उजाडल्यापासून झोपेपर्यंत की जन्मल्यापासून मरेपर्यंत?

Submitted by ट्यागो on 27 January, 2014 - 03:33

कसले ते दिवस
संघम चड्डीम कवायती
काठ्या फिरवत टकल्याला शिव्या द्यायच्या
किंवा
ढापण्याने देशाची वाट लावली म्हणत 'पूर्णपुरषोत्तमाचे' कायदे आळवायचे
बापही हसायचा मग
कौतुक करत दाही दिशा गडगडायचा

आजही घरोघरी पाजले जाते हे 'अमृत'
रंगात रंगवली जाते जात
धर्म
तुझा रंग कोणता हिरवा की निळा की भगवाच
ब्रेड खातोस की तूप की दहा नंबर
करतोस हवन की मानतोस रावण

माझ्या त्वचेवर घट्ट जमते साय जातीची
९६ कुळ
ब्राह्मणी शिक्का हवाच
मग म्हणून मी वाटेल तितक्या द्याव्यातच देणग्या
फाडाव्यात पावत्या
गणेश-देवी-अय्यपा-दत्त-शिवाजी-आंबेडकर इत्यादी इत्यादी मंडळांच्या
करावी चूल बंद एक दिवस
अन् लावावी रांग भंडाऱ्याला बायाकापोरांसकट

नायतर
दर मंडळात असतो एखादा टग्या
रोज त्याच पान टपरीवर गुटखा खात उभा असलेला
पण सर्वधर्मसमभावाप्रमाणे येतोच प्रत्येक मंडळासोबत पावती फाडायला
तुमची बिशाद नसते नाही म्हणायची
नायतर 'आय झवलीच' म्हणून समजा
उपटत नाही कुणी 'शष्प' ही यांचे
कारण यांच्या मालकाला दिलेले असते 'व्होट' आपणच कधीतरी

कधीतरी यातलाच एखादा करतो 'शुक-शुक'
आपल्याच बायका-पोरींना
कुणीतरी मोठ्ठा टिळेवाला पडतो मध्ये
उद्यापासून तोच असतो मग आपला साहेब
नव्या टग्यांसह

मग जुने-नवे टगे येतात एकत्र
सगळेच टगे
जास्तीत-जास्त टगे
टग्या-टग्या मिळून टिळेवाला
टिळ्या-टिळ्या टाळीवाला
टाळीवाला फक्त टाळी वाजवतो
काम टिळे अन् टगे करतात

टगे-टिळे-टाळी यांच्या टोळ्या फोफावतात
वाढतात
भरपूर वेळ असल्याने 'वेल' वाढतो
कुणालाच नसते घेणे
'पोट-चोटाचे' उद्योग की हे पहायचे

हेच असतात हिश्शेदार
रस्ते-बिल्डिंगींपासून ‘विकासखायचे’
यांच्या पर्सेंटेजवर पोसली जाते एक अखंड बांडगूळ जमात
जी वाढते पोसते तुमच्या-माझ्या घामावर
बुरशीसारखी

पण तरीही तुमची बिशाद नसते दुर्लक्ष करायची
'आपले आपण' बघायची
तुमच्या सगळ्याच गोष्टींवर असतो यांचा हक्क
यांच्या नियामांवरच असते चालायचे वाकायचे झुकायचे

कधीतरी तुम्हालाही वाटते व्हावे टाळीवाला
किंवा टिळेवाला
पण त्यासाठी टग्या व्हायचं विसरतो आपण
किंवा जन्मच चुकतो एखाद्या टिळेवाल्यापोटी

मयूरेश चव्हाण, मुंबई.
०६.१२.२०१३. ०३.२५.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टकल्या, ढापण्या हे नसतं तर सर्वाना आवडली असती.....अस मला वाटतं.
आपली ""अक्का अ‍ॅलिस आणि मी""आवडली होतिच.