बांध

Submitted by उमेश वैद्य on 11 January, 2014 - 08:41

बांधावरती दहिवरलेल्या सांज हिवाळी अलगद उतरे
शिरशिरणाऱ्या पात्यांवर ती पदर धुक्याचा हळूच पसरे
ओढ अनामिक दाटून येइ काय नकळे उगीच मानसी
किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे स्वरहि जवळचे वाटत जाती
तळव्याखाली थंड ओलसर चिखलाचे थर अन् एकटाच मी
तुझ्या स्मृतिंची ये थोडीशी थंड मनाला धगधग कामी
गुढ हासूनी डाव टाकिते सांज मनावर अंधाराचा
सोडुन जाती दिशाही मला प्रवास माझा दिशाहिनाचा
शांतच सारे थंड भासते परी अंतरी खदखद काही
तुझ्या न माझ्या बांधावरल्या जुन्या क्षणांची होते लाही
कोण जवळचे दूर कोणते काही आता समजत नाही
तुझ्या विना हे परके सारे माझे कुणि का वाटत नाही
आनंदाने सांज पुन्हा का हासत आहे गोठवुनी मज
निलज्ज मजला दाखविते ती दूर दिव्यांची सलज्ज कुजबुज
तिथे कुठेसा तुझ्या घराचा दिवा असे का उजळत आता
शुभंकरोती असशी शिकवत तू चिमण्यांसी घेत भोवता
मला न ठाउक की छळते का माझ्या सम ही सांज तुलाही
असे लाभली किंवा तुजला पतिप्रेमाची सुंदर दुलई
येथवरी मी असाच येतो रोज सांजचा या बांधावर
तो ओलांडुन क्षीण पाउले कधी न गेली पुढे आजवर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे कुठेसा तुझ्या घराचा दिवा असे का उजळत आता
शुभंकरोती असशी शिकवत तू चिमण्यांसी घेत भोवता
मला न ठाउक की छळते का माझ्या सम ही सांज तुलाही
असे लाभली किंवा तुजला पतिप्रेमाची सुंदर दुलई
येथवरी मी असाच येतो रोज सांजचा या बांधावर
तो ओलांडुन क्षीण पाउले कधी न गेली पुढे आजवर

फारच सुरेख.. विशेष करून कवितेचा समारोप जसा केलाय तो आवडला

प्रसाद लिमये +१

मला वाटते बोर्करांची ही ह्याप्रकारची एक कविता आहे.. पण मला ही जास्त आवडली.

उमेश वैद्य - कडवी करता येतील का? रसग्रहण करायला मला कडवी मदत करतात असे वाटते.