"आकर्षण "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 January, 2014 - 10:53

दु:खाग्नी ना शमतो,त्याला कारण असते
दु:ख जाळण्या आठवणींचे सरपण असते

मी दक्षिण टोकावर ,तू उत्तर टोकावर
विजातीय ध्रुवांत किती आकर्षण असते

हिरा जाहला असता या दगडाचा सुद्धा
तुझ्या कपाळाचे जर त्याला कोंदण असते

बरी गरीबी नको अशी श्रीमंती जेथे
पैसा पुष्कळ पण प्रेमाची चणचण असते.

कर्ज काय "कैलास" फेडले दोन तपांचे
तुझ्या घराचे हसरे हल्ली अंगण असते

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दक्षिण टोकावर ,तू उत्तर टोकावर
विजातीय ध्रुवांत किती आकर्षण असते..........वा वा वा

हिरा जाहला असता या दगडाचा सुद्धा
तुझ्या कपाळाचे जर त्याला कोंदण असते....क्या बात !!

बरी गरीबी नको अशी श्रीमंती जेथे
पैसा पुष्कळ पण प्रेमाची चणचण असते......ये ब्बात !

समीर आणि भूषणजी....तुम्ही दोघे नेहमीच चकित करता...

तुमच्या साहित्यिक जाणीपुढे हा बालक अक्षरशः नतमस्तक आहे.

---/\---

सर्व प्रतिसादकान्चा आभारी आहे.

मलाही हाच शेर सर्वाधिक आवडला ..>>तुझ्या घराचे हसरे हल्ली अंगण असते<<.. प्रत्यक्षात जगून पाहिलेला शेर !!

धृवांत <<< .. लयीसाठी ध्रूवांत असे वाचावे लागत आहे (मलातरी). म्हणून एक मात्रा अजून हवी असे मला वाटते(वै.म.) (पण बदलही जवळपास अशक्य आहे ह्याचीही जाणीव आहेच )
इतर शेरही छानच आहेत आवडले

कर्ज काय "कैलास" फेडले दोन तपांचे
तुझ्या घराचे हसरे हल्ली अंगण असते <<व्वावा

मी दक्षिण टोकावर ,तू उत्तर टोकावर
विजातीय ध्रुवांत किती आकर्षण असते << हा ही फार आवडला