हे आणि ते - २: सुशिक्षित आणि सुसंस्कृत

Submitted by चायवाला on 28 December, 2013 - 03:57

लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.

पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्‍याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी
कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.

त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.

२८.१२.२०१३
मार्गशीर्ष कृ. ११.सफला स्मार्त एकादशी, शके १९३५

--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार
--------------------------------------------------------------------------------------
लेखातील चित्रे फक्त सादरीकरणाच्या सोयीसाठी आहेत.
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! लेखकु. छान लिहील आहे.... तुझे बाबा म्हणतात ते खर आहे सुशिक्षित असण आणि सुसंस्कृत असण यात खूप फरक आहे. अगदी उच्चशिक्षितांकडुनही असुसंस्कृतपणाचे नमुने बघायला मिळतात....

चांगला आहे लेख....

मला स्वतःला मी जळगाव मुक्कामी असताना शेजारी रहाणार्‍या पाटीलकाकांच्या घरचा पुस्तकाचा खजीना मी त्यांच्याकडून आणलेल्या पहिल्या पुस्तकाला परत देताना असेच कव्हर घालून दिल्यावर माझ्याकरता खुला झाला होता.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं हे मात्र अगदी खरे आणि त्याचा प्रत्यय हरघडीला अन्य वेगवेगळ्या प्रकारेही येतच असतो.

हा दुसरा लेख जास्त आवडला. मला पुस्तकात पेन्सिलने लिहिणारे, पुस्तकं दुमडून वाचणारे, पानं पलटताना थुंकी लावणारे. पुस्तकांवर खुणा करणारे, बूकमार्क म्हणून पानाचे कोपरे घडी घालणारे असल्या सर्व लोकांचा मनापासून तिरस्कार आहे.
असल्यांना फार तर साक्षर किंवा अक्षर ओळख असलेलं म्हणावं. सुशिक्ष्हित ही पण फार मोठी पदवी त्यांच्यासाठी.

उत्तम लेख आहे.

मला पुस्तके वाचतांना आवडलेल्या वाक्यांना, महत्वाच्या संदर्भांना पेन्सिलने खुणा (अंडरलाईन) करण्याची सवय आहे. (अर्थात हे मी फक्त स्वतःच्या विकत घेतलेल्या पुस्तकांतच करतो, दुसर्‍यांकडून वाचायला आणलेल्या किंवा ग्रंथालयांच्या पुस्तकांना नाही.) शैक्षणिक अभ्यास करतांना अशी सवय लागली, ती पुढे कायम राहिली. यात काही 'असंस्कृत'पणा असल्यास कल्पना नाही. Happy

लेख जितका चांगला तितकेच "...सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं ...." ह्या एका अस्सल वाक्याने मनी निर्माण झालेले सामाजिक मतही तितकेच महत्वाचे मानले जावे. दरवाजावर एम.ए.; पीएच.डी. ची पाटी लावली म्हणजे ती व्यक्ती निश्चित्तच सुशिक्षित मानली जाते; पण त्या व्यक्तीच्या अंगी सुसंस्कृतपणा किती भरला आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेणाराच साक्ष देवू शकतो. अत्यंत हुशार नातेवाईक असलेला मुलगा पुस्तकावर स्पेलिंगच्या रांगोळ्या काढतो आणि जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात पुस्तक परत करतो तर दुसरीकडे वर वर अशिक्षित वाटणारा दुसरा गृहस्थ पुस्तकाला कव्हर घालून ते परत करतो म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतीलच असे नसते.

विचार आवडले. सुसंस्क्रुत असणे अधिक महत्वाचे आहे. मी अमेरिकेत राह्ते. अलिकडे काही नातलग, सुशिक्शित असूनही असंस्क्रुतपणे वागले. म्हणे काय तर "आम्ही तुला ख्रिस्मस पार्टीला बोलवत नाही. पण आमची पार्टी झाली की आम्ही तुझ्याकडे दोन दिवस पाहुणचाराला येऊ." लग्नाला ४४ वर्शे झालेल्या नणदेने काय असे वागावे? मी सध्या एकटी आहे हे माहीत असूनही?

वेगळाच अनुभव.

शाळा, कॉलेजात मात्र मी स्वतः क्रमिक पुस्तकावरच पेन्सिलने नोट्स लिहित असे. ती पुस्तके पुढे ज्यांना मिळाली त्यांचा फायदाच झाला असेल.
पण बोटांना थुंकी लावून पाने उलटणार्‍यांचा ( तसेच नोटा मोजणार्‍यांचा ) मला संताप येतो.

चांगले अनुभवकथन.

लोक अंतर्मुख होऊ शकतील आणि त्यांच्या सवयीत बदल करू शकतील.

माझ्या सवयीबाबत,

कमवता झाल्यापासून मी मला वाचायला हवी असलेली पुस्तके स्वतः घेऊ शकत आहे.

वाचताना खुणेसाठी पानाचा कोपरा दुमडणे, पेन्सिलीने खुणा(अंडरलाईन) करणे ह्या प्रकारांचा मला राग येतो. मी स्वत:ही तसे करीत नाही त्यामुळे माझ्याकडचे एकही पुस्तक कुणाला वाचायला द्यायला मला अजिबात आवडत नाही.

हा लेख छान आहे. ह्यावर सविस्तर लिहावेसे वाटत आहे. काही वेळाने लिहिण्याचा प्रयत्न करेन. ठळकपणे तीन मुद्दे जाणवले.

१. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे / नसणे

२. दुसर्‍याची पुस्तके नेणे, त्यांचा वापर व ती वेळेवर परत करणे

३. ह्या लेखातील प्रमुख मुद्दा आयुष्यातील अनेकविध बाबींना कसा लागू पडतो ते बघणे

विषयाच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात आली आहे. वर लेखकाने "फ्लिपकार्ट" सेवेचा चांगला उल्लेख केला आहे. हे लोक पुस्तकांच्या संदर्भातील सेवा देताना सोबत "वाचनखूण" उपयोगासाठी आपली वा प्रकाशकाची एक कार्डपट्टी देतात. ती पुस्तकात असतेच त्यामुळे ज्या क्षणी पुस्तकातील अमुक एक भाग वाचून झाला की तेथील पान दुमडून न ठेवता ती खूण तिथे ठेवल्यास पुस्तक पानांची काही हानी होत नाही.

आपल्याकडील मौज, मॅजेस्टिक, पॉप्युलर आदी प्रकाशक तशी बांधीव रेशीमधाग्याची सोबत देतात पण केवळ प्रतिष्ठित लेखकांच्या पुस्तकासोबतच.

मला पुस्तकाची हेळसांड केली की प्रचंड चीड येते. अगदी माझ्या स्वतःच्या पुस्तकातही कधी नोटस्/अधोरेखीत करणे हे प्रकार केले नाही. मी ७५% किमतीत घेतलेली जुनी पुस्तके अगदी त्याच किंमतीत विकल्या जातील इतकी चांगली असायची Happy
पण त्यामुळे आता रिसर्च पेपर्सवर नोटस/ अधोरेखन वगैरे अगदी पिडीएफ कॉपीतही होत नाही. Happy

साक्षर, सुशिक्षीत आणि सुसंस्कृत असण्याचा फारसा संबंध असावा असं वाटत नाही.

१. आपण लहानपणापासून सुशिक्षित व सुसंस्कृत असे दोन शब्द स्वतंत्रपणे व जोडीने असे अनेकदा ऐकलेले आहेत. ते एकत्रीतरीत्या ऐकण्याची वेळ येते तेव्हा सहसा सुशिक्षित हा शब्द नकारात्मक भावनेने वापरला गेल्याचे आठवते. म्हणजे 'हे लोक सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत नाहीत' अश्या शैलीने! हा लेख वाचून मनात असा विचार आला की आपल्यावर मुळात अशी वेळच का यावी की हे दोन शब्द जोडीने वापरावेत व सुशिक्षित हा शब्द नकारार्थी वापरावा लागावा? ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे मिळणारे शिक्षण हे विद्यार्थ्याला पदवी व रोजगार मिळण्यास पात्र बनवू शकते पण सुजाण बनवेलच असे नाही किंवा बनवत नाही. हल्ली काही शाळा नव्या धर्तीवर 'आम्ही सुजाण नागरीक घडवतो' असे स्वतःबद्दल सांगताना दिसतात व तेथील विद्यार्थ्यांचे पालकही शाळेच्या त्या शिक्षणपद्धतीबाबत समाधानी दिसतात आणि भरभरून बोलताना आढळतात. हा नवा प्रवाह अजुनही नवा व शाळेसाठी व्यावसायिकदृष्ट्या किंचित साहसीच ठरतो. ह्याचा दुसरा अर्थ असा की स्वातंत्र्य मिळाल्यापासून (ह्याचा पक्षीय राजकारणाशी संबंध नाही) शिक्षणातून सुजाण नागरीक घडावा ह्यावर बहुधा पुरेसे किंवा अजिबात प्रयत्नच झालेले नसावेत. पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापणे आणि शाळेत सर्वत्र सुविचार लिहिणे ह्यातून कोणी आपोआप सुजाण होईल व तेही सध्याच्या वेगाने बदलणार्‍या संस्कृतीत; ही अपेक्षा चुकीची वाटते. थोडक्यात, एक राष्ट्र म्हणून आपण शिक्षण शाळाकॉलेजांवर व संस्कार पालकांवर सोडलेले दिसतात. ज्याच्यावर जसे संस्कार होतील तसा तो घडेल अशी ही भूमिका थोडी धोकादायकच आहे व आपण सगळेच त्याच साच्यातून निघालेलो आहोत.

२. दुसर्‍याची पुस्तके नेतानाचा उत्साह हा बहुतेकदा 'आता काहीतरी फ्रेश किंवा आवडीचे मस्तपैकी वाचायला मिळेल' ह्यातून आलेला असतो आणि पुस्तके परत देण्यातील निरुत्साह हा 'नुसते पुस्तक परत देण्यात काय वेळ घालवायचाय, बघू नंतर' ह्यातून आलेला असतो. हा निरुत्साह निर्माण होऊ नये म्हणून पुस्तक देतानाच अती स्पष्ट बोलणे आवश्यक असले तरीही ते टाळावेसेच मनात येते कारण आपण कोणाला दुखावू इच्छित नसतो. मात्र ज्या वस्तूंवर आपले खरे प्रेम आहे त्यांच्या वापराबाबत सुस्पष्टपणे अपेक्षा नोंदवणे व अपेक्षाभंग झाल्यास काय परिणाम होतील ह्याचीही कल्पना देणे हे मी हल्ली हळूहळू शिकत आहे. विशेषतः लहान मुले कश्यालाही हात लावतात व कोणतीही वस्तू कशीही वापरू लागतात तेव्हा मी आधीच्या माझ्या स्वभावात बदल करून हल्ली त्यांच्या पालकांसमोर त्यांना स्पष्टपणे ठणकावतो की ही वस्तू अशी वापरणे अपेक्षित नाही. असे करणे शिकण्याचे कारण म्हणजे पालक आश्चर्यकारकरीत्या हे शिकलेलेच नसतात की त्यांनी हे त्यांच्या मुलांना शिकवायला हवे आहे. (माफ करा, विषयांतर होईल, पण या लेखमालिकेतील पहिल्या भागात लेखकुंनी स्वतःची मुले कोणाच्या घरी असे प्रकार करत असताना वाचून मला वाईट वाटले. अश्यावेळी सरळ मुलांना घेऊन तेथून बाहेर पडायला हवे असे माझे अतिशय खासगी मत आहे व लेखकु हे माझे मित्र असल्याने हे येथे नोंदवताना माझ्या मनावर दडपण नाही. तरीही आगाऊ माफी मागतो).

३. पुस्तके हा एकच विषय नाही. आयुष्यातील प्रत्येक पावलाला आपला दुसर्‍याशी काही ना काही संबंध येऊ शकतो. अश्यावेळी आपण किती टक्के वेळा सुसंस्कृतपणे वागतो, सुसंस्कृतपणाची सर्वमान्य अशी काही व्याख्या आपल्याला मान्य असते काय, ह्या सर्वावर विचार केला तर असे दिसते की सुसंस्कृतपणा हा अनेकांच्या बाबतीत 'रक्तात भिनलेली एक बाब नसून' 'आचारविचारांवर संस्कृतीने लादलेली एक बाब' असल्यासारखे लोक वागताना दिसतात. एकुणच ऐकीव माहितीनुसार इतर अनेक देशात आभार मानणे, सॉरी म्हणणे ह्या क्रिया करतानाची त्या लोकांची देहबोली समोरच्याला स्पष्टपणे संदेश देते की 'दे मीन इट'! उलटपक्षी आपण ह्या गोष्टी मुळीच न केल्या जाण ए हे तर कित्येकदा अनुभवतोच पण केल्या गेल्या तरी जणू आपल्यावरच उपकार केले जात आहेत अश्या प्रकारे केल्या गेलेल्या अनुभवतो. ह्याचे मूळ आपला समाज एकुणच मागासलेला असण्यात आहे व हे मागासपण पुन्हा शिक्षणाच्या अभावातूनच आलेले आहे. (उदाहरणार्थ बसमधून बाहेर थुंकणारे शंभर लोक घेतले तर त्यातील पंचाण्णव लोक अतिशय कमी किंवा न शिकलेले असतात व त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून दिली तर 'तुमच्या अंगावर उडलंय का' असे विचारतात). म्हणजेच, नुसतेच शाळा कॉलेजांमधून संस्कारहीन शिक्षण मिळते असे नव्हे तर जे शिक्षण मिळते तेही धड नसते व प्रभावी नसते असे दिसते. स्वच्छतेबाबत व सुरक्षेबाबतची दक्षता, कायदे व नियम पाळणे हे काही फक्त संस्कार नसून ते शिक्षणात ठसवले जाणारे विषयही असायला हवेत व प्रभावीपणे शिकवले जायलाही हवेत.

एकुण, विचारांना चालना देणार्‍या ह्या लेखामुळे आपल्या समाजाच्या विचारांमधील क्लिष्ट गुंतागुंत पुन्हा समोर येऊन गरगरलेच.

प्रतिसाद लांबल्याबद्दल व अवांतर लेखन झाले असल्यास दिलगीरी!

-'बेफिकीर'!

Proud

ज्ञानेश | 28 December, 2013 - 17:21
ज्ञानेश, आपल्याशी सहमत. स्वतःच्या पुस्तकांवर खुणा करण्यात काहीच चूक नसावी, कारण शेवटी ती आपली वस्तू असते. त्या बाबतीत ज्याची त्याची मर्जी असेच असावे. माझा रोख दुसर्‍यांकडून आणलेली वस्तू - इथे पुस्तक हा विषय आहे म्हणून पुस्तके - जबाबदारीने वापरून जशीच्या तशी परत करण्यासंबंधाने आहे. धन्यवाद Happy

बेफ़िकीर | 29 December, 2013 - 13:26
विवेचन आवडले. पुन्हा वाचून विचार करण्यासारखे. धन्यवाद. Happy

पुस्तकाबद्दल प्रत्येक जण कसा विचार करतो आणि त्याबद्दल एखाद्याचे सेंटीमेंटस कसे असतील यावर हे अवलंबून आहे. जर कोणी पुस्तकाला विद्या सरस्वती म्हणून दर्जा देत असेल तर तो त्याची तशी देखभाल घेणार, तसेच जर कोणी एक मनोरंजनाची वस्तू म्हणून बघत असेल तर तो तसेच हाताळणार, जसे आपण मोबाईल वापरतो, घरी आल्यावर काढला खिशातून आणि फेकला बेडवर.. त्यामुळे पुस्तक कसे वापरावे हे व्यक्तीसापेक्ष झाले, अन यात फार कोणी चूक किंवा बरोबर असे मला तरी नाही वाटत..

हो, पण तेच जर दुसर्‍याचे असेल, तर मात्र ते पुस्तक असो वा कोणतीही गोष्ट, ती बेदकारपणे वापरणे नक्कीच सुसंस्कृतपणात बसत नाही.

लेखात पुस्तकांचाच उल्लेख प्रामुख्याने केला म्हणून त्यावरच टिप्पणी, मात्र एकंदरीत सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे या दोन भिन्न गोष्टी याला अनुमोदनच.

छान लेख.

मला पुस्तकात पेन्सिलने लिहिणारे, पुस्तकं दुमडून वाचणारे, पानं पलटताना थुंकी लावणारे. पुस्तकांवर खुणा करणारे, बूकमार्क म्हणून पानाचे कोपरे घडी घालणारे असल्या सर्व लोकांचा मनापासून तिरस्कार आहे.>> हज्जारवेळा अनुमोदन

Pages