खूपसा अंधार आहे आजही माझ्यामधे

Submitted by जयदीप. on 12 January, 2014 - 22:04

तू कधी आलीस तर माझ्या मना भेटून जा
आठवांच्या पाकळ्यांना एकदा घेऊन जा

नेहमी मी जिंकतो अन् नेहमी तू हारशी
नेहमी जिंकू दिले तू, एकदा हरवून जा

काय तू करणार माझ्या आठवांचे सांग ना
आठवांचा त्रास होतो, तू मला विसरून जा

वाळक्या पानाप्रमाणे उडत आहे दूर मी
आसवांच्या पालवीने एकदा बहरून जा

मी कितीदा हाक मारू अन् कितीदा बोलवू
तू तुला वाटेल तेव्हा ये, मला घेऊन जा

मी अता जाणार नाही आठवांच्या त्या घरी
तू अता घरटे नव्याने एकदा बांधून जा

खूपसा अंधार आहे आजही माझ्यामधे
तू तुझा जयदीप माझ्या अंतरी लाऊन जा

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम
शैलीदार
सगळे शेर जोरकस

वाळक्या ऐवजी वाळल्या करू शकता वाळक्या शब्द ह्या गझलेत पुरेसा गोड नाही जरासा तुरट वाटतो

पण सगळेच काफिये त्या त्या शेराना तितके उठावदार बनवत नाही आहेत असे माझे वै म

अजून एक सांगायचं होतं की अनेक शायर गझलेत एकदा आलेला काफिया सहसा पुन्हा घेत नाहीत असे मी पाहिले म्हणजे तसा नियम नसतो पण लोक पाळतात

विसरून बांधून अणि मक्ता खास आवडले

धन्यवाद

गझलकारांनी इतर गझलकारांचे कौतुक करताना आपण वारेमाप स्तुती करत आहोत का ह्याचेही भान ठेवावे असे आपले वाटते मला. (हे त्यांनाही लागू आहे जे माझ्या गझलेची पात्रतेपेक्षा अधिक स्तुती करताना दिसतात). अशी स्तुती केल्याने त्या गझलेत जर काही त्रुटी असतील तर त्या गझलकाराच्या लक्षात येणे राहून जाऊ शकेल.

वरील गझलेच्याच जमीनीत माझी सुरेश भट डॉट इन वर एक गझल असल्याचे 'स्मरते'! 'एकदा येऊन जा तू एकदा येऊन जा'! तसेच, ही गझल रंजिशही सहीप्रमाणेही वाटते.

मात्र गझलेत अजुन सफाई हवी आहे, खयाल गोटीबंदपणे बसतील अश्या वृत्ताची निवड करण्याची हातोटी हवी आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. कृपया गैरसमज नसावा.

जयदीपरावांची माफी मागून माझी जुनी गझल येथे टाकण्याचा मोह पूर्ण करत आहे.

एकदा मी संपण्याआधी मला भेटून जा
एकदा येऊन जा तू, एकदा येऊन जा

ज्या ठिकाणी राहतो दोघे, तिथे माझीच हो
वा जिथे नाहीस तू, तेथे मला घेऊन जा

फारसे काही कुठे मी मागतो आहे तसे?
मी जसा होतो तुझ्याआधी तसा बनवून जा

'एकही नाते मला सांभाळता आले कुठे?'
तू तरी हा डाग माझ्यानावचा मिटवून जा

आजही मी बोलताना शेकडो केल्या चुका
आजही तू ऐकल्यावर त्या चुका विसरून जा

त्यातिथे स्वैपाकपाणी हे तुझे कर्तव्यसे
याइथे अपुली कहाणी, एवढे समजून जा

'बेफिकिर' प्रेमामधे नसते अपेक्षा एकही
हे तुलाही मान्य आहे एवढे कळवून जा

-'बेफिकीर'!

(पूर्वप्रकाशित - सुरेश भट डॉट इन - १७ सप्टेंबर २००९)