शल्य टोचले कधीच नाही

Submitted by निशिकांत on 23 January, 2014 - 00:20

स्फुल्लिंगावर राख एवढी, रान पेटले कधीच नाही
जीवन जगलो पिंजर्‍यातले, शल्य टोचले कधीच नाही

"कष्ट करोनी पोट भरावे" कसेबसे हे शक्य जाहले
क्षितिजाच्याही पुढे जगावे असे वाटले कधीच बाही

स्फुरण पावती बाहू ज्यांचे त्या योध्द्यांची जिद्द आगळी
दान करोनी कवच कुंडले युध्द टाळले कधीच नाही

जन्मपत्रिका जुळल्या नव्हत्या, एकाला मंगळही होता
पेम भावना उदात्त इतकी, कुणी भांडले कधीच नाही

प्रवचनातुनी ज्ञान सांगणे पेशा झाला कैकजणांचा
जे सांगितले, स्वतः करावे, तत्व पाळले कधीच नाही

जन्म मरण या शापांमधले अंतर म्हणजे जीवन असते
तरी सुखाच्या मागे पळणे व्यर्थ भासले कधीच नाही

आठरा वर्षे सरण्याआधी प्रौढ वयाचे गुन्हे करावे
बाल बलात्कार्‍याला फाशी दिली, ऐकले कधीच नाही

संजय होता पत्रकार पण हळू बातम्या सांगत होता
न्यूज ब्रेकने धृतराष्ट्राचे पित्त खवळले कधीच नाही

प्रेम दावण्या ताजमहल का? "निशिकांता"ला कधी न कळले
अमर प्रेम कबरीत पुरावे मनास पटले कधीच नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह काका वाह
दिल खुश केलंत अगदी

मस्त जमीन अनेक खयाल निव्वळ ग्रेट शेरात सफाईदारपणा अगदी तुमच्या स्टाईलचा

जन्म मरण या शापांमधले अंतर म्हणजे जीवन असते<< माझ्यासाठी सर्वोत्तम ओळ !

अमर प्रेम कबरीत पुरावे मनास पटले कधीच नाही<< अगदी अगदी!!...नेहमीसारखाच अजून एक उत्तम मक्ता !!

धन्स काका धन्स

जन्म मरण या शापांमधले अंतर म्हणजे जीवन असते
तरी सुखाच्या मागे पळणे व्यर्थ भासले कधीच नाही

व्वा !! सुंदर

जन्मपत्रिका जुळल्या नव्हत्या, एकाला मंगळही होता
पेम भावना उदात्त इतकी, कुणी भांडले कधीच नाही<<< व्वा

स्फुल्लिंगावर राख एवढी, रान पेटले कधीच नाही
जीवन जगलो पिंजर्‍यातले, शल्य टोचले कधीच नाही<<< छानच

"कष्ट करोनी पोट भरावे" कसेबसे हे शक्य जाहले
क्षितिजाच्याही पुढे जगावे असे वाटले कधीच बाही<<< छान

जे सांगितले ते स्वतःने तत्व पाळले कधीच नाही<<< ह्या ओळीत एक मात्रा कमी पडत असावी (स्वतः या शब्दाच्या तीनच मात्रा होतात, 'स्वतहा' अश्या चार होत नाहीत).

प्रवचानातुनी <<< हा टायपो आहे की मात्रेसाठी प्रवचान केलेले आहे? टायपो असल्यास तेथेही एक मात्रा कमी पडेल असे वाटते.

इतिहासातील दाखले गझलेत योजण्याची तुमची शैली छान आहेच. मात्र मला एक असेही वाटते की ज्या मूडमध्ये मतला व एक दोन शेर होतात तो मूड कुठेतरी सांभाळला गेला तर (गझल ही स्वतंत्र कवितांची मालिका असूनही) अधिक मजा येते.

कृ गै न

-'बेफिकीर'!

जन्म मरण या शापांमधले अंतर म्हणजे जीवन असते
तरी सुखाच्या मागे पळणे व्यर्थ भासले कधीच नाही

व्वा.

मूड सांभाळण्याबाबत भूषणशी सहमत.

मनापासून अभार सर्वांचे प्रतिसादासाठी. भूषणजी आपण केलेली चिकित्सा नेहमीच मार्ग दाखवणारी असते आणि आजचीही तशीच आहे.
"जे सांगितले ते स्वतःने तत्व पाळले कधीच नाही<<< ह्या ओळीत एक मात्रा कमी पडत असावी (स्वतः या शब्दाच्या तीनच मात्रा होतात, 'स्वतहा' अश्या चार होत नाहीत). "
चूक कबूल. अशी दुरुस्ती करतोयः-
जे सांगितले, स्वतः करावे, तत्व पाळले कधीच नाही
"प्रवचानातुनी <<< हा टायपो आहे की मात्रेसाठी प्रवचान केलेले आहे? टायपो असल्यास तेथेही एक मात्रा कमी पडेल असे वाटते."
हा टायपो आहे. तो दुरुस्त केला तर ओळ दोषरहित होईल असे वटते. ती ऑळ अशी असेलः-
प्रवचनातुनी ज्ञान सांगणे पेशा झाला कैकजणांचा
बहुमुल्य मर्गदर्शनासाठी आभार भूषणजी.