अंथर

Submitted by अज्ञात on 29 December, 2013 - 01:17

धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर
काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर

लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर
ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर
आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर

…………………………. अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली
अर्थ लवकर लक्षात येत नाहीत पण तुमच्या कवितामध्ये अर्थापेक्षा लयदार शब्दांसाठी वाचल्या जाव्यात अश्या त्या असतात ...म्हणजे माणसाला वाटते की जाऊदेत अर्थ बिर्थ काढायला नकोच वाचून आल्हाद मिळतोय ना तोच घेत राहूयात म्हणून ..त्यामुळे तुम्हाला काय व्यक्त करायचे आहे ह्याकडे लक्षच जात नाही हे घातक आहे
तुम्ही ग्रेसांच्याबिसांच्या प्रभावात आहात का ...असाल तर बाहेर पडा ह्यातून ..लोकानाच काय स्वतालाही समजू नयेत अश्या कविता करून काही उपयोग नाही ..अर्तात तुम्ही काय लिहिलेय ते तुम्हाला समजत असेलच ह्याची खात्री आहे मला ..पण तरीही...
विचार आपणच करावात
सांगीतले हे चुकले असल्यास क्षमस्व
चूक भूल द्यावी घ्यावी

समजुन घेण्याचा एक प्रयत्न...

"धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर"

असफल प्रेमानंतरच्या दीर्घ विरहानंतरची दोघांची एक भेट...ज्या भेटीत जुन्या आठवणी येत आहेत.. थोड्या थोड्या ? किंवा दोघेही एकांतात त्याच आठवणी काढत आहे?

समजल्या सारखी वाटली... आणि आवडलीही !!

वैवकु, आणि किरणजी,

आपला आर्त, उत्कट आणि प्रांजळ अभिप्राय वाचला.

आपल्या मतांचा शतप्रतिशत आदर राखून माझ्या लिखाण प्रक्रियेची मीमांसा आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मी, "प्रस्थापित, तज्ञ, अभ्यासू वा व्यासंगी वाचक नाही त्यामुळे अवांतर कुठलेही दाखले देऊ शकणार नाही. मला माझ्या लिखाणाच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचे समर्थन अथवा खंडनही करायचे नाही. या निमित्ताने आपल्या सौहर्द्पूर्ण अनुभवाचा स्पर्श त्यास व्हावा एवढीच इच्छा आहे म्हणुन हा खटाटोप........... Happy

एके सकाळी साडेपाच वाजता वॉकचे वेळी, ( जो मी आमच्या प्रशस्त गच्चीवर एकटाच घेत असतो) ह्या वर्षीचे पहिलेच दाट धुके पसरलेले मला दिसले आणि ते पाहून त्या वेळी जे विचार मनात आले ते मी त्याच वेळि जसेच्या तसे लिहून काढले आणि म. बो. वर टाकले.

हा माझा माझ्याशी झालेला वैचारिक संवाद आहे. " त्याला कविता म्हणायची की नाही, असलीच तर ती कुठल्या छंदवृत्तात आहे, कुणाला समजेल की नाही, ह्या विचारांवर कुणाचा पगडा आहे, शब्दांची रचना कशी करावी", असा कुठलाच अभ्यास; खरं सांगायचं तर; अशा वेळी घडलेला नाही.

या रचनेवर प्रभाव असलाच तर तो त्या दिवशीच्या माझ्या मानसिक अवस्थेचा, किंवा कांही भूत-वर्तमानातील संवेदनशील संपूर्ण विस्मृतीत जाऊ न शकलेल्या घटनांचा/ अनुभवांचा असू शकतो. बर्‍याचदा कारणांचा शोध घेत निसर्गाशी आपलं साधर्म्य शोधण्याचा माफक प्रयास अथवा अट्टाहास माझ्या विचारांत असतो असं मला नेहमी वाटतं.

ही रचना सुचली त्या दिवशी मला " धुकं आणि चराचर" हे दोघेही कातर झाल्यासारखे वाटाले. अशी अचस्था आपणही कधीतरी अनुभवलेली असल्याची संवेदना मनाला अस्वस्थ करू लागली. माझ्या गतकाळाच्या अनेक प्रतिमा अशाच काळाच्या पडद्याआड धूसर झाल्या असल्याची जाणीव होऊ लागली. त्यांची आजची आठवण म्हणजे शब्दात-वागण्याबोलण्यात उमटलेले प्रतिबिंब वाटू लागले आणि त्यात गुंफलेली वाक्य वा वर्णने सुंदर अल्हाददायक पारदर्शक कांचेची झुंबरे आभासू लागली.

झुंबरांच्या विचार लोलकांमधून, लोप पावलेल्या गोष्टींचे हरवलेले रंग, तरंगू लागले- फिरंगू लागले. आत भूत आणि वर्तमानाच्या द्वैताचे द्वंद्व थैमान घालू लागले आणि संगर पेटले. दुर्लभ झालेल्या सहवासांचे " ते होते की नाही, आधी होते आणि आता नाही, नाही कसे ? आहे अजूनही आहे, दूर आहे पण घनिष्ट आहे, धुसर आहे पण आहे, अंतर आहे म्हणून धूसर आहे." असे असंख्य आशावाद झडू लागले.

पण वस्तुतः असे विचार म्हणजे त्यावेळी मनावर उमललेली (उमटलेली नव्हे) एक रेष असते, जी , पुन्हा कधीही जवळ न येऊ शकणार्‍या समांतरांना (वर्तमान आणि भूत काळांना ) निष्फळ जोडू पहात असते.

माझ्या प्रतिक्रियेस सीरीयसली घेतलेत हा माझा सन्मान समज्तो मी धन्यवाद ह्यासाठी

आपण सांगीतलेला अर्थ नीट वाचून समजून घेण्याचा ..फील करण्याचा प्रयत्न करून कविता पुन्हा वाचली मग आपण काय सांगू पाहिले आहे ते समजले आवडलेही (पण हे सर्व तुमच्याकडून अर्थ सांगीतला गेल्यानंतर झाले )

.आपण अश्याच कचिता का करता किंवा कविता अश्याच का करता हा प्रश्न नव्हता माझा आपण जरा अजून सुलभ सोपे लिहू शकाल काय ..म्हणजे तश्या शैलीतही इतक्याच ताकदीने व्यक्त होवू शकाल काय ...प्रयत्न कराल काय अशी एक रसिक म्हणून विचारणा करून पाहिली होती केवळ
पण असो तुम्हाला जे ज्या प्रकारे लिहून आनंद मिळत असतो तेच करावेत ...
एक मात्र नक्की की मला आपल्या कवितेतील शब्द फार फार आवडतात पहिल्यापासूनच आवडत आले आहेत या कवितेत उलाल असा शब्द आहे त्याचा अर्थ समजला नाही ..अगतिक हा शुद्धलेखनानुसार असाच शब्द आहे का असेही विचारून घेत आहे कारण मी नुकताच एका शेरात अगतिकता हा शब्द वापरलाय आणि कोणी शुद्धलेखनात सूट घेतलीस असे बोल मला लावू नयेत असे वाटत असल्याने मी काळजीत होतो पण इथे अगतिक हा शब्द पाहून जरा हायसेही वाटले
असो
मन मोकळे केल्याबद्दल आभारी आहे
लोभ असूद्यात
धन्यवाद Happy

वैवकु, Happy

खरं तर मी अर्थ सांगितलेला नाहीये. ती ह्या लिखाणाच्या निर्मिती प्रक्रियेमागची कारण मिमांसा आहे. ह्या आशयातून मनुष्यस्वभावानुरूप आणि प्रत्येकाच्या आपापल्या अनुभूतीनुसार अनेक, मला अजिबात अभिप्रेत नसलेलेही, अनेक अर्थ निघू शकतील- निघावेत.

आपण आधी कशी वाचलीत आणि नंतर वाचली तेंव्हा वाचण्यात कांही फरक झाला का? झाला असणार !! कारण कुठलीही कविता लिहितांना जशी लिहिली तशीच वाचल्या गेली तर लवकर समजते असा माझा अनुभव आहे. असो.

आपण अश्याच कचिता का करता किंवा कविता अश्याच का करता हा प्रश्न नव्हता माझा आपण जरा अजून सुलभ सोपे लिहू शकाल काय ..................................
मी "कविता करण्याच्या" प्रेमात पडत नाही. मात्र एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ती जशी सुचते तशी "मांडून" ठेवतो. अशी प्रतिमा माझ्या संवेदनांची आकृती जरूर असते पण त्यात गुंफत जाणार्‍या शब्दांवर माझा ताबा नसतो. शब्द संपदा माझीच असते परंतु कोणता शब्द केंव्हा कुठे कसा नेमका ठेवायचा यावर माझे नियंत्रण नसते. ते काय आहे ह्याचं मलाही कुतुहल आहे.

मी घेतलेलं "अज्ञात" नांव ही विनम्रता किंवा "बचावाची ढाल" नसून सुचविणार्‍या प्रेरणेची "संज्ञा" आहे. लिहिणारा मी असलो तरी "सूचक" मला अज्ञात आहे. म्हणून मी कुठल्याही टीकेला "प्रत्युत्तर" देत नाही वा कधीतरी कुणी केलेल्या कौतुकाने हुरळून जात नाही. उलट त्यातून मला नवीन कुठला अर्थ उलगडल्या जात असेल तर तो हवा असतो.

वैवकु, आपण ह्या चर्चेला इतका वेळ दिलात ह्याचाच अर्थ "लोभ" आहे. Happy तो वृद्धिंगत होऊ द्या.

"उलाल" ह्याचा मला अभिप्रेत अर्थ "उललेली", "अचानक उमललेली", "अनपेक्षित समोर आलेली", असा आहे.