"पारो"....सुचित्रा सेन

Submitted by अशोक. on 17 January, 2014 - 01:09

suchira.jpg

“पारो” इतर अनेक नायिकांपैकी एक नाव असेच जर म्हटले गेले तर त्याबद्दल कुणी तक्रार करणार नाही; पण दुसरीकडे ज्यावेळी ’सुचित्रा सेन’ नामक बंगालमधील एक तरुणी ही भूमिका पडद्यावर दिलीपकुमारसारख्या सशक्त अभिनेत्यासमोर तितक्याच ताकदीने [काही प्रसंगी त्याच्यापेक्षा सकस अभिनय] साकार करते त्या क्षणीच ती देशातील करोडो चित्रपट रसिकांच्या हृदयी विराजमान झाली. आजच्या युवा पिढीला “सुचित्रा सेन” ह्या नावाशी कोणतीही ओळख नाही हे पाहताना आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण या श्रेष्ठ अभिनेत्रीने सन १९७८ मध्ये चित्रपट कारकिर्दीला शेवटचा नमस्कार केला आणि त्यानंतर तिने अगदी कालपर्यंतचे आयुष्य अक्षरश: एकांतात व्यतीत केले. त्या मागील कारणे खाजगी आणि कौटुंबिक असल्याने त्याच्या तपशीलात शिरण्यातही अर्थ नसतो, पण ज्यावेळी सुचित्रा सेनला भारत सरकारने २००५ चे “दादासाहेब फ़ाळके” पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले त्यावेळी तिने त्या खात्याला पुरस्कार स्वीकारण्याबाबत नम्रपणे आपला नकार कळविला. नवी दिल्लीत स्वत: हजर राहून राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार घेणे त्यातील एक अट आहे. तथापि प्रकृती आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून अलिप्त राहाण्याच्या निर्णय यामुळे तिने तो मान बाजूला ठेवला.

मनोरंजन क्षेत्रात अगदी १९५० पासून राजकपूर-नर्गिस, दिलीपकुमार-मधुबाला, देव आनंद-सुरैय्या अशा प्रसिद्ध जोड्या पड्द्यावर तसेच खाजगी जीवनातील चर्चेमुळे रसिकांच्या उन्मादिक चर्चेचा विषय राहिल्या आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीत अशाच पातळीवर खूप गाजलेली आणि सदैव चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे उत्तमकुमार-सुचित्रा सेन. हे सत्य की त्या दशकातील नायकनायिकेच्या संदर्भातील चर्चा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे जितकी होत असे त्यापेक्षाही या कलाकारांवरच प्रेम करणारा रसिक वर्ग मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या चर्चेद्वारे करीत असे. शारीरिक आकर्षणाच्या रसायनापेक्षा जोडीचा पडद्यावरील अभिनय या चर्चेचा प्रमुख विषय असे.

६ एप्रिल १९३१ रोजी अविभक्त बंगाल प्रांतातील पाभना जिल्ह्यात [जो सध्या बांगला देशात विलीन झाला आहे] हेडमास्तर असलेले वडील दासगुप्ता यांच्या घराण्यात जन्माला आलेली ही ’रमा’ पुढे लग्नानंतर ’सुचित्रा सेन’ बनली आणि त्यानंतरच तिने बंगाली चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे पुढे भारतभर आपल्या अभिनय कौशल्याने गाजलेल्या या अभिनेत्राचा पहिलाच बंगाली चित्रपट ’शेष कोथाय’ पूर्ण झालाच नाही. मात्र १९५३ मध्यी आलेल्या “शरेय चतुर’ [यात उत्तमकुमार नायक होता] आणि ’काजोरी’ या दोन पटांमुळे तिचे नाव बंगालप्रेमींना मनी वसले. इथून पुढे तिची कारकिर्द कधीच खाली आली नाही. एखाद्या राणीसमच तिने बंगाल चित्रपटक्षेत्रात राज्य केले. उत्तमकुमार हा अभिनेता म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत जे स्थान दिलीपकुमारचे तेच स्थान उत्तमकुमारचे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याच्या नायिका म्हणून नंतर सुचित्रा सेनने जे स्थान मिळविले ते सा-या बंगालने डोक्यावर घेतले होते. अभिनय कौशल्य वादातीत होते तिचे आणि लोक केवळ तिच्या सौंदर्यावर नव्हे तर अभिनयामुळेही ही चित्रपटाच्या खिडकीवर तिकिटासाठी गर्दी करत.

हिंदी चित्रपटातील इतिहासात आपण वहिदा रेहमान अभिनित “खामोशी” हा चित्रपट फ़ार उत्कष्ट आणि गाजलेला समजतो; पण त्या नर्सची भूमिका सर्वप्रथम सुचित्रा सेन हिनेच सन १९५९ मध्ये आलेल्या “दीप ज्वेले जाल” या चित्रपटात केली होती. बंगालमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविलेला हा चित्रपट नंतर असित सेन यानी वहिदाला प्रमुख भूमिकेत घेऊन हिंदीत निर्माण केला. बंगाल भाषेतच निर्माण झालेला “उत्तर फ़ाल्गुनी” ह्या पटाने हिंदीत ’ममता’ नावाने यश मिळविले. इथे मात्र बंगाली आणि हिंदी भाषेत दोन्ही ठिकाणी सुचित्रा सेन मुख्य नायिका होती.

हिंदी चित्रपटसृष्टी प्रत्येक अभिनेत्रीला खुणावत असते पण सुचित्रा सेन हिने आपली कारकिर्द प्रामुख्याने बंगाली भाषेतील चित्रपटावरच केन्द्रीत केली. सन १९५५ मध्ये आलेल्या ’देवदास’ या हिंदी चित्रपटात तिने आपली पहिली भूमिका केली. तिने साकारलेली ’पारो’ चित्रपटाचा केन्द्रबिंदू ठरली आणि दोन नायिका असूनही एकदाही त्या समोरासमोर येत नाहीत किंवा त्यांच्यात एका शब्दाचाही संवाद नाही. अत्यंत संयतपणे साकारलेली पारो…जितकी प्रेमाला आसुसलेली तितकीच देवदासने नकार दिल्यावर संतापाने आणि स्वत:च्या घराचा मान जाऊ नये म्हणून विधुरासमवेत विवाह करून त्याचा संसार नेटका करणारी पारो….देवदासविषयी प्रथम प्रेम आणि नंतर अपार करुणा अशी दोन्ही नाती जपणारी पारो….ही सारी रुपे सुचित्रा सेनने विलक्षण अभिनय सामर्थ्याने साकारली. यानंतर दोन वर्षांनी आलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या “मुसाफ़िर” ह्या प्रयोगशील चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका केली होती. १९६० मध्ये देव आनंदबरोबर “बम्बई का बाबू” हा चित्रपट. यातील एका अल्लड ’माया’ ची भूमिका सर्वांनाच आवडली. गाणीही खूपच गाजली होती या चित्रपटातील. १९६६ मध्ये आलेल्या ’ममता’ चित्रपटाने सुचित्रा सेनच्या अभिनय कौशल्याचा कसच लागला होता. मुलगी आणि आई या दोन्ही भूमिकेतील तिच्या अभिनयाने अशोककुमार आणि धर्मेन्द्र यांच्याहीपेक्षा सरस काम तिने केले होते. तब्बल जवळपास दहा वर्षानंतर म्हणजे १९७५ मध्ये ऐन आणीबाणीच्या काळात आलेल्या “आंधी” चित्रपटातील ’आरतीदेवी’ च्या भूमिकेत सुचित्रा सेनने साकारलेली राजकीय पुढारी म्हणजे जणू काही इंदिरा गांधीच होत्या. परिस्थिती अशी होती त्या साली की जवळपास बंदी येण्याचे घाटत होते; पण तसे झाले नाही आणि सोबतीला संजीवकुमारसारखा चतुरस्त्र अभिनेता असल्याने सुचित्रा सेनचा हा चित्रपट सा-या भारतात गाजला…..पण ’आंधी’ हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.
आंधी च्या अगोदरच तिच्या पतीचे ’आदीनाथ सेन’ निधन झाले होते. अर्थात त्यामुळे सुचित्रा सेनना फ़रक पडत नव्हता कारण विवाहानंतर केवळ चार वर्षातच दोघे अलग राहात होते. मात्र त्यानंतर त्या एकट्याच राहात होत्या. एकमेव मुलगी ’मुनमुन सेन’ स्वतंत्र आयुष्य जगत होती. त्यामुळेच की काय सुचित्रा सेन यानाही संसाराची विरक्ती आली असावी आणि “आंधी” नंतर त्यानी केवळ दोनच बंगाली चित्रपट केले व शांतपणे चंदेरी दुनियेचा निरोप घेतला व स्वत:ला रामकृष्ण मिशनच्या कार्यात गुंतवून घेतले. सार्वजनिक जीवनात त्या कुणालाच “अभिनेत्री” या नात्याने भेटल्या नाहीत. आजारीपणाच्या काळात त्या एकाकीच होत्या.

सत्यजित रे यानी खास सुचित्रा सेन साठी म्हणून “देवी चौधुराणी” चित्रपटाची घोषणा केली होती. पण हिने त्याना ठाम नकार दिला आणि स्वीकारलेल्या एकाकी जीवनातच तिने सौख्य मानले. बंगाल प्रांतात असाही प्रवाद ऐकायला मिळतो की सन १९८० मध्ये तिचा अत्यंत लाडका अभिनेता तसेच मित्र उत्तम कुमार निधन पावला आणि त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अन्य अनेक जोड्यांच्या संदर्भात उठतात तशा उत्तम-सुचित्राबद्दलही भरपूर पतंग उडविले गेले होते. त्याना या जोडीने कधीही प्रतिसाद दिले नाहीत…ना होकारार्थी ना नकारार्थी….पण चित्रपटसृष्टीत असले विषय नेहमीच चालत असतात. आज आपल्यातून अखेरचा निरोप घेऊन गेलेली ही अत्यंत गुणी आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री नेहमी स्मरणात राहील तेही विशेष करून ’पारो’ बद्दलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समयोचित लेख, अनेक गोष्टी नव्यानेच कळल्या, धन्यवाद. Happy

आणि कृष्णधवल छायाचित्र काय कातील आहे, खल्ल्लासच Happy

khoopach sundar.

junaa 'dewadaas' mee paahilaa naahee aataa nakkee paaheen.

मामा, मस्त माहिती आणि आमच्या पिढीला या आणी अशा बरयाच व्यक्तींबद्दल माहिती करुन देण्याबद्दल शत शत धन्यवाद..

ऊत्तम लेख
सुचित्रा सेन हे नाव आल की त्यांच्या आंधी या चित्रपट़ाचीच आठवण होते
आरतीदेवीच्या भूमिकेत अविस्मरणीय अशी छाप सोडली आहे त्यांनी

आंधीतला सुचित्रा संजीवचा ती हॉटेल मध्ये चेक इन करते व तो सकाळी तिला भेटतो तो पूर्ण सीन फार मस्त आहे. खेळकर आणि नर्म गुलाबी. त्या नंतर इस मोडसे जाते हैं गाणे परिपूर्ण बांगला सुंदरी. उत्तम अभिनेत्री. छान परिचय.

मून मून देखील एका सिलेक्ट ग्रूप ला फार आवड्त असे. रिया वर रैमांनी आजीचे नाव पुढे राखले आहे. पण त्यांना तसे ताकदीचे रोल्स मिळालेले नाहीत.

स्वीट परिचय.

छायाचित्र आणि लेख दोन्हीही खुप सुंदर. अप्रतिम अभिनयाला हस्की आवाज, रेखीव चेहरा, बोलके डोळे आणि शेलाट्या बांध्याची जोड. तेव्हाच्या चमचमणा-या चांदण्यांमध्ये त्या अगदी उठून दिसल्या असतील हे आम्ही कित्तीतरी उशीरा पाहिलेल्या चित्रपटांमधूनही जाणवले.

तुमच्या लेखामुळे आता त्यांचे बंगाली चित्रपटही मिळवून बघायला पाहिजेत असं वाटतंय. बघणारच.

आंधी” चित्रपटातील ’आरतीदेवी’ च्या भूमिकेत सुचित्रा सेनने साकारलेली राजकीय पुढारी म्हणजे जणू काही इंदिरा गांधीच होत्या. परिस्थिती अशी होती त्या साली की जवळपास बंदी येण्याचे घाटत होते; पण तसे झाले नाही आणि सोबतीला संजीवकुमारसारखा चतुरस्त्र अभिनेता असल्याने सुचित्रा सेनचा हा चित्रपट सा-या भारतात गाजला…..पण ’आंधी’ हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.

मला सुचित्रा सेन म्हणजे आंधी हेच आठवतय. खुप छान रंगवली होती भुमिका.

धन्यवाद....सर्व रसिक सदस्यांना. पंधराएक दिवसांपूर्वी सुचित्रा सेनला हॉस्पिटलमध्ये अगदी शेवटच्या स्थितीत दाखले केले त्यावेळेपासून सारेच अस्वस्थ होते. वय ८२ आणि प्रकृतीचीही हेळसांड झाली असल्याने सुचित्रा त्या दवाखान्याच्या आयसीयू मधून ठीक होऊन बाहेर येणे अशक्य वाटले होतेच. झालेही तसेच....परमेश्वराने अगदी तिची मुक्तताच केली असे म्हणावे लागेल.

हॉलिवूडच्या ग्रेटा गार्बोशी तिचे नाव जोडले जाते....अर्थात बंगालमध्ये...कदाचित ग्रेटाप्रमाणे हिनेदेखील तशीच एकांतवासाचे जीवन आपलेसे केल्यामुळेही असू शकेल.

सुचित्रा सेनचा वरील कृष्णधवल फोटो छान असल्याचे हर्पेन आणि सई यानी मुद्दाम लिहिले आहे. खरे सांगायचे झाल्यास हा फोटीही मी आजच सकाळी पाहिला...तिचे माझ्यासंग्रही असलेले फोटो बहुतांशी देवदासच्या पारोचेच आहेत...तर एक अगदी हसरा आहे तो बम्बई का बाबूमधील...पण लेखासाठी दोन्हीही सुयोग्य वाटले नाहीत. हा फोटो आहे मात्र अप्रतिम.

@ अश्विनीमामी....

"आंधी" तील तो प्रसंग आणि अन्यही [ती थेट राजकारणात जाण्यापूर्वीचे] प्रसंग नर्मविनोदाचा छेडकावा असलेले आठवतात. हॉटेलमधून जाताना सुचित्रा आपले कार्ड संजीवच्या हाती देते आणि आठवणीने फोन करायला सांगते....गाडी वळल्यावर संजीव कार्डाकडे पाहतो आणि फाडून फेकून देतो कारण त्याला जाणीव असते की असल्या लक्षाधिश पोरींच्या नादाला लागणे योग्य नाही...आत वळणार तोच सुचित्रा गाडी रीव्हर्समध्ये घेऊन पुन्हा त्याच्याचजवळ येऊन थांबते....नवीन कार्ड त्याच्या हातात बळजबरीने कोंबते, हसत म्हणते..."अब इसे मत फेक देना !"...आणि हसतच निघून जाते.

शिवाय तो दोघांचा "इस्माईलभाय"...हा फोटो प्रसंग...धमालच होता.

सुरेख लिहीलत. मधुबाला, बीना रॉय यान्च्यासारखीच अतीशय देखणी अभिनेत्री. बम्बई का बाबु मध्येच बर्‍याच वेळा मधुबालाचा भास होतो. डोळे फारच बोलके.

मामा सुंदर लेख, सुचित्रा सेन मलापण खूप आवडते. मी खूप लहान होते तेव्हा टीव्हीवर आंधी आणि ममता बघितले, तेव्हापासून मला ती खूप आवडते.

सुचित्रा सेनने हिंदीत अजून काम करायला हवे होते, उत्तम अभिनेत्री, आपल्याला तिचे खूप काम नाही बघायला मिळाले.

रश्मी....येस....तिचे डोळे. मी पाहिले आहे की बंगाली अभिनेत्रींचे डोळे विलक्षण बोलके असेच असतात. सत्यजित रे, ऋत्विक घटक, गौतम घोष, अपर्णा सेन आदी दिग्दर्शक या अभिनेत्रींकडून मौखिक अभिनयापेक्षा देहबोलीतून जास्त विचार प्रकट करण्याकडे लक्ष देत असत. त्यात डोळे हा भाग फार महत्वाचा. इथे प्रथम क्रमांक लागेल तो 'माधवी मुखर्जी' चा....अगदी जादुमय डोळे आणि भूमिका कोणतीही असो ही नायिका प्रथम डोळ्यानेच बोलते असे वाटत गेले.

@ हर्पेन....देवदासमधीलच जास्त आहेत. शिवाय प्रमाणापेक्षा जास्त फोटो [तेही थेट गुगलवरील फोटो] देणे अ‍ॅडमिनना मान्य नाही असे दिसते. एखाददुसर्‍याबद्दल कुणी कॉपीराईटचा आग्रह धरत नाहीत असा समज आहे.

@ अन्जू..... हिंदीत काम करायला हवे होते हे मान्य; पण सुचित्रा सेन बंगालीशी इतकी बांधली गेली होती की एकवेळ तर अशी आली की दिग्दर्शंकाचे दिग्दर्शक मानले गेलेल्या सत्यजित रे यानाही ती शूटिंगच्या तारखा देवू शकली नाही....आणि तो चित्रपट तिने सोडून दिला. तिच गोष्ट राज कपूरबाबत झाली. त्यानाही तिने हिंदीसाठी तारखा नसल्याचे सांगितले होते....आता अशा दिग्गजांची ही कथा, तर अन्यांचे काय झाले असेल.

मामा - हा पण गूगल वरचाच आहे होय? मग नको.
हा असा जुना-पाना, मधेच असलेल्या कागद दुमडल्याच्या खुणा, प्रत्यक्ष प्रिंटचा फोटो वगैरे बघून मला तो आपल्या वैयक्तिक संग्रहातलाच आहे असे वाटले.

येस्स, माधवी मुखर्जी. चारुलता विसरू शकत नाही... आणखी एक सुरेख आठवण करून दिलीत.
बंगाली अभिनेत्री नुसत्याच सुंदर नाही तर नेहमीच विलक्षण बुद्धिमान वाटतात. शर्मिलासुद्धा अपवाद नाही त्याला.
शक्य आणि वेळ असेल तर बंगाली अभिनेते-अभिनेत्री-दिग्दर्शक-उत्तम कलाकृती असाही एखादा आढावा घ्या.

सई....

माधवी मुखर्जी आणि तिने साकारलेली "चारुलता" याना तू विसरू शकत नाहीस असे जे लिहिले आहे ती जवळजवळ सार्‍याच चित्ररसिकांची भावना आहे....इतकी ती भूमिका ती जगली आहे. मला वाटते पुण्यातच दोनतीन वर्षापूर्वी एका महोत्सवाच्या निमित्ताने माधवी मुखर्जी आणि गोविंद निहलानी एकत्र व्यासपीठावर आले होते. त्यावेळीही त्याना अनेक चित्रपटातून केवळ "चारुलता" च आठवला यातच त्याचे यश सामावले गेले आहे.

बाकी तू प्रतिसादात लिहिलेल्या मुद्द्यावर जरूर विचार करतो....

छलेखव समयोचित लेख !
मला वाटतं , सुचित्रा सेन सारख्या अभिनेत्री निवडक सिनेमात व निवडक दिग्दर्शकांसोबत काम करतात, हेंच योग्य असावं. 'देवदास' व 'आंधी' च्या भूमिका रसिकाना आयुष्यभर पुरून उरतात. 'चारुलता'बद्दलही हेंच म्हणतां येईल.

<< बंगाली अभिनेत्री नुसत्याच सुंदर नाही तर नेहमीच विलक्षण बुद्धिमान वाटतात. >> शर्मिलाचा 'नायक' पाहिल्यावर याची खात्री पटते. अर्थात,बौद्धिक झलक दाखवण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक यानी तशी कथानकं सिनेमासाठी निवडणं , ही तर प्राथमिक गरज आहेच !! त्यासाठी बंगाली सिनेमाला व प्रेक्षकाना श्रेय जातंच.

अशोकमामा, सुरेख लेख.
धन्यवाद!!!!

समयोचित लेख, अनेक गोष्टी नव्यानेच कळल्या, धन्यवाद.
आणि कृष्णधवल छायाचित्र काय कातील आहे, खल्ल्लासच >>>>>> हर्पेन +१ Happy

शर्मिलाचा 'नायक' पाहिल्यावर याची खात्री पटते. अर्थात,बौद्धिक झलक दाखवण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक यानी तशी कथानकं सिनेमासाठी निवडणं , ही तर प्राथमिक गरज आहेच !! त्यासाठी बंगाली सिनेमाला व प्रेक्षकाना श्रेय जातंच.>>>> अगदी अगदी सहमत भाऊ. एकंदरीत अभिरुचीलाच बंगालात वरचा दर्जा आहे.

नायक तर नाही पहिलेला, पण शर्मिलाचा 'देवी' बघितल्यावर भारावून गेले होते.

आजचा सुचित्राजींवरचा लोकसत्ताचा अग्रलेखदेखिल वाचण्यासारखा आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/the-magic-of-suchitra-sen-350546/

'सुचित्रा सेन काळाच्या पडद्याआड गेल्या, तरी त्यांच्यातील तारका मनोरंजनाच्या आकाशात तळपतीच राहिली. न दिसताही असे तळपणे फार कमी जणांच्या भाग्यात असते. सुचित्रा सेन या अशा भाग्यवंतांतील.
समाजातल्या प्रत्येकाला आपल्यासारखे व्हायचे आहे, म्हणून आपण त्यांचे देव व्हावे, असे त्यांना कधीही वाटले नाही. म्हणूनच त्यांची मूर्तिपूजा करणाऱ्यांना त्या कधीच प्रसन्न झाल्या नाहीत. बंगालीतल्या चित्रपटविषयक नियतकालिकांमध्येही अभावाने दिसणारी ही नायिका, तरीही प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहिली. अभिनयात आणि जगण्यातही एक प्रकारची अभिजातता सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसती, तर कदाचित असे घडले नसते! '

Pages