एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४

Submitted by स्पार्टाकस on 19 January, 2014 - 23:37

 

टँगची पुढची टॉर्पेडो रूम अर्धवर्तुळाकार होती. नौसेनीक मॉमसेन लंग्ज चढवत असतानाच पॉल लार्सन आपल्या जखमी सहका-यांवर उपचार करण्यात मग्न होता. सुदैवाने टॉर्पेडो रुममध्ये त्याला जास्तीचं मेडीकल किट सापडलं होतं.

पाणबुडीतील हवा झपाट्याने दुषीत होत होती. दृष्यमानताही काही फूट अंतरापर्यंतच उरली होती. बॅट-यांमध्ये हळूहळू पाणी झिरपू लागलं होतं. इमर्जन्सी दिवेही मध्येच बंद पडू लागले होते.

लेफ्टनंट मेल एनॉसच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकली. कंट्रोल रूममध्ये पाणबुडीच्या तोफेकडे जाणारी हॅच उघडता आली तर बाहेर पडणं शक्यं होतं. एनॉसच्या या योजनेत सहभागी होण्यास टॉर्पेडो रूममधील सहा नौसेनीक तयार झाले.

एनॉसने कंट्रोल रुममध्ये जाणारं दार उघडलं मात्रं...

.. तुफान जोराने रबर जळल्याचा वास येणारा काळा धूर टॉर्पेडो रूममध्ये घुसला !

पाणबुडीच्या मागील भागात कुठेतरी नक्कीच आग लागली होती. घाईघाईतच एनॉसने दार बंद केलं, पण तोपर्यंत धुराने टॉर्पेडो रुम भरुन गेली होती ! आत आलेल्या धुराने आधीच दुषीत वातावरणात आणखीनच भर घातली होती. नौसेनीकांपैकी काही जणांना धूर असह्य झाल्याने त्यांनी जोरदार उलट्या केल्या होत्या ! काहींनी धुरामुळे गुदमरणं टाळाण्यासाठी मॉमसेन लंग्जच्या सहाय्याने श्वास घेण्यास सुरवात केली. मधलं दार उघडण्याचा निर्णय अधिकच घातकी ठरला होता.

पहाटेचे ३ वाजले होते.

अठ्ठावीस वर्षांच्या हॅन्स फ्लॅगनने सुटकेच्या प्रयत्नाचं नेतृत्वं स्वतःकडे घेतलं.

पाणबुडीतील अनेकजण मॉमसेन लंग्जच्या सहाय्याने सुटका होण्याबाबत साशंक होते. पाणबुडीला अपघात झाल्यास अथवा शत्रूच्या हल्ल्यास ती बळी पडल्यास नेमकं काय करावं याबद्दल नेहमी त्यांच्या चर्चा झडत असत. दुर्दैवाने आता ती वेळ येऊन ठेपली होती. त्यांच्यासमोर आता तीन पर्याय उपलब्ध होते.

मॉमसेन लंग्जच्या सहाय्याने एस्केप ट्रंकमधून निसटण्याचा प्रयत्न करणं,
ऑक्सीजनविना तडफडून मरण पत्करणं
अथवा
आपल्या कपाळाला रिव्हॉल्वर लावून सगळ्या यातनांतून सुटका करुन घेणं !

प्रत्येकाने स्वतःचा निर्णय घेण्याची वेळ आली होती !

एस्केप ट्रंकमधून बाहेर पडण्याबाबत अद्यापही कित्येक जण साशंक होते. काही जणांनी टॉर्पेडो ट्यूबमधून टॉर्पेडोप्रमाणे एकेकाला बाहेर सोडण्याचा विचार बोलून दाखवला. फ्लॅगननने त्याला ठाम नकार दिला. हवेच्या दाबातील फरकामुळे आणि बाहेर पडल्यावर पडणा-या पाण्याच्या दाबामुळे टॉर्पेडो ट्यूबमधून बाहेर पडल्यावर एका क्षणात मृत्यूने गाठण्याची शक्यता होती.

अखेर पहाटे ३.१५ च्या सुमाराला पहिल्या तुकडीतील चार नौसेनीक एस्केप ट्रंकमधून बाहेर पडण्यास सज्ज झाले. आता एक वेगळीच समस्या उभी राहीली. बाहेर पडण्याच्या दृष्टीने एस्केप ट्रंक उघडल्यावर त्यात पाणी भरणार होतं. पाणबुडीतील हवेच्या नियंत्रणाची यंत्रणा बंद पडल्यामुळे पुढील तुकडी निसटण्यापूर्वी या पाण्याचा निचरा करण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे टॉर्पेडो रूमच्यावर असलेली पाणबुडीच्या दोन आवरणांमधील चिंचोळी जागा !

दरम्यान जेम्स व्हाईटने एक वेगळीच कामगीरी केली होती. नौसेनीकांच्या मेसशेजारील शस्त्रागारातून त्याने कित्येक .४५ कॅलीबरची रिव्हॉल्वर्स आणि काडतूसं आणि काही खाद्यपदार्थ पैदा केले होते ! प्रत्येकाला त्याने कमरेला बांधण्यासाठी वेस्ट बेल्ट आणि रिव्हॉल्वर दिली. तसेच जलप्रतिबंधक आवरणात गुंडाळलेली काडतुसंही. फार्मोसा सामुद्रधुनीत शार्क्सचा सुळसुळाट होता ! टँगमधून निसटल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर जाताना आणि पोहोचल्यावरही शार्कचा हल्ला होण्याची शक्यता होती. शार्कच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी रिव्हॉल्वर आणि काही छोटे सुरे एवढीच साधनं त्यांना बरोबर नेता येणार होती.

सर्व तयारीनिशी एस्केप ट्रंकच्या दिशेने जाणा-या शिडीपाशी अनेकजण जमले होते. एस्केप ट्रंक अत्यंत सावधपणे आणि काळजीपूर्वक उघडावी लागणार होती. एक क्षुल्लकशी चूक टॉर्पेडो रुममधील सर्वजण सुटकेची कोणतीही संधी न मिळताच प्राणाला मुकण्यास कारणीभूत ठरु शकत होती.

टॉर्पेडो रुमच्या हॅचमधून एकावेळी चारजण एस्केप ट्रंकमध्ये शिरणार होते. ट्रंकमधे पाणबुडीच्या आतील आणि बाहेर समुद्राच्या पाण्यातील दाब आणि पाण्याची खोली दर्शवणारी यंत्रे होती. त्याच्या जोडीला मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्याची सोयही होती.

ट्रंकमध्ये शिरल्यावर समुद्राचं पाणी आत येण्याची यंत्रणा सुरु करण्यात येणार होती. ट्रंकमधील दाब समुद्राच्या दाबापेक्षा जास्त झाल्यावर पाणी झिरपणं थांबणार होतं. पाणी थांबताच सर्वात प्रथम पृष्ठभागावर जाणारी दिशा दर्शवण्यासाठि फुटबॉलच्या आकाराचा एक बुऑय सोडण्यात येणार होता. त्याला सुमारे पाचशे फूट लांबीची दोरी जोडलेली होती. या दोरीला दर दहा फूट अंतरावर गाठ मारलेली होती.

बुऑय सोडल्यावर बाहेरील हॅच उघडून एकेक माणूस दोरीच्या सहाय्याने बाहेर पडणार होता. पृष्ठभागाच्या दिशेने जाण्याचा आपला वेग मिनीटाला पन्नास फूटांपेक्षा जास्त न होऊ देणं अत्यावश्यक होतं. पाण्याचा दाब कमी कमी होताना ही धीम्यागतीची चढाई आवश्यक होती. अन्यथा तीव्र आकडी येण्याची शक्यता होती.

खोल पाण्यात रक्तात विरघळणा-या नायट्रोजनचं प्रमाण पृष्ठभागापेक्षा खूपच जास्तं असतं. पाण्याचा दाब अचानक कमी झाल्यास नायट्रोजनचे मोठेमोठे बुडबुडे रक्तात निर्माण होण्याची शक्यता असते. अर्थातच हे प्राणघातक ठरण्याची शक्यत असते.

१८० फूट खोलीवरुन पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी त्यांना तीन ते चार मिनीटाचा कालावधी लागणार होता. नेमकी खोली कळण्यासाठीच दोरीला दर दहा फूट अंतरावर गाठ मारलेली होती. प्रत्येक गाठीपाशी काही क्षण थांबून श्वासोच्छ्वास करावा आणि पुन्हा वर सरकावं अश्या त-हेने त्यांना वर जावं लागणार होतं.

एस्केप ट्रंगमधून चौथा माणूस बाहेर पडल्यावर तो ट्रंकच्या पृष्ठभागावर आघात करणार होता. हा संदेश मिळताच टॉर्पेडोरुममधून एका लिव्हरच्या सहाय्याने एस्केप ट्रंक बंद करण्यात येणार होती. मग दुस-या यंत्रणेच्या सहाय्याने एस्केप ट्रंकमधील पाणी पाणबुडीच्या दोन आवरणांतील जागेत सोडलं जाणार होतं आणि पुढची तुकडी ट्रंकमध्ये शिरणार होती.

ट्रंकमधून बाहेर पडणा-यांना टॉर्पेडो रुममधील आपल्या सहका-यांना संदेश देण्यासाठी बाहेरुन आघात करण्यापलीकडे पर्याय नव्हता. हा आवाज जपानी बोटींच्या सोनारवर टिपला जाण्याची दाट शक्यता होती. तसं झाल्यास टँगची नेमकी जागा त्यांना आयतीच समजणार होती. परंतु हा धोका पत्करण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता !

पहाटेचे ३.३० वाजले होते. पाणबुडी बुडाल्याला जवळपास तासभर झाला होता.

पहिल्या तुकडीतील नौसेनीकांनी एस्केप ट्रंकमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली. मेल एनॉस, बिल बेलींजर आणि जॉन फ्लूकरचा त्यात समावेश होता. चौथ्या माणसाऐवजी त्यांनी एक रबरी लाईफरॅफ्ट नेण्याचा निर्णय घेतला होता ! रॅफ्टच्या सहाय्याने तग धरण्याची जास्त शक्यता होती असं एनॉसचं मत होतं ! आपली ही योजना इतरांच्या गळी उतरवण्यात तो यशस्वी झाला होता.

एनॉस, बेलींजर आणि फ्लूकरने रॅफ्टसह एस्केप ट्रंकमध्ये प्रवेश केला. इतरांनी टॉर्पेडो रुममधून एस्केप ट्रंककडे जाणारी हॅच बंद केली.

एस्केप ट्रंकमध्ये तिघांनी काही क्षण चर्चा केली. प्रशिक्षणादरम्यान सामान्यतः छातीपर्यंत पाणी आल्यावर ट्रंकमधील पाण्याचा दाब बाहेरील दाबापेक्षा जास्तं होऊन ट्रंकमध्ये पाणी भरणं बंद होतं अशी त्यांना माहीती देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात पाणी भरणं थांबलं नाही तर ?

बेलींजरने पाणी आत आणणारी यंत्रणा सुरू केली. समुद्राचं पाणी ट्रंकमध्ये शिरण्यास सुरवात झाली. झपाट्याने चढत पाणी त्यांच्या कमरेपर्यंत पोहोचलं होतं ! काही वेळात पाणी छातीपाशी पोहोचलं. पुढे काय होणार या काळजीत ते असतानांच अचानक पाणी भरणं थांबलं !

एस्केप ट्रंकमधून बाहेर पडण्याची वेळ आली होती !

मेल एनॉस आतापर्यंतच्या तणावामुळे अधीर झाला होता. बाहेरील दार उघडताच बुऑयला दोरी बांधून सोडण्यापूर्वीच त्याने स्वतःला दारातून बाहेर झोकून दिलं !

एनॉसची घाई प्राणघातक ठरली !

एस्केप ट्रंकमधून बाहेर पडण्याची हॅच थेट समुद्रात न उघडता पाणबुडीचं बाहेरचं निकेल-स्टीलचं आवरण आणी डेकच्या दरम्यान उघडत होती ! बाहेर पडण्याची नेमकी दिशा दर्शवणारी बुऑयला जोडणारी मार्गदर्शक दोरी नसल्यास कोणीही अंधारात बाह्यावरण आणि डेकच्या मध्ये सापडून भरकटण्याची शक्यता होती !

दुर्दैवाने मेल एनॉसच्या नशीबात नेमकं हेच लिहीलेलं असावं !

टॉर्पेडो रुममध्ये असलेल्यांना डेक आणि बाह्यावरणाच्या दरम्यान अडकलेल्या एनॉसने केलेले आघात ऐकू येत होते. बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा तो आकांती प्रयत्न करत होता. काही क्षणांनी अचानक सगळे आवाज बंद झाले. एनॉसचं नेमकं काय झालं हे कोणालाच कधीच कळणार नव्हतं !

एस्केप ट्रंकमध्ये बिल बेलींजर आणि जॉन फ्लूकरची बुऑय सोडण्यावरुन चर्चा चालली होती. बुऑय सोडण्यात थोडीशी जरी चूक झाली तरी सर्वांच्या सुटकेची आशा संपुष्टात येणार होती.

एनॉस, बेलींजर आणि फ्लूकर एस्केप ट्रंकमध्ये शिरल्याला एव्हाना चाळीस मिनीटं झाली होती. एकेक मिनीट एकेका तासाप्रमाणे भासत होतं.

अखेर हॅन्स फ्लॅगननचा संयम संपला. त्याने एस्केप ट्रंकचं दार बंद करणारी लिव्हर ओढली. पाठोपाठ एस्केप ट्रंकमधील पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सुरू केली. एस्केप ट्रंककडे जाणारी हॅच उघडताच त्यांना दमलेभागलेले बेलींजर आणि फ्लूकर दृष्टीस पडले. एनॉसचा पत्ता नव्हता. बुऑय आणि लाईफरॅफ्ट एस्केप ट्रंकमध्येच होता.

पहिला प्रयत्न फसला होता. टॉर्पेडो रुममध्ये जमलेल्या नौसेनीकांचा धीर खचण्यास सुरवात झाली.

मृत्यू आणखीन एक पाऊल जवळ आला !

पृष्ठभागावर तरंगत असलेल्या बिल लेबॉल्डला जाणारं प्रत्येक मिनीट युगायुगाप्रमाणे भासत होतं. कधी पाठीवर तर कधी नॉर्मल पोहत तो अद्याप तग धरून होता. लेबॉल्डने आकाशात नजर टाकली.

' काही वेळातच पहाट होईल ' त्याच्या मनात आलं.

त्याचवेळी लेबॉल्डला पाण्यावर काहीतरी आपटल्याचा आवाज आला !

नेमका तोच आवाज फ्लॉईड कॅव्हर्लीनेही ऐकला होता ! त्याने आजूबाजूला नजर टाकली, परंतु गडद अंधारात त्याला काही दिसेना.

' कोण असावं ? माणूस....का शार्क ? शार्क असला तर सगळं संपलंच म्हणायचं !' कॅव्हर्लीच्या मनात आलं.

" कोण आहे ?" मनाशी धीर करून कॅव्हर्लीने आवाज दिला.
" लेबॉल्ड !" लेबॉल्डने उत्तर दिलं. कॅव्हर्लीने सुटकेचा नि:श्वास टाकला !
" इकडे ये !"
" नक्की कुठे ? मला तू कुठे आहेस दिसत नाहीये !"

कॅव्हर्लीने त्याला आवाज देणं सुरूच ठेवलं. आवाजाच्या अनुरोधाने अखेर लेबॉल्डने त्याला गाठलं. कॅव्हर्ली प्रचंड थकल्याची लेबॉल्डला कल्पना आली. एकमेकाला आधार देत ते पोहत राहीले.

टँगने बुडवलेल्या एका जहाजाची पुढील बाजू दूरवर दिसत होती. पहाट होताच तिथे जाण्याची त्यांनी योजना केली. टँग बुडण्यापूर्वी कॅव्हर्लीने सुमारे वीस हजार यार्डांवर असलेल्या चीनच्या फाऊचो बेटाचं निरीक्षण केलं होतं. ते बेट गाठण्याचा त्यांनी निश्चय केला. परंतु आपली समजूत चुकीची असल्याचं लवकरच त्यांच्या ध्यानात आलं. वीस हजार यार्डांवर त्यांना वाटलेलं बेट नसून तो एक मोठा ढग होता !

पहाटेचे ४.१५ झाले होते.

१८० फूट खोलीवर टँगच्या टॉर्पेडो रुममध्ये हँक फ्लॅगननने सुटकेच्या दुस-या प्रयत्नाची तयारी करण्यास सुरवात केली. यावेळी लाईफरॅफ्ट बाद करण्यात आला होता. एक माणूस जास्तं बाहेर पडू शकणार होता !

" मी पुन्हा प्रयत्न करणार आहे !" बिल बेलींजर ठामपणे उद्गारला, " माझ्याबरोबर कोण कोण येण्यास तयार आहे ?"
" मी येतो !" क्ले डेक्कर पुढे झाला.

काही मिनीटांतच पाचजण एस्केप ट्रंक़कडे जाणा-या शिडीपाशी जमले. बेलींजर, डेक्कर, फ्लॅगनन, लेलँड वीकली आणि एन्साईन बेसील पिअर्स !.

डेक्करने आपलं मॉमसेन लंग्ज चढवलं. त्याच्या मागेच असलेल्या जॉर्ज झॉफ्कीनच्या डेक्करच्या मॉमसेन लंग्जची कार्बन डाय ऑक्साईड सोडणारी झडप बंद असल्याचं ध्यानात आलं. त्याने ती झडप मोकळी केली.

झॉफ्कीनच्या या कृतीमुळे डेक्करचा जीव वाचणार होता का ?

मॉमसेन लंग्ज चढवून होताच डेक्करने झॉफ्कीनला एस्केप ट्रंकच्या दिशने ओढलं.

" चल माझ्याबरोबर ! आपण इथून बाहेर पडू !" डेक्कर त्याला म्हणाला
" नको !" झॉफ्कीन उत्तरला, " तू जा !"
" अरे पण का ?"
" मला भीती वाटते ! मला पोहता येत नाही !"

डेक्कर तीन ताड उडाला !

पाणबुडीवर काम करणा-या नौसेनीकाला पोहता येत नाही ? या धक्क्यातून सावरण्यास त्याला काही क्षण लागले.

" हे बघ जॉर्ज, मॉमसेन लंग्जचा तू लाईफ जॅकेटसारखा वापर करू शकतोस. वर जाताना दोरीला पकडूनच जायचं आहे ! एकदा वर पोहोचल्यवर तू बुऑयला पकडून तरंगत राहशील !" डेक्कर त्याला समजावत म्हणाला.
" तू जा क्ले ! मी नंतर येईन !"

डेक्कर गोंधळून गेला होता ! आपण वाचलो तर झॉफ्कीनच्या पत्नीला - मार्थाला काय सांगावं त्याला कळत नव्हतं.

आता विचार करायलाही वेळ नव्हता. डेक्करने बेलींजरपाठोपाठ एस्केप ट्रंकमध्ये जाणा-या शिडीवर पाऊल ठेवलं. झॉफ्कीनने मागे परतून एका बंकवर अंग टाकलं ! टँगमधून बाहेर पडण्यापेक्षा आतच मृत्यूला कवटाळण्याचा त्याने निर्णय घेतला होता !

डेक्कर, बेलींजर, फ्लॅगनन आणि पिअर्स एस्केप ट्रंकमध्ये पोहोचले होते. टॉर्पेडो रुमची हॅच बंद झाली.

एस्केप ट्रंकमध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली. काही वेळातच त्यांच्या कमरेवर पाणी आलं. पाण्याच्या वाढत्या दाबामुळे शरीराच्या अनेक भागांतून वेदना सुरु झाल्या होत्या ! चढत जाणारं पाणी एव्हाना त्यांच्या छातीपर्यंत आलं होतं ! पाण्याचा दाब दर चौरस इंचाला नव्वद पौंड झाला होता ! समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा असलेल्या दाबाच्या सहापट ! कोणत्याही क्षणी आपली छाती फुटून मृत्यू येईल अशी सर्वांना भीती वाटत होती !

क्ले डेक्करने पाणबुडीत येऊ श़कणा-या मृत्यूबद्दल अनेकदा आपल्या सहका-यांशी चर्चा केली होती.

" दुर्दैवाने काही अपघात अथवा जपानी हल्ल्याला आपण बळी पडलो तर पाणबुडी हे आपलं थडगं ठरणार हे निश्चीत !"

हवेच्या वाढत्या दाबाबरोबर डेक्करच्या मनात नेमका हाच विचार आला होता. त्याच वेळी एस्केप ट्रंकमधील पाण्याचा दाब समुद्राच्या पाण्यापेक्षा पाच पौंड जास्त झाल्याचं बेलींजरच्या ध्यानात आलं !

बेलींजरने सावकाशपणे बाहेर जाणारी हॅच उघडली. डेक्करच्या हातात बुऑय होता. बेलींजरने हॅच उघडताच त्याने बुऑय बाहेर सोडला. बुऑयला बांधलेली दोरी बाहेर जाऊ लागली.

" क्ले, हातातून दोरी जाताना गाठी मोज !" बेलींजरने सूचना दिली.

डेक्करने गाठींवरुन अंतराच अंदाज घेण्यास सुरवात केली.

१००..१२०...१५०...

बूऑय पृष्ठभागावर पोहोचला होता. डेक्करच्या हातात असलेल्या दोरीला बुऑयला बसणा-या लाटांच्या तडाख्यामुळे हिसके बसत होते. बुऑयला बांधलेली दोरी १८० फूट पाण्यावर होती ! ते समुद्राखाली १८० फूटांवर होते.

डेक्करने बुऑयला बांधलेल्या दोरीचं दुसरं टोक एस्केप ट्रंकच्या बाहेर असलेल्या शिडीला घट्टपणे बांधून टाकलं.

आता बाहेर पडायची वेळ आली होती. पहिला प्रयत्नं कोण करणार होतं ?

" गो फोर इट क्ले !" बेलींजर म्हणाला, " गुड लक !"

डेक्करने एस्केप ट्रंकमधून बाहेर पाऊल टाकलं. तो आता पाणबुडीचं बाहेरील आवरण आणि डेकच्या मधील जागेत होता. हातात असलेली दोरी त्याने घट्ट धरुन ठेवली होती. दोरीचा आधार सुटला तर त्याची मेल एनॉससारखी गत होणार होती.

सावधपणे दोरीचा माग घेत डेक्कर डेकच्या वर असलेल्या तीन फूट व्यासाच्या हॅचमधून बाहेर पडला. काही क्षणांत तो पाणबुडीच्या बाहेरील आवरणातून बाहेर पडला.

समुद्राच्या थंडगार पाण्याचा स्पर्श होताच डेक्कर शहारला !

सावधपणे एकेक फूट सरकत तो पृष्ठभागाच्या दिशेने जाऊ लागला. दर दहा फूट अंतरावरील गाठीशी थांबत आणि मॉमसेन लंग्जच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करत तो वर जात होता. घाईघाईत वर जाण्याची तीव्र इच्छा दाबत तो वर सरकत होता. पाण्याचा दाब हळूहळू कमी होत असल्याची त्याला जाणीव झाली. कोणत्याही क्षणी आपली शक्ती संपुष्टात येऊन आपण कोसळणार ही भीती त्याच्या मनात वाढत चालली होती. मात्रं वर जाण्याच्या तीव्र इच्छेने त्याला वाटणा-या भीतीवर मात केली. मॉमसेन लंग्जमधील हवेतून निर्माण झालेले बुडबुडे वरच्या दिशेने जात असल्याचं त्याच्या ध्यानात आलं ! आणखी फक्तं काही फूट...

... आणि एका क्षणी तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला !

क्लेटन डेक्कर टँगमधून निसटण्यात यशस्वी झाला होता !

डेक्करने आपलं मॉमसेन लंग्ज काढून पाण्यात सोडून दिलं. त्याचवेळी त्याला आपल्या नाकातून आणि गालावरून रक्तं वाहत असल्याची जाणीव झाली. तो जरी हळूहळू वर आला होता तरीही त्वचेजवळील भागातील काही रक्तपेशी फुटल्या होत्या. सुदैवाने रक्तस्त्राव लवकरच थांबला.

लाकडी बुऑयवर हाताने आधार घेण्यासाठी खाचा होत्या. त्याच्या आधाराने डेक्कर पाण्यात तरंगत होता. पाण्याच्या प्रवाहाला असलेली ओढ त्याला जाणवत होती.

काही क्षणांतच डेक्करपासून दोन-तीन यार्डांवर बिल बेलींजर प्रगटला. बेलींजर खूपच घाईत वर आला असावा. त्याचा चेहरा वेदनेने पिळवटून निघाला होता. त्याच्या तोंडातून वेदनेने चित्कार बाहेर पडत होते. चेह-यावरुन रक्ताचे ओघळ वाहत होते. तो भडाभडा उलटी करत होता !

डेक्कर हादरून त्याच्याकडे पाहत होता. बेलींजरची अवस्था गंभीर होती. त्याला वाचवण्याच्या हेतूने डेक्करने त्याच्या दिशेने हात केला परंतु...

... डेक्करने आपला हात मागे घेतला !

' तो वाचण्याची कोणतीही शक्यता नाही !' डेक्करचा आतला आवाज त्याला म्हणाला, ' तो बुडणार हे निश्चीत ! बुडणारा माणूस घोड्यालाही पाण्याखाली खेचू शकतो. त्याच्याबरोबर तू पण खाली जाशील !'

दुस-या क्षणाला बेलींजर दिसेनासा झाला !

डेक्करने आजूबाजूला नजर टाकली. आपण एकटेच वाचलो असल्याची त्याची खात्री झाली. आपल्याव्यतिरिक्त अजून चार जण आजूबाजूच्या पाण्याशी झगडत असल्याची त्याला कल्पना नव्हती !

पहाटेचे पाच वाजले होते.

टॉर्पेडो रुममध्ये एस्केप ट्रंकमधून सर्वजण बाहेर पडल्यावर बाहेरच्या आवरणावर होणार आवाज ऐकण्यासाठी सर्वजण जीवाचा कान करुन आवाजाचा मागोवा घेत होते. त्यांना कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला !

ताबडतोब एस्केप ट्रंकची बाहेरील हॅच बंद करण्यात आली. पाण्याचा निचरा होताच त्यांनी टॉर्पेडो रुमची हॅच उघडली.

एस्केप ट्रंकमध्ये दिसलेलं दृष्य पाहून सर्वजण हादरुन गेले.

हँक फ्लॅगनन वर जाणा-या दोरीमध्ये गुंडाळला जाऊन बेशुध्द झाला होता ! त्याच्या शेजारीच बेसील पिअर्स थरथरत उभा होता. टॉर्पेडो रुममध्ये येताच पुन्हा प्रयत्न करण्याची आपली हिंमत नसल्याचं त्याने बोलून दाखवलं. त्यापेक्षा मरणाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती.

फ्लॅगननला एका बंक मध्ये झोपवण्यात आलं. पॉल लार्सनने त्याचा ताबा घेतला.

पाणबुडीतील सर्वांचा धीर अधिकच खचला. ताकदवान फ्लॅगनन जर पाण्याचा दाब सहन करू शकत नसेल तर कोणाला संधी होती ? अनेकांनी बंकचा आश्रय घेतला. तोंडावरुन ब्लँकेट घेऊन मृत्यूला कवटाळण्यास ते सिध्द झाले. त्यावेळची त्यांची मनस्थिती काय झाली असेल ?

त्याचवेळी गस्त घालणा-या जपानी बोटीचा सोनारवर आवाज ऐकू आला !

' नक्कीच जपान्यांना पाणबुडीच्या बाह्यावरणावर केलेल्या आघातांचा पत्ता लागला असावा !' पीट नेरॉवन्स्कीची खात्री पटली होती.

सुदैवाने काही वेळातच जपानी बोटीचा आवाज कमी होत जाऊन लुप्त झाला.

मृत्यू आता अगदी निकट येऊन पोहोचला होता.

बॅटरी कंपार्टमेंटमधून विषारी वायू पाणबुडीत पसरण्यास सुरवात झाली होती ! एकेक कंपार्टमेंटमधून पुढे सरकत तो अखेर पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये पोहोचला होता ! त्यातच हवेत कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं होतं ! हवेतील ऑक्सीजनचं प्रमाण नेहमीच्या वीस टक्क्यांपेक्षा कितीतरी कमी झालं होतं ! ऑक्सीजनचं प्रमाण सहा टक्क्याच्या खाली गेल्यावर काही वेळाने सर्वजण बेशुध्द पडून मरण पावणार हे उघद होतं.

... आणि जपानी बोटींनी डेप्थ चार्जचा मारा सुरू केला !

पुढच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये आग लागली होती ! वाढत चाललेलं तापमान आता असह्यं होत होतं. काही वेळातच जपान्यांचा डेप्थ चार्जचा मारा थंडावला.

आगीमुळे लागलेल्या धुरामुळे गुदमरुन सर्वजण प्राणास मुकणार होते.

शेवट अवघ्या काही मिनीटांवर येऊन ठेपला होता.

हेस ट्रकच्या मनात अद्यापही बाहेर पडण्याचा विचार पक्का होता. ही शेवटची संधी होती. पीट नेरॉवन्स्की आणि इतर दोघांसह त्याने एस्केप ट्रंकमध्ये प्रवेश केला.

एस्केप ट्रंकमध्ये प्रवेश करताच पृष्ठभागावर जाणारी दोरी गायब झाल्याचं ट्रकच्या ध्यानात आलं ! आता पोहून वर जाण्याला पर्याय नव्हता !

ट्रकच्या डोक्यात वेगळीच कल्पना चमकली. परत टॉर्पेडो रुममध्ये उतरुन त्याने एक जपानी लाईफ जॅकेट उचललं आणि एस्केप ट्रंक गाठली. टँगच्या तिस-या मोहीमेत बुडवलेल्या एका जपानी जहाजातून स्मृतीचिन्ह म्हणून ते लाईफ जॅकेट उचललं होतं !

टॉर्पेडो रुमची हॅच बंद झाली. ट्रकने एस्केप ट्रंकमध्ये पाणी भरण्यास सुरवात केली. आपल्या मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्यासाठी त्याने ते ऑक्सीजनचा पुरवठा करण्या-या यंत्रणेला जोडलं, परंतु ऑक्सीजनचा पुरवठा संपला होता ! धीर न सोडता ट्रकने प्रशिक्षणादरम्यान शिकवण्यात आलेल्या एका विशीष्ट पध्दतीची सर्वांना आठवण करुन दिली. आजतागायत कोणी त्याचा वापर केला नसला तरीही तब्बल १८० फूट पाण्याखालूनही यशस्वीपणे बाहेर पडता येईल याची ट्रकला पक्की खात्री होती !

अचानकपणे जॉन फ्लूकरने किंकाळी फोडली. पाण्याचा दाब त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. तो जवळपास बेशुध्द पडण्याच्या मार्गावर होता.

आणखीन एक समस्या उभी राहीली होती. एस्केप ट्रंकमधून बाहेर पडणारं दार उघडत नव्हतं ! सर्व शक्ती एकवटून ट्रक आणि नेरॉवन्की त्यावर दणादण लाथा झाडत होते. अखेर एकदाचं दार उघडलं !

दरम्यान नेरॉवन्स्कीला एक महत्वाचा शोध लागला होता. मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्याची जरूर नव्हती. उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईडपासून सोडालाईमद्वारे पुरेसा ऑक्सीजन वेगळा होत होता !

हेस ट्रकची ताकद हळूहळू कमी पडत चालली होती. स्वत:ला कसंबसं सावरत तो एस्केप ट्रंकमधून बाहेर पडला. सुदैवाने डेक्करने बाहेरच्या शिडीला बांधलेली वर जाणारी दोरी त्याच्या नजरेस पडली ! सावधपणे दोरीचा आधार घेत ट्रक बाहेर पडला. त्याला आता लाईफ जॅकेटची गरज नव्हती, परंतु तरीही त्याने ते धरुन ठेवलं होतं.

लाईफ जॅकेटमुळे ट्रक वरच्या दिशेने ढकलला जात होता. परंतु दोराचा आधार घेत सावधपणे तो वर निघाला होता.

एस्केप ट्रंकमध्ये असलेल्या नेरॉवन्स्कीची दोरीला बसणा-या हिसक्यांमुळे ट्रक खूपच घाईत वर जातो आहे अशी समजूत झाली. ट्रकला वेग कमी कमी करण्यासाठी सुचवावं म्हणून त्याने दोरीला हिसका दिला. परंतु त्यामुळे ट्रकचं मॉमसेन लंग्ज त्याच्यापासून सुटं झालं आणि पाण्यात दिसेनासं झालं !

ट्रक टँगपासून वीस फूट उंचीवर होता. अद्याप त्याला १६० फूट वर जाणं आवश्यक होतं. धीर न सोडता हळूहळू तो वरच्या दिशेने जात होता. हळूहळू पाण्याचा दाब कमी कमी होत गेला आणि एका क्षणी तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला !

सुदैवाने त्याला कोणताही त्रास झाला नव्हता ! क्षणभर आपण बेशुध्द पडणार असं त्याला वाटलं, परंतु धीर धरुन तो लाईफ जॅकेटच्या सहाय्याने तरंगत राहीला.

काही मिनीटांनी ट्रकला हाक ऐकू आली. आजूबाजूला पाहताच त्याला डेक्कर दिसला. पन्नास यार्डांवर तो पिवळ्या रंगाच्या बुऑयला धरून तरंगत होता. ट्रक डेक्करपाशी पोहोचला. दोघांनी मिळून लाईफजॅकेट बुऑयला बांधलं.

डेक्कर आणि ट्रकने आपल्या जवळील जास्तीचं सर्व सामान खाली फेकून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या जवळील रिव्हॉल्वर आणि खाद्यपदार्थ त्यांनी खाली सोडून दिले.

१८० फूट खाली एस्केप ट्रंकमध्ये जॉन फ्लूकरची सहनशक्ती संपली. पाणबुडीतून निसटण्याचा विचार सोडून मरण पत्करण्याचा त्याचा पक्का निश्चय झाला होता. त्याने बाहेरील हॅच बंद केली आणि नेरॉवन्स्कीने टॉर्पेडो रुमच्या दारावर दणादणा आघात करुन ते उघडण्याची सूचना केली.

काही वेळाने टॉर्पेडो रुमची हॅच उघडली गेली. फ्लूकर खाली उतरुन एका बंकमध्ये शिरला.

नेरॉवन्स्की अद्याप एस्केप ट्रंकमध्ये होता. कोणत्याही परिस्थीतीत बाहेर पडण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. त्याने टॉर्पेडो रुममध्ये हाका मारण्याचा सपाटा लावला होता. बाहेर पडण्यासाठी मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्यासाठी शेवटचा ऑक्सीजन व्हॉल्व उघडण्याची त्याने सूचना दिली.

दरम्यान हँक फ्लॅगनन शुध्दीवर आला होता. नेरॉवन्स्कीचा आवाज येताच त्याने त्याच्याबरोबर पाणबुडीबाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना टॉर्पेडो रुममध्ये धूर पसरण्यास सुरवात झाली होती. काही वेळातच बॅटरीतून येणारा क्लोरीन टॉर्पेडो रुममध्ये शिरुन सर्वाचा जीव घेणार होता.

फ्लॅगनन एस्केप ट्रंकमध्ये पोहोचला.

" अजून कोणीतरी चला आमच्याबरोबर !" फ्लॅगननने आवाज दिला.

जेसी डी'सिल्वा टॉर्पेडो ट्यूबजवळ उभा होता. फ्लॅगननचा आवाज ऐकताच तो आपल्या मित्राकडे ग्लेन हॉजकडे वळला. हॉ़ज विवाहीत होता. त्याची पत्नी गरोदर होती.

फ्लॅगननने पुन्हा आवाज दिला. हॉजला प्रयत्न करण्याचीही धास्ती वाटत होती.

" मी जातो आहे !" अखेर डी'सिल्वाने शिडी चढण्यास सुरवात केली, " कम ऑन् !"

हॉजने खालूनच हात हलवला आणि मागे फिरुन तो एका बंकमधे शिरला !

एव्हाना सकाळचे ८.०० वाजले होते. टँगने सागरतळ गाठल्यास पाच तास उलटून गेले होते.

पाणबुडीतील इतरांनी मृत्यूला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली. आपापल्या बंकमध्ये पडून ते आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. पॉल लार्सन त्यांना शक्यं ती सर्व मदत करत होता. पाणबुडीतून बाहेर पडणा-या शेवटच्या तुकडीबरोबर बाहेर पडण्याचा लार्सनने विचार केला होता.

एस्केप ट्रंकमध्ये नेरॉवन्स्कीने पाणी भरण्याची यंत्रणा सुरु केली. पाण्याचा दाब असह्य होत होता, परंतु तरीही बाहेर पडायचंच या तीव्र इच्छेने ते तिघं तग धरुन होते. अखेरीस एस्केप ट्रंकमधील पाण्याचा दाब समुद्राच्या दाबापेक्षा वाढला.

नेरॉवन्स्कीने एस्केप ट्रंकची हॅच उघडली आणि बुऑयकडे जाणा-या दोरीच्या सहाय्याने तो पाणबुडीतून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ हँक फ्लॅगनन आणि जेसी डी'सिल्वा बाहेर पडले होते. हळूहळू एकेक फूट पार करत ते वरच्या दिशेने निघाले होते.

पाणबुडीपासून सुमारे ऐशी फूट वर आल्यावर डी'सिल्वाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने आपला वेग कमी केला. तो आवश्यकतेपेक्षा वेगाने वर निघाला होता. स्वतःला सावरत त्याने एकेक फूट अंतर कापण्यास सुरवात केली. हळूहळू पाण्याचा दाब कमी झाला आणि एका क्षणी तो पृष्ठभागावर पोहोचला !

डी'सिल्वाने आजूबाजूला नजर टाकली. काही अंतरावर त्याला पीट नेरॉवन्स्की आणि हँक फ्लॅगनन दिसले. ते ब-यापैकी सुस्थीतीत होते. काही अंतरावर त्याला पिवळा बुऑय आणि त्याच्या सहाय्याने तरंगणारे ट्रक आणि डेक्कर दिसले. डी'सिल्वाने बुऑय गाठला. त्याच्या पाठोपाठ नेरॉवन्स्की आणि फ्लॅगननही तिथे पोहोचले.

दुर दहा मैलांवर चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. सध्याच्या आपल्या परिस्थीत आपण तिथे पोहोचू शकणार नाही याची डेक्करला कल्पना होती. पाण्याचा तीव्र प्रवाह खुल्या सागराच्या दिशेने वाहत होता. ट्रक आणि नेरॉवन्स्कीने मात्र चीनच्या दिशेने मार्ग काढण्यास सुरवात केली. मात्रं अवघ्या काही मिनीटांतच ते माघारी परतले.

टँगच्या टॉर्पेडो रुममध्ये पॉल लार्सनने शेवटचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता. त्याच्याबरोबर ओ'केनचा केबीन बॉय असलेला हॉवर्ड वॉकर होता. टॉर्पेडो रुममध्ये मॉमसेन लंग्जविना उभं राहणंही अशक्यं झालं होतं. उष्णतेमुळे पाणबुडीच्या आतील भागातला रंग वितळण्यास सुरवात झाली होती !

लार्सन आणि नाक फुटलेल्या वॉकरने एस्केप ट्रंकमध्ये पाणी भरण्यास सुरवात केली होती. वाढत जाणा-या पाण्याचा दाब कसाबसा सहन करुन दोघं पाणबुडीतून बाहेर पडले होते, परंतु ढासळत्या मानसिक अवस्थेत सावधपणे हालचाली करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं.

पॉल लार्सन प्रथम पृष्ठभागावर पोहोचला. परंतु त्याची अवस्था भयंकर झाली होती. तो जेमतेम जिवंत होता इतकंच. त्याचे हात-पाय आकडीमुळे वेडे-वाकडे झाले होते. त्याला श्वसनाला त्रास होत होता. त्याची फुफ्फुसं कामातून गेली असावीत अशी डेक्करला शंका आली.

डी'सिल्वा आणि नेरॉवन्स्कीने लार्सनला बुऑयपाशी आणलं. लार्सनला आपलं डोकं पाण्यावर ठेवणंही जमत नव्हतं. डी'सिल्वाने लार्सनचे हात बुऑयच्या खाचेत ठेवले, परंतु लार्सनला बुऑय धरण्याइतकीही ताकद उरली नव्हती. तो मृत्यूपंथाला लागला होता.

लार्सन पाठोपाठ बुऑयपासून सुमारे पस्तीसेक फूट अंतरावर हॉवर्ड वॉकर पृष्ठभागावर प्रगटला ! त्याने मॉमसेन लंग्जचा वापर केलेला दिसत नव्हता. कदाचित त्याच्या फुटलेल्या नाकामुळे त्याला मास्क चढवता आला नसावा. वर येताच तो पोहता येत नसलेल्या माणसाप्रमाणे हात-पाय झाडू लागला.

जेसी डी'सिल्वाने वॉकरच्या दिशेने सूर मारला ! परंतु डी'सिल्वा त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वॉकर पाण्याखाली गेला होता. काही क्षण त्याचं शरीर दिसत होतं, परंतु खोल समुद्रात जाणा-या प्रवाहाबरोबर तो इतरांपासून दूर खेचला गेला.

जेसी डी'सिल्वाला पुन्हा बुऑय गाठण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली.

बुऑयपाशी सर्वजण लार्सनचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्याने बरंच पाणी गिळलं होतं. योग्य वैद्यकीय मदत मिळाली असती तर लार्सनचा जीव वाचण्याची शक्यता होती. परंतु भर समुद्रात कोणती मदत मिळणार होती ?

सकाळचे नऊ वाजून गेले होते.

टँगमधून आपले आणखीन सहकारी वर येतील या अपेक्षेने सर्वजण आजूबाजूला नजर ठेवून होते, परंतु कोणाचाही मागमूस लागला नाही. टँगमधून बाहेर पडलेले लार्सन आणि वॉकर हे शेवटचे नौसेनीक होते.

टँगपासून काही मैल अंतरावर पी-३४ ही जपानी पेट्रोल बोट गस्त घालत होती. रात्रभरात टँगच्या हल्ल्याला बळी पडलेल्या बोटीतील नौसेनीकांची सुटका करण्याचं काम पी-३४ करत होती. टँगने उडवलेल्या ऑईल टँकरमधील वाचलेले अनेक नौसेनीक पी-३४ च्या डेकवर विव्हळत पडले होते. बॉयलरचा स्फोट झाल्याने ते वाईट रितीने भाजलेले होते.

पी-३४ च्या डेकवरुन एक लाईफबोट समुद्रात सोडण्यात आली. हातात भरलेल्या रायफली घेतलेले दोन जपानी नौसेनीक त्या बोटीत होते. आदल्या रात्री टँगने बुडवलेल्या एका बोटीच्या अद्याप समुद्रावर असलेल्या पुढील भागाकडे ती लाईफबोट निघाली.

बिल लेबॉल्ड आणि फ्लॉईड कॅव्हर्ली बुडालेल्या बोटीच्या पुढील भागाकडे निघाले होते. लाईफबोटीतील जपानी सैनीकांच्या ते दृष्टीस पडले.

" आपण त्या बोटीकडे जाऊ !" बुडालेल्या बोटीच्या पुढच्या भागाकडे हात करत कॅव्हली लेबॉल्डला म्हणाला, " तिथे एखादी लाईफबोट मिळाली तर आपल्याला चीनचा किनारा गाठता येईल !"

त्याचवेळी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला जपानी लाईफबोट दिसली. दोघांनी त्यांना हाका मारण्याचा सपाटा लावला, पण जपान्यांना त्यांची भाषा समजत नव्हती. त्यांच्या युरोपीय तोंडावळ्यामुळे जपानी गोंधळले होते.

" दोईत्सू का ? ( तुम्ही जर्मन आहात का ?)" दोघांपैकी एका जपान्याने त्यांना विचारलं.

दोघा जपान्यांनी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला लाईफबोटीवर ओढून घेतलं. टँगने बुडवलेल्या बोटींपैकी एका बोटीवर जर्मन नौसेनीक होते. हे दोघे त्यांच्यापैकीच असावेत अशी त्यांची कल्पना झाली होती.

" दोईत्सू का ?" जपान्यांनी पुन्हा प्रश्न केला.

कॅव्हर्लीने लेबॉल्डला डोळा मारला आणि जपान्यांकडे वळून त्याने खाडकन जर्मन पध्द्तीने सॅल्यूट ठोकला.

" हाईल हिटलर !"

जपानी दोघांसह पी-३४ कडे परत फिरले. काही अंतरावर त्यांना पाण्यावर तरंगणा-या एका माणसाचं डोकं दिसलं. एका लाकडी फळीच्या आधाराने तो तरंगत होता.

टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन !

लेबॉल्ड आणि कॅव्हर्लीने ओ'केनला वर ओढून घेतलं.

" गुड मॉर्नींग कॅप्टन ! तुम्हांला लिफ्ट हवी आहे ?" लेबॉल्डने मजेत प्रश्न केला.

लेबॉल्डच्या तोंडून ' कॅप्टन ' हा शब्द ऐकताच जपान्यांची ट्यूब पेटली. त्यांनी समुद्रातून वाचवलेले नौसेनीक जर्मन नसून अमेरिकन होते ! दोघांपैकी एकाने रायफलच्या धाकाखाली तिघांना लाईफबोटीच्या मागच्या भागात बसवलं आणि त्यांच्यावर नजर ठेवून ती लाईफबोट पी-३४ वर परतली.

सकाळचे १०.३० वाजले होते. टँगमधून वाचलेल्या तिघा नौसेनीकांना घेऊन ती लाईफबोट पी-३४ वर पोहोचली. शिडीवरुन डेकवर पाऊल ठेवताच कॅव्हर्लीच्या तोंडावर एक सणसणीत ठोसा बसला !

जपानी पाहुणचाराची ती सुरवात होती !

लॅरी सॅव्ह्डकीन गेल्या आठ तासांपासून पाण्याशी झगडत होता. दूर अंतरावर त्याला चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. दूर अंतरावर त्याला गस्त घालणा-या जपानी बोटी दिसत होत्या. सुरवातीला जपान्यांना टाळण्याचा त्याने विचार केला, परंतु खुल्या समुद्रात आपण बुडून मरू याची त्याला कल्पना होती. पी-३४ वरील एका लाईफबोटीवरील खलाशांचं लक्षं वेधून घेण्यात अखेर तो यशस्वी झाला. सॅव्ह्डकीनची पी-३४ वर रवानगी करुन ती लाईफबोट पुन्हा तिथे परतली.

पाण्याखाली गेलेल्या टँगमधून निसटलेले पाच नौसेनीक अद्याप बुऑयला धरुन होते. टँगची शेवटची शिकार ठरलेल्या बोटीचा अद्यापही पाण्यावर असलेला भाग त्यांना दिसत होता. प्रवाहात अनुकूल बदल झाल्यावर त्या दिशेने जाण्याचा प्रयत्नं करण्याचं त्यांनी एकमताने ठरवलं.

काही वेळाने जपानी लाईफबोट त्यांच्या दृष्टीस पडली. लाईफबोट जवळ आल्यावर एका जपानी नौसेनीकाने त्यांच्या दिशेने आपल्या रायफलचा नेम धरला !

' खलास !' जेसी डी'सिल्वाच्या मनात आलं, ' ते आपल्याला गोळ्या घालणार !'

परंतु जपान्यानी गोळी झाडली नाही. रायफलच्या धाकाखाली त्यांना लाईफबोटीत चढण्याचा हुकूम देण्यात आला. सर्वात प्रथम त्यांनी पॉल लार्सनला लाईफबोटीत चढवलं. सर्वजण वर आल्यावर त्यांनी लार्सनला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. लार्सनचा श्वास मंदपणे चालू होता, परंतु तो वाचण्याची शक्यता फारच कमी होती.

दोन जपानी नौसेनीकांनी तो बुऑय ओढण्यास सुरवात केली. परंतु तो बुऑय त्यांना ओढता येईना. तळाशी असलेल्या पाणबुडीला तो बुऑय बांधलेला आहे हे जपान्यांना सांगण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.

लाईफबोट पी-३४ कडे परतली. दोराच्या शिडीवरुन एकेक जण डेकवर पोहोचला. जेसी डि'सिल्वाने शेवटच्या क्षणी मागे दृष्टीक्षेप टाकला.

मृत्यूपंथाला लागलेल्या बेशुध्द पॉल लार्सनला दोघा जपान्यांनी समुद्रात फेकलं होतं !

वाचलेले नऊ अमेरिकन हे पाणबुडीवरील नौसेनीक आहेत याची लवकरच जपानी अधिका-यांना कल्पना आली. त्यांनी या सर्वांचा अघोरी छळ आरंभला.

टँगच्या शेवटच्या मोहीमेत बुडवलेल्या बोटींवरील वाचलेले जपानी नौसेनीक पी-३४ वर होते. त्यापैकी अनेकजण गंभीररित्या जखमी झालेले होते. कित्येकजण भाजलेले होते. आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेले अमेरिकन समोर दिसताच त्यांनी त्यांना तुडवून काढण्यास सुरवात केली. आपल्याच हल्ल्यातून वाचलेले जपानी सैनीक आपल्याला मारत असल्याची कल्पना आल्यावर ओ'केन सह सर्वांनी हसतहसत मार खाणं पसंत केलं !

टँगवरील ८७ नौसेनीकांपैकी फक्त ९ जण वाचले होते. ७८ जणांना जलसमाधी मिळाली होती.

शेवटचा टॉर्पेडो टँगवर आदळल्यावर ब्रिजवर असलेले कमांडर डिक ओ'केन आणि बिल लेबॉल्ड आणि कोनींग टॉवरमधून ब्रिजवर आलेला फ्लॉईड कॅव्हर्ली हे टँग बुडाल्यापासून समुद्रशी झगडत वाचले होते.

लॅरी सॅव्ह्डकीन पन्नास फूट खोल पाण्यातून कोणत्याही ऑक्सीजन उपकरणाविना वर येण्यात यशस्वी झाला होता.

सिडने जोन्स आणि डॅरील रेक्टर लेबॉल्डच्या नजरेसमोर सागरात गडप झाले होते. चीनच्या दिशेने पोहत निघालेला जॉन ह्यूबेक कधीच चीनला पोहोचला नाही !

क्लेटन डेक्कर, बिल बेलींजर, हेस ट्रक, पीट नेरॉवन्स्की, हँक फ्लॅगनन, जेसी डी'सिल्वा, पॉल लार्सन आणि हॉवर्ड वॉकर १८० फूट खोलीवर बुडालेल्या टँगमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते, परंतु दुर्दैवाने बेलींजर, लार्सन आणि वॉकरला मृत्यूने गाठलं होतं.

दुस-या महायुध्दात सुमारे ३५०० अमेरिकन नौसेनीक बुडालेल्या पाणबुड्यांत सागरतळाशी गेले होते. कोणत्याही मदतीविना बुडालेल्या पाणबुडीतून बाहेर पडण्यात फक्तं टँगवरील नौसेनीकांना यश आलं होतं.

मॉमसेन लंग्जचा यशस्वी उपयोग फक्त टँगवरील नौसेनीकांनी केला होता.

टँगवरील वाचलेले नऊजण आता जपान्यांचे युध्दकैदी होते. त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं होतं ?

 
क्रमश :

 
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३                                                                         एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ५ (अंतिम)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोहता न येणारा माणूस नौसैनिक कसा काय बनू शकतो....त्यांच्या ट्रेनिंगमध्ये पोहणे नसते
हे फारच धक्कादायक आहे

आधी एव्हरेस्ट आणि के२ वर विरळ हवा आणि आता इथे बरोबर उलट....
परफेक्ट कॉन्ट्रास्ट...
हा योगायोग का मुद्दामच हा विषय निवडला

आशुचँप,
ठरवून वगैरे असं नाही. गिर्यारोहण हे माझं एकेकाळचं व्यसन आणि दुसरं महायुध्द आणि खासकरुन सायलेंट सर्वीस ( पाणबुड्यांचं युध्द ) हा आवडीचा विषय. त्यामुळे पर्वतशिखरांवरुन थेट समुद्राच्या तळाशी जाऊन पोहोचलो. happy.gif

हिम्स
टँगचा तो व्हिडीओ पाहिला आहे. धन्स !

खरंच - केवळ चित्तथरारक आणि रोमांचकारी .....

स्पार्टाकस - एखादी सुरेख पटकथा लिहू शकाल तुम्ही .....