माणसं वाचताना..............१) क्लारा

Submitted by मानुषी on 1 February, 2014 - 07:52

अमेरिकेतल्या मुक्कामात लेकीबरोबर फिरताना, तिच्या मित्र परिवारातल्या काही स्त्रियांशी माझा अगदी जवळून परिचय झाला. प्रत्येकीचं व्यक्तिमत्व, वंश, नॅशनॅलिटी, वय, रंगरूप, त्या जिथून आल्या ती परिस्थिती…… इ. प्रत्येक गोष्टीत बरीच भिन्नता होती. पण यातल्या काही स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे माझ्या मनावर कायमचे ठसे उमटले. माणसं वाचता वाचता आलेले हे काही अनुभव!
1) क्लारा

"जीपीएस" ला अ‍ॅड्रेस फ़ीड केला. आणि आम्ही दोघी क्लाराच्या घराच्या दिशेने निघालो.
"आई, आम्ही जर ऑफिसमधून कुठे लंचला जाणारा असू, तर मी, ठरवलेल्या ठिकाणी तीन मिनिटे आधीच पोचते. कारण जर तीन मिनिटे जरी उशीर झाला तर क्लारा आधीच तिथे पोचलेली असते आणि मग माझ्याकडे रागावल्याच्या आविर्भावात बघत मनगटावरचं घड्याळ बघ्ते." लेक सांगत होती. "आणि मी म्हटलं ना तुला …… आम्हाला ज्या प्रोजेक्टबद्दल अ‍ॅवॉर्ड मिळालं, त्यात मी, क्लारा आणि लिंडा अश्या तीघींनीच तो प्रोजेक्ट लीड केला होता. खरं म्हणजे क्लारा तेव्हा इतकी डिप्रेस्ड होती, पण तिने खाजगी बाबींचा परिणाम ऑफिसमधल्या गोष्टींवर कधीच होऊ दिला नाही!"
आम्ही क्लाराच्या घराजवळ पोचेपर्यंत बर्फ पडायला सुरवात झाली होती.
क्लाराच्या घराजवळ पोचल्यावर लेकीने तिला फ़ोन केला, तर क्लारा बाहेर गेलेली होती.
तिने आम्हाला तिथेच थांबायला सांगितलं. पण बोलणं संपेपर्यंत आमच्या कारच्या पुढे एक मोठी एसयूव्ही थांबली. (दिलेली वेळ न पाळ्णारी क्लारा नव्हेच!)आणि त्यातून एक जोडपं बाहेर पडलं. ते क्लारा आणि पीटर होते.
पीटरच्या हातात बाळाची बास्केट(कार सीट) होती.
गाडीतून उतरल्यावर दोघी मैत्रीणींची एक घट्ट गळाभेट झाली. मग माझ्याशी ओळख झाल्यावर क्लारा…"हाय मॉमी, हाऊ आर यू?" म्हणत माझ्याही गळ्यात पडली.
पीटरने मात्र अगदी अदबीने, "हाय, हाऊ आर यू? नाइस टु मीट यू." म्हणत माझ्याशी हात मिळवला.
क्लारा ही कृष्णवर्णीय आणि चांगली धिप्पाड . तरीही चेहेऱ्यावर कोवळीक आणि गोडवाही! वय साधारण बेचाळीसच्या आसपास. डोक्यावरच्या केसांच्या अगणित बारीक बारीक वेण्या वळल्यामुळे माथ्यावर मधे मधे अगदी टक्कल पडल्याप्रमाणे त्वचा उघडी पडलेली. पण अर्थातच इथल्या कृष्णवर्णीय स्त्रीयांमध्ये हे अगदीच कॉमन, पॉप्युलर आणि फॅशनेबलही.
पीटर सम्पूर्णपणे श्वेतवर्णीय आणि देखणाही! तोही पंचेचाळीस ते पन्नासचा असावा.
यांचं बंगलीवजा घर, छोटंसं टुमदार आणि उतरत्या छपराचं. ज्याला इकडे "सिंगल फॅमिली हाऊस" म्हणतात. घरासभोवार थोडी मोकळी जागा, पण आत्ता झालेल्या सततच्या हिमवर्षावामुळे बर्फाने भरलेली. मुख्य रस्त्यापासून घरापर्यंत गेलेली छोटीशी नागमोडी फरसबंदी. घराच्या पुढे मागे दोन तीन मोठे वॄक्ष.
बास्केटमधलं बाळ (मुलगी) झोपलेलं. आम्ही सगळे घरात गेलो.
तेवढ्यात बाळ उठलं. पीटर पटकन पुढे झाला आणि त्याने बाळाला उचलून छातीशी धरलं आणि तो बाळाशी बोबडं बोबडं काहीबाही बोलत राहिला.

क्लाराचं बाळ बघायला जायचं म्हटल्यावर माझ्या भिडस्त स्वभावानुसार मला जरा वाटलं की बाळ अगदी छोटं आणि ही मंडळी एवढ्यातच या नवीन घरात रहायला आलेली.…… आपण त्यांना डिस्टर्ब तर नाही ना करत? बाळ तीन महिन्यांचं म्हणजे तशी क्लाराही (आमच्या हिशोबाने) बाळंतीणच!
त्यात आधी एक वाजता जायचं ठरलेलं …. मग पुन्हा क्लाराचा मेसेज आला की एकच्या ऐवजी दोनला या. मग तर मला जाणं कॅन्सल करावं का? असंच वाटायला लागलं होतं.
आम्ही क्लाराकडे द्यायला एक टिपिकल इंडियन मणीजडित पर्स, खजूर आणि ड्रायफ्रुट्सचं होममेड फज आणि तिळगुळाच्या वड्या असं बरोबर घेतलं होतं.
संक्रांत नुक्तीच झालेली आणि अजून रथसप्तमीला बराच अवकाश होता. त्यामुळे इंडियन स्टोअर्समधून तीळ, गूळ वगैरे सामान आणून वड्या करून ठेवलेल्या होत्या........ लेकीच्या ऑफिसमध्ये देण्यासाठी .
असो…. पण भिडस्त स्वभावानुसार आधी आलेल्या सगळ्या शंका या दांपत्याच्या लाघवी वागण्याने दूर झाल्या.
आणि एकदा माझी दोघांची नीट ओळख झाल्यावर मात्र मग गप्पा रंगल्या. आधी क्लाराने आम्हाला घर दाखवलं. खूप सुंदर सजवलं होतं. अगदी कमी जागेत, होत्या त्या जागेचं फार सुंदर नियोजन, व्यवस्थापन केलेंलं होतं. भिंतींवरच्या फ़्रेम्समधल्या कलाकृतींवरची, रंगसंगतीतली आफ्रिकन छाप जाणवत होती.

क्लारा ही लेकीची ऑफिसातली कलीग. लेक मला तिच्या ऑफिसात घेऊन गेली होती तेव्हा फक्त ही क्लाराच भेटली नव्ह्ती. कारण ती सध्या बाळंतपणाच्या रजेवर आहे.
तिच्याशी गप्पा मारताना तिचं इंग्रजी खूपच सॉफ्ट म्हणजे फ्रेंचच्या वळणाने जाणारं वाटलं. तर अंदाज बरोबर निघाला. क्लारा मूळची "गिनी" या देशातली. म्हणूनच तिच्या इंग्रजीला फ्रेंचचा सुगंध येत होता.
बाकी स्वता:बद्दलच्या बऱ्याच गोष्टी बोलता बोलता क्लाराने स्वत:च अगदी मोकळेपणाने सांगितल्या. काही गोष्टी लेकीकडून समजल्या होत्या.

तिचे आई वडील आणि इतर बहुतेक सगळे नातेवाईक गिनी या देशातच आहेत. मात्र एका बहीण मात्र अमेरिकेतच याच गावात आहे.
गंमत म्हणजे दोघी बहीणींची बाळंतपणं करायला आई गिनीहून इथे जवळजवळ ७/८ महिने राहून नुक्तीच परत गेली होती. लगेच पीटरने अगदी कौतुकाने सेलफ़ोनातला दोन्ही बाळांचा (मावसबहीणी) सारखे कपडे घातलेला फ़ोटोही दाखवला.
इतक्यात......बाळ बास्केटमध्ये परत झोपलं. मग दोघी मैत्रिणींच्या किचन ओट्यापाशीच ऑफिसच्या गप्पा सुरू झाल्या.
लेक क्लाराला ऑफिसातल्या लेटेस्ट अपडेट्स देत होती. थोडं गर्ली गॉसिप …… अमकीतमकीला काही लायकी नसताना प्रमोशन, सगळ्यांच्या आवडत्या मेनेजरची अचानक हाकालपट्टी .........इ.इ.
एकीकडे पीटरने आम्हाला काय हवं नको चौकशी करून कपाटातून ग्लास काढता काढता माझ्याशी गप्पा सुरू केल्या. फ़्रीजमधून ज्यूसची बाटली काढली. आमचे ग्लास भरले. एकीकडे त्याने भराभर फळं कापली. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चीजचे चांगले मोठाले चार पाच तुकडे आणि सुरी माझ्यापुढे ठेवले.
हे चीज त्याने खास स्विझरलन्डहून आणलं होतं. तसं त्याने मला सांगितलं आणि चीज खाऊन बघण्याचा आग्रहही केला. फळं अगदी ताजी, रसाळ आणि चीज खरंच फार चविष्ट होतं.
तो स्वतः मूळचा केनडातल्या व्हेंकुव्हर या शहरातला. १०/१२ वर्षापूर्वी इथे अमेरिकेत आलेला.
अत्यंत मृदुभाषी आणि सभ्य गृहस्थ असावासं वाटलं. गप्पागप्पात माझीही माहिती तो विचारत होता. भारताबद्दलही आपलेपणाने चौकशी करत होता.

इकडे क्लारा मी दिलेले पदार्थांचे बॉकसेस उघडण्यात गुंतलेली.
मी नेलेले पदार्थ....."मॉमी… मी हे खाऊन बघू का लगेच?" म्हणत क्लाराने आधी नवर्‍याच्या पुढे केले. दोघांनाही ते खूपच आवडले. गंमत म्हणजे पीटरला तिळाच्या वड्या खूप आवडल्या.
यात काय घातलंय ……. अशी चौकशीही त्याने केली. तर त्यांना तीळ माहिती होते. पण त्यांना गूळ (jaggery) माहिती नव्हता.
मग गूळ कश्यापासून, कसा बनतो हे सांगितल्यावर दोघांच्याही लक्षात आलं असावसं वाटलं.
क्लारा लगोलग मी दिलेली पर्स काखोटीला मारून पटकन समोरच असलेल्या आरश्यातही बघून आली. नंतर पीटरसमोर उभी राहून म्हणाली,"Look baby...how beautiful it looks on me!"
पीटरनेही हसून मान डोलावली.

आम्हाला घर दाखवतानाच एका खोलीचा उल्लेख…… "ही मुलांची रूम" असा केला. आणि अगदी सहजतेने मला म्हणाली, "Mommy, I have two sons from my previous husband".

क्लाराची तिच्या पहिल्या नवऱ्याने बरीच फ़सवणूक केली होती. एकीकडे मुलं मोठी होता होती आणि तो दुसऱ्याच एका स्त्रीत गुंतला होता. पैशाच्या गैरव्यवहारातही कुठे तरी गुंतलेला!
आधी क्लारा खूपच ढासळली. अगदी डिप्रेशनमधेच गेली होती. पण मग तिने स्वत:ला सावरलं. आणि मग रीतसर घटस्फोट घेऊन आपलं आयुष्य त्याच्यापासून सम्पूर्णपणे वेगळं केलं. आर्थिक, सामाजिक, भावनिक फारकत! यासाठीही तिला तिच्या पहिल्या नवऱ्याने फार त्रास दिला. पण तिने निर्धारच केला होता.
आणि त्याप्रमाणे तिने लढा देऊन स्वत: चे सगळे हक्क अधिकार परत मिळवले. आणि आणि नशिबाला दोष देत रडत न बसता आपलं जीवन सुकर केलं.

इथल्या मेच मेकिंग वेब साईटवर स्वता:चं नाव पुन्हा नव्याने रजिस्टर करून पुन्हा नव्याने जोडीदाराच्या शोधात निघाली. खूप मुलांना(?!) भेटत राहिली. कारण या वेळी तिला चान्स घ्यायचा नव्हता.
सगळा रिसर्च अगदी काळजीपूर्वक करून, स्वता:च्या जबाबदारीवर तिने पीटरला आपला जोडीदार म्हणून निवडला. दोघांनी लग्न केलं आणि वर्षभरातच त्यांच्या लेकीचा जन्म झाला.
पहिल्या नवऱ्याने आणि तिने मिळून जे घर घेतलं होतं, त्यातले तिचे पैसेही तिने परत काढून घेतले होते.
तीच रक्कम इकडे या घरात गुंतवली, अर्थातच पीटरनेही निम्मी रक्कम गुंतवली. आणि हे घर दोघांनी मिळून घेतलं .........

आम्ही चीज आणि फळांचा आस्वाद घेता घेता एकीकडे हळूहळू निघण्याचाही विचार करत होतो.
पण क्लाराचा काही वेगळाच बेत दिसत होता. बोलता बोलता तिने जेवणाचं टेबल लावायला सुरवात केली. टेबल मॅट्स मांडल्या. प्लेट्स, काटे सुऱ्या सगळं काही साग्रसंगीत. आम्हां दोघींची पुन्हा निघण्यासाठी चुळबुळ सुरू! मग मात्र मी लेकीला चक्क मराठीतच ………आता जरा निघायचं बघूया…… असं मोठ्यांदाच सांगितलं.
पण क्लाराने आम्हाला बोलण्यात गुंगवून आम्हाला जेवायलाच घालायचा घाट घातला होता.
माझ्या लेकीने तिला आम्ही आता निघतोय असं ......काही सुचविण्याचा प्रयत्न केला तर तिने स्वता:च्या सिनिऑरिटीचा योग्य वेळी फायदा घेत लेकीवर डोळे वटारले आणि मोठा आवाज काढून म्हणाली …… नो आर्ग्युमेंटस!
लेक हसत हसत म्हणाली, "आई, now you must have realised how she bullies me in the office!"
आणि पुढे क्लारा जे काही बोलली ते मला इतकं परिचित आणि भारतीय वाटलं !
"मॉमी माझ्या बाळाला आशीर्वाद द्यायला आलीये …… इतक्या लांबून…… आणि मी तिला तसंच पाठवू? ही कुठली पद्धत?"असं म्हणून तिने टाळ्या वाजवून आमचं लक्ष वेधून घेतलं आणि ती पुढे म्हणाली,"चला…. जेवण तयार आहे"
आणि आता हे असं ! आमचा आवाज बंद! नो अपील!
मग आम्ही सगळे जेवायला बसलो. काही पदार्थ सामिष असल्याने त्यासाठी मी तिची माफ़ी मागितली आणि जेवढं जमलं, .... तेवढा तिच्या आदरातिथ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

मग तिने आम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तिच्या नव्या सोफ़्याची डिलिव्हरी द्यायला काही लोक सोफा सेट घेऊन आले. याच संधीचा आम्ही फायदा घेतला आणि पटकन उठलो.
तिने उत्साहाने आम्हाला आपल्या घरातली नवी अ‍ॅडिशन दाखवली. घरातल्या इतर डेकोरेशनला हा सोफा सेट कसा छान मॅच होतोय त्यावर दोघी मैत्रिणींची थोडी चर्चा झाली.

मग मात्र आम्ही त्या कुटुंबाचा निरोप घेतला. या लाघवी दाम्पत्याचा निरोप घेताना त्यांच्या अनौपचारिक आदरातिथ्यामुळे निघताना मला अगदी एखाद्या खूप जुन्या ओळखीच्या कुटुंबाचा निरोप घेतोयसं वाटलं.
असंही वाटलं …… जगाच्या पाठीवर कुठेही जा, आदरातिथ्याची आणि सुगृहिणी ची व्याख्या काही बदलत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhaan lihiley. aaNakhee savistar lihaayalaa have hote. mhaNaje nemake vyaktimatv ubhe raahile asate.

विजय देशमुख, सुरेश शिंदे, अभिषेक, मामी, स्वाती सर्वांना धन्यवाद!
वर्षू.....इतके गोड प्रतिसाद मिळाले तर क्रमशः येण्याचा धोका संभवतो!

गोड, गोड,गोड, गोड,गोड, गोड,गोड, गोड,गोड, गोड,गोड, गोड,गोड, गोड....
म्हणे असे गोड गोड प्रतिसाद आले तर अजून माणसे भेटणारेत;)

मस्तच लिहिलंय, अजून येऊदे ....:)

आवडलं.. आणखी लिहा नक्कीच. आपल्यातल्या खुणा जगभरातल्या माणसांच्यात शोधणं इंटेरेस्टिंग आहे खुप.

माधव अनघा प्राची सई
सर्वांना धन्यवाद. सई....<<<<< आपल्यातल्या खुणा जगभरातल्या माणसांच्यात शोधणं इंटेरेस्टिंग आहे खुप.>>>>>
हं आपण हेच करतो. पण आत्ता तू लिहिल्यावर ते जाण्वलं आणि अगदी पटलं.

खुप छान लिहीले आहे. आपल्याला अशी बरीच माणसे भेटत असतात पण त्यांना असे शब्दातुन मांडणे सगळ्यांनाच जमत नाही. तुम्ही ते खुप अगदी छान मांडले आहे.

खूप छान लिहिलं आहेस. क्लारा अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली. अशीच अजून वाचलेली माणसं आम्हाला पण भेटू देत! Happy