यडपट राजू (भाग-२)

Submitted by संतोष वाटपाडे on 23 January, 2014 - 22:13

यडपट राजू जेव्हा भक्ति देशावरची दावायाचा,
वृक्षलतांना जाता येता मुजरा वाकून घालायाचा....

सुभाषबाबू येतील माझे हसून नेहमी सांगायाचा
गावामधल्या वेशीवरती फ़ूलमाळा तो टांगायाचा....

अनेक वेळा अनेक गल्ल्या एकटाच तो झाडायाचा
काटेगवत कुठे उगवले स्वतः हाताने तोडायाचा....

फ़िरंग्यानो भारत सोडा बोलत राजू धावायाचा
भाळावरती रंग केसरी क्रांतीसाठी लावायाचा....

गावामधल्या म्हातार्‍यांना उगाच पाणी वाटायाचा,
तिथे कदाचित त्याला देश कळवळणारा वाटायाचा....

मंदिरातल्या सार्‍या घंट्या रोज पहाटे वाजवताना,
देव झोपला असेल त्याला हलवून हळूच उठवायाचा.....

हाती तिरंगा झेंडा घेऊन राजू जेव्हा चालायाचा
सारा गाव मिळून त्याला काहीबाही बोलायाचा......

कसली लज्जा नव्हती त्याला सर्वांसाठी धावायाचा,
स्वतंत्र होईल माझा भारत अशा आरोळ्या ठोकायाचा....

यडपट राजू रात्री नुसता खडकावरती झोपायाचा,
थकून निजलेल्या धरतीचे पाय हाताने दाबायाचा.....

संतोष वाटपाडे(नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users