतंय की या गावात आणखी काहीतरी जुने अवशेष मिळायला हवेत. शिवाय तिथपासून ५ किमी अंतरावर एक मोठ्ठी ताम्रपाषाणयुगीन वसाहत मिळाली आहे.

गावात पोचायला नऊ-सव्वानऊ झाले. नदीच्या काठावर तीसेक फूट उंच कपारीवर हे गाव वसलंय. एकदम छोटं. जेमतेम २०० उंबर्‍यांचं. कितीही मोठा पूर आला तरी गावाला ढिम्म काही होत नाही. १९६०च्या दशकात इथे एक अभ्यासक येऊन गेले होते. इथल्या मंदिरांची आणि मूर्तींची खानेसुमारी त्यांनी केली होती. पण पांढरीविषयी काहीच संशोधन, नोंदणी केली नव्हती. त्यांच्या नोंदीप्रमाणे गावाला ५ फूट रुंद तटबंदी आणि घडीव वेस होती. आता त्यातले फक्त काही दगड शिल्लक आहेत.

गावात सकाळच्या कोवळ्या उन्हात गल्लीबोळांना नुकतीच जाग येत होती. कपारीवर नदीला पाठमोरं गाव. गावात शिरताना डावीकडे काही अंतर बाहेर मराठाकाळातली एक समाधी अर्धवट ढासळलेल्या, रान माजलेल्या अवस्थेत पडली होती. थोडीफार सिमेन्टची पक्की घरं, थोडी विटा-मातीची. पांढरीच्या टेकाडावर गाव वसलंय हे नीटच दिसत होतं. विशेषतः नदीकडच्या बाजूला चांगलाच उंचवटा दिसत होता.
बाहेर ४-५ तरुण मुलं कोंडाळं करून बोलत उभी होती. मदतनिसाच्याच वयाची. त्यांच्याशी ओळख काढून मदतनिसाने आमचं काम सांगितलं. तीही लगेच गाव दाखवायला तयार झाली. हे सगळं लांबून गावातून काही जण बघत होते. ते पुढे सरसावले. बहुतेक सगळे मध्यमवयीन पुरुष. अशी अनोळखी शहरी पाहुणी बघितली की सहसा बायका पुढ्यात येतच नाहीत. अगदी अपवादात्मक चारपाच गावांमधे मला बायकांनी पुढे होऊन मदत केली आहे. नाहीतर बोलणंचालणं गावातल्या पुरुषांशीच. त्यातल्यात्यात प्रौढ, प्रतिष्ठित किंवा जाणत्यांशी. बायका घराच्या दारातून कुतुहलाने बघत असतात.खरंतर त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतात. एरवी न कळणारी अनेक माहिती, आख्यायिका, समज, श्रद्धा अशा खास बायकांच्या विश्वातल्या गोष्टी कळतात. आधीच आपल्याकडे कागदपत्र सोडून मौखिक परंपरेला/ इतिहासाला फार क्वचित विचारलं जातं. त्यातही जातीपातीनुसार फरक पडतो. ब्राह्मण, मराठा, धनगर, इतरेजन सगळ्यांच्या गोष्टींमधे फरक असतो. अनेक ठिकाणी ब्राह्मण-मराठ्यांना शिवकाळात किंवा नंतर वतनं/ जोसपण/ कुलकर्णीपण मिळालंय. मग त्यांनी सांगितलेला मौखिक इतिहास हा त्यात्या कुळाच्या त्या गावातल्या प्रवेशानंतरच्या घडामोडी सांगणारा असतो.

तर आम्हाला मदत करायला सरसावलेल्या लोकांनी नेहेमीप्रमाणे सखोल चौकशी करून आमचा ताबा घेतला. या पोलिसी खाक्याच्या इत्थंभूत माहिती काढून घेणार्‍या चौकशीची आता सवय झाली आहे. त्यातले एकदोघे जरा शिकलेसवरलेले वाटत होते. थोडे वयस्कर होते. एक जेमतेम शाळेचं तोंड पाहिलं असेल नसेल असे पैलवानबाप्पू होते. आकडेबाज मिश्या, कानाची भजी झालेली, घोगरा, धमकीच्याच सुरात बाहेर निघणारा आवाज असा अगदी द.मां.च्या कथेतल्या पात्रासारखा थाट होता. पण एकुणात माझ्या कामाचा उद्देश त्यांच्या लक्षात आला होता. गाव धुंडाळायला निघालो. वेशीच्या आत शिरल्याशिरल्या एक यादवकालीन 'हेमाडपंती' मंदिर आहे असा पूर्वीच्या नोंदीत उल्लेख आहे. आता फक्त त्याचा चौथरा, चंद्रशिला आणि गाभार्‍याचा उंबरा एवढंच जाग्यावर राहिलंय. दगड सगळे घरांच्या बांधकामाला गेले असावेत. एरवी प्रत्येक गावात आढळणारे वीरगळ मात्र इथे अजिबात नाहीत. हे पाहिल्यावर एक आधी न लक्षात आलेली बाब एकदम लख्ख जाणवली. या गावात शेकडा नव्व्याण्णव कुटुंबं एका विशिष्ट उपजातीची आहेत. या उपजातीचं संख्याबाहुल्य असलेली आणखी तीन गावं आजपर्यंत पाहिलीत. आणि एकाही गावात वीरगळ नाही आणि पूर्वीही कधी नव्हता याबद्दल गावकरी ठाम होते. माझ्या अभ्यासाचा विषय हा नाही खरा पण डोक्यात एक नोंद झालीये. परत कधीतरी कुठेतरी आयुष्यात या धाग्यांशी-अर्ध्यामुर्ध्या नोंदींशी भेट होईलच.

जरी माझं खरं उद्दिष्ट पांढरीचा तपास हे असलं तरी मी चौकशीची सुरुवात सगळ्यात ठळकपणे उठून दिसणार्‍या पुरावशेषांपासून करते. म्हणजे देवळं, मूर्ती, वीरगळ, गढ्या, हुडे, इ. मग हळूहळू गाडी खापरं, पांढरी अशा रुळांवर न्यायची.
मघाशी मागच्या बाजूला जो पांढरीचा उंचवटा दिसला होता तिकडे गेलो. तिथे पांढरीच्या सगळ्यात उंच भागावर गाव-आईचं ठाण. काही अनघड दगड आणि एक नैसर्गिक त्रिकोणाकृती शिळा त्यांच्या मध्यभागी. सगळ्या दगडांना शेंदूर लावलाय. हे गावातलं सगळ्यात पावरबाज दैवत. आईचा कौल घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही.
इतर ठिकाणी पांढर घरांखाली दबली गेली आहे, पण इथे ठाणाच्या आसपास ना शेतासाठी-घरासाठी माती काढून नेलीये ना तिथे कुठलं बांधकाम आहे. हा पुरावशेष, खापरं शोधण्यासाठी एकदम आदर्श भाग दिसला. मी ही अशी तुटकीफुटकी खापरं का उचलतेय याचं त्यांना कळेल असं स्पष्टीकरण दिलं. त्यावरून काळ कसा कळतो ते आजचे माठ, मला मिळालेली वेगवेगळी खापरं, या सगळ्यांचा वेगवेगळा रंग, पोत, आकार, असलीच तर नक्षी याची तुलना करून थोडक्यात समजावून सांगितलं. मग उत्साहाने ते सगळेचजण मला मदत करायला लागले. प्रत्येक गावात याच गोष्टीची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती होते.

एकुणातच ठाणाच्या आसपास बारकाईने पहाताना लक्षात आलं की मध्ययुगीन खापरं तर आहेतच पण सातवाहनकालीन खापरांचाही अक्षरशः खच पडलाय. २-३ सातवाहनकालीन शंखांच्या बांगड्यांचे तुकडे, गारगोटीच्या छिलक्यांपासून तयार केलेली धारदार सूक्ष्मास्त्रं आणि ती तयार करताना काढून टाकलेले बारकेबारके छिलके असंही कायकाय मिळतंय या पांढरीतून. एका ठिकाणी एका उथळ खड्ड्यात एक कुत्र्याचं बारकुसं पिल्लू मरून पडलं होतं. बहुदा गारठ्याने. त्याच्या शेजारी मला चारपाच खापरं पडलेली दिसली. लांबून पाहूनच जी शंका आली होती ती जवळ जाताच खरी ठरली. नक्षी नसलेली पण नि:संशय ताम्रपाषाणयुगीन खापरं. आनंदाने जीव पिसासारखा हलका हलका झाला. थोडं पुढे गेल्यावर आणखी असेच काही तुकडे मिळाले. गावची वसाहत किमान तीन ते साडेतीन हजार वर्षं जुनी आहे हे नक्की झालं.

पूर्ण गावाला चक्कर मारून नीट सगळं शोधायला, पांढरीची तांत्रिक मोजमापं घेऊन त्याच्या नोंदी घ्यायला आणखी एक तासभर लागला. पलिकडची मध्ययुगीन समाधीही बघून, नोंदवून झाली. सगळ्या अवशेषांचे, पांढरीचे, गावाचे, गावाभोवतीच्या परिसराचे, कपारी-नदीकाठाचे व्यवस्थित फोटो काढून झाले. आढावा सर्वेक्षणाच्या अनुभवांवर आधारित मी प्रत्येक पुरातत्वीय स्थळामधे कुठली आणि कसली माहिती (अवशेष, तांत्रिक नोंदी, पर्यावरण, भूगोल, अक्षांश-रेखांश, पाण्याचे स्त्रोत, जमिनीचा प्रकार आणि कस, गावची मौखिक माहिती, कच्चा नकाशा, इ. इ.) टिपून घ्यायची याचे रकाने करून एक माहितीतक्ता तयार करते. शक्यतोवर गावातल्या गावात बसूनच. जास्तीची माहिती, निरिक्षणं हा अहवाल रात्री तपशीलात लिहायचा. तो तक्ता भरून झाला. गावातल्या एकमेव दुमजली घरात वरती छतावर जाऊन गाव आणि परिसराचं विहंगमावलोकन करून काही टिपणं केली. यानंतर मला गावाबाहेर वेशीसमोर एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे एक शेंदूर फासलेला दगड होता. हा गावचा म्हसोबा. म्हसोबाच्या पलिकडे थोडी दलदल आणि झुडपांचं रान माजलं होतं. पैलवानबापूंनी तिथे पूर्वी एक तळं होतं असं सांगितलं. ते तळं कुणाच्या पाहण्यात नाही पण तिथे ते होतं ही मौखिक परंपरेने आलेली माहिती सगळेच गावकरी सांगतात. तेवढ्याच भागात दलदल आणि तिथली झुडपं जास्त हिरवीकच्च होती हे मात्र खरं. १९७२ च्या दुष्काळात इथे रस्त्याचं काम चालू असताना जमिनीत पुरलेलं सोन्याचे जिन्नस असलेलं एक मडकं सापडलं होतं असंही काही वयस्क लोकांकडून कळलं. त्याचं पुढे काय झालं ते सोयीस्कररीत्या कुणालाच आठवत नव्हतं ते सोडून द्यायचं.

सगळं झाल्यावर शेजारच्याच चहाच्या टपरीवर गेलो. स्पेशल चहाची ऑर्डर गेली. मघाचपासून पैलवानबापूंच्या मनात काहीतरी प्रश्न उसळ्या मारतोय हे मला जाणवलं होतं. थोडा वेळ आढ्याकडे नजर लावून विचार करून मला म्हणाले - 'ताई, आमचं ह्ये गाव, ही पांढर इतकी जुनी हाय ना?' म्हटलं 'हो'. 'म्हंजे इथे पण - ते कुठलं खणलं न्हवतं का जुनं गाव, तसंच म्हंजे म न दे... म ज ना.... म न जा दो.....' ते शब्दाला जामच अडखळले होते. मलाही आधी नीट कळलं नव्हतं पण एकदम ट्यूब पेटली. विचारलं -'तुम्हाला मोहेन्जोदडो म्हणायचंय का?' त्यांच्या चेहर्‍यावर एकदम दिलखुलास हसू पसरलं. 'होय की, तेच बघा की काय ते.. मंग आमच्या गावाला पण..' मी घाईघाईने खुलाश्यात घुसले, की नाही इथे उत्खनन एवढ्यात तरी होणार नाहीये. सध्या लोक जमीन अधिग्रहण, सेझ याच्या अर्ध्याकच्च्या अफवांनी घाबरलेले असतात. अनेक ठिकाणी समजावून सांगूनही तांत्रिक मोजमापं घेऊ द्यायला कटकटी करतात. जीव अगदी मट्ट्याला आणतात. खुलासा ऐकून पैलवान एक क्षणभर माझ्याकडे टक लावून म्हणाले -'नाही हो ताई, तसं न्हाई म्हणायचंय. पन त्या इतक्या प्रशिद्द मनजादोड (शेवटपर्यंत ते नाव त्यांना म्हणता आलं नाहीच) सार्कंच आमचं गाव पण लई जुनंय म्हणा की. लईच आपरुक वाटतंय बगा.'
मला काय म्हणावं ते सुचेना. कुठलं दूरदेशचं मोहेन्जोदडो. त्याच्या प्राचीनतेविषयी इतिहासाच्या पुस्तकात - स्वतःच्या म्हणा, पोराच्या म्हणा - वाचलेली माहिती लक्षात ठेवून, त्याच्याशी तुलना करून स्वतःच्या गावाच्या जुनेपणाविषयी अप्रूप बाळगणारा, त्याचा मनापासून आनंद होणारा असा मला भेटलेला हा एकमेव गावकरी. बहुदा अगदी शिकले सवरलेले गावकरीपण देवळांच्या प्राचीनतेत, मूर्तींच्या तपशीलात आणि देवाच्या आख्यायिकांमधेच जास्त गुंतलेले असतात. इथेही त्या पैलवानांच्या इतर साथीदारांना या संवादाचं काहीही सोयरसुतक नाही हे स्पष्ट होतं. मी मात्र वय, लिंग, शिक्षण, सामाजिक स्तर या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन ऐतिहासिक माहिती जाणून घेऊन त्याने हरखून जाणारा समानधर्मा अचानक भेटल्याच्या खुशीत होते.

आता गाव क्र. २ कडे मोर्चा वळवला. रोज वेगवेगळ्या कोंदणातली गावं बघतेय. काल मैलोन् मैल पसरलेल्या अथांग दगडी माळाच्या मधोमध असलेल्या एका छोट्या गावापाशी, वर्षातून जेमतेम आठवडाभर पाणी वहाणार्‍या कोरड्याठक्क ओढ्याच्या काठी शेजारीशेजारी दोन सातवाहनकालीन वसाहती पाहिल्या. आजचा प्रवास नदीकाठाने, हिरव्या शिवाराच्या आणि तुडुंब भरलेल्या नदीच्या सोबतीने.
हे गाव नदीच्या काठावरच पण थोड्या वरच्या अंगाला. रस्ता नदीकाठानेच. इथल्या सरपंचाचं नाव आधीच्या गावातून कळलं होतंच. या दोन गावांची जोड पंचायत आहे. त्यामुळे मदतीचा प्रश्न सुटल्यासारखाच आहे. गावाला भेट देणारी मी पहिलीच आर्किऑलॉजिस्ट.
गाव नदीपासून थोडं आत, उंचवट्यावर. पण इथे कडेकपारी नाहीत. नदीत म्हशी आणि पोरं निवांत डुंबत होती. बायका धुणं धूत होत्या. गावात शिरल्यावर समोरच पंचायत-शाळा यांची जोडइमारत दिसली. सरपंचांना फोन गेला होता आणि ते काही शिक्षकांबरोबर आमची वाटच पहात होते.

गाव तसं मोठं आहे आणि बहुतेक सगळी घरं पक्क्या विटा-सिमेन्टची. त्यामुळे पांढरीचा अदमास येणं अवघड होतं. तरी २-३ जुन्या वाड्यांच्या बखळींमधे मातीसाठी उकराउकरी झाली होती त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. बहुतेक सगळीच खापरं मध्ययुगीन आणि मराठाकालीन होती. तरी त्यात तीन खापरं सातवाहनकालीन निघाली. गावात यादवकालीन मंदिर नाही, मूर्ती नाहीत, की वीरगळही नाही. असं काही या गावात होतं याची जुन्याजाणत्यांना आठवणही नाही. ग्रामदैवतं दोन. पीर आणि अंबाबाई. पण दोन्ही ठाणं आधुनिकच. गावाविषयी, ग्रामदैवताविषयी मौखिक परंपरेतून, आख्यायिकांमधून सांगितल्या गेलेल्या गोष्टी जवळजवळ नाहीतच. या परिसरातल्या कुठल्याही ताम्रपट-शिलालेखातही गावाचा उल्लेख नाही. म्हणजे सातवाहन कालात जरी इथे वसाहत असली तरी ती नंतर कदाचित उजाड झाली असेल आणि मध्ययुगात किंवा मराठाकाळात इथे परत एकदा वस्ती झाली असेल असं मला वाटतं. उत्खनन केल्याशिवाय याचं खात्रीशीर उत्तर मिळणार नाही पण माझ्या संशोधनाचा हा विषयही नाही. पांढरीतून आणि गावातून मिळालेल्या पुरावशेषांमधून निघालेली एक तर्कसुसंगत शक्यता एवढंच.
पूर्ण गावाला आणि गावातून एकदा नीट चक्कर मारली. काही तांत्रिक मोजमापं घेतली. माहितीतक्ता लिहिला. फोटो काढले. आणि आजच्या वेळापत्रकातल्या पुढच्या गावात कुणाला भेटायचं याची माहिती घेतली. परत एकदा गोडमिट्ट स्पेशल चहा आला. (दिवसातून असे दोन चहा झाले की माझ्या शरीराची दिवसभराच्या ग्लुकोजची गरज सणसणीत भागत असणार आणि म्हणूनच तहानभुकेचा, उन्हातान्हाचा लवमात्रही त्रास न होता मी काम करत रहाते. एकदम नक्कीच.)

गाव क्र. ३. हे गावपण नदीच्या काठालाच. आणखी थोडं वरती. खरंतर हे गाव माझ्या मूळ यादीत नव्हतं पण दशक्रोशीतल्या सगळ्या गावातून इथल्या पांढरीविषयी मला सांगितलंय त्यामुळे इथे जायचंय.
अगदीच गावढं म्हणावं इतकं छोटं गाव आहे. गाव क्र. १ पेक्षाही छोटं. शेजारच्याच गावात एक शिलालेख आहे. त्यात आसपासच्या बहुतेक गावांची नावं आहेत. पण या गावाचं नाही. गावात जवळजवळ १५फूट उंचीचं पांढरीचं टेकाड आणि त्यावर काही घरं. यातली बरीच पांढर शेतकर्‍यांनी खणून काढून शेताला घातली आहे. एकुणातच या सर्व प्रदेशात खताचा स्वस्त पर्याय म्हणून ही माती वापरतात. (यात नायट्रोजन, फॉस्फेट आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं). फक्त १५-२० रु. ला एक ट्रक. एकदम जास्त उचललीत तर त्यातही सूट. अनेक ठिकाणी मी पांढरीची चौकशी केली की त्यांना मी ही माती विकत घ्यायला आलेय असं वाटतं त्यामुळेच हे दर मला माहिती आहेत. पहिल्यांदा अगदी नवखी असताना हे ऐकलं तेव्हा 'मातीमोल' म्हणजे काय याचा अर्थ नीटच उमगल्यासारखा झालेला. कवडीमोलाच्या भावाने हे अवशेष असे नाहिसे होताना पाहून खरोखरीच छातीत बारीक कळ आली होती. आता निर्ढावले आहे. कितीक शेतातल्या पांढरी एखाददोन दिवसात बुलडोझर लावून उडवलेल्या पाहिल्यात, ऐकल्यात. ही सामायिक जमीन मोकळी करून गावातल्या भूमिहीन कुटुंबांना देण्यासाठी हे सर्रास होतं. मी फक्त दिसेल ते व्यवस्थित तपशीलवार नोंदून ठेवण्याच्या पलिकडे काहीही करू शकत नाही. आपल्याकडे दर गावाआड कुठल्याना कुठल्या काळाची पांढर असते. किती वाचवणार? भूतकाळापेक्षा जिवंत माणसांचं जगणं जास्त महत्वाचं आहे हे मलाही पटतं. पण गावोगावच्या इतिहासाचे अमूल्य ठेवे असे पोरासोरी नष्ट होताना पहाणंही काळजाला घरं पाडणारं असतं. असो.

गावातले बहुतेक सगळे जण रहायला शेतीवरच्या वस्त्यांवरून पांगलेत. त्यामुळे गावात फारशी जाग नाही. मात्र आम्ही येणार असल्याचा फोन आधीच्या गावातून गेला होता त्यामुळे तरुण उपसरपंच आणखी दोघाचौघा जाणत्यांना घेऊन वस्तीवरून आले होते.
गावातली बहुसंख्य वस्ती एका विशिष्ट उपजातीची. त्यांचे पूर्वज नऊ पिढ्यांपूर्वी जगायला म्हणून शेजारच्या राज्यातल्या गावातून बाहेर पडले ते फिरत फिरत या बारमाही नदीच्या काठाला येऊन इथे अखेर स्थायिक झाले. अजूनही या कुटुंबांचे मूळ गावाशी, त्या ग्रामदैवताशी संबंध आहेत. मूळ भाषा जवळ जवळ विसरलेत पण तिथल्या नातेवाईकांशी संबंध आहेत. रोटीबेटी व्यवहारही होत रहातात. या अशा हकिकती मी या आधीही अनेक गावांमधे ऐकल्यात. सगळ्या मौखिक परंपरा प्रत्येक वेळीच विश्वासार्ह असतात असं नाही, पण या स्थलांतरांच्या कथांमधे लोक कायम मूळ गाव, नाव असे तपशील सांगत असतात तेव्हा त्यात तथ्य असतंच असतं. माणसाचं पूर्वजांची नाळ पुरलेल्या मातीशी नातं इतकं सहजी तुटत नसतंच. शहरात जन्मलेली, वाढलेली मीच नाही का वडिलांनी त्यांच्या लहानपणीच सोडलेल्या गावाचं नाव अभिमानाने माझं गाव म्हणून सांगत! विकून टाकलेल्या घराच्या एका जुन्या बखळीशिवाय आमचं तिथे काहीच नाही, आता नातेवाईकही नाहीत. ४-५ वेळाच गेलेय तिथे पण प्रत्येक वेळी जीव अपार सुखावलाय. आयुष्यात कधी बक्कळ पैसा मिळाला की आमच्या या गावात चौसोपी वाडा बांधून रहायची स्वप्नं मी अजूनही पहातेच की!

तर मूळ मुद्दा पांढर. गावभर पांढरच पांढर. हव्वी तेवढी तपासा, वरवर उकरून बघा. छोटीशी दीड एकराचीच आहे. तपासायला, शोधाशोध करायला आणि तांत्रिक मोजमापं घ्यायला फारसा वेळ लागला नाही.
इथेही मोठ्या प्रमाणात सातवाहनकालीन खापरं मिळतात. आणि मध्ययुगीनही. पण यादवकालीन मंदिर, मूर्ती असं काहीच नाही. नाही म्हणायला गावच्या हद्दीबाहेर एका चौथर्‍यावर एक वीरगळ. त्याला भंडारा-फुलं वाहून पूजा केलेली दिसली. इतके शेकड्याने वीरगळ बघितलेत पण त्याची पूजा प्रथमच पहात होते. गावकर्‍यांनी सांगितलं की इथे रामोश्याचं एकच घर आहे आणि हा दगड त्यांच्या पूर्वजाची समाधी आहे. अंगावर सर्रकन काटा आला. वीरगळ म्हणजे लढाईत किंवा चकमकीत मारल्या गेलेल्या वीराची स्मृतिशिला, समाधी - साधारण ८०० ते १००० वर्षांपूर्वीची - हे मला आर्किऑलॉजिस्ट म्हणून चांगलंच माहिती आहे. पण बहुतेक सगळा ग्रामीण समाज या बाबतीत अनभिज्ञ असतो. काहीतरी कोरलेले दगड म्हणून देवळाला टेकू देऊन ठेवलेले असतात. आजपर्यंतच्या (आणि नंतरच्याही) भटकंतीत मौखिक परंपरेतून आलेला वीरगळाचा हा अर्थ, हा उल्लेख एकमेव. आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा.

या सगळ्याचे तपशीलवार फोटो काढले. निग्रहाने चहाला नाही म्हटलं. आणि मोटरसायकलवर टांग टाकून परतीची वाट पकडली. दुपारचे तीनच वाजले होते. यावर्षीचं काम ठरवल्याप्रमाणे वेळेत आणि व्यवस्थित पार पडलं म्हणून जिवाला निवांतपणा आला होता. परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यावर येतो तसा रिकामपणा आला होता. खोलीवर जाऊन अहवाललेखन, हिशोब, आवराआवरी, निरोपानिरोपी करायची होती. पुढच्या वर्षीचा पडाव दुसर्‍या बंदराला जाऊन थडकणार. परत इथे कधी येणं होईल माहित नाही. ही बारमाही नदी, तिच्य उपनद्या, तिचं खोरं साथीला असेलच पण हा भूप्रदेश नसेल. रहातील फक्त निवडून घेतलेले पुरावशेष, त्यांच्या नोंदी, काही लोकांशी जडलेली जिव्हाळ्याची नाती आणि माझ्या मनात उमटलेली या गाव-शिवारांची, लोकांची असंख्य छायाचित्रं आणि आठवणी.

(हा लेख माहेर दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झालेल्या लेखाचा उत्तरार्ध आहे. इथे त्याची 'अनकट व्हर्शन' देत आहे. पुनर्प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर संपादक मंडळाची आभारी आहे.)

ही लेखमालिका इथेच संपवत आहे. हे लिहायला सुरुवात केली तेव्हा इतकं सारं लिहेन आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला फुटकळ का होईना लेखकू करण्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि माबोचे मनःपूर्वक आभार. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वरदा.. तुझ्या कार्यक्षेत्राची, लिखाणाची मै पुरानी फॅन हूँ ..

खूप एंजॉय केला हा लेख ही Happy

बरेच दिवसांनंतर आलेल्या लेखाचे स्वागत आणि असे अजून लेख घेऊन यावे म्हणून पुनरागमनायच असे आमंत्रणही Happy

तुझ्या लेखातला 'ह्युमन टच' एकदम प्रसन्न असतो.
माणसाचं पूर्वजांची नाळ पुरलेल्या मातीशी नातं इतकं सहजी तुटत नसतंच. विकून टाकलेल्या घराच्या एका जुन्या बखळीशिवाय आमचं तिथे काहीच नाही, आता नातेवाईकही नाहीत. आयुष्यात कधी बक्कळ पैसा मिळाला की आमच्या या गावात चौसोपी वाडा बांधून रहायची स्वप्नं मी अजूनही पहातेच की!>>> अगदी अगदी, या सुट्टीत मीदेखील हा अनुभव घेतला अगदी या वाड्याच्या स्वप्नासह!

खरंतर आणखी लिहिणं फार रीपीटिटिव्ह वाटायला लागलंय. कंटाळा आला. म्हणून इथेच आटपलं Happy

मला पुनरागमनायच असं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद!

एका वेगळ्या क्षेत्राबद्द्ल महिती झाली. लेख आधी वाचला होता. पण परत वाचताना तेवढीच मजा आली. अजून लिहीण्याची विनंती आहे.

भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांबद्दल लिही, वर आगावूने म्हटलेल्या त्या 'ह्युमन टच' ला वाढव जरा म्हणजे पुनरावृत्ती वाटणार नाही...हाकानाका Happy
पण लिहीत रहा

मस्त. तुझ्यासोबत सफर करून आल्यासारखं वाटलं वाचल्यावर >> ++

सगळ डोळ्यासमोर दिसलं शेत, पडके अवशेष आणि स्पेशल चा. लिहित रहा.

तुम्हाला एकदा एक फोटू लावलाय अँजेलिना जोली चा. आमच्या ड्रीमातली शिनुमा पुरातत्व शास्त्रीण Proud .
मस्त लिहिलंय. लेखमाला संपवलीत हे वाचून वाईट वाटले.
सगळे चारी (plus 1) लेख वाचले पुन्हा एकदा. या लेखात थोडी पुनरावृत्ती झालीये, पण सगळ्यांनाच जुने वाचायचे असतील वा वाचतील असे नाही.

एक शंका. हुडे म्हणजे? वाडे-हुडे असा शब्दप्रयोग वाचण्यात आहे. पण तो भांडी बिंडी मधल्या बिंडी सारखा अर्थहिन असावा असं डोक्यात होतं.

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद!

हुडा म्हणजे बुरूज/ वॉचटॉवर. मी हिंडले त्या भागात असे मध्ययुगीन बुरूज बर्‍यापैकी दिसतात.

हो, पुनरावृत्ती झाली आहे हे खरं आहे कारण हा लेख स्वतंत्रपणे लिहिला होता. ती संपादित करायला हवी होती पण कंटाळा केला Happy

लेखमाला संपवायचं आणखी एक कारण म्हणजे माझे बरेचसे अनुभव/ त्यांचे पॅटर्न्स हे प्रातिनिधिकरित्या या चार-पाच लेखांमधून आले आहेत. बाकी दिवस हे याच प्रकारच्या अनुभवांचं व्हेरिएशन आहेत बहुतांशी..

याउप्पर कधी वाटलं तर लिहेनही, पण जसजसं नवं संशोधन करते आहे ते सोप्या रीतीने मराठीत आणायला जास्त आवडेल (म्हणजे एक अ‍ॅकेडेमिक आर्टिकल झालं की त्याचं सोपं करून एक मराठी ललित Wink )

बघू कितपत काय जमतंय!

वरदा, मस्त मस्त.
तुझ्या आधीच्या लेखांमध्ये (पूर्वी डिटेलमध्ये वाचले होते, आता परत चाळले) आणि आताही मध्ययुगीन आणि सातवाहनकालीन खापरं जास्त प्रमाणार मिळालेली दिसली. तुझ्या शोधामध्ये यादवकालीन खापरं मिळाली का? ही खापरं सापडणं अवघड असतं का? (विविध कारणांमुळे)

एकदा वेगवेगळे काळ आणि संस्कृती लिहाल का, म्हणजे कोणती संस्क्रूती किती जुनी असं कळेल आणि तुलना करायला सोपे जाईल.

तुमचं लिखाण खुप आवडतं. लेखमाला संपल्याचं दु:ख आहे.

मला आतनं सारखं वाटतंय की या गावात आणखी काहीतरी जुने अवशेष मिळायला हवेत.

हे वाक्य आवडलं तुमचं आता एखाद्या निष्णात डॉक्टरप्रमाणे झालं असणार. प्रदेश पाहताच सिक्स्थ सेन्स सांगणार येथे काय असेल Happy खरंच खुप भाग्यवान आहात Happy

हा भाग पण परत वाचायला मजा आली.
हे संशोधन चालूच राहणार, नवी गावे, नवे अनुभव.... आम्हालाही वाचायचेय. तेव्हा तो मालिका संपवण्याचा उल्लेख काढून टाकावा !

वरदा, पहिले तीन भाग पहिल्यांदा वाचले त्याला ३-४ वर्षं होऊन गेली असतील, कदाचित जास्तही. तेव्हा वाचताना काय वाटलं होतं ते आत्त्त्ताही नीट आठवतंय... हा भाग वाचूनही तसंच वाटलं... मालिका संपली याची हुरहुर आहेच..

पुढील कामासाठी खूप शुभेच्छा... Happy

मस्त ग वरदा! पुन्हा वाचतानाही खूप इंटरेस्टींग वाटला. वर्षातून बरेच महिने या अवशेषांचं विश्लेषण, अभ्यास करण्यात घालवतेस, त्यातून नेमकं काय काय निष्पन्न होत असतं यावरही काही लिहिलस तर आवडेल वाचायला. अर्थात लिहिण्यात वेळ जातो तो अभ्यासकांना नकोसा वाटत असतो याचीही जाणीव आहे. पुढे मागे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाची अपेक्षा मात्र आहे तुझ्याकडून. मनावर घे. सहज आणि छान शैली आहे तुझ्याकडे.

शर्मिला, रेंगाळलेलं थीसिसचं काम संपलं की त्याचं मराठीत एक पुस्तक करायचं डोक्यात आहे. ललित नाही पण सर्वांना सहज समजेल अशा भाषेत त्या भागाचा इतिहास.
दुसरं म्हणजे एक-दोन विषयांवर टेक्स्टबुक्स लिहायचा बेत आहे. मराठीत एमे लेव्हलसाठी उत्तम पाठ्यपुस्तकं आहेत पण आता हळूहळू कालबाह्य झाली आहेत. काही विषयांवर कधीच मराठीत लिखाण झालेलं नाही... हे सगळे बुडित धंदे खात्यातलं प्रकरण आहे हे मला माहित आहे पण तरीही लिहायचं आहेच.

या सगळ्यात असलेला सर्वात मोठ्ठा अडथळा म्हणजे मला असलेला लिखाणाचा मनस्वी कंटाळा आणि आळस!!!! Proud त्यावर मात करायचे उपाय करून थकले...

सध्या वेळ आहे म्हणून जुन्या लेखांचं खोदकाम करून वाचन करते आहे. गेल्या २-३ दिवसांत तुझी ही सगळी लेखमालिका पुन्हा वाचली. एक warmth आहे तुझ्या सगळ्या लेखनात.

वरदा, मी पण हल्लीच हे तुझे लेख वाचायला घेतले. हा शेवटचा राहिलेला. आज वर आलेला पाहून आठवलं आणि वाचून काढला आत्ता. खूपच मस्त लेखमाला वाचायला मिळाली. हे सर्व म्हणजे आमच्या सारख्यांना एक वेगळीच दुनिया! एका नविन प्रांताची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!