धोका फार आहे

Submitted by निशिकांत on 31 January, 2014 - 01:23

लावलेली खंजिराला धार आहे
आपुल्यापासून धोका फार आहे

ऊब मायेची कुठेही सापडेना
चालला चोहीकडे व्यापार आहे

भाजणे पोळ्या चितेवर आपुल्यांच्या
हेच आता संस्कृतीचे सार आहे

अल्पसंतुषटी अशी की पोट भरता!
स्वप्न झाले वाटते साकार आहे

सासरा, काका असो वा दीर घरचा
ग्रस्त भीतीने बिचारी नार आहे

बुध्दिवाद्यांनो चिडा अन्याय बघुनी
लेखणी हातातली तलवार आहे

कोडगा झालो, न कण्हतो वेदनांनी
संकटांचा जीवनी भडिमार आहे

थाट प्रेताचा किती तो अंत्ययात्री !
व्यर्थ जगलो ही खरी तक्रार आहे

ठेविले जैसे अनंते सांजवेळी
राहण्याचा अंतरी निर्धार आहे

वाटले "निशिकांत"ला नेता बनावे
घाण दिसता घेतली माघार आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पसंतुषटी अशी की पोट भरता!
स्वप्न झाले वाटते साकार आहे<<< वा वा

थाट प्रेताचा किती तो अंत्ययात्री !
व्यर्थ जगलो ही खरी तक्रार आहे<<< दुसरी ओळ मस्त!

(तुमच्या गझलांमध्ये सामाजिक विषयांची रेलचेल असते, पण मांडणीमागे तुमचा एक परिपक्व व साध्या स्वभावाचा चेहरा दिसत राहतो, असे निरिक्षण नोंदवावेसे वाटले).