शेवटची कविता

Submitted by रसप on 27 December, 2013 - 03:56

कधी लिहिलं गंमत म्हणून
कधी लिहिलं सवय म्हणून
कधी लिहिलं गरज म्हणून
उद्या लिहिन ओळख म्हणून

कधी कधी वाटतं..
काय मागे राहतं?
चेहरा, आवाज की नाव?
माझ्या मागे राहतील
फक्त माझे शब्द
असेच.. उगाच.. सहज सुचलेले
वेळ होता म्हणून लिहिलेले
लिहिता लिहिता अजून सुचलेले
वेळ नव्हता, पण तरीही लिहिलेले

नसानसांत भिनली कविता
क्षणाक्षणात दिसते कविता
चार श्वास कमी दे मला
त्याच्या बदल्यात दे एक कविता

सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर
दोन शब्द लिहून जाईन
आणि अनंताच्या वाटेवर
माझी दोन पावलं उमटतील

तीच असेल शेवटची कविता
खरीखुरी.. सर्वस्व वाहिलेली
वेळ नसेल, तरीसुद्धा लिहिलेली.....

....रसप....
२५ जून २०११
http://www.ranjeetparadkar.com/2011/06/blog-post_26.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर >>>>>>>> जबरदस्त लिहिलंस रे ....